06 August 2020

News Flash

गंडातून सुटका

आमच्या घरचं वातावरण मुक्ततेचा पुरस्कार करणारं होतं.

|| अशोक रावकवी

भारत ज्या वेळी स्वतंत्र झाला अगदी त्याच वर्षी माझा जन्म झाल्याने आपल्या देशाचा आणि माझा वैयक्तिक प्रवास एकाच वेळी सुरू झाला. आजही आम्ही दोघं काटय़ाकुटय़ांनी आणि अडथळ्यांनी भरलेल्या रस्त्यांवरून तो प्रवास करतोच आहोत. प्रत्येक समलिंगी व्यक्तीला आयुष्यात ‘हा’ प्रवास कधी ना कधी करावाच लागतो. काही पुरुषांच्या आयुष्यात तो आधी येतो, तर काहींच्या आयुष्यात अगदी उशिरा. दुर्दैवानं काही जण या प्रवासाला मात्र कधी सुरुवातच करू शकत नाहीत. आयुष्यभर त्यांना एका काळोख्या जगात लपत-छपत, पराकोटीचं नैराश्य आणि भीती यांचा सामना करत जगत राहावं लागतं. माझ्यासाठी तो कठीण प्रवास बराचसा सोपा होण्याचं कारण म्हणजे माझे मनमोकळ्या स्वभावाचे वडील. त्यांचं आणि माझं नातं अगदी मित्रत्वाचंच होतं.

सोबतच या प्रवासाच्या सुरुवातीतले माझे माहीमच्या बॉम्बे स्कॉटिश हायस्कूलमधले दिवस असोत की व्हीजेटीआयमध्ये मी इंजिनीअर बनवण्याची धडपड करत असलेले थोडके दिवस असोत; रामकृष्ण मिशनमध्ये मी साधू बनण्याची केलेली प्राणांतिक धडपड असो की अखेर हे सारं सोडून मी मुंबई विद्यापीठातून विज्ञान विषयात घेतलेली पदवी असो – मी नेहमीच शिवाजी पार्कच्या माझ्या साऱ्या मित्रांचाही ऋणी राहीन. आणि सोबतच माझ्या उदय आणि रणजित या दोन धाकटय़ा भावांचाही (दुर्दैवानं या दोघांचंही अकाली निधन झालं). त्यांनी आयुष्यभर माझं डोळ्यात तेल घालून रक्षण केलं. जरी ते ‘हा विषय’ कधीच उघडपणं बोलत नसले, तरी माझ्यावर टीका करणाऱ्या लोकांशी त्यांनी जोरदार लढा दिलेला होता. अगदी माझा बचाव करण्यासाठी प्रत्यक्ष हाणामारीसुद्धा केली होती. ज्या लोकांनी प्रत्यक्ष अशा मारामाऱ्या पाहिल्या होत्या, त्यांच्याकडून माझ्या कानावर हे आलं होतं. कदाचित मी करत असलेल्या लिखाणापेक्षा, त्या दोघांच्या संरक्षणामुळंच मला मित्रांकडून सन्मानाची वागणूक मिळाली असावी.

आमच्या घरचं वातावरण मुक्ततेचा पुरस्कार करणारं होतं. महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, प्र. के. अत्रे, ग. दि. माडगूळकर, विजय तेंडुलकर, मार्क्‍स आणि एंगेल्स्, आणि अनेक युरोपियन तत्त्वचिंतक या साऱ्यांचं साहित्य, तसंच सत्यजित राय यांच्या सारी सिनेमाची स्क्रिप्टस्, हे सारं आमच्या घरात होतं. आमचं कुटुंब गोव्यातून कसं बाहेर पडलं, याबद्दल ‘गोवा इनक्विझिशन’ या त्या वेळचा इतिहास वर्णन करणाऱ्या पुस्तकात प्रा. प्रियोळकर यांनी लिहिलेलं आहे. या साऱ्या वातावरणात मी लहानाचा मोठा झालो. अण्णा मला वांद्रे येथील ‘मेहबूब’ स्टुडिओसोबतच परळच्या ‘राजकमल’ आणि अंधेरीच्या ‘फिल्मिस्तान’ स्टुडिओमध्येही घेऊन जायचे. या साऱ्या ठिकाणी मला नेहमीच ‘माझ्यासारखे’ लोक सगळीकडे दिसायचे. त्या वेळी चित्रपट उद्योग आणि रंगभूमी या दोन्हीहीकडे लैंगिकता आणि लिंगभाव यांकडे आजसारख्या विरोधी भूमिकेतून पाहिलं जायचं नाही. अगदी थोडय़ाच लोकांना असं ‘वेगळं’ असण्याचा त्रास झाला.

