अशोक रावकवी rowkavi@gmail.com

प्रिय वाचकहो, गेल्या वर्षभरात महाराष्ट्रभरातून आलेल्या हजारो पत्रांमुळे मला या स्तंभलेखनाचं चीज झाल्यासारखं वाटलं. लैंगिकता आणि लिंगभाव या विषयांबद्दल मी तुमच्याशी अगदी मनमोकळं बोलू शकलो, याबाबतचं समाधान मनात ठेवून मी आज तुमचा निरोप घेतो आहे. नववर्षांच्या हार्दिक शुभेच्छा!

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

हे वर्ष किती भर्रकन निघून गेलं ना? मला ‘लोकसत्ता’ या प्रतिष्ठित आणि लोकप्रिय वृत्तपत्रानं २०१८च्या जानेवारीपासून हा स्तंभ लिहायला सांगितला होता त्या वेळी माझा तुम्हा वाचकांसोबत इतका छान संवाद होईल याची मी कल्पनाही केलेली नव्हती. माझ्यासाठी हा एक अगदी नवाच अनुभव ठरला. लिंग आणि लैंगिकता यांबाबत लोकांच्या मनामध्ये असणाऱ्या समजुती किती ठाम असतात, याबाबत मला पुन्हा नव्याने जाणीव झाली.

जर तुमच्यापैकी कोणी माझ्या लेखनामुळे दुखावलं गेलं असेल, तर त्यांची मी क्षमा मागतो. अर्थातच मी तसं मुद्दाम लिहिलेलं नाही, कदाचित तो माझ्या वाढत्या वयाचा दोष असेल. मी उतावळ्या स्वभावाचा असल्यामुळं कधीकधी माझी ‘सटकते’ हे मात्र खरं. शास्त्रज्ञ ज्याला ‘ओकॅम्स रेझर’ (Occamls Razor) असं म्हणतात, त्यावर माझ्यासारख्या अनेक लोकांचा विश्वास दृढ आहे. ‘ओकॅम्स रेझर’ या सिद्धांतानुसार, कुठल्याही प्रश्नाचं सर्वात सोपं स्पष्टीकरण हेच त्यावरचं सर्वात उपयुक्त उत्तर असतं (उदा. दोन बिंदूंमधलं सर्वात छोटं अंतर हवं असेल, तर त्या दोहोंमध्ये सरळ रेष काढली की झालं). मीदेखील याचप्रकारचं तर्कशास्त्र वापरून तुम्हाला आजच्या विज्ञानाच्या आणि समाजशास्त्राच्या भाषेत ‘लैंगिकता म्हणजे काय’ हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. अर्थातच हे काम मुळीच सोपं नव्हतं.

हे अवघड का असतं, ते आपण पाहू या.

डॉ. सारा हॉक्स या लंडन विद्यापीठाच्या प्रमुख माझ्या स्नेही आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अखत्यारीखाली असणाऱ्या अनेक संस्थांच्या त्या सल्लागार आहेत. गेल्या वर्षी या विदुषीनं त्यांना भेडसावत असणाऱ्या लिंगभावासंदर्भातल्या एका महत्त्वाच्या प्रश्नाबद्दल माझ्यासोबत चर्चा केली. विशेष म्हणजे तो प्रश्न मलाही तितकाच टोचत होता. यूएनडीपीनं (युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) अंतर्गत आफ्रिकन देशातल्या लिंगभावाबद्दलच्या अभ्यासाबद्दल एक भलामोठा दस्तऐवजांचा भार डॉ. सारा यांच्या हाती दिला. त्यांना हा मोठा दस्तऐवज फ्रेंच, जर्मन आणि रशियन या भाषांमध्ये अनुवादित करण्याची विनंती करण्यात आलेली होती. मात्र या तीनही युरोपियन भाषांमध्ये ‘लिंगभाव’ याकरता कुठलाच चपखल शब्द नसल्याचं पाहून आपल्याला धक्काच बसल्याचं डॉ. सारा हॉक्स यांनी मला सांगितलं. पण भारतातही लिंगभाव या शब्दातून पुरेसा अर्थ स्पष्ट होत नसल्याचे मी म्हटल्यावर, आम्हा दोघांनाही हसू आलं. एकुणातच हा वैश्विक प्रश्न दिसतोय खरा, असं आमच्या लक्षात आलं. कारण जन्मत: आपल्याला नैसर्गिकरीत्या मिळालेले लैंगिक अवयव आणि ‘आपण समाजामध्ये वावरताना असलेला विशिष्ट लिंगाच्या भूमिकेत व्यक्त होणं’ या दोन्हीही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ही समाजशास्त्रातली ही एक वेगळी आणि महत्त्वाची बाब आहे. मी हा किस्सा तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे गेलं वर्षभर लिंगभावाची खरीखुरी व्याख्या काय, हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात मी चांगल्यापैकी यशस्वी झालो आहे, अशी मला आशा आहे. आता लैंगिकता आणि लिंगभाव या नव्या शाखा समाजशास्त्रात आघाडीवर असून आज समाजरचना जसजशी जास्त गुंतागुंतीची होत आहे, तसतशा त्या अधिकच महत्त्वाच्या बनत चाललेल्या आहेत.

