Tuberculosis Symptoms And Treatment : एक काळ असा होता जेव्हा क्षयरोग हा एक असाध्य आजार होता, ज्यामुळे असंख्य लोकांचा मृ्त्यू झाला. पण, आज क्षयरोगावर चांगले उपचार उपलब्ध आहेत. हा संसर्गजन्य रोग ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस’ नावाच्या जीवाणूंमुळे होतो. क्षयरोगाचा प्रामुख्याने फुप्फुसांवर दुष्परिणाम होतो आणि हळूहळू तो शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो. भारतात दरवर्षी याचे अनेक रुग्ण आढळतात.
या आजारावर उपचार करण्यासाठी सरकार मोफत औषधोपचार योजना आणि अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध करून देते. पण, हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो का? लोक उपचार का सोडून देतात, याविषयी डॉक्टरांकडून जाणून घेऊ…
दिल्लीतील जीटीबी हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागातील डॉ. अजित कुमार सांगतात की, जर क्षयरोगाचा रुग्ण सहा ते नऊ महिने नियमितपणे औषधोपचार घेत असेल, तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. काही रुग्णांना अधिक काळ उपचार घ्यावे लागू शकतात; परंतु त्यांनी आवश्यक त्या कालावधीपर्यंत उपचार पूर्णपणे घेणे अत्यावश्यक आहे. पण, बऱ्याच प्रकरणांमध्ये असे घडत नाही. उपचार सुरू केल्यानंतर काही आठवड्यांतच रुग्णाची लक्षणे आणि अशक्तपणा कमी होऊ लागतो. त्यामुळे रुग्णाला वाटते की, आपण बरे झालो आणि आता औषधोपचार घेण्याची गरज नाही. पण, उपचार अर्धवट सोडून देणे ही त्या रुग्णांकडून झालेली सर्वांत मोठी चूक ठरते.
क्षयरोगावरील उपचार मधेच का सोडू नयेत?
डॉ. कुमार सांगतात की, क्षयरोगाचे अनेक रुग्ण आराम वाटू लागताच औषधोपचार बंद करतात; पण असे उपचार मधेच सोडणे ही सर्वांत मोठी चूक आहे, ज्यामुळे रोगावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा येतो. जे रुग्ण उपचार बंद करतात, त्यांच्यातील जीवाणू पूर्णपणे नष्ट होत नाहीत आणि काही काळानंतर ते पुन्हा सक्रिय होतात, ज्यामुळे रोग नियंत्रणाबाहेर जातो. रुग्णाला वाटू शकते की, तो बरा झाला आहे; पण तो संक्रमित अवस्थेत असतो आणि इतरांमध्येही रोगाचा प्रसार करतो.
डॉ. कुमार सांगतात क्षयरोगाच्या उपचारांचा संपूर्ण कोर्स पूर्ण करणे, दररोज वेळेवर औषधे घेणे आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या आहाराचे पालन करणे गरजेचे आहे. क्षयरोगाच्या बाबतीत लोकांनी निष्काळजीपणा टाळला पाहिजे.
कोणत्या लक्षणांबद्दल सतर्क राहणे गरजेचे?
१) दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला
२) श्लेष्मा किंवा रक्त
३) सतत ताप आणि घाम येणे
४) जलद वजन कमी होणे
