यूकेमधील एका रेस्तराँला जगातील सर्वोत्कृष्ट रेस्तराँचा मान मिळाला आहे. कुंब्रियामध्ये असलेल्या ‘ओल्ड स्टॅम्प हाऊस’ या रेस्तराँने ट्रिपॅडव्हायझरच्या 2-21 ट्रॅव्हलर्स चॉईस ‘बेस्ट ऑफ द बेस्ट’ रेस्तराँ अवॉर्ड्समध्ये (Tripadvisor’s 2-21 Travellers’ Choice ‘Best of the Best’ Restaurants awards) पहिला स्थान पटकावलं आहे. या मिशेलिन-तारांकित  रेस्तराँने उत्कृष्ट जेवण आणि डेट नाईट या २ विभागांसाठी हा पुरस्कार जिंकला आहे. द इंडिपेन्डंटच्या मते, हे  रेस्तराँ आपल्या दर्जेदार ब्रिटीश खाद्यपदार्थासाठी ओळखलं जातं. त्यात ब्लॅक पुडिंग ‘बॉन बॉन्स’ आणि कुंब्रियाच्या वेस्ट कॉस्टमधील प्रसिद्ध क्रॅब यांसारख्या खाद्यपदार्थाचा समावेश होतो. हेड शेफ रायन ब्लॅकबर्न यांनी २०१४ मध्ये सुरु केलेल्या या रेस्तराँमध्ये एकावेळी २८ लोक बसू शकतात. विशेष म्हणजे या रेस्तराँमधील खाद्यपदार्थांमध्ये अमेरिकन, कॅरिबियन आणि भारतीय पाककृतींचा समावेश असतो.

एक अद्वितीय खाद्यसंस्कृती!

‘ओल्ड स्टॅम्प हाऊस रेस्तराँ’च्या वेबसाईटवरील माहितीनुसार, “दीर्घ काळापासून प्रभावित असलेल्या एका अद्वितीय खाद्य संस्कृतीचं या माध्यमातून दर्शन घडतं. अनेकांना याबाबत कल्पना नसेल परंतु या खाद्यसंस्कृतीवर अमेरिका, कॅरिबियन आणि भारतासोबतच्या समुद्री व्यापाराचा मोठा प्रभाव आहे.”

“पारंपरिक कुंब्रियन डिशेसमध्ये बाहेरच्या देशांमधून आयात केलेल्या मसाल्यांचा भरपूर प्रमाणात वापर असतो. मिरपूड, जावित्री, आलं, साखर आणि रम हे त्यांपैकीच काही पदार्थ आहेत. हे सर्व पदार्थ व्हाईटहेव्हन आणि मेरीपोर्टच्या ऐतिहासिक किनाऱ्यावरील बंदरांतून या किनाऱ्यावर आणले गेले आहेत”, असेही या रेस्तराँच्यावेबसाईटवरील माहितीत म्हणण्यात आलं आहे.

दरम्यान सध्या करोना महामारीमुळे आपल्या व्यवसायावर झालेल्या परिणामाबद्दल बोलताना,  ट्रिपॅडव्हायझरच्या हॉस्पिटॅलिटी सोल्यूशन्सचे जनरल मॅनेजर मार्टिन व्हर्दोन-रो यांनी असं म्हटलं आहे की, “गेल्या वर्षभरात रेस्तराँ उद्योगाला मोठा फटका बसला ह्यात काही आश्चर्य नाही. परंतु. चांगली बातमी अशी आहे की आता जगभरातील खवय्ये पुन्हा एकदा विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी पूर्वीपेक्षा प्रचंड प्रमाणात उत्सुक आहेत.