अनुवाद : सुश्रुत कुलकर्णी

जेव्हा मुंबई शहरात एचआयव्ही/ एड्सचा धोका पराकोटीला पोचला होता, तेव्हा मुंबा-आई आणि मुंबई महापालिका, या दोघीही माझ्या मदतीला धावून आल्या. तोवर या रोगाचा मुकाबला करण्यासाठी कोणतंही औषध नव्हतं. पण या दोघींनीही मात्र मला मुंबईमध्ये माझ्या समुदायाच्या लोकांना एकत्र आणायला मदत केली..

भारतामधल्या बहुसंख्य समलैंगिकांसाठी १९७० ते १९८०चं दशक मोठय़ा प्रमाणावर उलथापालथ घडवणारं आणि बऱ्यापैकी भीतीचंही ठरलं. त्याच वेळी जगभरातल्या समलिंगी व्यक्तींमध्ये स्वत्त्वाची जाणीव व्हावी आणि त्यांना समाजात सन्मान मिळावा यासाठी चळवळी सुरू झालेल्या होत्या. या चळवळीची सुरुवात १९६९ मध्ये न्यूयॉर्क इथं झाली.

दक्षिण न्यूयॉर्कमधल्या ख्रिस्तोफर स्ट्रीटवर ‘स्टोनवॉल’ नावाचा एक बार होता. पोलीस तिथं नेहमी धाडी टाकायचे आणि समलैंगिकांचा छळ करायचे. या बारमधल्या लोकांनी व्यवस्थेविरुद्ध पहिल्यांदा बंड केल्यामुळं याला ‘स्टोनवॉल रायट’ असं ओळखलं जातं. बंडाचा हा दिवस म्हणजेच २९ जून जगभरात ‘गे लिबरेशन डे’ म्हणून ओळखला जातो. एक समलिंगी

म्हणून स्वत:ला पटलेल्या ओळखीची जाणीव होणं आणि समाजाच्या दबावाला बळी न पडणे, या गोष्टींच्या आठवणीसाठी हा दिवस साजरा केला जातो.

१९७०च्या दशकात या चळवळीचे वारे भारतातही वाहू लागले होते खरे, पण अगदी जेमतेमच. कारण क्षितिजावर कुठल्याच सामाजिक बदलांची नांदी दिसत नव्हती. भारतात मुळात संघटित ‘एलजीबीटी’ समुदाय नावाची कोणती गोष्टच अस्तित्वात नव्हती ना! अगदी आज, २१व्या शतकातही मला याबाबत चिंता वाटत असते. कारण भारतीय दंडविधानांतर्गत असणाऱ्या ३७७ला कलमाविरुद्ध मला आजही झुंज द्यावी लागते आहे (या कलमामध्ये समान लिंगाच्या व्यक्तींनी परस्परसंमतीनं शरीरसंबंध ठेवणं, हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. म्हणजे त्यामुळं एखादा माणूस केवळ समलिंगी असला, तरी तो कायद्याच्या दृष्टीनं गुन्हेगार ठरतो.). पण अशा कायद्यापेक्षाही एक जोरदार धक्का आम्हाला १९८० दशकाच्या उत्तरार्धातच बसणार होता.

तोपर्यंत आमच्यापैकी बहुसंख्य लोकांना एचआयव्ही/एड्स या नव्या आजाराबाबत खूपच चिंता वाटू लागलेली होती. त्या वेळी अमेरिकेत हा रोग पसरायला नुकतीच सुरुवात झालेली होती आणि खासकरून तो समलिंगी पुरुषांवर परिणाम करत होता. भारतात मात्र पहिल्यांदा चेन्नईमधल्या एका स्त्रीला, वेश्येला हा आजार झाल्याचं १९८४ मध्ये लक्षात आलेलं होतं. गे पार्टीजमध्ये रममाण होणाऱ्या बहुसंख्य भारतीय समलिंगींना मात्र हा आजार कधी भारतात येईल, असं वाटत नव्हतं. खरंतर, एचआयव्हीची बाधा भारतात पहिल्यांदा एका स्त्रीला झाल्याचं लक्षात आल्यानंतर तर भिन्नलिंगी संबंध ठेवणाऱ्या ‘वाईट चालीच्या स्त्रियांना’च फक्त असले लैंगिक संबंधामुळं होणारे आजार होतात, असंच सगळीकडं बोललं जात होतं. पसरवलं जात होतं.

