19 January 2019

News Flash

काळोखाकडून प्रकाशाकडे

लैंगिकता आणि लिंगभाव यांकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली.

प्रतिनिधिक छायाचित्र

मी जेव्हा १२ वर्षांचा झालो, तेव्हा माझे बाबा माझ्या लैंगिकतेबाबतच्या सततच्या आणि खोलवरच्या प्रश्नांच्या माऱ्यामुळे पार त्रासून गेले. अखेर त्यांनी मला हॅवलॉक एलिसचं लेखन संग्रहित केलेलं ‘द सायकॉलॉजी ऑफ सेक्स’ हे पुस्तक आणून दिलं. लैंगिकता आणि लिंगभावाचा अभ्यास यासारख्या सामाजिक शास्त्रांमध्ये युरोपात त्यावेळी मोठीच प्रगती होती. हॅवलॉक एलिस, सिगमंड फ्रॉईड, मॅग्नस हर्शफिल्ड, कारपेंटर आणि त्यानंतर अल्फ्रेड किन्सी या शास्त्रज्ञांनी मला लैंगिकसंबंध, लैंगिकता आणि लिंगभाव यांकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली.

मी तुम्हाला थोडंसं माझ्या प्रवासाबद्दल सांगतो. भारत ज्या वर्षी स्वतंत्र झाला, अगदी त्याच वर्षी माझा जन्म झाला. ज्या मुलांचा १९४७ मध्ये जन्म झाला होता, त्यांना सलमान रश्दी यांनी ‘मिडनाईट चिल्ड्रन’ असं म्हटलं होतं. अर्थातच भारताला जेव्हा स्वतंत्र देश म्हणून घोषित करण्यात आलं, तेव्हा पंडित नेहरूंनी केलेल्या त्या विख्यात भाषणाचा संदर्भ त्याला आहे. अशा प्रकारे मीसुद्धा एक ‘मिडनाईट चाईल्ड’च होतो. पण काळोखातून प्रकाशाकडे येण्यासाठी मला बराच प्रयत्न करावा लागला.

माझा जन्म मुंबईतल्या गिरगावातला. विख्यात इंपिरिअल सिनेमा आणि काँग्रेस भवनाजवळ असणाऱ्या लॅमिंग्टन रोड इथला. माझे आईबाबा स्वातंत्र्यलढय़ामध्ये सक्रिय सहभागी होते. आई आणि अण्णा हे दोघेही काँग्रेसच्या सेवादलाचे सदस्य होते. महाराष्ट्राचे नेते यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली ते कार्यरत होते. यशवंतराव अनेकदा आमच्या घरी येत असत. अण्णा त्यांना ‘नाझ’ सिनेमाच्या मागच्या ‘गोविंदाश्रम’ या खानावळीमध्ये घेऊन जात असत. स्वातंत्र्यलढय़ाच्या वेळी आई आणि तिच्या सगळ्या सेवादलातल्या मैत्रिणी पाण्याच्या बादल्यांमध्ये कापडाच्या पट्टय़ा भिजवून ठेवत असत. ते सारे ओल्या कापडाचे तुकडे नंतर गोवालिया टँकला नेले जात. कशासाठी? ब्रिटिशांच्या विरुद्ध जे भारतीय निदर्शनं करत, त्यांच्यावर त्यावेळी पोलीस अश्रुधुराचा मारा करत असत. ओल्या कापडांच्या त्या पट्टय़ांचा उपयोग या अश्रुधुरापासून बचाव करण्यासाठी होई.

