New Mother Breastfeeding Problems : आई होणे हा प्रत्येक स्त्रीसाठी एक आनंदाचा क्षण असतो. पण आई होण्याबरोबर अनेक आव्हानांचा देखील सामान करावा लागतो. यात स्तनपान न करता येणे हा एक मोठा त्रासदायक अनुभव असतो. यामुळे अनेकदा नैराश्य येते. सतत वाईट वाटत राहते की, आपण आपल्या बाळाला पुरेसे पोषण देऊ शकत नाही. बाळांसाठी स्तनपान अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे त्यांची आवश्यक पोषण शक्ती वाढते, रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. पण हेही समजून घेणे महत्वाचे आहे की, प्रत्येक मातेला स्तनपान करता येतेच असे नाही. यामागे काही समस्या असू शकतात. पण मातेने यासाठी स्वत:ला दोषी समजू नये, तुम्ही काही योग्य पर्याय आणि काळजीने तुमच्या बाळाला निरोगी आणि सुदृढ ठेऊ शकता.

स्तनपान का महत्वाचे आहे?

तुमच्या बाळाच्या विकासासाठी स्तनपान अत्यंत महत्त्वाचे आहे.आईच्या दुधात तुमच्या बाळाला सशक्त आणि निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पोषक तत्वे, कॅलरीज आणि द्रवपदार्थ असतात. ते बाळाच्या सर्वांगीण विकासास मदत करतात आणि त्याला जंतुसंसर्गाशी लढण्याची शक्ती देतात.

किती काळ स्तनपान करावे ?

जन्मानंतर पहिले सहा महिने बाळाला केवळ स्तनपान करण्याची शिफारस केली जाते. त्यानंतर दोन वर्षांपर्यंत घन पदार्थांसह स्तनपान सुरू ठेवणे फायदेशीर ठरते. पण काही माता स्तनपान करु शकत नाहीत आणि ही एक पूर्णपणे सामान्य गोष्ट आहे.

कोणत्या परिस्थितीत स्तनपान शक्य नसते?

स्तनपान करू न शकण्याची अनेक कारणे आहेत , जसे की शारीरिक समस्या, आरोग्याच्या समस्या किंवा इतर वैयक्तिक परिस्थिती. यात खाली काही सामान्य कारणे दिली आहेत, जी समजून घेणे महत्त्वाचे आहे:

१) काही मातांना अजिबात दूध येत नाही.
२) काही महिलांना हार्मोनल समस्या असतात.
३) काही मातांनी स्तनांची शस्त्रक्रिया करून घेतली आहे.
४) काही प्रकरणांमध्ये संसर्गाचा धोका असतो.
५) काही बाळं वेळेपूर्वी जन्मल्यामुळे किंवा तोंडाच्या समस्यांमुळे आईचे दूध पिऊ शकत नाहीत.
६) बऱ्याच महिलांना सुरुवातीला स्तनपान करताना अडचण येते, पण याचा अर्थ असा नाही की त्या आपल्या बाळाला स्तनपान करू शकत नाहीत.

वाईट वाटून घेऊ नका

काही माता जेव्हा बाळाला स्तनपान करु शकत नाहीत, तेव्हा त्या भावनिकदृष्ट्या खचून जातात आणि आपण आपल्या बाळाला दूध देऊ शकत नाही, याचे वाईट वाटत राहते. पण असे समजणे फार चुकीचे आहे. ही अपराधीपणाची भावना अनेकदा सामाजिक अपेक्षा आणि प्रसारमाध्यमांनी रंगवलेल्या ‘आदर्श आई’च्या प्रतिमेतून निर्माण होते.

वाईट वाटून न घेता करा ‘हे’ उपाय

परंतु मातांनी हे समजून घेतले पाहिजे की, या काळात त्यांनी आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्या आपल्या बाळाची अधिक चांगली काळजी घेऊ शकतील.

खालील उपाय ठरतील फायदेशीर

तुम्ही स्तनपान करू शकत नाही हे वास्तव स्वीकारा आणि पुढे जा.
डॉक्टर किंवा स्तनपान तज्ञाचा सल्ला घ्या.
आपल्या भावना आपल्या जोडीदाराशी आणि कुटुंबाशी बोला, ज्यामुळे तुमचे मन शांत होण्यास मदत होईल.
स्वतःची तुलना इतर मातांशी कधीही करू नका, कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते.
आपल्या बाळासह वेळ घालवा आणि त्याच्या काळजी घेण्यावर लक्ष द्या.

कुटुंबाचा आधार खूप महत्त्वाचा

या काळात तुमच्या जोडीदाराचा आणि कुटुंबाचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा असतो. विशेषतः जोडीदार, आईला भावनिक आधार देण्यात आणि तिचा आत्मविश्वास वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. ते मुलांची काळजी वाटून घेऊन आणि तिच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेऊन आईवरील भार हलका करण्यास मदत करू शकतात.

बाळाच्या आरोग्यावरील परिणाम

आजकाल बाळाच्या पौष्टिक गरजा पूर्ण करण्यास मदत करणारे विशेष फॉर्म्यु मिल्क उपलब्ध आहेत. स्तनपान करता आले नाही तरी, योग्य काळजी, प्रेम आणि पोषणाने बाळाचे आरोग्य निरोगी आणि सदृढ ठेऊ शकता.बाळाप्रमाणेच एक निरोगी आणि आनंदी आईसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. म्हणूनच आपण नव्याने आई झालेल्या मातांना भावनिक आधार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.