१९८९ मध्ये माँट्रिअल इथं भरणाऱ्या ५व्या आंतरराष्ट्रीय एड्स परिषदेसाठी मला समलिंगी लोकांच्या एका गटानं आमंत्रित केलेलं होतं. तेव्हा मला हा आजार किती भयंकर आहे, हे लक्षात आलं. त्या वेळी अमेरिकेत तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रेगन आणि पारंपरिक मतं असणारं रिपब्लिकन सरकार यांच्यासोबत, चळवळ करणाऱ्या एलजीबीटी समुदायाचा या आजारावर उपचार करण्यासाठी निधी मिळवण्यासाठीचा अयशस्वी लढा चालू होता.

या रोगाचे भयंकर परिणाम दिसू लागलेले होते. मी १९९१ मध्ये अमेरिकेला आणि १९९२ मध्ये ब्रिटनला भेट दिली होती. त्या वर्षी सॅनफ्रान्सिस्कोमधल्या माझ्या जवळच्या १६ मित्रांपैकी १२ मित्र एकाच वर्षांत औषधोपचारांअभावी मरण पावले. लंडनमध्येदेखील नऊ मित्रांपैकी सहा मित्र कोणताच मागमूस न ठेवता मरण पावले. अर्थातच ते सारे अविवाहित असल्यामुळं त्यांच्यामागे शोक करणारं कोणीही नव्हतं. अगदी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्सेसही त्यांना स्पर्श करायला घाबरत होते. रुग्णांची शक्य तितकी सेवा मित्र किंवा प्रियजनच करत होते. हे सारं चित्र खूपच भीतीदायक होतं.

ही प्रचंड भीती मनात घेऊन मी भारतात परतलो. माझ्या जवळच्या सगळ्या मित्रांना हे जणू समलिंगींचा वंशविच्छेद करणंच सुरू आहे, असं मी सांगितलं. एकीकडे ख्रिश्चन धर्मगुरू या आजाराला ‘समलिंगी असल्याबद्दल परमेश्वरानं तुम्हाला दिलेला हा शाप आहे’ असं म्हणत होते, तर दुसऱ्या बाजूला लाखो नागरिक या नव्या प्राणघातक आजाराबद्दल मनात शंकाकुशंका आणि धास्ती घेऊन वावरत होते. या दरम्यान चर्चचे वेगवेगळ्या धर्मामधले नैतिक पोलीस आणि पारंपरिक विचारांचा समाज, अशा दोहोंनीही या आजाराचं खापर समलिंगी समुदायावर फोडायला सुरुवात केली.

भारतामध्ये याबाबत खूपच साशंकता आणि भीती असल्यामुळं सगळ्यांनीच या विषयावर तोंडात मिठाची गुळणी धरलेली होती. समाजातले अनेक प्रतिष्ठित लोकांनी (जे गुप्तपणे समलिंगी म्हणून वावरत होते) लंडनला जाऊन स्वत:ची एड्सची चाचणी करून घेतली. भारतात नुसती अशी चाचणी करण्याचीसुद्धा त्यांना प्रचंड भीती वाटत होती. कारण दुर्दैवानं त्यात जर त्यांना आजार झाल्याचं निदान झालं असतं, तर समाजाकडून होणारी हेटाळणी आणि भेदभाव यांना त्यांना सतत सामोरं जावं लागलं असतं. याउलट काही समलिंगी लोकांचा दृष्टिकोन तर वेगळाच होता. ‘जर या आजारावर कोणते उपचारच उपलब्ध होणार नसतील, मग चाचणी करून घेऊन आपल्याला एचआयव्हीची बाधा झाल्याचं माहीत करून तरी काय फायदा?’ असाही होता. त्यामुळं फारच थोडय़ाच लोकांनी एड्सची चाचणी करून घेतली. माझ्या दोन मित्रांनी (त्यापैकी एक बालहक्क  संरक्षणासाठी चळवळ करणारा प्रसिद्ध कार्यकर्ता होता, तर दुसरा प्रसिद्ध उद्योगपती होता) हा आजार लपवून गुपचूप लंडनला जाऊन त्यावर उपचार करून घेतले होते, असं मी ऐकलं होतं. अर्थात ते उपचारही पूर्णत: निरुपयोगीच होते. कारण मुळात या आजारावर उपचार करणाऱ्या औषधांचं शोधणारं संशोधनच त्या वेळी अगदी प्राथमिक अवस्थेत होतं.

