06 August 2020

News Flash

‘आझादी’ची कर्मकठीण जबाबदारी

अन्य प्राण्यांच्या तुलनेत मानवप्राणी चांगल्यापैकी शिकू शकणारा आहे.

 

अनुवाद : सुश्रुत कुलकर्णी

आमच्या एलजीबीटी समुदायामध्ये कोणतेच नियम नाहीत, कारण आमच्या अशा नातेसंबंधांना कोणतीच सामाजिक मान्यताही नाही. वादळी समुद्रात हाकत असलेल्या बोटीसारखी ही सारी नाती आहेत. तथाकथित नैतिकता आणि मूल्यांच्या रूपात दिसणाऱ्या आकाशातल्या ताऱ्यांचा अंदाज बांधून नात्यांची ही छोटीशी बोट आम्हाला योग्य दिशेला न्यावी लागते. पण नेमकी कोणती नैतिकता आणि कोणती मूल्यं आम्ही पाळायची? .. मात्र त्या घटनेनंतर अन्य कुठल्याही समलैंगिक किंवा विवाहित पुरुषाचं स्थिर असणारं नातं आपण तोडायचं नाही, अशी मी स्वत:शी प्रतिज्ञा केली..

जेव्हा तुम्ही ‘आझादी’च्या घोषणा ऐकाल तेव्हा जरा सावध व्हा. कारण प्रत्येक प्रकारच्या ‘आझादी’सोबत कित्येक अटी आणि कर्तव्यंही चिकटून आलेली असतात. अगदी आपण घालत असलेल्या कपडय़ांसारख्याच. प्रत्येकाच्या पाठीला कुठलं ना कुठलं लेबल चिकटलेलं असतंच. तुमच्या शर्टाच्या आत कॉलरवर साइज लिहिलेला टॅग असतो, अगदी आपल्या अंतर्वस्त्रांनादेखील असतो तो.

मला वाटतं, आझादी म्हणजेच हे स्वातंत्र्य कसं वापरावं, याचं आपल्यापैकी प्रत्येकालाच थोडं शिक्षण दिलं पाहिजे. शेवटी माणूस हादेखील प्राणीच आहे. आपल्या आजूबाजूच्या लोकांनी टाकलेल्या दबावाप्रमाणे वागत राहणं, यापलीकडे तो फारसा काही शिकलेला नाही. जर तुम्ही चिम्पांझींचा अभ्यास केला- (त्यांच्यात आणि आपल्यात केवळ जनुकांमध्ये केवळ सहा वेढय़ांचाच फरक आहे. त्यांची आणि आपली ९९ टक्के जनुके सारखीच आहेत. एकूणात आपण किती क्रूर प्राणी आहोत, हे आता लक्षात येईल.) लेनिन म्हणत असे, ‘‘स्वातंत्र्य हे इतकं महत्त्वाचं आहे, की ते लोकांना मोजूनमापूनच दिलं पाहिजे.’’ त्याचं अगदी बरोबरच होतं असं मला वाटतं!

अन्य प्राण्यांच्या तुलनेत मानवप्राणी चांगल्यापैकी शिकू शकणारा आहे. मानवी समाजात पुस्तकं आणि स्मृतींचं संकलन या रूपात सगळ्या लेखी नोंदी ठेवण्याची सोय असल्यानं आधीच्या लोकांच्या अनुभवातून आपल्याला शिकता येतं. ‘कसं वागायचं’ हे समाज बघत-वाचत शिकत जातो आणि त्यातून वेगवेगळ्या मूल्यव्यवस्था असणारे समुदाय तयार होतात. दुर्दैवाने भारतात एलजीबीटी समूहामध्ये मात्र अजून ‘कसं वागावं’ हे शिकण्याची प्रक्रिया बाल्यावस्थेत आहे. ‘आम्ही’ कोणते नियम किंवा बंधनं पाळायची, याबद्दल आजवर काहीच लिहिलं गेलेलं नाही, कारण अजून आम्हाला समुदाय म्हणून समाजमान्यताही मिळालेली नाही ना!

