Yellow and Black Teeth Whitening Remedies:  आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. सिगारेट, तंबाखू, पान, गुटखा, सतत चहा-कॉफी पिणं आणि अयोग्य पद्धतीने दात घासणे यांमुळे दातांचा नैसर्गिक शुभ्रपणा कमी होतो. मग पांढरे दात हळूहळू पिवळे पडू लागतात, हिरड्यांतून रक्त येणं, तोंडाला दुर्गंधी येणं, दात हलणं किंवा किडणं अशा समस्या निर्माण होतात.

विशेष म्हणजे अनेक जण या समस्यांकडे सुरुवातीला दुर्लक्ष करतात; पण पुढे जाऊन याच त्रासामुळे वारंवार दंतचिकित्सकांकडे धाव घ्यावी लागू शकते. मात्र, आयुर्वेदात अशा समस्यांवर एक नैसर्गिक उपाय सांगितला जातो, जो आजही अनेक ग्रामीण भागांत वापरला जातो.

तोंडाच्या आरोग्याची बिघडती स्थिती

तज्ज्ञांच्या मते, तोंडातील अस्वच्छता ही अनेक गंभीर समस्यांचं मूळ ठरते. जंक फूड, जास्त गोड पदार्थ, धूम्रपान, तंबाखू सेवन आणि शरीरातील पाण्याची कमतरता यांमुळे दातांवर चिकट थर जमा होतो. त्यामुळे जीवाणू वाढू लागतात आणि दातांचं इनॅमल कमकुवत होतं.

त्यामुळे खालील समस्या निर्माण होऊ शकतात-

  • दात पिवळे पडणे
  • हिरड्यांची सूज
  • हिरड्यांतून रक्त येणे
  • तोंडाला दुर्गंधी येणे
  • दात किडणे
  • तोंडात वारंवार जखमा होणे

डॉक्टरांनी सांगितला नैसर्गिक उपाय

डॉक्टर भूषण रिसर्च लॅबचे तज्ज्ञ डॉ. समीर भूषण यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

ते म्हणाले, “जर तुम्हाला दात पुन्हा स्वच्छ आणि मजबूत करायचे असतील, तर काही औषधी वनस्पतीच्या पानांचा वापर फायदेशीर ठरू शकतो. या वनस्पतींच्या पानांपासून तयार केलेले नैसर्गिक मंजन किंवा काढ्यामुळे हिरड्यांची सूज, रक्तस्राव आणि तोंडातील जंतुसंसर्ग कमी करण्यास मदत होऊ शकते.”

त्यांच्या मते, या पानांमध्ये नैसर्गिक प्रतिजैविक आणि दाहशामक गुणधर्म असतात.

तोंडातील जीवाणूंवर प्रभावी परिणाम

आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, या वनस्पतीच्या पानांमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीमायक्रोबियल घटक तोंडातील हानिकारक जीवाणूंची संख्या कमी करण्यास मदत करतात.

यामुळे-

  • दातांची कीड कमी होण्यास मदत
  • तोंडाची दुर्गंधी कमी होणे
  • हिरड्यांची सूज आटोक्यात येणे
  • दातांची संवेदनशीलता कमी होणे

असे फायदे मिळू शकतात.

वापरण्याच्या पद्धतीही सोप्या

तज्ज्ञांच्या मते, या पानांचा वापर तीन प्रकारे केला जाऊ शकतो.

पाने चावणे

सकाळी रिकाम्या पोटी ३ ते ४ ताजी पानं स्वच्छ धुऊन चावावीत. त्यामुळे हिरड्यांना मसाज मिळतो आणि रक्तस्राव कमी होण्यास मदत होते.

नैसर्गिक गुळण्या

पाण्यात काही पानं उकळून, तो काढा गुळण्या करण्यासाठी वापरता येतो. त्यामुळे तोंडातील दुर्गंधी कमी होऊ शकते.

आयुर्वेदिक मंजन

सुकलेल्या पानांची पूड करून, त्यात मध किंवा मोहरीचं तेल मिसळून हिरड्यांवर हलक्या हातानं चोळल्यास दात स्वच्छ राहण्यास मदत होते.

कोणते आहे हे चमत्कारी पान?

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की अखेर हे पान कोणतं?

आयुर्वेदात ज्याचा उल्लेख केला जातो, त्या वनस्पतीचं नाव आहे ‘अपामार्ग’. काही भागांत याला ‘चिरचिटा’ किंवा ‘लटजिरा’ असेही म्हटलं जातं. रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेत सहजपणे उगवू शकणारी ही वनस्पती अनेक वर्षांपासून आयुर्वेदात दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी वापरली जात आहे.

काही महत्त्वाच्या सूचना

  • अतिसंवेदनशील हिरड्या असतील, तर सुरुवातीला कमी प्रमाणात वापर करावा.
  • गर्भवती महिलांनी कोणतीही वनौषधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरू नये.
  • हिरड्यांमध्ये तीव्र वेदना किंवा सूज कायम राहिल्यास दंततज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

तज्ज्ञांच्या मते, योग्य पद्धतीनं आणि मर्यादित प्रमाणात वापर केल्यास ही वनस्पती तोंडाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.