माझा जन्म मुदतीपूर्वीच म्हणजे मी आईच्या पोटात जेमतेम साडेसहा महिने असतानाच झाला. जर मी आईच्या पोटात पूर्ण ९ महिने पुरे केले असते, तर भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मी जन्माला आलो असतो. पण माझी आजी म्हणते तसंच असणार बहुधा- मी भारताचा स्वातंत्र्य लढा पाहायला फारच उत्सुक असल्यानं लवकर जगात आलो. माझ्या जन्माच्या वेळी आई जेमतेम १७ वर्षांची होती. त्यामुळं माझं पालनपोषण माझ्या कल्याणी आजीनं आणि बाबांची थोरली विधवा बहीण प्रेमाआक्का या दोघींनी केलं. त्यावेळी अण्णा इंपिरिअल सिनेमामध्ये ‘प्रोजेक्शनिस्ट’ म्हणून काम करू लागले. त्यामुळं आमची आर्थिक परिस्थिती जरा चांगली झाल्यानं लीली नावाची एक आया मला सांभाळण्यासाठी ठेवण्यात आलेली होती.

मी जेव्हा दोन वर्षांचा झालो, तेव्हा ही लीली मला मुलींचे कपडे घालायची. कारण ‘मी त्यात खूप गोड दिसायचो’ म्हणे. मला असं मुलीच्या वेशात नटवण्यात घरातल्या कुठल्याच स्त्रियांना फारसं वेगळं, विशेष वाटायचं नाही. त्यानंतर माझे बाबा चित्रपट उद्योगात गेले. त्यांनी त्यावेळी विख्यात असणाऱ्या वाडिया मूव्हीटोनच्या वितरण विभागात एजंट म्हणून काम करायला सुरुवात केली. पुढं काही काळानं त्यांनी भागीदारीमध्ये बसंत फिल्म डिस्ट्रिब्युटर्स नावाचा स्वत:चा व्यवसायही सुरू केला. त्यावेळी बॉलिवूडमधले सारे लोक ‘नाझ’ सिनेमातल्या संकुलात आपलं बस्तान बसवत होते. अण्णांनीही आपलं ऑफिस तिथंच सुरू केलं.

मी ८ वर्षांचा झाल्यावर मला एक आश्चर्यकारक गोष्ट आजूबाजूला घडत आहे हे लक्षात आलं. मुंबई या एकाच शहरात इंपिरिअल सिनेमाच्या परिसरात असणाऱ्या स्त्रिया त्यांच्यापासून केवळ काहीशे फूट अंतरावर राहणाऱ्या अन्य पारंपरिक स्त्रियांपेक्षा कितीतरी मुक्तपणे वावरत होत्या. विख्यात ‘हंटरवाली’ नादिया त्यावेळी नाझ बिल्डिंगमध्ये येत असे. त्यावेळी लो-कट ब्लाऊजमधून तिचं सौंदर्य अगदी उठून दिसत असे. ललिता पवार, लीला चिटणीस आणि व्ही. शांताराम यांची पत्नी जयश्री यादेखील तिथं नेहमी येत. (पुढं याच जयश्री यांची मागे झुकून फुले उधळणारी विख्यात ‘पोज’ राजकमल चित्रमंदिराच्या नाममुद्रेमध्ये वापरण्यात आली). या साऱ्या जणींना अभिनेत्री म्हणून मानसन्मान होताच, शिवाय पुरुष त्यांना समानतेची वागणुकही देत असत.

१९५०च्या दशकाच्या सुरुवातीचं वातावरण अगदी भारलेलं होतं. त्यावेळी मी अगदी अधाशासारखा वाचत असे. त्या काळात आम्ही मुंबईतल्या शिवाजी पार्कच्या दक्षिण भागात राहायला गेलो. शांतारामही आपली पत्नी संध्या यांच्या सोबत त्या भागात राहायला आले होते. शिवाजी पार्कच्या उत्तर भागात आमच्यासारखी फिल्म जगतातली म्हणजे ललिता पवार, सी. रामचंद्र, संध्या, लीला चिटणीस आणि प्र. के. अत्रे यांसारखी मंडळी राहात. (अत्रे लेखक म्हणून प्रसिद्ध असले, तरी ते ‘श्यामची आई’ या विख्यात चित्रपटाचे दिग्दर्शकही होतेच.) तर शिवाजी पार्कच्या दक्षिणेला राजकारणातील लोक राहात. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर, प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र बाळासाहेब त्या भागात राहत असत.

