चीनची स्मार्टफोन निर्माती कंपनी शाओमीने आपल्या ‘एमआय मॅक्स’ आणि ‘एमआय नोट’ या सीरीजमधील मोबाइलचे उत्पादन थांबवत असल्याचं जाहीर केलं आहे. शाओमीचे सीईओ ली जून यांनी वीबो या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली.
यावर्षी ‘एमआय मॅक्स’ आणि ‘एमआय नोट’ या सीरीजच्या कोणत्याही नवीन मॉडलचे मोबाइल लाँच होणार नाहीत असं त्यांनी पोस्टमध्ये जाहीर केलं. या जुन्या मालिकेच्या जागी आता कंपनी रेडमी, एमआय मिक्स, एमआय ९ आणि नवीन CC मालिकेती फोनच्या निर्मितीवर भर देणार असल्याचंही सांगितलं.
शाओमीने ‘एमआय मॅक्स ३’ हा मोबाइल गेल्या वर्षी लाँच केला होता. त्यामुळे यावर्षी या मोबाइलसाठी अपडेटेड व्हर्जन येईल अशी शक्यता वर्तवली होती. तर, २०१७ मध्ये कंपनीने ‘एमआय नोट 3’ लाँच केला होता, नोट सीरिजमधील हा शेवटचा मोबाइल ठरला. सर्वप्रथम 2015 मध्ये कंपनीने नोट सीरीजमधील मोबाइल सादर केला होता.