अखेर माझ्या जीवनप्रवासात मला मनात असणारी उत्सुकता आणि पाहिलेल्या वा ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीचा शोध घेण्याची वृत्ती यांना योग्य न्याय देणारा व्यवसाय सापडला. तो होता पत्रकारितेचा. कुठल्याही चांगल्या वार्ताहराला हे दोन गुण आवश्यकच होते. ‘इंडियन एक्स्प्रेस समूह’मध्ये मी काम करू लागल्यावर माझी सारी कौशल्यं पणाला लागली. त्या वेळी मी गुन्हेगारी, विज्ञान, समाजशास्त्र (आणि कधीकधी राजकारणसुद्धा) या क्षेत्रात बीट रिपोर्टर म्हणून काम करत असे. ‘एक्स्प्रेस टॉवर’मध्ये घालवलेली ती १२ र्वष माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम र्वषे आहेत. आजही मला ते छान दिवस आठवतात. आमच्या विभागात दोन अत्यंत कर्तबगार वरिष्ठ होते. एक होते बी.एस.व्ही. राव, आमचे चीफ रिपोर्टर आणि दुसरे होते एस. कृष्णमूर्ती, आमचे न्यूज एडिटर. दोघंही अत्यंत कर्तव्यकठोर होते आणि त्यांच्या गुणवत्तेच्या निकषांनुसार काम करणं तसं कठीणच होतं. आम्ही लिहिलेल्या बातम्या त्यामधील माहिती अचूक आहे ना, याची खात्री करून घेण्यासाठी पुन:पुन्हा लिहून घेतल्या जात. कधीकधी किरकोळ चुकीसाठीसुद्धा मला त्यांची बोलणी खावी लागत. त्याकाळी ‘इंडियन एक्स्प्रेस’ व ‘लोकसत्ता’ या दोन वृत्तपत्रांमध्ये अगदीच खेळीमेळीचं वातावरण होतं. संपादकीय विभागात मध्येच रांगेनं मांडलेली बुटकी कपाटं म्हणजे दोन्ही वृत्तपत्रांमधली लुटुपुटुची सीमारेषा.

त्या काळातच तो प्रकार घडला. वैयक्तिक आयुष्यात मी ‘कसा’ आहे, हे या दोन्हीही वृत्तपत्रांमधल्या माझ्या सहकाऱ्यांसमोर अचानकपणे उघड झालं. एका शनिवारी रात्री वृत्तपत्र छापायला गेल्यावर आम्ही विरारला जाणारी उशिराची ट्रेन पकडली. शेवटच्या या लोकलला समलिंगी समुदायामध्ये ‘क्वीन्स् एक्स्प्रेस’ या नावानं ओळखलं जात असे. याचं कारण म्हणजे दक्षिण मुंबईतले समलिंगी पुरुष, वेश्या, तृतीयपंथीय आणि असेच अन्य लोक सगळी मजा करून रात्री घरी परतण्यासाठी ही लोकल पकडत असत. नेहमी उशिराच्या शिफ्टनंतर आम्ही सारी पत्रकार मंडळी ट्रेनमधल्या एखाद्या रिकाम्या डब्यात चढून डुलकी काढण्याची संधी मिळते का, हे शोधत असू.

