Damage Liver Symptoms: लिव्हर म्हणजे शरीरातील एक महत्त्वाचा ‘फिल्टर’! मात्र लिव्हरमध्ये काही बिघाड सुरू झाला तरी लगेच वेदना होतीलच असं नाही. उलट अनेकदा लिव्हरचं नुकसान हळूहळू होत राहतं आणि व्यक्ती नेहमीप्रमाणे काम करत, खात-पित आपलं आयुष्य जगत असते. त्यामुळे ‘लिव्हर दुखत नाही म्हणजे सगळं ठीक आहे’ असा समज धोकादायक ठरू शकतो. लिव्हरच्या समस्या सुरू झाल्यानंतर शरीर काही दृश्य संकेत देऊ शकतं. हे संकेत डोळे, त्वचा, लघवी, मल, पोट आणि पायांमध्ये दिसू शकतात.
डॉ. शालीन अग्रवाल यांच्या मते, लिव्हरमध्ये गंभीर नुकसान झालं तरी ते बराच काळ काम करत राहण्याची क्षमता ठेवतं. त्यामुळे लिव्हरचे आजार अनेक वर्षे लक्षणांशिवाय राहू शकतात. मात्र काही वेळा शरीरातील दिसणारे बदल हे समस्या ओळखण्याचा महत्त्वाचा इशारा ठरू शकतात.
१. डोळ्यांचा पांढरा भाग अचानक पिवळा दिसू लागतो
लिव्हरच्या समस्येतील सर्वात ओळखण्याजोग्या लक्षणांपैकी एक म्हणजे कावीळ (Jaundice). लाल रक्तपेशी तुटल्यानंतर बिलीरुबिन तयार होतं. निरोगी लिव्हर या पदार्थावर प्रक्रिया करून तो शरीरातून बाहेर जाण्यास मदत करतं. मात्र लिव्हरचं कार्य बिघडलं किंवा पित्ताचा प्रवाह अडथळला तर रक्तात बिलीरुबिन वाढू शकतं. यामुळे सर्वात आधी डोळ्यांचा पांढरा भाग पिवळसर दिसू शकतो आणि नंतर त्वचेवरही पिवळेपणा जाणवू शकतो. त्यामुळे डोळे अचानक पिवळे दिसू लागले तर त्याकडे केवळ थकवा किंवा झोपेची कमतरता म्हणून पाहू नका.
२. पुरेसं पाणी पिऊनही लघवी चहासारखी गडद होते
पाणी कमी प्यायल्यास लघवी गडद होणं सामान्य आहे. पण पुरेसं पाणी घेत असूनही लघवी गडद पिवळी, तपकिरी किंवा चहासारखी दिसत असेल तर त्यामागे दुसरं कारण असू शकतं. लिव्हर किंवा पित्तप्रवाहाशी संबंधित समस्या असल्यास बिलीरुबिनचा काही भाग मूत्रपिंडांमार्फत बाहेर पडू शकतो. त्यामुळे लघवीचा रंग अधिक गडद होऊ शकतो. गडद लघवीसोबत डोळे किंवा त्वचा पिवळी दिसत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
३. शौचाचा नेहमीचा तपकिरी रंग बदलतो
शौचाचा तपकिरी रंग येण्यामध्ये पित्ताची महत्त्वाची भूमिका असते. पित्ताचा प्रवाह कमी झाला किंवा अडथळा निर्माण झाला तर शौचाचा रंग फिकट, राखाडी किंवा मातीसारखा दिसू शकतो. एखाद्या पदार्थामुळे एक-दोन वेळा रंग बदलणं वेगळं; पण कोणतंही स्पष्ट कारण नसताना हा बदल वारंवार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
४. त्वचेवर पुरळ नसतानाही सतत खाज सुटते
खाज आली की अनेकांना लगेच कोरडी त्वचा, उकाडा किंवा अॅलर्जीची आठवण होते. पण कोणताही पुरळ नसताना सतत खाज येत असेल, तर त्यामागे इतर कारणांचाही विचार करायला हवा. पित्तप्रवाहात अडथळा निर्माण झाल्यास शरीरात काही पदार्थ जमा होऊन खाज वाढू शकते.
