News Flash

आरशावरची धूळ झटकताना..

मुंबई जिल्ह्य़ाकरता महानगरपालिकेनं एड्स नियंत्रण सोसायटी (MDACS)ची स्थापना करण्यात आली.

प्रतिनिधिक छायाचित्र

अशोक रावकवी

एलजीबीटी समुदाय खूप आधीपासून अस्तित्वात आहे, मात्र नंतरच्या इतिहासात त्याचा उल्लेख मुद्दामच गाळण्यात आला.  दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ब्रिटिशांनी प्रयत्नपूर्वक आपला सारा प्राचीन इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याजागी स्वत:ची सांस्कृतिक मूल्यं प्रस्थापित केली, त्यामुळे आता आपल्याला इतिहास पुन्हा एखाद्या आरशावरची धूळ झटकून आपलं रूप नीटपणे पाहाणं गरजेचं आहे.

हमसफर ट्रस्टचं काम सुरू करताना सगळ्यात कठीण भाग म्हणजे माझ्या या ‘अदृश्य’ समुदायासाठी एक सामुदायिक भेटींसाठींची जागा तयार करणं. यासाठी माझ्या दोन आईंनी मला आशीर्वाद दिलेला होता. त्यातली एक म्हणजे मुंबा-आई आणि दुसरी आई मुंबई महानगरपालिका! आपल्या हरवलेल्या मुलांना एकत्र कुशीत घेऊन त्यांना सुरक्षित ठेवण्याचं आता त्या दोघींनी ठरवलेलं होतं. महानगरपालिकेनं आम्हाला जागा वापरायला दिली आणि मुंबा-आईच्या आशीर्वादानं आम्ही या साऱ्यांना एकत्र आणू शकलो. यामुळं दोन्ही आईंना नक्कीच आमचा अभिमान वाटला असणार.

समलिंगी समुदायाचं वैशिष्टय़ आणि कठीण बाब ही, की आम्ही सगळीकडेच अस्तित्वात असतो आणि तरीदेखील आम्ही कुठंच दिसत नाही – पाऱ्यासारखा. तो समाजाचा प्रत्येक वर्ग, जात आणि समुदाय यात असतोच असतो. महाराष्ट्र आरोग्य सेवा संचालनालयाच्या

डॉ. साळुंखे यांनी याचदरम्यान आम्हाला मुंबई महानगराचं ‘मॅपिंग’ म्हणजेच जिथं समलिंगी पुरुष एकमेकांना ‘भेटण्यासाठी’ ज्या जागा वापरतात त्यांची नोंद करण्यासाठी ५७ हजार रुपयांचा निधी दिलेला होता. तोवर मी ‘सेक्स मॅपिंग’बद्दल बरंच ऐकलेलं होतं खरं, पण हे नेमकं कसं करायचं ते ठाऊक नव्हतं. त्यानंतर अशा प्रकल्पात काम करणाऱ्या प्रमोद निगुडकर यांनी ‘ते अगदी सोपं आहे’ असं आम्हाला सांगितलं. त्यामुळे आम्ही हौशी समाजसेवक म्हणून कामाला सुरुवात केली. आम्ही ते पुढील प्रकारे केलं.

आम्ही मुंबईची फोन डिरेक्टरी घेतली आणि तिचे चार भाग केले – उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. त्यानंतर आम्ही मुंबईच्या प्रत्येक भागातल्या ‘समुदायातल्या मित्रांना’ फोन करायला सुरुवात केली. अशा मित्रांना आम्ही समाजसेवक म्हणत असू. ते ‘इतर मित्रांना’ ज्या जागी भेटत असत अशा जागांची यादी आम्ही त्यांना बनवायला सांगितली. ज्या ठिकाणी १० पेक्षा जास्त समलिंगी पुरुष एखाद्या ठरावीक वेळेला भेटत असतील, त्या त्या ठिकाणी ‘हमसफर’नं आपलं काम सुरू करावं आणि समलिंगी समुदायापर्यंत पोचावं अशी आमची योजना होती.

अशाप्रकारे आम्ही मुंबई शहरभर पसरलो आणि ६५हून अधिक ठिकाणं आम्ही ‘मॅप’ केली. त्यांमध्ये सार्वजनिक बागा होत्या, दादर, चर्चगेट आणि सीएसएमटीसारखी रेल्वे स्थानके होती किंवा गेट वे ऑफ इंडिया आणि गिरगाव चौपाटीसारख्या इतर विख्यात जागाही होत्या. इथं समलिंगी पुरुष दर शनिवारी रात्री किंवा ऑफिसच्या कामकाजाच्या वेळा संपल्यावर संध्याकाळी भेटत असत.