पण अशाच एका रात्री माझा घात झाला. त्या दिवशी आमचे चार-पाच उपसंपादक आणि एक वरिष्ठ संपादक (रंगा सर) आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’, ‘फायनान्शिअल एक्स्प्रेस’ आणि ‘लोकसत्ता’ समूहातले कितीतरी बाकीचे वार्ताहर ती शेवटची ट्रेन पकडण्यासाठी धावत होतो. शेवटी कशीबशी आम्हाला ट्रेन मिळाली. आम्ही आत बसतो न बसतो तोच गेट वे ऑफ इंडियाकडून मौजमस्ती करून परतणाऱ्या डझनभर समलिंगी पुरुषांनी मला पाहिलं. ताज हॉटेलच्या समोरचा फुटपाथ ते दक्षिणेकडचा रेडिओ क्लब या भागाला त्या वेळी तेव्हा ‘द वेल’ असं म्हटलं जायचं. तिथं अरब, खलाशी, पुरुष वेश्या, परदेशी लोक व प्रवासी या साऱ्यांचीच मौजमस्ती करण्यासाठी झुंबड उडायची. आजूबाजूला मद्याचा पुरवठा करणारे अनेक बार असल्यामुळं दोन घोट पोटात गेल्यानंतर सगळ्यांना स्वत:ची खरी लैंगिकता खुलेपणानं जाहीर करण्याचं धैर्यही यायचं. त्यामुळं हा सगळा मोठा समलिंगी गट माझ्या चांगलाच परिचयाचा होता.

या परिचितांची नजर माझ्यावर पडताच मी ट्रेनच्या कंपार्टमेंटच्या कोपऱ्यात रंगा सरांच्या बाजूला दडायचा प्रयत्न करू लागलो. माझ्याशेजारीच राजा नायर नावाचा एक उंच, धिप्पाड मल्ल्याळी उपसंपादक बसलेला होता. मी असं का लपतो आहे, हे त्या दोघांनाही कळेना. पण पलीकडून जेव्हा कॉमेंट्स करायला सुरुवात झाली, तेव्हा ते त्यांना लगेचच कळलं. पलीकडून मनू नावाचा अंगात चमकदार कापडाचा शर्ट घातलेला एक जण, मला तिकडून कर्कश्श आवाजात बोलावू लागला : ‘‘अगं आशा (माझं समलिंगी जगात वापरात असणारं नाव) या असल्या हुशार लोकांसोबत तू काय करते आहेस? इकडं ये ना. आज तर तुझी खूप सारी गंमत हुकली.’’ त्यानंतर मग तिकडून कुलाबा इथल्या ‘द वेल’ या भागात भाडय़ानं घेतलेल्या खोल्यांमध्ये त्यांनी काय गमतीजमती केल्या याची विस्तृत वर्णनं ऐकावायला त्याने सुरुवात केली. त्यानंतर माझ्या आयुष्यात असणाऱ्या नौदलातील पुरुषांबद्दल मोठमोठय़ानं चर्चा सुरू झाली. त्यामुळं पलीकडचा मित्रांचा गट ‘नेव्हीतला एक विशेष माणूस तुझी चौकशी करत होता’ असं म्हणून मला तिकडून चिडवत होता (त्याच्याबद्दल पुन्हा केव्हातरी सांगेन).

अखेरीस ‘एक्स्प्रेस’च्या संपादकीय विभागातल्या माझ्या रंगा या वरिष्ठांना या अश्लील टिप्पण्या अगदी असह्य़ झाल्या. मला स्वत:ला इतकी शरम वाटत होती, की या लोकांना विरोध करण्याचं बळही माझ्यात नव्हतं. राजा नायर आणि रंगा हे दोघंही चर्नी रोड या पुढच्या स्टेशनला खाली उतरून फर्स्ट क्लासच्या दुसऱ्या डब्यामध्ये निघून गेले. मी तिथं तसाच बसून राहिलो. माझा वरिष्ठ एल्विन मेनिंझेस मात्र मला धीर देत होता. अखेर ‘माझ्यासोबत सारे माझे वरिष्ठ आहेत’ असं सांगत मी त्या साऱ्या लोकांना गप्प बसायला सांगण्याचा प्रयत्न केला. यावर पलीकडून खिदळण्याचा आवाज आला. कुणीतरी ओरडलं : ‘‘ए आशाबाई, जरा डोळे उघड स्वत:चे. प्रत्येकालाच तुझ्याबद्दल ठाऊक आहे हां! तू आपलं रंगीत मौजमस्तीचं जीवन का दडवून ठेवते आहेस?’’ खरंच, का असं करत होतो मी त्या वेळी?