५. किरकोळ धक्का लागला तरी वारंवार निळे डाग पडतात
कुठेतरी धक्का लागल्यानंतर निळा डाग पडणं सामान्य आहे. मात्र कारण नसताना किंवा अगदी किरकोळ धक्क्यानंतरही वारंवार ब्रूजेस (निळे डाग) दिसू लागले तर त्याची तपासणी करणे गरजेचे आहे. लिव्हर रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रथिनांच्या निर्मितीत भूमिका बजावतो. लिव्हरचं कार्य गंभीरपणे बिघडलं तर रक्तस्राव नियंत्रित करण्याची शरीराची क्षमता प्रभावित होऊ शकते. त्यामुळे वारंवार निळे डाग, सहज रक्तस्राव आणि त्यासोबत इतर लिव्हर-संबंधित लक्षणं दिसत असतील तर ते दुर्लक्षित करू नका.
६. पाय, घोटे किंवा पोट अचानक सुजायला लागतं
दिवसभर उभं राहिल्यानंतर पाय किंवा घोटे थोडे सुजणं अनेक कारणांनी होऊ शकतं. मात्र सूज कायम राहणे किंवा वाढत जाणे हे तपासण्यासारखं लक्षण आहे. लिव्हरच्या प्रगत आजारामध्ये शरीरात द्रव साचू शकतो. त्यामुळे पाय आणि घोट्यांमध्ये सूज येऊ शकते. याशिवाय पोटाच्या आत द्रव जमा होण्याला अॅसाइटिस (Ascites) म्हणतात. यामुळे पोट फुगल्यासारखं, ताणल्यासारखं किंवा दिवसेंदिवस मोठं होत असल्यासारखं दिसू शकतं. पोटाचा आकार झपाट्याने वाढत असेल आणि त्यासोबत इतर लक्षणं असतील तर त्याला फक्त वजन वाढणं समजू नका.
७. त्वचेवर कोळ्याच्या जाळ्यासारख्या छोट्या लाल रक्तवाहिन्या दिसतात
त्वचेवर मध्यभागी एक छोटा लाल ठिपका आणि त्यातून बाहेरच्या दिशेने पसरलेल्या बारीक रक्तवाहिन्या दिसत असतील तर त्यांना स्पायडर अँजिओमा (Spider angioma) किंवा स्पायडर नेव्ही म्हणतात. एक-दोन अशा खुणा दिसल्या म्हणजे लिव्हरचा आजार आहे असं अजिबात नाही. त्या इतर कारणांनीही होऊ शकतात. मात्र अशा अनेक खुणा अचानक किंवा मोठ्या प्रमाणात दिसू लागल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं योग्य ठरू शकतं.
एकच लक्षण नव्हे, तर ‘पॅटर्न’ महत्त्वाचा!
वरीलपैकी कोणतंही एक लक्षण दिसलं म्हणून लिव्हरचा आजार आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. उदाहरणार्थ, गडद लघवी डिहायड्रेशनमुळेही होऊ शकते आणि पायांची सूज हृदय किंवा किडनीशी संबंधित कारणांमुळेही येऊ शकते. मात्र लक्षणं वारंवार दिसत असतील, एकापेक्षा जास्त संकेत एकत्र दिसत असतील किंवा ते दिवसेंदिवस वाढत असतील, तर वैद्यकीय तपासणी महत्त्वाची आहे.
फॅटी लिव्हरशी संबंधित MASLD (Metabolic dysfunction-associated steatotic liver disease) अनेकदा सुरुवातीला कोणतीही ठळक लक्षणं देत नाही. त्यामुळे ‘लिव्हर दुखायला लागलं की तपासणी करू’ अशी वाट पाहणं योग्य नाही.
लिव्हर तपासण्यासाठी काय केलं जातं?
लक्षणं दिसल्यास डॉक्टर परिस्थितीनुसार रक्ताच्या चाचण्या, लिव्हर फंक्शन टेस्ट, अल्ट्रासाऊंड किंवा इतर इमेजिंग चाचण्या आणि फायब्रोसिसचे मूल्यांकन सुचवू शकतात. डॉ. शालीन अग्रवाल यांच्या सल्ल्यानुसार, लिव्हर दुखण्याची वाट पाहू नका. कारण गंभीर लिव्हर आजारामध्येही वेदना नसू शकतात. शरीराने दिलेले संकेत वेळेत ओळखले आणि योग्य तपासणी केली तर लिव्हरची स्थिती बिघडण्यापूर्वी समस्या शोधण्यास मदत होऊ शकते.
