Amazing Benefits Of Drinking Rice Water: जगभरातील आरोग्य तज्ज्ञ दिवसाची सुरुवात योग्य प्रकारे करण्याची शिफारस करतात, जेणेकरून तुम्हाला दिवसभर हलके आणि तंदुरुस्त वाटेल. दिवसाची सुरुवात आरोग्यदायी पद्धतीने करणे तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. सकाळी उपाशी पोटी मेथीचे पाणी, बडीशेपचे पाणी, फळभाज्यांचा रस अशा विविध पेयांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. पण, आज आम्ही तुम्हाला अशा एका पेयाबद्दल माहिती देणार आहोत, जे एक नैसर्गिक प्रोबायोटिक आहे, ते म्हणजे तांदळाचे पाणी. हे एक नैसर्गिक प्रोबायोटिक मानले जाणारे आणि अनेक आरोग्यदायी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेले पेय तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकते.
तांदळाच्या पाण्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी, सी, ई आणि इनॉसिटॉल हे पोषक घटक असतात; जे त्वचा, केस आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. ते त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. अनेक आशियाई देशांमध्ये फार पूर्वीपासून विविध आजारांवर नैसर्गिक उपाय म्हणून तांदळाचे पाणी वापरले जात आहे.
तांदळाचे पाणी कसे प्यावे?
कच्चे तांदूळ रात्रभर भिजवल्यानंतर उरलेले पाणी आंबते. आंबवण्याच्या प्रक्रियेमुळे पाण्यात चांगले जीवाणू वाढतात, ज्यामुळे हे पेय जीवनसत्त्वे, अमिनो ॲसिड, अँटीऑक्सिडंट्स आणि दाहशामक गुणधर्मांनी परिपूर्ण होऊन एक पौष्टिक पेय बनते.
तांदळाचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे
आतड्यांमधील दाह कमी करते
तांदळाच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स आणि दाहशामक गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात, जे पोटाला थंडावा देतात, सूज कमी करतात, पोट फुगणे आणि आम्लपित्त टाळतात.
पचनास मदत करते
रात्रभर पाणी भिजवत ठेवल्यामुळे तुमच्या आतड्यातील चांगल्या जीवाणूंच्या वाढीस मदत होते, ज्यामुळे पोषक तत्त्वांचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे होते, तसेच पचन आणि चयापचय क्रिया सुधारते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते
आतड्यांचे आरोग्य हे थेट मजबूत रोगप्रतिकारशक्तीशी जोडलेले आहे आणि चांगल्या जीवाणूंच्या वाढीमुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती सुधारते, ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या टाळता येतात.
तांदळाचे पाणी कसे बनवायचे
- तांदळाचे पाणी बनवण्यासाठी, अर्धा कप तांदूळ दोन कप पाण्यात भिजवा. उत्तम परिणामांसाठी मातीच्या भांड्याचा वापर करा.
- ते रात्रभर खोलीच्या तापमानावर ठेवा.
- दुसऱ्या दिवशी सकाळी तांदूळ गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी ते पाणी प्या.
तांदळाचे पाणी त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
त्वचेशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी तांदळाचे पाणी खूप प्रभावी मानले जाते. या पाण्यात अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट व अँटी-एजिंग गुणधर्म आहेत; जे त्वचेचे संरक्षण करून त्वचा मुलायम करण्यास मदत करते. त्याशिवाय तांदळाचे पाणी त्वचेवरील सुरकुत्या आणि रेषा कमी करून शरीर हायड्रेट ठेवण्यासही मदत करू शकते, कारण त्यात स्टार्च असते; जे नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. एटोपिक एक्झिमा असलेल्या लोकांसाठी हे प्रभावी मानले जाते.
तांदळाचे पाणी केवळ त्वचेलाच नव्हे, तर केसांना पोषण देत मजबूत बनवते. तांदळाच्या पाण्यात प्रथिने, जीवनसत्त्वे व खनिजे असतात, ज्यामुळे केसांची गुणवत्ता आणि वाढ यामध्ये सुधारणा करते. केसांना मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा कंडिशनर म्हणून वापर केला जाऊ शकतो. त्याशिवाय केसातील कोंडा कमी करण्यासाठीही तांदळाचे पाणी फायदेशीर मानले जाते.
तांदळाचे पाणी तुमचे सौंदर्य वाढवण्यासाठी निःसंशयपणे चांगले आहे, परंतु काही खबरदारीही आवश्यक आहे, कारण कधी कधी तांदळात काही रासायनिक घटक असतात, ज्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात; यामुळे काही लोकांना ॲलर्जीही होऊ शकते. अशा परिस्थितीत तांदळाचे पाणी वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
