05 July 2020

News Flash

आझादी आणि बरंच काही..

१९७० ते ८०चं दशक हे स्वातंत्र्य उपभोगण्याचं दशक होतं.

|| अशोक रावकवी

१९७० ते ८०चं दशक हे स्वातंत्र्य उपभोगण्याचं दशक होतं. (अर्थात या काळात इंदिरा गांधींच्या जुलमी आणीबाणीचा टप्पाही होताच. याच काळात मी ऐहिकदृष्टय़ा आणि मानसिकदृष्टय़ादेखील अनेक मित्र गमावले.) माझा मुंबईतल्या नव्यानं उदयाला येऊ पाहणाऱ्या मध्यमवर्गावरचा विश्वास पूर्णत: उडाला तो याच दशकात. गुदमरून टाकणाऱ्या पारंपरिक, मध्यमवर्गीय मूल्यातून स्वत:ची सुटका करून घेणं, हेच जणू माझ्या नियतीमध्ये लिहिलेलं होतं.

अण्णांचं १९७४ मध्ये अचानक निधन झाल्यानंतर मीच रावकवी कुटुंबातला कर्ता पुरुष झालो होतो. त्या वेळी माझी आई शोभा आणि आत्या प्रेमाअक्का हे दोन आमच्या घराचे खरे आधारस्तंभ आहेत, हे माझ्या लक्षात आलं. पत्रकारितेत मिळणारा तुटपुंजा पगार आणि सोबतीला बॉलीवूडमधील नायकांच्या नावानं लिखाण करण्याची (म्हणजे घोस्ट रायटिंगची) कामं मिळाल्यामुळं निदान दोन वेळचं अन्न मिळवण्याइतपत तरी मी मजल मारू शकलो; पण त्याच वेळी एक घटना अशी घडली, की शरीर हीसुद्धा मुंबईच्या बाजारांमध्ये खरेदी-विक्री केली जाणारी एक वस्तू आहे, हे माझ्या लक्षात आलं. एका ‘गे पार्टी’मध्ये ही घटना घडली होती. तिथं सर्व प्रकारचे लोक होते – सर्व प्रकारचे म्हणजे सगळ्या जातींचे, धर्माचे आणि आर्थिक स्तरातले गे लोक मढ आयलंड इथल्या एका पार्टीला जमलेले होते. मी एका कोपऱ्यात शांतपणे हातात माझ्या पेयाचा ग्लास धरून उभा होतो. तेवढय़ात एक उंच जर्मन माणूस माझ्याकडं आला आणि त्यानं हिंदीत गप्पा सुरू केल्या. तो एका मोठय़ा बहुराष्ट्रीय औषध कंपनीत उच्चपदी काम करत होता. बोलता बोलता आमच्यातला अवघडलेपणा कमी होत गेला आणि ती रात्र आम्ही सोबत घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता केल्यानंतर मी त्याच्या आदरातिथ्याबद्दल आभार मानून घराच्या दिशेनं निघालो. रेल्वे स्टेशनवर ट्रेनचं तिकीट काढण्यासाठी मी पाकीट उघडलं, तर त्यामध्ये मला जास्तीचे ५०० रुपये दिसले. (त्या काळात ही बऱ्यापैकी मोठी रक्कम होती) मी बावरून गेलो. ‘मी पैसे चोरले आहेत’ असं त्या जर्मन माणसाला वाटेल की काय, असे मनात विचार येऊ लागले. लगेचच एका सार्वजनिक फोनवरून मी त्याच्या घरच्या नंबरवर फोन केला. पाकिटात सापडलेल्या पैशांबद्दल मी त्याला सांगितले. त्यावर तो हसत म्हणाला, ‘‘अरे, तुला घरी जाण्यासाठी टॅक्सीचे म्हणून मीच ते पैसे ठेवले होते.’’ त्या काळात मी अगदी टॅक्सीनंसुद्धा घरी गेलो असतो, तरी १०० रुपयांपेक्षा जास्त बिल झालं नसतं. त्यामुळं मी पुन्हा एकदा त्याला माझ्या पाकिटात सापडलेल्या मोठय़ा रकमेबद्दल सांगितलं. ‘‘तू मला पुन्हा भेटावंस यासाठी ते पैसे ठेवलेले होते.’’ तो बेफिकीरपणे म्हणाला.

