How Does Smoking Affect Your Health: अनेक व्यक्तींना असे वाटते की, अधूनमधून धूम्रपान करणे, जसे की सामाजिक कार्यक्रमांमध्ये, आठवड्याच्या शेवटी किंवा तणावाच्या काळात सिगारेट ओढणे आरोग्यासाठी फारसे धोकादायक नसते. मात्र, वैद्यकीय आकडेवारीनुसार, तंबाखूचा कोणताही वापर व्यक्तीच्या आरोग्यासाठी तितकाच धोकादायक असतो, मग तो दररोज केला जात असो किंवा केवळ पार्टी किंवा सामाजिक प्रसंगी. डॉ. अरविंद बडिगेर, Technical Director, BDR Pharmaceuticals यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

अधूनमधून धूम्रपान करणेही हानिकारक का?

हृदयावर तत्काळ परिणाम होतो

धूम्रपानामुळे हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. संशोधनानुसार, हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका हा कधीही तंबाखूचा वापर न केलेल्या व्यक्तींपेक्षा अधूनमधून धूम्रपान करणाऱ्यांमध्ये अधिक लक्षणीय प्रमाणात असतो.

कर्करोग अपेक्षेपेक्षा लवकर विकसित होऊ शकतो

तंबाखूच्या धुरामध्ये ७,००० हून अधिक विषारी रसायने असतात, ज्यांपैकी अनेक कर्करोग निर्माण करणारी (कार्सिनोजेन्स) मानली जातात. त्याचा अर्थ अधूनमधून होणारा संपर्कसुद्धा डीएनएमध्ये बदल घडवू शकतो, ज्यामुळे फुप्फुस, तोंड, घसा, मूत्राशय, स्वादुपिंड आणि इतर अवयवांच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

तुमच्या फुप्फुसांना ‘सुरक्षित विश्रांती’ मिळत नाही

अनेक सोशल स्मोकर्सना असे वाटते की, दोन सिगारेटमधील अंतर फुप्फुसांना सावरण्यासाठी पुरेसे असते. मात्र वास्तव हे आहे की, प्रत्येक सिगारेटसोबत अधिक विषारी पदार्थ शरीरात जातात, जे श्वसनमार्गांना त्रास देतात, फुप्फुसांची क्षमता कमी करतात आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD)सारख्या आजारांचा धोका वाढवतात.

नकळत निकोटीनचे व्यसन लागू शकते

सुरुवातीला सोशल स्मोकिंग निरुपद्रवी वाटू शकते. मात्र, कालांतराने निकोटीनचे व्यसन हळूहळू वाढते आणि व्यक्ती नकळत नियमित धूम्रपान करणारी बनू शकते.

धूम्रपानामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते

तंबाखूच्या वापरामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्यांना आजार पटकन होण्याची शक्यता वाढते आणि जखमा भरून येण्याची प्रक्रियादेखील मंदावते.

धूम्रपान कसे सोडावे?

  • सिगारेट किंवा इतर तंबाखूजन्य पदार्थ सहजपणे उपलब्ध होणार नाहीत याची काळजी घ्या.
  • धूम्रपानाची सवय वाढवणारे ट्रिगर्स ओळखा आणि पर्यायी योजना तयार करा.
  • तणाव आणि धूम्रपानाची इच्छा नियंत्रित करण्यासाठी नियमित व्यायाम करा.
  • धूम्रपान सोडण्यात अडचण येत असल्यास तज्ज्ञांची मदत घ्या.
  • डॉक्टरांचा सल्ला न घेता, कोणतेही धूम्रपान बंद करण्याचे साधन किंवा औषध वापरू नका.
  • सुरुवातीच्या काळात धूम्रपान करणाऱ्यांच्या सामाजिक वातावरणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
  • धूम्रपान कमी करणे उपयुक्त असले तरी ते पूर्णपणे सोडल्यामुळे मिळणाऱ्या आरोग्य फायद्यांशी त्याची तुलना होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा.

धूम्रपान आणि त्याच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबतचा सर्वांत मोठा गैरसमज म्हणजे अधूनमधून धूम्रपान करणे सुरक्षित आहे, ही धारणा. प्रत्यक्षात, प्रत्येक वेळी धूम्रपान केल्यावर विषारी पदार्थ शरीरात प्रवेश करतात आणि हृदय, फुप्फुसे, रक्ताभिसरण प्रणाली तसेच रोगप्रतिकारक शक्तीवर विपरीत परिणाम करतात. चांगली गोष्ट म्हणजे एकदा धूम्रपान सोडल्यानंतर शरीर स्वतःची दुरुस्ती करण्यास सुरुवात करते. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी सर्वांत शहाणपणाचा निर्णय म्हणजे धूम्रपानाला पूर्णपणे नकार देणे.