Daily Yoga vs 3-4 Days Yoga : योगा नक्की किती दिवस करावा? दररोज नियमित योगा केल्यासच फायदा मिळतो का? मग आठवड्यातून फक्त तीन-चार दिवस योगासनं केल्यानेही शरीर आणि मनाला याचे फायदे मिळू शकतात? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात. पण जे आपल्या व्यस्त रूटीनमधून वेळ काढून योगाला आपल्या आयुष्याचा भाग बनवू इच्छितात. अनेकदा १-२ दिवस सराव चुकल्यास लोक असा समज करून घेतात की त्यांची संपूर्ण मेहनत वाया गेली पण, प्रत्यक्षात तसे होत नाही. दुसरीकडे काही लोकांचे असेही मानणे असते की, रोज तर योगा करतोच, मग काही दिवस नाही जमलं तर काय फरक पडणार…
योगाचा परिणाम केवळ तुम्ही किती दिवस सलग आसन केले यावर अवलंबून नसतो. तुमची सातत्यता, सरावाचा कालावधी, योगाचा प्रकार आणि तुमची शारीरिक स्थितीदेखील यात महत्त्वाची भूमिका बजावते. काही संशोधनांमध्ये योगाचा संबंध ताणतणाव कमी करणे, जीवनमान उंचावणे आणि काही शारीरिक क्षमतांमध्ये सुधारणा होण्याशी जोडला गेला आहे.
नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका समीक्षेत असे दिसून आले आहे की, नियमित योग अभ्यासामुळे मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. काही अभ्यासांमध्ये आठवड्यातून ३-४ दिवस सराव करणाऱ्या सहभागींमध्ये अधिक चांगले परिणाम दिसून आले. संशोधनाच्या मर्यादा लक्षात घेता, याला प्रत्येक व्यक्तीसाठी एक निश्चित नियम मानता येणार नाही.
मग रोज योगा करणे खरोखर गरजेचे आहे का? दोन-तीन दिवसांचा पडणारा खंड नुकसान करतो का? आणि आठवड्यातून तीन-चार दिवस योगा केल्याने नेमका किती फायदा होऊ शकतो? चला समजून घेऊया.
रोज योगा करणे खरोखर गरजेचे आहे का?
योगा प्रभावी ठरण्यासाठी दररोज सराव करणे हा काही अनिवार्य नियम नाही. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा सराव दीर्घकाळासाठी नियमित राहिला पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) शारीरिक हालचालींविषयीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्येही संपूर्ण आठवड्यात नियमित शारीरिक हालचालींवर भर दिला गेला आहे, दररोज प्रत्येक व्यक्तीने एकाच प्रकारचा व्यायाम केला पाहिजे असा अट्टाहास धरलेला नाही, त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीकडे रोज ४५ ते ६० मिनिटे काढण्यासाठी वेळ नसेल तर आठवड्यातून तीन किंवा चार दिवस योगा करणे हा एक व्यावहारिक मार्ग आहे. योगा करण्यासह चालणे, इतर शारीरिक हालचाली आणि पुरेशी विश्रांती यांचा रुटीनमध्ये समावेश करणे फायदेशीर ठरते.
आठवड्यातून ३-४ दिवस योगासन केल्याने काय परिणाम होईल?
आठवड्यातून तीन-चार दिवस योगा केल्याने शरीराला नियमित हालचाल मिळत राहते. विविध अभ्यासांमध्ये योगाचा संबंध शरीराची लवचिकता, संतुलन, स्नायूंची क्षमता आणि मानसिक आरोग्यातील सुधारणेशी जोडला गेला आहे. विशेषतः वयोवृद्ध लोकांवर केलेल्या एका विश्लेषणात त्यांच्या शारीरिक संतुलन, लवचिकता आणि स्नायूंच्या ताकदीत सुधारणा झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्तीला अगदी सारखेच परिणाम मिळतील. योगाचा प्रकार, आसनांची कठीण पातळी, सरावाचा कालावधी, वय, फिटनेसची पातळी आणि आरोग्य स्थिती यानुसार परिणामांमध्ये फरक पडू शकतो.
कधीतरी योगा करायला नाही जमलं तर काय होईल?
जर एखाद्या दिवशी किंवा काही दिवसांसाठी योगाचा सराव सुटला, तर घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. एक-दोन दिवसांचा ब्रेक तुमच्या आतापर्यंतच्या मेहनतीला अचानक संपवत नाही. खरी समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा हा कधीतरी पडणारा ब्रेक हळूहळू मोठ्या अंतरात बदलतो आणि सराव पूर्णपणे बंद होतो.
याकडे ‘ऑल-ऑर-नथिंग’ (किंवा पूर्ण करा किंवा काहीच करू नका) या दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी सरावातील सातत्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. एखाद्या दिवशी वेळ कमी असल्यास मोठा सेशन करण्याऐवजी हलके स्ट्रेचिंग, प्राणायाम किंवा कमी वेळेत शक्य असणारे सोपे योग प्रकार केले जाऊ शकतात.
ताणतणाव आणि मानसिक शांततेसाठीही योगा उपयुक्त
योगाला केवळ शरीर वाकवण्यापुरते मर्यादित समजणे योग्य नाही. आसने, श्वासोच्छवासाचे सराव (प्राणायाम) आणि विश्रांती/ध्यान यांसारख्या तंत्रांचा एकत्रित परिणाम मन आणि शरीरावर होतो. ताणतणावाचा सामना करणाऱ्या प्रौढांवर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, योगामुळे अल्पकालीन ताण कमी होतो आणि जीवनमानात सुधारणा होते.
याच कारणामुळे अनेक लोकांसाठी योगाचा सर्वात मोठा फायदा केवळ लवचिकता वाढणे हा नसून, रोजच्या धावपळीत शांततेचा आणि नियमिततेचा एक वेळ मिळणे हा आहे.
रोज थोडा योगा की आठवड्यातून ३-४ दिवस नियमित; काय निवडावे?
जर रोज योगा करण्यामुळे तुम्हाला मानसिक दबाव जाणवत असेल किंवा काही दिवसांनंतर सराव पूर्णपणे सुटत असेल तर आठवड्यातून तीन-चार दिवसांचा एक नीट रूटीन बनवणे हा अधिक चांगला पर्याय आहे. उदाहरणार्थ, तुम्ही सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारी योगा करू शकता. उर्वरित दिवसांमध्ये चालणे किंवा हलक्या शारीरिक हालचाली ठेवू शकता.
योगाला परिपूर्ण (परफेक्ट) रूटीन बनवण्याऐवजी दीर्घकाळ टिकणारी सवय बनवणे अधिक महत्त्वाचे आहे. तसेच, जर एखाद्या व्यक्तीला दुखापत, गंभीर आजार, गर्भावस्था किंवा इतर कोणतीही वैद्यकीय परिस्थिती असेल तर योगाची तीव्रता आणि आसनांची निवड तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावी.