ते ऐकून मी पार उडालोच. तो मला काय समजला होता?.. पश्चिम रेल्वेच्या त्या स्टेशनवर उभं राहून मी खदाखदा हसायलाच लागलो.. पण  लवकरच मी समाजाच्या वरच्या वर्तुळातील ‘गे सर्कल’मध्ये शिरलो.. अनुभवांचं भांडार होतं तिथे. त्यावेळी एक प्रसंग घडला. माझा एक अगदी जवळचा मित्र बॉलीवूडमधल्या मोठय़ा फिल्म स्टुडिओचा मॅनेजर होता. आम्ही ओव्हल मैदानातून जात असताना आम्हाला लोकांचे जोरजोरात, चिडलेले आवाज ऐकू येऊ लागले. उडपी हॉटेलात काम करणारी काही मुलं एका माणसाला अंधारात जोरजोरानं मारताहेत, असं आम्हाला दिसलं. आम्ही धावत जाऊन त्यांना मारण्यापासून रोखलं. तिथं एक जण उडपी हॉटेलमधल्या एका तरुणासोबत मजा करताना त्यांना सापडला होता आणि ते त्याला मारत होते. त्या माणसाला या संकटातून सोडवल्यावर आम्हाला त्याचा चेहरा दिसला. मुंबईतल्या सर्वात मोठय़ा तीन उद्योगपतींपैकी तो एक होता. आमचे आभार मानून तो उद्योगपती निघून गेला. विशेष म्हणजे, दुसऱ्या दिवशीच मी एका कॉर्पोरेट पत्रकार परिषदेला गेलो असताना तिथं तो आपल्या उत्पादनाबद्दल सगळ्यांशी बोलताना दिसला. त्यानं माझ्याकडं बघून हलकं स्मित केलं खरं, पण याआधी तो मला भेटला आहे, असं त्यानं अजिबातच दर्शवलं नाही. त्याला मनातून कसं वाटत असेल, हे मला समजू शकत होतं. त्यामुळं अर्थातच मीही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही.

हे प्रसंग म्हणजे नुसते किस्से नाहीत, तर ते तुम्हाला सांगण्याचं एक विशिष्ट कारण आहे. ते म्हणजे, समाजात कुठल्याही ठिकाणी समलैंगिकता कशा प्रकारे अनपेक्षितपणे समोर येऊ शकते, याची ही सारी उदाहरणं आहेत. समाजात प्रतिष्ठित ठरलेले मोठमोठे लोकसुद्धा या एका गोष्टीमुळं हिंसाचार आणि ब्लॅकमेल यांना बळी पडत होते, पडतात.

अशा अनेक प्रसंगांतून सुटका झाल्यानं माझा असे साहस करण्याचा सोस आणखीनच वाढला. एकदा मढ आयलंड इथल्या एका पार्टीत अचानक पोलिसांची धाड पडली. कारण तिथल्या संयोजकाकडे पार्टीसाठीचा मद्य परवाना नव्हता.  मग चटकन मी आणि मुंबईतल्या एका विख्यात आर्ट डीलरनं एका कुख्यात गुंडाच्या भावाला आमच्या कारच्या डिकीत लपवलं. मढ आयलंड ते अंधेरी जंक्शनपर्यंत आम्ही वेगानं गाडी हाकली. हे सारं खूपच वेडेपणाचं होतं. जरा कल्पना तर करा, एक पत्रकार आणि शहरातला सर्वात मोठा प्रतिष्ठित आर्ट डीलर पोलिसांना हव्या असलेल्या गुंडाच्या भावाला पळून जाण्यासाठी मदत करताहेत. काय होऊ शकलं असतं आमचं? अर्थातच त्याला आमच्याबद्दल कृतज्ञता वाटत राहिली, पण पुढं त्या गुंडाला भेटणं मी टाळलंच.

