How to identify original hing: भारतीय स्वयंपाकघरातील अनेक पदार्थांमध्ये हिंग मोठ्या प्रमाणात वापरला जातो. कुठल्याही पदार्थामध्ये हिंग टाकल्याने त्या पदार्थाचा खमंगपणा वाढून, त्याचा सुंदर सुवास सर्वत्र पसरतो. हिंगामध्ये स्वादासह औषधी गुणधर्म असतात. आपल्या आहारात हिंगाचा समावेश असेल, तर आपली पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. परंतु, हल्ली बाजारात अनेक भेसळयुक्त पदार्थांप्रमाणे भेसळयुक्त हिंगदेखील विकला जातो. असा भेसळयुक्त हिंग पोटात गेल्याने अनेक प्रकारचे नुकसान होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत हिंग खाण्यापूर्वी त्याची शुद्धता ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही काही सोप्या पद्धतींनी खरा हिंग ओळखू शकता.
भेसळयुक्त हिंग खाण्याचे तोटे
भेसळयुक्त हिंग खाण्याचे अनेक तोटे असू शकतात. त्यामुळे पोटात गॅस, अपचन, डोकेदुखी, उलट्या आणि अॅलर्जीदेखील होऊ शकते. भेसळयुक्त हिंगामध्ये अनेक प्रकारची रसायने मिसळली जातात, ज्यांच्या दीर्घकाळ सेवनाने शरीरात विषारी पदार्थ जमा होतात.
खरा आणि भेसळयुक्त हिंग कसा ओळखायचा?
पाण्यात विरघळवून खरा हिंग ओळखा
तुम्ही खरा हिंग पाण्यात विरघळवूनदेखील ओळखू शकता. हे तपासण्यासाठी प्रथम एक कप पाण्यात थोडासा हिंग टाका. खरा हिंग पाण्यात पूर्णपणे मिसळत नाही आणि त्याचा रंग हलकासा पिवळा किंवा तपकिरी असतो. दुसरीकडे बनावट हिंग पाण्यात टाकल्यानंतर लगेच विरघळू लागतो. कधी कधी त्याचा रंग पांढरादेखील होतो.
तव्यावर गरम करा
तुम्ही हिंग गरम करूनदेखील ओळखू शकता. हिंग वापरण्यापूर्वी तो एका तव्यावर गरम करा. जर हिंग खरा असेल, तर तो जळेल आणि धूर निघू लागेल आणि त्यातून तीव्र वास येईल. दुसरीकडे जर हिंग बनावट असेल, तर गरम केल्यानंतर त्याला प्लास्टिक जळल्यासारखा वास येऊ लागेल.
रंगाकडे लक्ष द्या
तुम्ही खरा आणि नकली हिंग त्याच्या रंगावरूनही ओळखू शकता. कच्च्या हिंगाचा रंग हलकासा तपकिरी असतो आणि तेलाट टाकल्यावर तो लाल होतो; तर याउलट नकली हिंगाचा रंग बदलत नाही.
वासाने ओळखा
खऱ्या हिंगाचा सुगंध खूप तीव्र असतो. त्याचा सुगंध हातात बराच काळ राहतो. दुसरीकडे बनावट हिंगाचा सुगंध जास्त काळ टिकत नाही.