Jaggery Tea Benefits: अनेक जण आपल्या दिवसाची सुरुवात सकाळच्या गरमागरम वाफाळलेल्या चहाने करतात. आपल्या भारतीयांचा दिवस सकाळच्या चहाशिवाय सुरू होत नाही. सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने वाटण्यासाठी लोक चहा पितात. तसेच हिवाळ्यात तर गरमागरम चहा हवाच. पण, अनेक जण चहा पिताना खूप मोठी चूक करतात आणि ती म्हणजे सतत साखरेचा चहा पिणे. आपण बहुधा साखरेचा चहा पितो; पण साखरेऐवजी गूळ वापरल्यास कसे वाटेल, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? साखरेच्या तुलनेत, गुळामध्ये अनेक पोषक तत्त्वे असतात, जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. गुळाचा चहा प्यायल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहते, पचनसंस्था मजबूत होते, तुमची ऊर्जा पातळी वाढते आणि तुमची प्रतिकारशक्ती सुधारते. नियमितपणे गुळाचा चहा प्यायल्याने अनेक आरोग्यादायी फायदे मिळतात. चला, गुळाच्या चहाचे आणखी काही फायदे जाणून घेऊया.

गुळाचा चहा पिण्याचे जबरदस्त फायदे

पचनसंस्थेच्या मजबुतीला चालना

गुळाचा चहा पचनसंस्था मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे. त्याच्या नियमित सेवनाने पचनाच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात. गुळातील फ्रुक्टोज आणि फायबर सहज पचतात आणि पोट हलके ठेवतात. त्यामुळे आम्लपित्त कमी होते आणि पोटातील जळजळ व अल्सरपासून आराम मिळतो. गुळातील प्रो-बायोटिक गुणधर्म आतड्यांमधील निरोगी जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देतात. तसेच, त्यामुळे पाचक एंझाइम्सचे उत्पादन वाढते. अशा प्रकारे गुळाचा चहा पचनसंस्था मजबूत करण्यासाठी एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे.

ॲनिमियापासून आराम

ॲनिमिया ही शरीरात रक्ताची कमतरता असलेली एक स्थिती आहे. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज व झिंक यांसारखी खनिजे असतात. ही खनिजे ॲनिमियामुळे कमी झालेल्या रक्ताच्या घटकांची भरपाई करण्यास मदत करतात. गूळ रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासही सक्षम आहे. त्याव्यतिरिक्त गुळाचा चहा ॲनिमियामुळे होणारा अशक्तपणा आणि थकवा कमी करण्यास मदत करू शकतो.

वजन कमी होण्यास मदत होते

गुळातील अँटीऑक्सिडंट्स आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम व लोह यांसारखी खनिजे चयापचय क्रिया वाढवून वजन कमी करण्यास मदत करतात. गुळाच्या चहाचे सेवन केल्याने पोट भरलेले राहते आणि भूक शमते, ज्यामुळे कॅलरीचे सेवन कमी होते. त्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते, जे वजन नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. गुळातील फायबर पोट भरलेले ठेवण्यास आणि भूक शमवण्यास मदत करते.