अशा प्रकारचं धाडसी वागणं मला अनेकदा अडचणीतसुद्धा आणत असे. एकदा एका कॉर्पोरेटच्या कार्यक्रमाहून उशिरा घरी परतत असताना शिवाजी पार्क परिसरात मला एक देखणा ‘कार्यकर्ता’मागे येताना दिसला. मला ‘भेटण्यासाठी उत्सुक होता’ हे उघडच होतं. आपल्याला भेटण्यासाठी इथं माझ्याकडं कुठलीच जागा नाही, असं मी त्याला (खोटंच) सांगितलं. त्यावर ‘मी राहात असलेल्या खोलीकडं जाऊ या,’ असं तो म्हणाला. प्रत्यक्षात तिथं पोहोचल्यावर हा सारा एक बनाव होता, असं माझ्या लक्षात आलं. मला लुटण्यासाठीच (माझ्यासोबत ब्रीफकेसही होती) आपल्या एका मित्रासोबत त्यानं हे सारं रचलं होतं. या प्रसंगानंतर मी दादर पोलीस ठाण्यामध्ये गेलो. तिथल्या फौजदारानं मला गुन्हय़ाबाबतची माहिती विचारल्यावर मी त्याला सत्य काय ते सांगितलं. त्या देखण्या माणसाला लैंगिक संबंधांची इच्छा असल्यानं आम्ही कसे भेटलो आणि नंतर काय काय घडलं ते मी सांगितलं. ते सारं ऐकून डायरीत लिहिताना क्षणभर त्या फौजदाराचा श्वासच अडकला. लिहिणं थांबवून त्यानं विचारलं, ‘‘तुम्ही काय बोलताहात ते तुम्हाला नीट कळतंय का?’’ त्यावर, ‘‘होय. मी अगदी खरं तेच सांगतो आहे. हवं तर अमुक माणसानं मला लुटायचा प्रयत्न केला एवढाच भागसुद्धा मी तुम्हाला सोयीस्करपणे सांगू शकला असतो, पण त्याला माझ्याकडून वेगळंच अपेक्षित होतं. हे सत्यसुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे. मात्र तसं काही घडलं नाही. तिथं जे काही घडलं तो हिंसाचारच होता,  तुम्ही या माणसाविरुद्ध तात्काळ कृती करावी.’’ मी म्हणालो. आता दादर पोलीस ठाण्यामध्ये टाचणी पडली तरी ऐकू येईल इतकी शांतता पसरली.  हा खंडणीबहाद्दर कार्यकर्ता सततच आजूबाजूच्या परिसरात दिसत असल्यानं त्याचा नीट बंदोबस्त करणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. इथं जर माझी हार झाली असती, तर माझं त्या परिसरात जगणं कठीण होऊन बसलं असतं. अखेर माझा नैतिक विजय झाला. त्या दोन्हीही कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. माझ्या या विजयानं मोठाच फरक पडला, कारण नंतर तो कार्यकर्ता मला आदराने वागवू लागला. पुढं पुढं तर आम्ही ‘छबिलदास’ जवळ एकत्र वडापावसुद्धा खाऊ लागलो आणि आमची मैत्रीही झाली.

माझ्या या मुक्त वागण्याला आता काही सीमाच राहिलेल्या नव्हता. माझ्या समलिंगी विश्वातल्या आईनं, अ‍ॅलन गिलनं मला ‘डान्स बार’ नावाच्या नव्याच जगाचा दरवाजा उघडून दिला होता. अशाच एका डान्स बारमध्ये मला ‘सिंपल’ हा समलिंगी पुरुष भेटला. हा सिंपल ग्रँट रोडवरच्या एका कुप्रसिद्ध बारमध्ये नृत्य करत असे. दर शनिवारी रात्री तर तिथं अंडरवर्ल्डमधली सगळी नामचीन मंडळी जमत असत. एरव्ही बाहेरच्या जगात असणाऱ्या विख्यात, तथाकथित ‘माचो’ पुरुषांचं हे समलिंगी रूप पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसत असे.

