Best Foods for Vision: वय वाढत असताना डोळ्यांची प्रकाशदृष्टी मंदावत जाणे ही स्वाभाविक बाब मानली जाते. परंतु, आजकाल चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार व सततचा ताण यांमुळे ही समस्या अधिक वेगाने वाढताना आढळते. अनेकांना तर इतपत अडचण जाणवते की, सकाळचं वर्तमानपत्र उघडताना अक्षरांऐवजी फक्त काळे ठिपके दिसतात आणि मोबाईलवरील प्रत्येक संदेश धूसर दिसू लागतो. काही वेळा तर दृष्टी झपाट्याने कमी होऊन दिवसेंदिवस वाचन, लेखन आणि दैनंदिन कामे करणे कठीण होते.

डोळ्यांची दृष्टी कमी होण्यात वाढते वय, आहारातल्या जीवनसत्त्वांची कमतरता, सूर्यप्रकाशातील तीव्र किरणे, ताणतणाव, मधुमेह, रक्तदाब अशा अनेक कारणांचा समावेश होतो. तसेच डोळ्यांना झालेली दुखापत, संसर्ग, मोतीबिंदू, काळा मोतीबिंदू अशा व्याधीही दृष्टी अस्थिर करू शकतात. या साऱ्या समस्यांमुळे अनेकांना वाटते की, आता चष्मा किंवा औषधांशिवाय जगणे अशक्य आहे; पण तसे नाही!

एआयआयएमएसचे माजी सल्लागार व साओल हृदय केंद्राचे संस्थापक डॉ. विमल झांझर यांनी सांगितले की, योग्य आहारातून मिळणारे काही घटक डोळ्यांच्या पेशींना पोषण देतात आणि दृष्टीला पुन्हा नवसंजीवनी देतात. योग्य आहार पाळल्यास दृष्टी मंदावणे रोखता येते आणि चष्म्यावरील अवलंबित्वही कमी करता येते. खालील ५ उपायांचा सातत्याने अवलंब पाळल्यास तुमची दृष्टी पुन्हा निर्मळ होऊ शकते.

आहारातील ‘हे’ ५ पदार्थ तुमची दृष्टी पुन्हा तल्लख करतात!

१) रोज एक गाजर खा

गाजरामध्ये भरपूर प्रमाणात ‘बीटा-कॅरोटिन’ असते. शरीरात गेल्यानंतर ते ‘अ’मध्ये परिवर्तित होते, जे निरोगी दृष्टीसाठी अत्यावश्यक समजले जाते. ज्यांची दृष्टी वेगाने धूसर होत आहे अशा व्यक्तींनी रोजच्या आहारात एका गाजराचा अवश्य समावेश करावा. केवळ काही दिवसांतच डोळ्यांची क्षमता सुधारू लागते.

२) हिरव्या पालेभाज्यांचा नियमित समावेश

डोळ्यांच्या रक्षणासाठी ‘ल्युटीन’ व ‘झेक्सॅन्थिन’ हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे घटक पालक, मेथी, ब्रोकोली, सिमला मिरची आणि इतर हिरव्या पालेभाज्यांमध्ये विपुल प्रमाणात आढळतात. हे घटक डोळ्यांना अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण देतात आणि दृष्टीची गुणवत्ता सुधारतात.

३) अंड्याचा नियमित आहार

अंड्यात प्रथिने, ‘अ’, ‘ड’ ही जीवनसत्त्वे आणि ओमेगा-३ तेल हे घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यातही ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे घटक दृष्टीसाठी अमूल्य मानले जातात. दिवसभर काम करणारे, स्क्रीनसमोर बराच वेळ घालवणाऱ्या व्यक्तींनी रोज एक अंडे जरूर खावे, त्यामुळे डोळ्यांचा थकवा कमी होतो आणि दृष्टिदोष लांब काळपर्यंत दूर राहतो.

४) विशेष फळांचा आहार

किवी आणि संत्र्यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये ‘क’ जीवनसत्त्व आणि उपयुक्त प्रतिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. ही फळे डोळ्यांच्या पेशींना बळकटी देतात आणि वृद्धत्वामुळे कमी होणाऱ्या दृष्टीवर नियंत्रण ठेवतात. ज्यांची वाचताना अचानक धूसर दिसू लागल्याची तक्रार आहे, त्यांनी या फळांचा नियमित आहारात समावेश करावा.

५) सुका मेवा आणि बियांपासून मिळणारे पोषण

अक्रोड, बदाम, पिस्ता, काजू आणि चिया बिया यांमध्ये ओमेगा-३ तेल, ‘ई’ जीवनसत्त्व, ल्युटीन व झेक्सॅन्थिन हे घटक मुबलक प्रमाणात असतात. हे सर्व घटक डोळ्यांच्या पेशींना पोषण देतात, रक्तप्रवाह सुधारतात आणि दृष्टीची शक्ती वाढवतात, त्यामुळे रोज थोडा सुका मेवा आणि एक चमचा चिया बिया यांचे सेवन केल्यास तुमची दृष्टी हळूहळू सुधारू शकते.

धूसर दृष्टी ही फक्त वयानुसार येणारी समस्या नाही, तर तुमचा आजचा आहार आणि जीवनशैली भविष्यातील दृष्टी ठरवते. रोजच्या आहारात हे ५ पदार्थ नियमितपणे समाविष्ट केले तर धूसर दिसणारी अक्षरे पुन्हा स्पष्टपणे दिसू लागतील.

डोळ्यांची काळजी घ्या, कारण जग पाहण्याचा प्रत्येक क्षण अनमोल आहे.