तुम्हाला वाचून कदाचित आश्चर्य वाटेल, पण एचआयव्ही आणि एड्स या दोन गोष्टींसाठी स्वतंत्र संस्था स्थापन करणारा भारत हा जगातल्या पहिल्या काही देशांमधला एक देश आहे. ‘नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिटय़ूट’ (एनएआरआय) ही संस्था १९९२ मध्ये पुण्याच्या भोसरी भागात स्थापन करण्यात आली. आजही ती एड्सवर संशोधन करणाऱ्या जगातल्या प्रमुख संस्थांपैकी एक गणली जाते. त्या वेळी डॉ. रमण गंगाखेडकर तिथले सर्वात विख्यात संशोधक होते. अगदी आजही जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि केंद्र सरकारच्या आरोग्य विभाग एचआयव्हीबाबत कोणताही कार्यक्रम आखण्याआधी ‘एनएआरआय’चा सल्ला घेतात.

डॉ. गंगाखेडकरांनीच माझी डॉ. सुभाष साळुंखे यांच्याशी ओळख करून दिली. हे अत्यंत हुशार गृहस्थ त्या वेळी ते महाराष्ट्र आरोग्य सेवेचे संचालक होते. या दोन्हीही सद्गृहस्थांनी मला नेहमीच अत्यंत सन्मानानं वागवलं. मी ही गोष्ट आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही, कारण डॉ. साळुंखे संचालक होण्याच्या आधीच्या काळात जेव्हा जेव्हा मी आरोग्य संचालनालयामध्ये जात असे, तेव्हा मला बसायला साधी खुर्चीदेखील दिली जात नसे. पण डॉ. साळुंखेंशी परिचय झाल्यानंतर मात्र बसायला खुर्ची तर मिळू लागलीच शिवाय सोबत चहादेखील आणला जाऊ लागला. डॉ. गंगाखेडकरांनी माझ्या बरोबरच महाराष्ट्रभरातल्या अनेकांच्या विस्तृत मुलाखती घेतल्या आणि त्यामुळे सगळ्यांनाच या आजाराबद्दलचं गांभीर्य कळलं (पुढं त्यांनी मला त्यांच्या संशोधनासाठी सल्लागार म्हणूनही नियुक्त केलं.). आजही डॉ. साळुंखे डब्ल्यूएचओचे आरोग्यविषयक सल्लागार म्हणून काम करतात. हे दोन्हीही महाराष्ट्रात आरोग्य सेवेत कार्य करणारे मोठे आधारस्तंभ आहेत आणि गेले २५ र्वष ते माझे मित्र आहेत याचा मला खूप अभिमान वाटतो.

या दोन्ही तज्ज्ञांनीच मला मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेवा विभागाकडं पाठवलं होतं. १९८०-१९९०च्या दरम्यान डॉ. अलका कारंडे त्याच्या प्रमुख होत्या. ‘झपाटय़ानं काम करणाऱ्या’ म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचे कनिष्ठ सहकारी होते डॉ. जयराज ठाणेकर. ते एखाद्या पैलवानासारखेच दिसत. या दोघांसोबत माझ्या महापालिकेमधल्या कामाला सुरुवात झाली.