मी जेव्हा १२ वर्षांचा झालो, तेव्हा माझे बाबा माझ्या लैंगिकतेबाबतच्या सततच्या आणि खोलवरच्या प्रश्नांच्या माऱ्यामुळे पार त्रासून गेले. अखेर त्यांनी मला हॅवलॉक एलिसचं लेखन संग्रहित केलेलं ‘द सायकॉलॉजी ऑफ सेक्स’ हे पुस्तक आणून दिलं. बहुधा, गेल्या ७० वर्षांत सहापेक्षा जास्त वेळा घर बदलणारा रावकवी कुटुंबातला मी एकमेव सदस्य असेन. पण असं असलं, तरी आजसुद्धा हे महत्त्वाचं पुस्तक माझ्यासोबत आहेच. अण्णा म्हणायचे, ‘‘मराठी आणि हिंदी या भाषा जाणून घेण्यासाठी त्यात वाचन कर, पण विज्ञान, तंत्रज्ञान, जागतिक तत्त्वज्ञान आणि इतिहास यांच्या अभ्यासासाठी इंग्रजी आणि फ्रेंच पुस्तकं वाच.’’

लैंगिकता आणि लिंगभावाचा अभ्यास यांसारख्या सामाजिक शास्त्रांमध्ये युरोपात त्यावेळी मोठीच प्रगती होती. हॅवलॉक एलिस, सिगमंड फ्रॉईड, मॅग्नस हर्शफिल्ड, कारपेंटर आणि त्यानंतर अल्फ्रेड किन्सी या शास्त्रज्ञांनी मला लैंगिकसंबध, लैंगिकता आणि लिंगभाव यांकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. पण सर्वात  आश्चर्याची गोष्ट म्हणजे हॅवलॉक एलिस आणि एडवर्ड कारपेंटर या शास्त्रज्ञांच्या संपूर्ण लिखाणामध्ये कुठंही ‘होमोसेक्श्युअ‍ॅलिटी’ हा शब्ददेखील आढळत नाही. त्यांच्या संशोधनाच्या कालखंडाकडे मी बारकाईनं पाहिलं. त्यावेळी ‘होमोसेक्श्युअ‍ॅलिटी’ या शब्दाचाच मुळात त्या काळात शोध लागला नव्हता, हे पाहून मला धक्काच बसला. पुढं मारिया कर्टबेनी नावाच्या एका मनोचिकित्सकानं १८८९मध्ये दोन वेगवेगळे शब्द एकत्र जोडून हा नवा शब्द तयार केला. (त्यातला होमो या ग्रीक शब्दाचा अर्थ ‘सारखे’ आणि ‘सेक्शुअल’ या अँग्लोसॅक्सन शब्दाचा अर्थ ‘लैंगिक अवयवांशी संबंधित’ असा होता.) ज्या पुरुषाला किंवा स्त्रीला त्याच लिंगाच्या अन्य व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवायचा आहे, त्यांसाठी हा विशिष्ट शब्द तिने तयार केला होता.

