भारत आणि चीन सीमेवरील तणावाची स्थिती आणि २० भारतीय जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात चिनी सामानावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत आहे. भारतात चीनविरोधात वातावरण असताना आघाडीची चिनी मोबाइल कंपनी शाओमी इंडियाचे प्रमुख मनू कुमार जैन यांनी एक विधान केलं आहे. अन्य कोणत्याही स्मार्टफोन ब्रँडच्या तुलनेत शाओमी ‘जास्त भारतीय’ कंपनी असल्याचं जैन यांनी म्हटलं आहे.

“शाओमीचे R&D सेंटर आणि प्रोडक्ट टीम भारतात आहे. आमचे फोन आणि टीव्ही मेड इन इंडिया आहेत. ५० हजार जणांना आम्ही भारतात रोजगार दिलाय”, असे ट्विट जैन यांनी केले आहे. अन्य कोणत्याही स्मार्टफोन ब्रँडच्या तुलनेत शाओमी ‘जास्त भारतीय’ कंपनी असल्याचं सांगत आम्ही कर भारतातच भरतो आणि गुंतवणूकही भारतातच करतो असेही जैन म्हणाले आहेत.

यासोबतच, जैन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी अनेक अमेरिकी स्मार्टफोन ब्रँड्स त्यांचे कंपोनेंट्स चीनमधून मागवतात, काही भारतीय कंपन्याही चीनमधूनच कंपोनेंट्स मागवतात असं म्हटलंय. भारतात सोशल मीडियावर चीनविरोधी जनभावना असल्याचं त्यांनी मान्य केलं. पण, शाओमीच्या व्यवसायावर त्याचा जास्त परिणाम होणार नाही असा दावाही त्यांनी केला. यापूर्वी रिअलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनीही रिअलमी एक भारतीय स्टार्टअप असल्याचं म्हटलं होतं.