नैतिकता मूल्यं पाळण्याबाबतचा माझाच अनुभव सांगतो ना! माझ्या ‘इंडियन एक्सप्रेस’मधल्या सर्व सहकाऱ्यांना जेव्हा माझ्या खासगी जीवनाबद्दल माहिती झालं, तेव्हा अचानक मला स्वतंत्र झाल्यासारखं वाटू लागलं. घरीसुद्धा माझ्याबाबत ठाऊक असलं, तरी तितक्या मोकळेपणानं मला वागता येत नव्हतं. अखेर मी एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबातून आलो होतो ना. जरी प्रामाणिकपणा आणि सचोटी या गुणांना प्रोत्साहन दिलं जातं असलं, तरी आपल्या भावना व्यक्त करणं मात्र काहीसं कमीपणाचं समजलं जायचं. कधी कधी माझी आई आणि आक्काआत्या मला थेट प्रश्न विचारायच्या. उदाहरणार्थ, ‘‘हा माणूस किती देखणा आहे. तुला तो कुठं भेटला?’’ त्यांना काय उत्तर द्यावं हे मला समजत नसे. पण इथंसुद्धा अण्णा माझ्या मदतीला धावून यायचे.

मला चांगलंच आठवतं, एकदा माझं आमच्या माहीमच्या कॉलनीमधल्या स्वच्छता कामगाराच्या मुलासोबत प्रेमप्रकरण चालू होतं. मी आमच्या कॉलनीच्या मागेच असणाऱ्या त्यांच्या छोटय़ाशा घरात बराच वेळ घालवत असे. मी ‘अस्वच्छ लोकांमध्ये’ मिसळत असल्यानं आधी माझ्या आईनं यावर बराच गहजब केला. त्यामागचं खरं कारण म्हणजे तिच्या काही मैत्रिणींनी मला त्यांच्या घरात खाताना पाहिलेलं होतं. मला वाटतं त्यांच्यापैकी काही जणींनी आणखीही बरंच काही पाहिलं असावं, पण तसला विषय काढण्याची त्यांची हिंमतच झाली नसणार. शेवटी मला दिवाणखान्यात अण्णांच्यासमोर बोलावण्यात आलं. माझी अक्काआत्यासुद्धा तिच्या भावासारखीच म्हणजे अण्णांसारखीच सुधारक आणि बंडखोर होती. ‘‘अशोक त्यांच्या घरात जेवला तर काय बिघडलं?’’ असं त्या दोघांनीही आईला विचारलं. ‘‘तसंही आपण जातीपाती मानत नाहीच ना,’’ अण्णा म्हणाले. माझे आजोबा म्हणजे सदाशिवराव मूळचे मंगलोरचे. त्या काळी त्यांनी घरी दलितांना जेवायला बोलावल्याबद्दल आमच्या समाजाकडून त्यांना वाळीत टाकण्यात आलेलं होतं. अखेर १९३०मध्ये वडील मुंबईला आले आणि आम्ही आमचं आडनावसुद्धा बदललं. ‘‘मग अडचण काय आहे?’’ अण्णांनी आईला पुढं विचारलं. त्यांच्या डोळ्यात निराळीच चमक होती. मला ‘नेमकं काय करायचं होतं’ हे त्यांना नक्कीच ठाऊक होतं, पण त्यांनी तो विषय काढला नाही. आईनं अखेर जातीचा मुद्दा काढला आणि आपल्या थोरल्या मुलानं एखाद्या साफ सफाई करणाऱ्याच्या घरात दिसणं चांगलं नव्हे, असं सांगितलं. त्यावर माझ्या वडिलांनी एक आश्चर्यकारक (आणि खोचकही) टिप्पणी केली : ‘‘आपल्या कॉलनीमधल्या कित्येक कुटुंबांपेक्षा त्यांचं घर किती तरी स्वच्छ आहे. त्यामुळं तिथं गेलं तर काही बिघडत नाही. अशोक जिथं हवं तिथं जाऊ शकतो,’’ अण्णा मुद्दामच ही वाक्यं अगदी शेजाऱ्यापाजाऱ्यांना ऐकू जाईल इतक्या मोठय़ा आवाजात म्हणाले. मला मिळालेल्या विजयांपैकी हा पहिला विजय. पण मिळालेल्या या स्वातंत्र्यामुळं मी नीट, जबाबदारीनं वागायला शिकलो का? दुर्दैवानं नाही!

त्या साऱ्या धुंद दिवसांत आणि आमच्या शिवाजी पार्क इथल्या जवळजवळ ४० वर्षांच्या वास्तव्यात मी खूप मजा केली. जवळजवळ दिवसाआड मी रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पाटर्य़ाना जात असे. मी रोज कामावर यायला बाहेर पडत असल्यामुळं मित्रांना थेट ‘एक्स्प्रेस टॉवर’ला येऊनच मला पाटर्य़ाना घेऊन जाणं सोपं होतं. त्या काळात माझी मुंबईमधल्या अनेक राजनैतिक अधिकाऱ्यांसोबत आणि गोऱ्या समलिंगी पुरुषांसोबत मैत्री झाली. त्यांपैकी एक होता अँथनी व्हॅन ब्राबँड. समलिंगी जगामध्ये त्या वेळी त्याला ‘टोनी’ या टोपणनावानं ओळखलं जायचं. त्या काळी गोऱ्या समलिंगी लोकांचा मुंबईत एक बिनधास्त गट होता. हा गट दर आठवडय़ाला एका उच्चभ्रू हॉटेलसमोर असणाऱ्या ‘ द टाऊन’च्या वरच्या मजल्यावर भेटायचा. टोनीनं प्लेबॉयच्या धर्तीवर भारतातलं पहिलं प्रौढांसाठी असणारं ‘डेबोनियर’ नावाचं मासिक सुरू केलं होतं. दिवसभर मी या मासिकासाठी खूप काम करायचो आणि रात्री आम्ही तितकीच धमाल पार्टीही करायचो. त्या काळात मी अनेक देखण्या पुरुषांना भेटलो. पुढं ७० आणि ८०च्या दशकात हे लोक बॉलीवूडमधले नायक झाले.

पण मला बॉलीवूडचं आकर्षण कधीच वाटलं नाही. बॉलीवूडशी संबंधित काम करत असतानाच अण्णांचा १९७४ मध्ये मृत्यू झाल्यानंतर आमच्या कुटुंबाला खूप कठीण काळातून जावं लागलं होतं. त्यामुळं माझ्या मनात चित्रपट उद्योगाबद्दल एकूणच कटू भावना तयार झाली. नवे ‘प्रेमी’ शोधण्याकरिता मी लष्कराकडं वळालो. मी पत्रकार असल्यामुळं असे पुष्कळच लोक मला सापडले. त्यांपैकी एक होता डीबी हा एक देखणा नौदल अधिकारी. शिवाय त्याचं कमांडो म्हणून नौदलात विशेष प्रशिक्षणही झालं होतं. १९७१मधल्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात डीबीनं बजावलेल्या महत्त्वाच्या कामगिरीमुळं त्याला मोठा सन्मानही मिळालेला होता. तो काळ मोठा छान होता. त्या काळात माझी अनेक जणांसोबत प्रेमप्रकरणं होती, पण डीबी मात्र माझ्याशी प्रामाणिक होता. आम्ही दक्षिण मुंबईत एका बारमध्ये भेटायचो आणि पुढं कसं एकत्र राहायचं याबद्दल बोलत बसायचो. भविष्यातल्या करिअरसाठी मी त्याला मॅनेजमेंटचे काही कोर्सेस करायला सांगितलं होतं. मी आग्रह धरल्यामुळं त्यानंही ते अगदी इनामेइतबारे पुरे केले होते.

त्यानंतर त्यानं माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. तो डय़ुटीवर समुद्रावर गेलेला असताना मी इतर कुठल्या पुरुषासोबत मैत्री करू नये यासाठी, थोडक्यात मला ‘अडकवण्यासाठी’ सारं चाललेलं आहे, हे मला नीटच समजत होतं. लग्नामुळं आम्हा दोघांचं एक ‘स्थैर्य असणारं’ नातं प्रस्थापित होईल, असं त्याला वाटतं होतं. मग काय? परदेशी कंपनीत काम करणाऱ्या आमच्या एका मित्रानं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आमच्यासाठी एक स्वीट बुक केला आणि डझनभर मित्रांना आमच्या ‘लग्नासाठी’ बोलावलं. डीबीचा सगळ्यात जवळचा मित्र होता आरएस. नौदलातला हा उच्चाधिकारी, जो आमच्या लग्नात ‘बेस्ट मॅन’ची भूमिका बजावणार होता. हे लग्न म्हणजे अगदी मजाच चालली होती. आम्ही १२-१५ लोकांना बोलावलं होतं खरं, पण ही बातमी कळल्यावर प्रत्यक्षात तब्बल ८० ते १०० लोक आले. लग्नाच्या पार्टीत प्रचंड धमाल चाललेली होती. अ‍ॅलन गिल, म्हणजे माझी समलिंगी आई अगदी हेलन या अभिनेत्रीसारखे कपडे घालून ओबेरॉयच्या लॉबीमध्ये अवतरला. त्याचं ते रूप पाहून प्रत्येकालाच आश्चर्याचा मोठाच धक्का बसला होता. इतर लोक मोठमोठय़ा विनोदी दिसणाऱ्या हॅटस् आणि पिसांच्या टोप्या घालून आलेले होते. पार्टीमध्ये मद्याचा महापूर आलेला होता आणि प्रचंड गर्दी झाल्यामुळं लोक अगदी बाथरूममध्ये बसूनसुद्धा गप्पा मारत होते.

दरम्यान डीबीनं त्या हॉटेलजवळ दुसऱ्या एका हॉटेलमध्ये खोली बुक केलेली होती. (त्या हॉटेलमध्ये आमच्या ओळखीच्या लोकांचा भरपूर राबता असल्यामुळं आमच्यासाठी ती ‘सुरक्षित’ जागा नाही, हे आम्हाला ठाऊक होतं). मी आणि डीबीनं एकमेकांची साथ कधीही न सोडण्याची आणि आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेतली आणि एका भल्यामोठय़ा मेणबत्तीभोवती सात फेरेही घेतले. आम्हाला दोघांनाही भरपूर चढलेली होती. आम्ही अगदी स्वर्गातच विहरत होतो. सुदैवानं आरएस हा आमचा बेस्ट मॅन मात्र बऱ्यापैकी शुद्धीवर होता. अखेर तो आम्हाला जवळच्याच दुसऱ्या हॉटेलमधल्या आमच्या सजवलेल्या खोलीकडं घेऊन गेला.

त्यानंतर जे काही घडलं, त्याचं वर्णन केवळ ‘अभूतपूर्व आपत्ती’ असंच करता येईल. माझा ‘जोडीदार’ मद्याच्या अमलाखाली पूर्णपणे बेहोष होऊन गाढ झोपलेला आहे, हे पाहून मी काहीसा निर्धास्त झालो आणि चक्क आरएससोबतच बिछान्यात शिरलो. डीबीने झोपेतून जागा झाल्यावर माझ्या अप्रामाणिकपणाचं निर्लज्ज प्रदर्शन पाहिलं. त्याचा राग अगदी अनावर झाला. त्यानं मला कमरेच्या पट्टय़ानं बेदम मारलं आणि तडक निघून गेला. माझ्याइतकाच आरएसदेखील शरमेनं चूर झाला होता. बहुधा हे इतिहासातलं सर्वात अल्पकाळ टिकलेलं लग्न असावं – बरोब्बर ८ तास ते टिकलं!

माझ्या या बेताल वागण्यामुळं डीबी अगदी हताश झालेला होता. मला खूपच लाज वाटत होती. मी स्वत:वरच खूप चिडलेलो होतो. डीबीचं अजूनही माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला ठाऊक होतं. माझ्या स्वातंत्र्याचा मी अगदी गैरवापर केला आहे, हे मला समजत होतं. आठवडय़ाभरानं डीबीनं मला फोन केला आणि आम्ही भेटलो. पण मी सीमारेषा पार केली होती, हे उघडउघडच दिसत होतं. आम्ही परत एकत्र आलो नसलो, तरी डीबी माझ्या आयुष्यातून कधी पूर्णत: बाहेरही गेला नाही. अगदी आजही दिवाळीला किंवा त्याच्या-माझ्या वाढदिवसाला आमचा फोन होतोच. कधीकधी तो मला मुंबईला भेटायलाही येतो. ‘‘तू असं वागणं थांबवू शकत नाहीस, तू खूप वाईट आहेस,’’ असं तो मला एकदा म्हणाला होता. अर्थातच मी त्या वेळी यावर काही उत्तर देऊ शकत नव्हतो आणि मी ते देण्याचा प्रयत्नही केला नाही. कारण माझ्याकडं यावर काही उत्तर नव्हतंच ना!