या स्तंभाच्या लेखनादरम्यान वाचकांकडून आलेल्या प्रतिसादात सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न- दोन पुरुष आणि दोन स्त्रिया एकमेकांशी लैंगिक संबंध कसे काय ठेवू शकतात, याबाबतचे होते. ‘हमसफर ट्रस्ट’मध्ये आम्ही एक ‘बॉडी मॅपिंग’ नावाचा एकमेकांची शरीरं समजावून घेण्याच्या हा उपक्रम करतो. या अनुभवात स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही शरीरावरच्या उत्तेजना निर्माण करणाऱ्या जागा अगदी सारख्या असतात हे दोघांच्याही लक्षात येतं. केवळ त्यांच्या लैंगिक अवयवांची रचना निरनिराळी असते. खरंतर गर्भावस्थेत असताना हे अवयव एकाच प्रकारच्या पेशीरचनेपासून निर्माण होत असतात. वाचकांनी विचारलेल्या अन्य प्रश्नांमध्ये, मला एलजीबीटी गटातील लग्न ‘नेहमीच्या’ लग्नांपेक्षा अयशस्वी होण्याचं प्रमाण तुलनेनं मोठं का आहे, याबाबतचे प्रश्न मोठय़ा प्रमाणावर होते. मुळातच आता लग्नसंस्थेचं अस्तित्वच टिकेल की नाही,  याबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिल्यानं तसा हा प्रश्न आता हास्यास्पदच म्हणावा लागेल.

सध्या अमेरिकेमध्ये घटस्फोटाचं प्रमाण सुमारे ६० टक्के आहे. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण आपल्या ग्रामीण भागात शहरी भागांपेक्षा घटस्फोटाचं प्रमाण जास्त आहे. शहरी भागातही ते वाढतंच आहे. लग्न संस्था खरंतर आता कालबाह्य़ झालेली आहे. २०१० या वर्षांत इंग्लंडमध्ये जन्माला आलेल्या मुलांपैकी ३० टक्के मुलं स्वखुशीनं एकेरी मातृत्व पत्करलेल्या स्त्रियांच्या पोटी जन्माला आलेली होती. केवळ गरोदर होण्यापुरत्याच्या आवश्यक नैसर्गिक सहभागाखेरीज या स्त्रियांना आपल्या आयुष्यात पुरुषांचं अन्य कोणतंच स्थान नको होतं. या मुलांचं संगोपन करण्यासाठी सरकारी पाळणाघरं तर आहेतच, शिवाय त्यांची काळजी घेण्यासाठी लागणाऱ्या अन्य गोष्टीही शासनाद्वारे पुरवल्या जातात. आपल्या देशात जसजशी आर्थिक समृद्धी वाढेल तसतसं असंच चित्र दिसू लागेल. स्त्रियांच्या जोखडातून मुक्त होण्याचा हा नैसर्गिक अविष्कारच आहे असं म्हणावं लागेल. अनेक स्त्रियांनी मला एलजीबीटी संदर्भात त्यांनी लिहिलेल्या पत्रांमध्ये हा सूर आढळून आला.

