Worst Combination With Oranges: थंडीची सुरवात होताच संत्र्याची बाजारातील विक्री वाढली आहे. आपल्यापैकी काही जण सुद्धा अगदी आवडीने संत्र्याचे सेवन करतात. संत्रं आरोग्यदायी आणि पौष्टिक फळ आहे हे नाकारता येणार नाही, परंतु तुम्हाला माहित आहे का की काही ठराविक पदार्थ संत्र्यासह एकत्रित खाल्ल्यास त्याचे फायदे कमी उलट नुकसानच होऊ शकते. संत्र्यामध्ये सायट्रिक ऍसिड आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे ते रोगप्रतिकारक शक्ती आणि चयापचयसाठी खूप कामी येते. परंतु काही पदार्थांसह संत्री एकत्रित खाल्ल्याने अपचन, ऍलर्जी, अस्वस्थता किंवा छातीत जळजळ होऊ शकते. आज आपण अशाच पदार्थांची यादी पाहणार आहोत ज्यांचे सेवन संत्र्याबरोबर करणे टाळायला हवे.
संत्र्याबरोबर ‘या’ पदार्थांचे सेवन टाळाच
दूध
दुग्धजन्य पदार्थ लिंबूवर्गीय फळे किंवा ज्यूससह एकत्र केल्याने अपचन किंवा छातीत जळजळ होऊ शकते, याचे कारण असे की संत्र्याच्या आंबटपणामुळे दुधातील प्रथिने प्रभावित होऊन पोट खराब होते किंवा पोटाला सूज येऊ शकते.
टोमॅटो
टोमॅटो आणि संत्री दोन्ही व्हिटॅमिन सी आणि आवश्यक पोषक तत्वांनी भरलेले असताना, दोन आम्लयुक्त पदार्थ एकत्र करणे हे घातक ठरू शकते. यामुळे ऍसिडिटी वाढण्याचा धोका असतो.
केळी
संत्र्यासह केळी खाल्ल्याने पचनास त्रास होऊ शकतो आणि अपचन होऊ शकते, विशेषत: पोटाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हे कॉम्बिनेशन घातक ठरू शकते.
मसूर आणि शेंगा
संत्र्याच्या आंबटपणामुळे काही डाळी व शेंगांच्या पचनास त्रास होऊ शकतो आणि अपचन होऊ शकते.
जास्त मसालेदार पदार्थ
संत्र्याच्या आंबटपणासह मसालेदार पदार्थ मिसळणे पचन समस्येचे कारण ठरू शकते. पोटात अल्सरसारखी स्थिती उद्भवल्यास वेदना देखील होऊ शकते.
फॅटी आणि तळलेले पदार्थ
संत्र्याच्या आंबटपणासह जास्त चरबीयुक्त पदार्थ एकत्र केल्यास पोट फुगण्याचा त्रास होऊशकतो .
चीज
चीज आणि संत्र्याचे मिश्रण चवीमुळे अनेकांना आवडू शकते परंतु या मिश्रणामुळे पाचन प्रक्रिया मंदावते आणि अपचन देखील होऊ शकते.
कॅफीन
संत्र्यांसह कॉफी किंवा काळ्या चहाचे सेवन केल्याने पोट खराब होऊ शकते. यामुळे पोटात अल्सर वाढू शकतो. काहींना छातीत जळजळ जाणवू शकते.
कार्बोनेटेड पेये
कार्बोनेटेड पेये संत्र्यांसह एकत्रित केल्याने पोट फुगणे किंवा अस्वस्थता येऊ शकते.
हे ही वाचा<< थंडीत रोज संत्री खाल्ल्याने शरीराला नेमका काय फायदा मिळू शकतो? डॉक्टरांची माहिती वाचून व्हाल खूश
दारू
अल्कोहोल आणि लिंबूवर्गीय फळे पोटाच्या अस्तरांना त्रास देऊ शकतात आणि ऍलर्जी देखील होऊ शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये)