Yoga Vs Walking Which is Better for Blood Sugar Control: रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी नेमकं काय करावं, दररोज चालणं की योगाभ्यास? अनेक जण या प्रश्नात गोंधळलेले असतात. काहींना वाटतं चालणं पुरेसं आहे, तर काही जण योगालाच सर्वोत्तम मानतात. पण, या दोन्हींपैकी खरंच कोणता पर्याय अधिक परिणामकारक आहे? की दोन्हींचा एकत्रित परिणाम अधिक फायदेशीर ठरू शकतो? याचं उत्तर जाणून घेतल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल…
चालण्याचे फायदे : रक्तातील साखर लगेच नियंत्रणात?
चालणं हा सर्वात सोपा आणि सहज करता येणारा व्यायाम मानला जातो. विशेषतः जेवणानंतर ३० ते ४५ मिनिटे चालल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढण्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. चालण्यामुळे शरीरातील पेशी इन्सुलिनला अधिक संवेदनशील होतात, ज्यामुळे साखर पेशींमध्ये शोषली जाते.
नियमित चालण्याची सवय लावल्यास उपाशीपोटी साखरेची पातळी कमी होण्यास मदत होऊ शकते. याशिवाय, हृदयाच्या आरोग्यासाठीही चालणं फायदेशीर ठरतं. विशेष म्हणजे, एकदा केलेल्या चालण्याचा फायदा २४ तासांपर्यंत टिकू शकतो, म्हणजेच साखरेचं चयापचय सुधारत राहतं.
योगाचा प्रभाव : फक्त व्यायाम नाही, संपूर्ण शरीरावर परिणाम
योगाभ्यास हा केवळ शारीरिक हालचालींपुरता मर्यादित नाही, तर त्यात श्वसनक्रिया आणि ध्यान यांचाही समावेश असतो, त्यामुळे शरीरावर त्याचा सर्वांगीण परिणाम होतो. संशोधनानुसार, योग केल्याने उपाशीपोटी रक्तातील साखरेची पातळी आणि HbA1c कमी होण्यास मदत होऊ शकते.
याशिवाय, योगामुळे स्वादुपिंडाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होऊन इन्सुलिनची क्रिया अधिक प्रभावी होते. तणाव हा साखर वाढण्याचा मोठा घटक मानला जातो आणि योग तणाव कमी करण्यात मदत करतो, यामुळे कॉर्टिसोल आणि अॅड्रेनालिनसारख्या हार्मोन्सचे प्रमाण कमी होऊन साखरेवर नियंत्रण मिळवणं सोपं होतं.
वेळ महत्त्वाची : कधी कराल तर मिळेल जास्त फायदा?
या दोन्ही प्रकारचे व्यायाम योग्य वेळी केल्यास परिणाम अधिक चांगले दिसू शकतात. जेवणानंतर चालणं केल्यास साखरेच्या अचानक वाढीवर नियंत्रण ठेवता येतं. १० मिनिटांची छोटी चालदेखील फायदेशीर ठरू शकते, पण ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालणं अधिक प्रभावी मानलं जातं.
योगाभ्यास दररोज ठराविक वेळेला केल्यास दीर्घकालीन फायदे मिळू शकतात. विशेषतः जेवणानंतर हलका योग केल्यास साखरेच्या पातळीवर सकारात्मक परिणाम दिसून येतो.
अंतिम निष्कर्ष : एकटं चालणं की योग? की दोन्हींचा संगम?
चालणं आणि योग दोन्हींचे फायदे वेगवेगळे असले तरी एकत्रित केल्यास त्यांचा परिणाम अधिक प्रभावी ठरू शकतो. चालणं साखरेचं शोषण वाढवतं आणि हृदय निरोगी ठेवतं, तर योग इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारतो आणि तणावामुळे होणाऱ्या साखरेच्या वाढीवर नियंत्रण ठेवतो, त्यामुळे आठवड्यातील दिनचर्येत चालणं आणि योग या दोन्हींचा समावेश केल्यास रक्तातील साखर अधिक स्थिर ठेवता येऊ शकते.
शेवटी एक महत्त्वाची गोष्ट
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ एकच उपाय पुरेसा नसतो. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैली यांचा समतोल राखणं अत्यावश्यक आहे.
कदाचित तुमच्या दैनंदिन जीवनात छोटासा बदल चालणं आणि योग मोठा फरक घडवू शकतो!