विशेष म्हणजे शंका विचारणाऱ्या सर्वसामान्य पत्रांपेक्षा वेगळा आशय असणारी पत्रं आपल्या राज्याच्या छोटय़ा गावांमधून आणि खेडय़ांमधून आली. सातारा इथल्या एका ६५ वर्षांच्या वृद्ध स्त्रीनं अगदी भोळेपणानं मला प्रश्न विचारला होता, ‘‘रस्त्यावर लहान वयाचे तृतीयपंथी मला का दिसत नाहीत?’’ या दयाळू स्त्रीला अशा एखाद्या बालवयातल्या तृतीयपंथी मुलाला दत्तक घ्यायचं होतं. अखेर मी अशाप्रकारचे अल्पवयीन तृतीयपंथी सार्वजनिक किंवा रस्त्यावर का दिसत नाहीत, याचं कारण तिला समजावून सांगितलं. एखाद्या व्यक्तीला आपण चुकीचं शरीर घेऊन जन्माला आलेलो आहोत, असं कळल्यावर कसं वाटत असेल, हे वाचून खूप दु:ख झाल्याचं तिनं मला सांगितलं.

अशा पत्रव्यवहारामुळे एक माणूस म्हणून मी अधिक समृद्ध झालो, अधिक सहृदय बनलो. प्रिय वाचकहो, तुमच्याकडून घेतलेल्या चांगल्या गोष्टी कायमच माझं आयुष्य समृद्ध करतील. तुम्ही तुमचे प्रश्न किंवा अडचणी मला सांगणं आणि त्यांची आपण एकत्र उत्तरं शोधणं, हा आपल्यात चांगलं माणूसपण असण्याचा गुण आहे. याबाबतच्या भारत आणि पाश्चिमात्त्य देश यांमध्ये असलेल्या दोन महत्त्वाच्या फरकांमध्ये आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. भारतीय संस्कृतीमधल्या समाजरचनेचा मूळ गाभा आहे ‘दया’, तर त्याउलट पाश्चिमात्त्य संस्कृती मुख्यत: ‘दान’ या गोष्टीवर अधिक विश्वास ठेवते. पौर्वात्य देशांच्या संस्कृतीमध्ये सर्व सजीव मर्त्य आणि समान आहेत अशी ठाम समजूत आहे. त्यामुळं आपल्याला सर्वाबद्दल ‘सह-अनुभूती’ असते. बुद्धाचीदेखील हीच शिकवण आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या शरीरात जन्माला आलेला असला, तरी त्यामुळं कोणीही श्रेष्ठ वा कनिष्ठ नसतो. ‘कर्मा’समोर आपण सर्व जण समान आहोत. अगदी देवांनादेखील हाच नियम लागू पडतो. समजा आपल्या एखाद्या बोटाला इजा झाली, तरी शरीराचा प्रत्येक अवयव त्याक्षणी प्रतिसाद देत असतो, तसंच काहीसं हे असतं. ‘दया’ ही गोष्ट आपल्या समाजाला अगदी या उदाहरणासारखीच लागू पडते. एक समाज म्हणून आपण अशा प्रकारे राहिलं पाहिजे.

आपण एकत्रपणे लैंगिकता आणि लिंगभाव यांसारख्या नव्या शास्त्रशाखांचा अभ्यास करू शकतो. परस्पर सहकार्यातून होणाऱ्या या शिक्षणामुळे आपण एकमेकांना समजून घेऊ शकू आणि एक सशक्त स्वावलंबी संस्कृती निर्माण करू शकू. तुमच्यासोबतचा हा संवाद पुढे कसा न्यावा, स्वत:चं या विषयातलं काम नीटपणे समजावून घेऊन, स्वत:त बदल कसा घडवून आणावा याबाबत प्रत्येक स्तंभ हे माझ्यासाठी आव्हानच होतं. दर पंधरवडय़ाला मिळणाऱ्या या मोलाच्या पाठाबद्दल वाचकहो, तुमचा खरोखरच खूप आभारी आहे.