ही आहे १९९०ची गोष्ट. आत्ताच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’जवळच्या मनपा आरोग्य विभागाला दिलेली ही भेट मला काहीशी बुचकळ्यातच पाडणारी होती. दुसऱ्या मजल्यावरच्या एका ऑफिसमध्ये डॉ. कारंडे यांनी मला बोलावलं. बहुधा ‘बघू या तरी हा समलिंगी कोण आहे’ अशा उत्सुकतेनं त्यांनी बोलावलं असावं. त्यांनी मला अगदी थेटच विचारलं – ‘‘तुम्ही ‘तसले’ पुरुष आहात का?’’ त्यांच्यासमोरच्या भल्यामोठय़ा टेबलाशेजारी

डॉ. ठाणेकर उभे होते. ते उद्गारले, ‘‘हा दिसतोय तर तसा सभ्यच.’’ डॉक्टरांची ही दुक्कल मी एखादा ‘सार्वजनिक आरोग्यापुढं उभा ठाकलेला प्रश्न’ असावा, अशा नजरेनं माझ्याकडं पाहात होते. मात्र त्यांच्या नजरेमध्ये माझ्याबद्दल अजिबात घृणा किंवा तिरस्कार नव्हता, तर केवळ उत्सुकता होती. प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शकाखालच्या एखाद्या क्षयरोगाच्या किंवा कॉलराच्या जिवाणूकडं संशोधक जसं पाहील, अगदी त्या नजरेनं ते दोघंही माझ्याकडं पाहात होते. या सगळ्या दाटीवाटीनं भरलेल्या शहराला निरोगी आणि रोगमुक्त ठेवण्यासाठी मुंबई महापालिका किती मोठं आणि कठीण काम करते आहे, हे पाहून मला आश्चर्य वाटल्यावाचून राहिलं नाही. खासकरून खूप कमी लोकांना नव्यानं उद्भवणाऱ्या या आरोग्यविषयक प्रश्नांबाबत जाण असूनसुद्धा मुंबई मनपा खूपच आघाडीवर होती. भविष्यात डॉक्टरांची ही जोडी माझ्यासाठी मोठाच आधार बनणार होती, हे लवकरच दिसू लागलं.

डॉ. कारंडे अगदी सावकाश आणि मोजून मापून बोलणाऱ्या होत्या. त्यांनी आमच्यासाठी चहा मागवला. त्या मला अगदी बारकाईनं प्रश्न विचारू लागल्या. ‘‘तुमच्यासारखे असे किती पुरुष असतील?’’ त्यावर मी उत्तरलो, ‘‘मुंबई आणि तिची उपनगरं मिळून निदान लाखभर तर असतीलच.’’ यावर डॉ. ठाणेकरांनी आपल्या भुवया उंचावत म्हणाले, ‘‘मला तर कुठंच दिसत नाहीत.’’  डॉ. कारंडेंना समलिंगींची इतकी मोठी संख्या असल्याबाबत आणखी ‘प्रूफ’ हवा होता. डॉ. ठाणेकर आजही माझे हिरो आहेत. केवळ माझ्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी मला आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यायला सुरुवात केली. डॉ. ठाणेकर मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचे खूप वरच्या पदावरचे अधिकारी आहेत हे फारच थोडय़ा लोकांना माहीत असेल. ते या महापालिकेच्या ३५ हजार आरोग्य विभागातल्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांपैकी एक आहेत. त्या वेळी

डॉ. ठाणेकर हे डॉ. कारंडे यांनी सुरू केलेल्या एका गुप्त प्रकल्पावर काम करत होते. त्या प्रकल्पामध्ये कामाठीपुरा भागात धंदा करणाऱ्या वेश्यांसोबत थेट काम करायचं होतं. (एरवी कोलकाता इथल्या दरबार समन्वय समितीनं वेश्यांबाबत केलेल्या कामाबद्दल मोठय़ा प्रमाणावर सगळीकडं गौरवोद्गार काढले जातात. पण खरंतर आपल्या मुंबई महापालिकेनं या गरीब वेश्यांना एकत्र आणून त्यांच्यासोबत आरोग्यविषयक मोहीम फार पूर्वीपासूनच सुरू केलेली होती, हे फारच थोडय़ा लोकांना माहीत असेल.). ‘आशा प्रकल्प’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या प्रकल्पासाठीचं कार्यालय फॉकलंड रोडवरील  एका डोळ्यांच्या हॉस्पिटलमधल्या साध्याशा इमारतीत होतं. बहुसंख्य महापालिकेच्या इमारती असतात तशीच ही इमारतही बऱ्यापैकी वाईट स्थितीतच होती. पण डॉ. ठाणेकरांच्या प्रयत्नांमुळे ती मदत आणि लैंगिक सुरक्षितता साधनं मागायला येणाऱ्या वेश्यांसाठी ती जागा म्हणजे सुरक्षा पुरवणारं मोठं वरदानच ठरली.

