5 major side effects of tea : काही जण कॉफी, काही जण चहा, तर काहींना ब्लॅक कॉफी प्यायला आवडते. चहा पिणे आरोग्यासाठी चांगले नाही, असे अनेकदा म्हटले जाते. मात्र, कोणताही पदार्थ योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतला, तर त्याचा आहारात समावेश करता येतो. त्यामुळे चहा पिताना तो योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात घेणे महत्त्वाचे आहे.
चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, त्यामुळे मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास चहा एक आरोग्यदायी पेय ठरू शकते. मात्र, चहा कसा आणि कधी पिता या गोष्टीचा आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. काही सामान्य सवयींमुळे चहाचे फायदे कमी होऊ शकतात किंवा काही लोकांना चहा प्यायल्यानंतर अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत समजून घेतल्यास, ही आरोग्यदायी सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरणार नाही याची खात्री करता येईल.
चहा पिताना होणाऱ्या सामान्य चुका कोणत्या?
याबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने ग्रेटर नोएडा येथील यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ‘इंटर्नल मेडिसिन आणि डायबेटोलॉजी’ विभागाचे प्रमुख आणि वरिष्ठ सल्लागार डॉक्टर एन. के. सोनी म्हणतात की, चहा नक्कीच आरोग्यदायी जीवनशैलीचा भाग असू शकतो. पण, त्याचे प्रमाण, वेळ आणि बनवण्याची पद्धत महत्त्वाची आहे. कमी साखर वापरणे, खूप कडक चहा टाळणे, जेवण व चहा यांच्यात योग्य अंतर राखणे यामुळे चहा पिण्याची सवय अधिक आरोग्यदायी होऊ शकते.
‘चेरीस इंडिया’चे संस्थापक परिमल शाह आणि गुरुग्राममधील ‘मारेन्गो एशिया हॉस्पिटल्स’च्या (MAIINS) क्लिनिकल डायटिशियन मीनाक्षी अग्रवाल यांनी चहा पिताना लोक करत असलेल्या सामान्य चुकांची यादी दिली आहे.
जेवणानंतर लगेच चहा पिणे
चहामध्ये असे काही घटक असतात जे अन्नातील ‘नॉन-हीम आयर्न’ (non-heme iron) शोषून घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणू शकतात. ज्यांना आधीच लोहाच्या कमतरतेचा धोका आहे, त्यांच्यासाठी ही बाब विशेष महत्त्वाची ठरू शकते. जेवण आणि चहा यांच्यात थोडे अंतर ठेवल्यास हा परिणाम कमी करण्यास मदत होऊ शकते.
जास्त साखर घालणे
जरी चहामध्ये स्वतःहून कमी कॅलरीज असल्या तरीही त्यात दोन चमचे साखर घातल्याने अतिरिक्त कॅलरीजची भर पडते. कालांतराने, यामुळे तुमच्या आहारात अनावश्यक कॅलरीजचा समावेश होऊ शकतो.
गरम चहा पिणे
चहा थोडा कोमट किंवा थंड होऊ दिल्यावर पिणे अधिक चांगले असते. अतिशय गरम पेयांचे नियमित सेवन केल्याने तोंड आणि अन्ननलिकेची जळजळ होऊ शकते किंवा इजा होऊ शकते; त्यामुळे चहाचे तापमान हा पिण्याच्या सवयीचा एक महत्त्वाचा भाग आहे.
जेवणाऐवजी चहा घेणे
कॅफिनमुळे चहाचा एक कप तात्पुरती भूक कमी करू शकतो. पण, पोषक मूल्यांच्या दृष्टीने तो जेवणास पर्याय ठरू शकत नाही. नाश्ता किंवा दुपारच्या जेवणाऐवजी चहा घेतल्यास शरीराला प्रथिने (प्रोटीन), फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे (मिनरल्स) अपुऱ्या प्रमाणात शरीराला मिळू शकतात.