या स्तंभाचा विषय स्फोटक असला, तरी ‘चतुरंग’ने मला खूप स्वातंत्र्य दिलं आणि जे हवं ते मोकळेपणानं लिहू दिलं. प्रत्येक स्तंभ प्रसिद्ध झाल्यानंतर पत्रांचा जणू पूरच येत असे. त्यामुळे पुढच्या स्तंभात काय लिहावं याबद्दल मला खूप साऱ्या गोष्टींबाबत दिशा मिळत असे. वर्षभर चाललेलं हे स्तंभलेखन त्यानुसार आपोआप आकार आणि वळणंही घेत होतं. वाचकहो, तुम्हीच या स्तंभलेखकाला नवनवे मार्ग आणि कल्पना देऊन हा स्तंभ पुढे नेलात. अर्थातच, ‘हे नैसर्गिक आहे का?’, ‘तुम्ही लैंगिक संबंध कसे ठेवता?’ यांसारख्या प्रागतिक नसणाऱ्या किंवा अगदीच अर्थहीन प्रश्नांना मी मुद्दामच विचारात घेतलेलं नाही. या साऱ्या प्रश्नांची उत्तरं याआधी अनेकांनी अनेकवेळा देऊन झालेली असल्यामुळे पुन:पुन्हा ती देत राहणं निर्थकच ठरलं असतं. मात्र या प्रचंड पत्रव्यवहारात आलेले मानवी भावभावनांसंबंधीचे प्रश्न मला विशेष भावले आणि त्यांची शक्य तेवढी उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे (कदाचित या साऱ्या प्रश्नांची एकत्रितपणे उत्तरं देण्यासाठी मी पुढं एखादं पुस्तकही लिहीन.).

प्रिय वाचकहो, ७२ वर्षांचा हा स्तंभलेखक गेल्या एका वर्षांतच अधिकच शहाणा झालेला आहे. मानवाचं अस्तित्व समजावून घेणं किती कठीण असतं, याची नवी जाण त्याला आलेली आहे. सगळ्याच पत्रांतल्या प्रश्नांना उत्तरं देता येणं शक्य नव्हतं, कारण ती माझ्याकडेही सगळ्याच प्रश्नांची उत्तरं नाहीत. अगदी मी वयानं ७२ वर्षांचा असलो ना, तरीही माझ्याकडे ‘एखाद्यानं आयुष्य कसं जगावं’ याबाबतचा अक्सीर सल्ला खरंच नाही. मात्र तुम्ही आपल्या आयुष्यात धर्यानं वागलं पाहिजे आणि मुक्तपणे आयुष्य जगलं पाहिजे, हे मात्र मी तुम्हाला अगदी आवर्जून सांगेन.

रामकृष्ण मठातले माझे स्वामीजी म्हणायचे त्यानुसार, ‘‘तुम्ही इतरांना इजा न पोचवता तुमच्या प्रतिभेसाठी आणि जीवनासाठी स्वत:चा मार्ग बनवत राहिलं पाहिजे. जर तुमची हा लढा जिंकण्याची जीवनेच्छा तीव्र असेल, तर लक्ष्मी आणि सरस्वती या दोघीही तुमच्या बाजूला असतील.’’ बहुधा त्यांच्या या सांगण्यातल्या लक्ष्मीबाबतच्या भागाकडे मी दुर्लक्ष केलं असावं, कारण आजही मी उपजीविकेसाठी काहीसा चाचपडतोच आहे. अर्थात मुंबादेवीच्या आशीर्वादानं माझं तसं ठीकच चाललं आहे म्हणा. कधीकधी जेव्हा खिशात खडखडाट झालेला असतो आणि उत्पन्नाचा कुठलाच मार्ग दिसत नसतो, तेव्हा अचानक माझ्या बँक खात्यात पैसे जमा होतात. खूप पूर्वी लिहिलेल्या कुठल्या तरी लेखाचं मानधन देण्याची त्या प्रकाशन संस्थेला आठवण झालेली असते. बहुधा माझी स्थिती पाहून मुंबादेवी त्यांची स्मृती जागृत करत असावी आणि त्यामुळं पैसे येत असावेत. किती आहे छान ना हे!

