Benefits Of Eating Raw Mango: कैरी हा शब्द जरी उच्चारला तरीदेखील अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. उन्हाळा सुरू झाला की बाजारात कैऱ्या दिसू लागतात. त्यामुळे घराघरात कैरीचं पन्हं, कैरीची डाळ, लोणचं, मोरांबा, साखरआंबा असे अनेक पदार्थ दिसू लागतात. चवीला आंबट-गोड असलेल्या कैरीमध्ये अनेक गुणकारी फायदे आहेत, जे फार कमी जणांना माहीत आहेत. कैरी हे ए, के, सी व बी६ या जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत आहे. तसेच ते फायबर, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह व जस्त यांनीही समृद्ध आहे. परंतु, तरीही अनेकांना कैरी खाण्याचे नेमके फायदे काय आहेत ते ठाऊक नाहीत. चला तर मग जाणून घेऊ कच्ची कैरी खाण्याचे जबरदस्त फायदे

कैरी खाण्याचे जबरदस्त फायदे

  • पोषणतज्ज्ञांच्या मते , कैरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि नियमित होते. ए, सी व ई ही जीवनसत्त्वे आणि लोह यांसारखी पोषक तत्वे तुमच्या केसांचे आणि त्वचेचे पोषण करू शकतात. सी जीवनसत्त्व कोलेजनच्या निर्मितीस मदत करते. दुसरीकडे, लोह आणि तांबे तुमचे केस मजबूत करू शकतात.
  • कैरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. त्यामुळे ते हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. त्याशिवाय त्यातील फायबर आणि पोटॅशियम रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकतात.
  • कच्च्या आंब्यांमध्ये नैसर्गिक साखर असल्यामुळे ते मधुमेहींसाठी फायदेशीर ठरतात . तसेच, त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे ते रक्तातील साखरेची पातळी वाढवत नाहीत. त्यातील उच्च तंतुमयतेच्या प्रमाणामुळेही ते मधुमेहींसाठी एक सुरक्षित पर्याय ठरतात.

उन्हाळ्यात कैरी का खावी?

  • उन्हाळ्यात वातावरणात उष्णता पसरली असते. त्यामुळे कैरीच्या पन्ह्याचे सेवन केल्यास शरीराला थंडावा मिळतो. ज्यांच्या शरीरात उष्णतेचं प्रमाण जास्त आहे अशा व्यक्तींनी रोजच्या जेवणात मुरांबा, साखरआंबा या पदार्थांचा समावेश करावा.
  • उन्हाळ्यात सतत घाम येतो. त्यामुळे घामावाटे शरीरातील क्षार निघू जातात आणि थकवा जाणवतो. अशा परिस्थितीत कैरी खावी. कैरीमध्ये सोडियम आणि पोटॅशिअम यांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या क्षारांची कमतरता भरून निघते.
  • उन्हाळ्यात अनेकांचा घोळणा फुटतो. (नाकातून रक्त येणे) त्यावेळी कैरीचं सेवन फायदेशीर ठरतं. आजारपणामुळे तोंडाची चव गेल्यास कैरीची लहानशी फोड खावी.

कैरी खाण्याचे दुष्परिणाम

कैरी खाण्याचे अनेक फायदे असले तरी कैरी खाण्याचे काही दुष्परिणामदेखील आहेत.

  • पोटात जळजळ
  • अॅसिडिटी
  • घसा खवखवणे
  • उलटी
  • कफाचा त्रास
  • वात
  • दातांमध्ये वेदना