चीनची दिग्गज स्मार्टफोन कंपनी Xiaomi ला एका जाहिरातीमुळे माफी मागावी लागली आहे. जपानमध्ये ‘रेडमी नोट 9 प्रो’ स्मार्टफोनच्या प्रमोशनसाठी जारी केलेल्या एका जाहिरातीमुळे कंपनीने माफी मागितली आहे. या जाहिरातीमध्ये शाओमीने Fat Man आणि अणुबॉम्ब हल्ला या दोन्ही गोष्टी ग्राफिक्सद्वारे दाखवल्या होत्या.

दुसऱ्या महायुद्धात जपानवर अणुबॉम्ब टाकताना अमेरिकेने ‘Fat Man’ कोडचाच वापर केला होता. या हल्ल्यानंतर हिरोशिमा आणि नागासाकी ही दोन शहरं बेचिराख झाली होती. त्यामुळे शाओमीच्या जाहिरातीचा व्हिडिओ जारी होताच जपानमधून Xiaomi वर जोरदार टीका व्हायला सुरूवात झाली होती.  त्यानंतर शाओमीने तो व्हिडिओ तातडीने डिलिट केला आणि माफी मागितली आहे.

मात्र, स्मार्टफोनची ही जाहिरात अणुहल्ल्याशी का जोडण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, जाहिरात पाहिल्यानंतर रेडमी नोट 9 प्रो हा स्मार्टफोन अणुबॉम्ब इतकाच पॉवरफुल आहे, असं सांगण्याचा कंपनीचा प्रयत्न होता असं दिसतं. “शाओमी कंपनी जगभरातील युजर्सचा आणि संस्कृतींचा आदर करते. प्रमोशनसाठी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये अयोग्य कंटेंट वापरण्यात आले होते. तो व्हिडिओ तातडीने डिलिट केला आहे. भविष्यात अशी चुकी पुन्हा होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ”, असे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले आहे.

दरम्यान, Redmi Note 9 Pro हा स्मार्टफोन भारतातही उपलब्ध आहे.  या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात NavIC सपोर्ट आहे. NavIC हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(ISRO)विकसीत केलेले तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे जीपीएससाठी ‘मेड इन इंडिया’ पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. जीपीएसच्या तुलनेत NavIC अत्यंत अचूक माहिती देईल, असा ISRO चा दावा आहे. तसेच यामध्ये 48MP प्रायमरी सेंसर आणि 5,000mAh क्षमतेची दमदार बॅटरीही आहे.  ऑरोरा ब्लू, ग्लेशिअर व्हाइट, आणि इंटरस्टेलर ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. रेडमी नोट 9 प्रोमध्ये 6.67-इंच फुल-एचडी+ IPS डिस्प्ले असून कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 वर कार्यरत असून यात लेटेस्ट MIUI व्हर्जन देण्यात आलंय. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर आहे. याशिवाय क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी अल्ट्रा-वाइड सेंसर, मॅक्रो लेंससोबत 5 मेगापिक्सलचा तीसरा सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा चौथा सेंसर आहे. तर, सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,020mAh क्षमतेची दमदार बॅटरी फोनमध्ये आहे.

किंमत : रेडमी नोट 9 प्रो (4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिअंट)ची किंमत 13 हजार 999 रुपये आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये आहे. याशिवाय सेलमध्ये 1,000 रुपये डिस्काउंट मिळेल.