या स्तंभात लिंग आणि लिंगभाव या कशा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे पाहिलं. हे दोन्हीही अत्यंत संवेदनशील विषय आहेत आणि ते चांगल्याप्रकारे समजवण्याचा मी माझ्यापरीनं पूर्ण प्रयत्न केला आहे. खुद्द माझ्या स्वत:बद्दल सांगणंही इतकं सोपं नव्हतं, तरीदेखील खासगीपणाचा संकोच पूर्णत: बाजूला ठेवून व्यक्त होण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे.

विवेकानंदांचं ‘आयुष्य कसं असावं’ याबाबतचं जे मत होतं, तेच मी या स्तंभातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणत, ‘‘तुम्हाला एखाद्या आंब्याच्या झाडाची परीक्षा घ्यायची असेल, तर तुम्ही ती त्याच्या फांद्यांवर लगडलेल्या पिकलेल्या आंब्यावरून करता.’’ मात्र, ‘‘त्या झाडाच्या आजूबाजूला पडलेल्या सडलेल्या फळांवरून अशी परीक्षा करू नये,’’ अशी धोक्याची सूचना द्यायलाही ते विसरत नाहीत. मीदेखील मानवी भावभावनांबद्दल, लैंगिकतेबाबत भारतात उपलब्ध असलेल्या प्रचंड ज्ञानसाठय़ातून काही कण तुमच्यापुढे सादर केलेले आहेत. आपण सगळे वानरापासून निर्माण झालेलो आहोत आणि आपल्या वाढीचं काम अजून सुरूच आहे. ते भविष्यात नेमकं कसं असेल, हे सांगता येणार नाही, पण ते प्रगतीच्या दिशेनं असेल अशी मला आशा आहे.

मानवजातीच्या इतिहासात पहिल्यांदाच उत्क्रांतीच्या अशा टप्प्यावर आपण येऊन पोचलो आहोत, की आता आपल्याला वैद्यकीय साधनांच्या मदतीनं आपली शरीरं बदलता येऊ लागलेली आहेत. पुरुषांनी शस्त्रक्रिया करून स्त्री बनणं किंवा त्याउलट करणं आता शक्य झालेलं आहे. तुम्ही छोटय़ा मुलांनादेखील स्मार्टफोनवरची अ‍ॅप्स कुशलतेनं हाताळताना पाहिलं आहे? खुद्द ज्ञानच स्वत:चं रूप किती वेगानं बदलून टाकतं आहे हे तुमच्या लक्षात आलं आहे का? आपलं ज्ञान कॉम्प्युटरच्या शिक्षणानं वाढतं तर आहेच, पण कृत्रिमरीत्या आपला मेंदू कॉम्प्युटरला जोडून ते अमर्यादपणे वाढवणंही लवकरच शक्य होईल.

सदराचा निरोप घेण्याआधी एका व्यक्तीचे आभार मानायलाच हवेत ज्यांनी हे माहितीवजा सदर जिवंत केलं, ते माझ्या सदराचे अनुवादक

सुश्रुत कुलकर्णी. त्यांनी प्रत्येक लेख लक्ष पूर्वक वाचून त्यात योग्य त्या सुधारणाही केल्या. त्यांचे आभार.

..अरेच्चा, माझ्या मागं उभं राहून हे कोण हसतं आहे? माझी आवडती मांजर ‘मिस्की बेगम’. हीसुद्धा तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा द्यायला माझ्या डेस्कवर येऊन बसलेलीच आहे. आमच्या दोघांचं एकत्रित छायाचित्र तिनं तुम्हाला शुभेच्छा संदेश म्हणून पाठवलेलं आहे.

अलविदा वाचकहो, दर पंधरवडय़ाला तुम्हाला भेटणं खूप चतन्यदायक होतं. मला तुमची खूप आठवण येईल. सर्वाना २०१९ साठी शुभेच्छा!

(सदर समाप्त)

chaturang@expressindia.com

अनुवाद : सुश्रुत कुलकर्णी