त्या रात्री नंतर रंगा आणि राजा यांना जाऊन भेटण्याचं माझ्यामध्ये धैर्य अजिबातच नव्हतं. एल्विन ग्रँट रोडला राहात असल्यानं तो त्या स्टेशनवर उतरला. दादपर्यंत मी एकटय़ानंच प्रवास केला. तिथं उतरून मी शिवाजी पार्कच्या दिशेनं चालू लागलो. प्लाझा सिनेमा आणि त्यानंतर कोहिनूर मिल्स्जवळच्या अंधाऱ्या रस्त्यानं घराकडं चालत असताना माझं आयुष्य पुन्हा कधीच पहिल्यासारखं असणार नाही, हे माझ्या लक्षात आलं होतं. दुसऱ्या दिवशी माझ्या वरिष्ठांना तोंड दाखवायला मला सारा आत्मसन्मान पणाला लावावा लागणार होता. जितका धीर मला गोळा करता येईल, तितका तो मी गोळा करत होतो.

पण त्या दिवशी उलटंच घडलं. रंगा सर आणि राजा नायर या दोघांनीही सभ्यता आणि सुसंस्कृतपणा म्हणजे काय, याची प्रचीतीच मला आणून दिली. आदल्या रात्री जणू काहीच घडलं नाही, अशाप्रकारे ते माझ्याशी नेहमीसारखंच वागत होते. त्या दिवशी संध्याकाळी चहाच्या वेळी राजा आणि रंगा, दोघंही जण मला एक्स्प्रेस कँटीनमध्ये घेऊन गेले. ‘‘अरे बाबा, आम्हाला तुझ्याबद्दलचं ठाऊक होतं.’’, रंगा सर हसतहसत म्हणाले. ‘‘पण काल रात्रीचा प्रकार तुझ्याइतकाच आम्हालासुद्धा संकोच वाटायला लावणारा होता. पण आम्ही काही तुला कुठल्याच बाबतीत कमी समजत नाही.’’ राजा म्हणाला.

मग त्या दोघांनी छान विनोद केले. त्याने आदल्या रात्रीच्या प्रसंगामुळं निर्माण झालेला ताण विसरून आम्ही सारेच जोरजोरानं हसू लागलो. माझ्या या सहकाऱ्यांनी अशाप्रकारे मला स्वत्वाची जाणीव करून दिली. त्यांच्या या ऋजू आणि सुसंस्कृत वागण्यामुळं मी जगात समलिंगी असल्याचा गंड न वाटता मोकळेपणानं वावरू लागलो. मी मुंबई नावाच्या शहरात राहतो ही किती छान गोष्ट आहे ना? मी मुंबईत म्हणजे मुंबा-आईच्या घरात राहतो. ही देवी तिच्या सप्तद्वीपांमध्ये वास्तव्याला येणाऱ्या आणि कष्ट करून प्रामाणिकपणे आयुष्य जगू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला आत्मसन्मानाची हमी देत असते.

आणि त्या दिवशी मी ठरवलं, की मीसुद्धा या मुंबा-आईला अभिमान वाटेल, असंच काम पुढचं आयुष्यभर करेन!

rowkavi@gmail.com

chaturang@expressindia.com

अनुवाद : सुश्रुत कुलकर्णी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2018 1:32 am

Web Title: articles about gender issues and sexuality 2
Next Stories
1 मिसळून गेलेला एलजीबीटी समूह
2 सुसंस्कारच!
3 काळोखाकडून प्रकाशाकडे
Just Now!
X