चांगल्या आरोग्यासाठी पचनसंस्था सक्षम असणं अत्यंत आवश्यक आहे. याबाबत आपण अनेकदा ज्येष्ठांकडून ऐकतो, आणि याला आरोग्य तज्ज्ञांचाही पूर्ण पाठिंबा आहे. आपण दिवसभरात जे अन्न खातो-पितो, ते पचनसंस्था योग्य प्रकारे पचवून शरीराला आवश्यक पोषक तत्त्वांमध्ये रूपांतरित करते. या पोषकतत्त्वांमुळेच शरीराला ऊर्जा मिळते.

पचनसंस्थेतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे मोठी आतडे. अन्न पचल्यावर उरलेले अपायकारक घटक शरीरातून बाहेर टाकण्याचं काम मोठी आतडे करते. मात्र, सातत्याने तेलकट, जंक किंवा असंतुलित आहार घेतल्यास अन्न पचण्याऐवजी आतड्यामध्ये कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. ही स्थिती वेळेत ओळखली नाही, तर अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात.

याच पार्श्वभूमीवर, अन्न नीट पचत नसल्यास शरीरात दिसणारी काही महत्त्वाची लक्षणं पुढे दिली आहेत.

भूक न लागणं (Loss of Appetite)

दीर्घकाळ काहीही न खाल्ल्यानंतरही भूक लागत नसेल, किंवा आवडते पदार्थ समोर असतानाही खाण्याची इच्छा होत नसेल, तर हे पचनसंस्थेतील बिघाडाचं लक्षण असू शकतं. काही वेळा आतड्यामध्ये जंतुसंसर्ग झाल्यासही भूक कमी लागते.

जि‍भेवर पांढरी जाड थर (White Coating on Tongue)

जिभेवर पांढऱ्या रंगाची जाड थर जमा होत असेल, तर ते पचन बिघडल्याचं संकेत मानले जातात. तज्ज्ञांच्या मते, पचनसंस्थेत गडबड झाल्यास जिभेवर बॅक्टेरिया, कॅंडिडा किंवा यीस्ट इन्फेक्शनची लक्षणं दिसू शकतात. ही लक्षणं वेळेत ओळखून उपाय करणं गरजेचं आहे.

पोट फुगणं व जडपणा (Bloating and Heaviness)

नेहमी पोट फुगलेलं वाटणं, पोटदुखी, सूज, थोडंसं खाल्ल्यावरही मळमळ किंवा उलटीसारखं वाटणं, तसेच शौचास अडचण येणं – ही सर्व लक्षणं अन्न आतड्यांमध्ये कुजत असल्याची गंभीर खूण असू शकतात. अशा वेळी तपासणी करणे आवश्यक ठरते.

गॅस बाहेर पडताना वेदना (Pain While Passing Gas)

गॅस सोडताना वेदना होणं किंवा ढेकर घेताना छातीत टोचल्यासारखं वाटणं, हेही खराब पचनामुळे होऊ शकतं. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.

चेहर्‍यावर मुरूम व त्वचेच्या समस्या (Skin Issues and Acne)

पचन बिघडल्याचा परिणाम त्वचेवरही स्पष्टपणे दिसतो. चेहर्‍यावर वारंवार मुरूम येणं, एक्झिमा, सोरायसिससारख्या समस्या वाढणं, तसेच त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसणं – हे सर्व खराब पचनाचे संकेत असू शकतात.

टीप: वरील लक्षणं दीर्घकाळ जाणवत असतील, तर स्वत: औषधोपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वेळेत लक्ष दिल्यास गंभीर आजार टाळता येऊ शकतात.