डीबी माझ्यावर नेहमीच प्रेम करत राहील याची त्याला स्वत:ला स्पष्ट जाणीव होती. पण सोबतच ‘मी अगदी अशक्य आहे’ (हे त्याचेच शब्द आहेत) हेही त्याला ठाऊक होतं. डीबीनं आता लग्नही केलेलं आहे आणि त्याच्या पत्नीला आमच्यातल्या साऱ्या गोष्टी ठाऊक आहेत. एकदा ती कडवटपणे विनोद करताना म्हणाली होती : ‘‘मला हे ठाऊक आहे तो तुला कधीही विसरू शकणार नाही आणि मी तुझ्याशी स्पर्धाही करू शकत नाही.’’ आज डीबीच्या कुटुंबाचा दिल्लीमध्ये मोटारीच्या सुटय़ा भागांचा आणि टायर्सचा खूप मोठा व्यवसाय आहे. आता आम्हीच एकमेकांचं कुटुंब आणि मित्रही आहोत. त्याचा मुलगा आता धिप्पाड तरुण झालेला आहे. तोसुद्धा मला सल्ला घेण्यासाठी अधूनमधून फोन करत असतो. आमचं हे नवं कुटुंब खरं तर काहीसं विचित्रच आहे. आजवर डीबी कधीच माझ्या आईला भेटायला आला नाही. मला ‘सासू’ची भीती वाटते असं तो म्हणतो! पण अफगाणिस्तानला गेल्यावर मात्र त्यानं तिथून तिच्यासाठी आवर्जून भारी कपडे आणले होते. तिनंही ती भेट स्वीकारली होती. माझ्या बिछान्याशेजारी त्याचा फोटो सापडल्यानंतर ती उपहासानं म्हणाली होती, ‘‘तो आपल्या देशाचा हिरो आहे, तुझ्यासारखा नाही!’’

मी शिकलेल्या एका मोठय़ा धडय़ाबद्दल इथं मला तुम्हाला सांगायचं आहे. आमच्या समुदायामध्ये कोणतेच नियम नाहीत, कारण आमच्या अशा नातेसंबंधांना कोणतीच सामाजिक मान्यताही नाही. वादळी समुद्रात हाकत असलेल्या बोटीसारखी ही सारी नाती आहेत. तथाकथित नैतिकता आणि मूल्यांच्या रूपात दिसणाऱ्या आकाशातल्या ताऱ्यांचा अंदाज बांधून नात्यांची ही छोटीशी बोट आम्हाला योग्य दिशेला न्यावी लागते. पण नेमकी कोणती नैतिकता आणि कोणती मूल्यं आम्ही पाळायची?

त्यानंतर अन्य कुठल्याही समलैंगिक किंवा विवाहित पुरुषाचं स्थिर असणारं नातं आपण तोडायचं नाही, अशी मी स्वत:शी प्रतिज्ञा केली. या साऱ्यातून येणारा एकटेपणाही जीवघेणा होता. आपल्या आयुष्यातल्या प्रेमाशिवाय आपल्याला दुसरं काहीच मार्ग दाखवू शकत नाही, हेच खरं. जेव्हा आपल्या आयुष्यातून प्रेम निघून जातं, तेव्हा आपण अंधारात ठेचकाळत, चाचपडत राहतो. डोळे जेव्हा अश्रूंनी भरलेले असतात ना, तेव्हा समोरचा रस्ता पार दिसेनासा होतो आणि मग मात्र पुढं जाणं खरंच खूप कठीण होऊन बसतं!

rowkavi@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2018 12:33 am

Web Title: ashok row kavi article in loksatta
Next Stories
1 गंडातून सुटका
2 मिसळून गेलेला एलजीबीटी समूह
3 सुसंस्कारच!
Just Now!
X