इथंच डॉ. ठाणेकरांनी माझी ओळख प्रमोद निरगुडकर या तरुणाशी करून दिली. मुख्य समाजाचा भाग असणाऱ्या पण दुर्लक्ष झालेल्या एखाद्या अल्पसंख्याक गटासोबत नियोजनबद्ध पद्धतीनं समाजकार्य कसं करावं, हे प्रमोदनंच मला शिकवलं. त्याच वेळी मला समलिंगी समुदायासोबत काम करण्यासाठी एक छोटीशी फेलोशिपही मिळाली, त्यामुळं निदान माझ्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला. मी अजूनही वृत्तपत्रांसाठी लेखन करत होतो खरा, पण ते माझ्या चरितार्थासाठी पुरं नव्हतं. एकूण दिवस कठीणच चाललेले होते. त्यातच मी कामाठीपुऱ्यामध्ये जाऊन वेश्यांसोबत काम करतो हे कळल्यावर तर माझ्या आईला मोठाच धक्का बसला होता. ती सतत त्याबद्दल प्रश्न विचारून मला भंडावून सोडत असे. तोवर आमचं कुटुंब विभक्त झालेलं होतं. आमचं आधीचं राहतं घर विकावं लागलं होतं. माझ्या धाकटय़ा भावांनी आपापली स्वतंत्र बिऱ्हाडं थाटली होती. सांताक्रूझ इथल्या रामकृष्ण मिशनजवळ एक घर घेऊन मी तिथं आई आणि माझी आत्या प्रेमाक्का यांसोबत राहात होतो. प्रत्येक दिवस एक नवं आव्हान घेऊन उगवत होता.

एके दिवशी मी या सगळ्याला अगदी विटलो आणि मुंबादेवीच्या दर्शनाला गेलो. तिथं एक चमत्कार घडला. जणू काही मुंबादेवीनंच मला भेटायला बोलावलेलं होतं. देवळात जाताना मी अगदी विदीर्ण मन:स्थितीत होतो. ‘‘हं. तर आयुष्यातल्या तुझ्या सगळ्या पाटर्य़ा-बिटर्य़ा, मौजमजा संपल्यानंतर आता शेवटी माझ्याकडं आलास होय?’’ मुंबादेवीनं विचारलं. ‘‘आता इथून पुढं तू तुझ्या लोकांसाठी काम करायला सुरुवात करायचीस,’’ ती म्हणाली. हे ऐकून मी स्तंभितच झालो होतो. ती जणू तिची आज्ञाच होती आणि यावर मी उलट काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. इतके दिवस सगळ्या पाटर्य़ा, मौजमजा करत असताना माझं तिच्याप्रतिचं कर्तव्य मी विसरलोच होतो. आता तिनं धाडकन मला भानावर आणलं होतं.

जेव्हा मुंबई शहरात एचआयव्ही/ एड्सचा धोका पराकोटीला पोचला होता, तेव्हा मुंबा-आई आणि मुंबई महापालिका, या दोघीही माझ्या मदतीला धावून आल्या. तोवर या रोगाचा मुकाबला करण्यासाठी कोणतंही औषध बनलेलं नव्हतं. पण या दोघींनीही मात्र मला मुंबईमध्ये माझ्या समुदायाच्या लोकांना एकत्र आणायला मदत केली. या लेखात देशातल्या सर्वात मोठय़ा शहराच्या रक्षणकर्तीला, मुंबादेवीला आदरांजली वाहू या आणि इथंच थांबू या!

rowkavi@gmail.com

chaturang@expressindia.com