अर्थात माझं आयुष्य जरी त्यावेळी असं मस्तीचं सुरू होतं तरी लवकरच माझ्या आयुष्याला भीषण  आणि हृदयद्रावक वळण लागणार होतं. कारण सगळ्याच ‘गे’ना मुक्त आयुष्य नव्हतं. अनेकांना आपल्या घरी ते सांगता येत नव्हतं, त्यामुळे प्रचंड नैराश्य त्यांच्या वाटय़ाला आलं होतं. काहींनी तर त्या नैराश्यापोटी आत्महत्याही केल्या होत्या. त्या काळात अशा आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण मोठं होतं. काही जण नैराश्यापोटी व्यसनाच्या प्रचंड आहारी गेले होते. एक काळंकुट्ट जग माझ्या समोर येणार होतं, पण त्याही आधी मला आणखी एका भीषण वास्तवाला सामोरं जावं लागलं. माझ्या या मौजमस्तीनं भरलेल्या जीवनाला ती काळी किनार होती. या जीवनशैलीमुळं मला स्वत:लासुद्धा अनेक प्रकारच्या आजारांना सामोरं जावं लागलं होतं. क्षितिजावर आता नवीनच भयप्रद सावली पडू लागलेली होती. सॅनफ्रान्सिको परिसरात समलिंगी पुरुषांना ग्रासणारा एक (गे रिलेटेड इम्युनो डेफिशिअन्सी डिसीज) नावाचा आजार पसरतो आहे, असं त्या वेळी मी वृत्तपत्रांतून वाचलं होतं. त्यामुळं आमच्या एका गटानं केईएम हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी जाण्याचं ठरवलं. तिथल्या डॉ. गीता भावे जीवरसायनशास्त्र विभागाच्या आणि प्रयोगशाळेच्या प्रमुख होत्या. त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘मी सॅनफ्रान्सिस्कोला गेले होते तेव्हा तिथं ‘प्राइड परेड’ पाहिली. त्यात अनेक देखणे गे पुरुष होते तुमच्यासारखेच. (आम्ही एकूण आठ लोक तिथं गेलेलो होतो). तुम्ही नक्की गे आहात याची तुम्हाला खात्री आहे ना? की केवळ तुम्ही एक फॅशन म्हणून असं करता आहात?’’ हे सारं खूपच गमतीशीर होतं. अ‍ॅलनला तर त्या ‘एक मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय’ ताईच वाटत होत्या. (या डॉक्टर किती ‘ताई’सारखं वागताहेत, अशी कुरकुरही त्यानं केली.) आम्ही प्रयोगशाळेत आमचं रक्त तपासणीसाठी दिलं आणि देवाची प्रार्थना करू लागलो. आम्हा आठ जणांपैकी दोन जणांच्या रक्तामध्ये एचआयव्हीचा विषाणू सापडला, म्हणजेच एड्सला कारणीभूत असणारा विषाणू. मी त्या दोघांपैकी नव्हतो, पण अ‍ॅलन मात्र होता. ही बातमी ऐकून मी त्या वेळी खूपच अस्वस्थ झालो. अ‍ॅलननं मात्र ती गोष्ट हसून उडवून लावली.

त्यानंतर आम्हाला कोणत्या शोकांतिकेला सामोरं जावं लागलं, हे आपण पुढच्या स्तंभामध्ये बघणारच आहोत. मुंबईतल्या माझ्यासारख्या लोकांचा याविरुद्धचा लढा अजून चालूच आहे. सुदैवानं मुंबई महापालिकेमधल्या काही तज्ज्ञ मंडळींची या लढय़ात आम्हाला साथ आहे. होय, अगदी खरं सांगतोय! आता लवकरच मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसी माझी कर्मभूमी होणार होती आणि अगदी आजही ती माझं कर्मक्षेत्र आहेच..

(अनुवाद: सुश्रुत कुलकर्णी)

rowkavi@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 12:03 am

Web Title: articles about gender issues and sexuality 3
Next Stories
1 ‘आझादी’ची कर्मकठीण जबाबदारी
2 गंडातून सुटका
3 मिसळून गेलेला एलजीबीटी समूह
Just Now!
X