हे एक तुलनेनं नवंच शास्त्र आहे, हे त्यावेळी माझ्या लक्षात आलं. पण त्याबद्दलचे उल्लेख भारतीय साहित्यामध्ये मात्र त्या आधीच येऊ लागले होते. १९५०च्या उत्तरार्धात आणि १९६०च्या सुरुवातीला विजय तेंडुलकरांनी ‘मित्राची गोष्ट’ ही लेस्बियन जोडप्याची दु:खी कहाणी लिहिलेली होती. नुकतच तिचं चित्रपटात रूपांतर करण्यात आलं आहे. अलीकडेच सचिन कुंडलकर यांच्या ‘कोबाल्ट ब्लू’ या मराठीतल्या महत्त्वाच्या पुस्तकाचं आता इंग्रजीमध्ये जेरी पिंटो यांनी भाषांतर केलं आहे. १५ वर्षांपूर्वी मिलिंद बोकील यांनी लिहिलेली ‘बंधू’ ही कथा एका दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती आणि त्यावेळी तिनं बरीच खळबळ उडवून दिली होती. निर्मला देशपांडे यांनीदेखील लेस्बियन या संकल्पनेवर लिहिलेली कथा हिंदीत अनुवादितही झालेली आहे. रुथ वनिता व सलीम किडवाई यांच्या ‘सेम सेक्स लव्ह इन इंडिया’ या अभ्यासपूर्ण लेखनामध्ये तिचा उल्लेख करण्यात आलेला आहे. उत्तम बंडू तुपे यांच्या ‘झुलवा’ या कादंबरीत तृतीयपंथीयांसोबत असणाऱ्या संबंधांचे चित्रमय वर्णन आहे, तर दलित लेखक नामदेव ढसाळ यांनीही गे पुरुष अन्य गे पुरुषांचा हिंडत कसा शोध घेतात, याबद्दल लिहिलं होतं. भालचंद्र नेमाडेंच्या ‘जरीला’मध्ये परिस्थितीमुळे उद्भवलेल्या समलैंगिकतेचे चित्रण केलेलं आहे. माझा मित्र बिंदुमाधव खिरे यांनंही अनेक पुस्तकं या विषयावर लिहिलेली आहेत. त्यापैकी ‘पार्टनर’ या पुस्तकाचा मला विशेष उल्लेख करावासा वाटतो. उज्ज्वला मेहेंदळे यांनीही ‘लोकप्रभा’ साप्ताहिकामध्ये समलैंगिकतेमधील वेगवेगळ्या संस्कृतींबद्दल केलेलं लेखन विशेष महत्त्वाचं आहे.

एकीकडे एलजीबीटी समुदायाची साहित्यामध्ये अशा प्रकारे दखल घेतली जात असतानाच क्षितिजावर एक नवा धोका त्याचवेळी दिसू लागलेला होता. माझ्या अनेक अमेरिकन मित्रांनी १९८०च्या उत्तरार्धात एका नव्या आजारामुळे आपण गंभीररीत्या आजारी आहोत असं सांगितलं. या आजाराला आधी GRID असं म्हटलं जात होतं. जीआरआयडीचा अर्थ होता गे रिलेटेड इम्युनोडेफिशिअन्सी डिसीज. मात्र याविरोधात अमेरिकेतल्या समलिंगी समुदायानं आरोग्य प्रशासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या अटलांटा स्थित सेंट्रल फॉर डिसीज कंट्रोल (सीडीसी) सोबत मोठी झुंज दिली. त्यामुळे अखेर या रोगाचं नामकरण AIDS (अ‍ॅक्वायर्ड इम्यून डेफिअन्सी सिंड्रोम) असं करण्यात आलं. हा आजार एचआयव्ही म्हणजे ह्य़ुमन इम्युनोडेफिशिअन्सी व्हायरसमुळे होत होता. त्याच्या पुढच्या एका वर्षांतच माझे जवळचे १५ अमेरिकन, इंग्लिश आणि फ्रेंच मित्र या आजारामुळं मृत्युमुखी पडले. शिवाय युरोपमधले अनेकजण एचआयव्हीमुळे बाधित झाल्यानं आजारी पडले होते ते वेगळेच.

त्यानंतर माझ्या आयुष्यातल्या एका वेगळ्या आणि दु:खी कालखंडाला सुरुवात झाली. त्याबद्दल आपण पुढच्या लेखात पाहणारच आहोत. तोवर जर या विषयावरच्या कुठल्या कथा-कविता माझ्या निरीक्षणातून सुटल्या असतील, तर त्याबद्दल लिहून मला जरूर कळवा.

भाषांतर – सुश्रुत कुलकर्णी

अशोक रावकवी rowkavi@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on March 24, 2018 1:01 am

Web Title: articles about gender issues and sexuality