जेव्हा नॅकोनं आपलं काम सुरू केलं, तेव्हा आधीच आपली कार्ययोजना सुरू असणारी पहिली संस्था म्हणजे ‘हमसफर ट्रस्ट’. त्यामुळे आम्हाला भारतातला समलिंगी पुरुषांसोबत काम करण्यासाठीचा पहिला प्रकल्प मिळाला. बहुधा हिंसा आणि आजार यांचा मोठा धोका असलेल्या या समुदायापर्यंत पोचण्याचा हा आशियामधल्या कुठल्या सरकारचा पहिलाच प्रयत्न असावा. याकरता निधीची उपलब्धता व्हावी म्हणून सरकारनं प्रत्येक राज्यात आणि महानगरात ‘सोसायटी’ची स्थापना केली. मुंबई जिल्ह्य़ाकरता महानगरपालिकेनं एड्स नियंत्रण सोसायटी (MDACS)ची स्थापना करण्यात आली. हिचं कार्यालय वडाळा इथल्या अ‍ॅकवर्थ कुष्ठरोग केंद्रात होतं. महापालिकेनं आपले सर्वोत्तम अधिकारी या कामासाठी तिथं नियुक्त केले. MDACS च्या पहिल्या संचालक होत्या लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेजच्या (सायन हॉस्पिटल) जीवरसायनशास्त्र/ सूक्ष्मजीवशास्त्र (तपासणे) विभागातल्या प्राध्यापक डॉ. अलका गोगटे. त्यांनी सोसायटीत नियुक्ती होण्याअगोदरच एचआयव्ही/ एड्सच्या साथीच्या धोक्याचा अभ्यास सुरू केलेला होता. त्यांनी यावर तयार केलेला पाच पानांच्या सखोल अभ्यासाचा UNAIDS ने अभ्यास केलेला होता.

एड्सच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी ती उत्तम योजना होती. पण अनेक मुंबईकरांप्रमाणेच त्यांनादेखील ‘हे समलिंगी लोक कोण आहेत’ याची अजिबात कल्पना नव्हती. पहिल्यांदा मी जेव्हा त्यांना सायन हॉस्पिटलमध्ये भेटलो, तेव्हा सिल्कची साडी नेसलेल्या या उंच्यापुऱ्या स्त्रीनं माझ्याकडे चौकसपणे पाहिलं आणि त्या उद्गारल्या, ‘‘ओहो! तू तो समलिंगी आहेस तर!’’ मी त्याला होकार दर्शवल्यावर लगेच त्यांनी कामाबद्दल बोलण्यास सुरुवात केली. ‘‘मग तुम्ही कसं काम करणार आहात,’’ त्यांनी थेटपणे विचारलं. आजवर आम्ही काय काय केलं आहे हे मी त्यांना सांगितलं आणि सरकारनं दिलेल्या छोटय़ाशा निधीतून हे कसं साध्य केलं हेही सांगितलं (शासनाचं कोषागार ठाण्याला असल्यानं या रकमेचा चेक आणायला मला तिथं जावं लागलं होतं.). आमची लगेच मैत्री जुळली. आजही त्या ‘हमसफर ट्रस्ट’च्या संशोधनावर देखरेख करणाऱ्या संस्थात्मक परीक्षण मंडळाच्या प्रमुख आहेत. डॉ. गोगटे यांच्या नेतृत्वाखाली असणारा हमसफर ट्रस्टचा आयआरव्ही विभाग जगभरात अत्यंत सन्माननीय म्हणून ओळखला जातो. अलका गोगटे यांच्या कठोर गुणवत्ता चाचण्यांमुळे त्याला अमेरिकन नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ वेल्थ (एनआयएच), वॉशिंग्टन यांचीदेखील मान्यता मिळालेली आहे. जेव्हा त्या आपल्या विशिष्ट लकबीत अत्यंत सावकाश पद्धतीने बोलत असतात, तेव्हा मोठमोठे परदेशी शास्त्रज्ञसुद्धा अत्यंत बारकाईनं त्यांचं बोलणं कान देऊन ऐकत असतात.

या अत्यंत हुशार स्त्रीला ‘समलिंगी लोकांचे प्रश्न कोणते आहेत’ याबद्दल जागरूक करायला मला फार वेळ घालवावा लागला नाही. आम्ही नेमकं ते ‘कसं करतो’ हे त्यांना खरंच कळत नव्हतं. एकदा त्यांनी मला स्त्री व पुरुष या दोन्हींशीही संबंध ठेवणारे पुरुष नेमकं काय करतात, याबाबत प्रश्न विचारायला सुरुवात केली. भारतीय पुरुषांच्या लोकसंख्येत हा उपगट मोठय़ा प्रमाणावर आहे. मग आम्ही जेवणाच्या सुट्टीनंतर तिथल्या बागेत चालत चालत याबद्दल विस्तृत चर्चा केली. ते ऐकून त्या चालता चालता थांबल्या आणि म्हणाल्या, ‘‘हे तर अवघडच आहे. आपण त्यांच्यापर्यंत पोचणार तरी कसं?’’ अशाप्रकारे एकूण ही आव्हानं स्वीकारत महापालिकेच्या एमडीएसीएसच्या कामाची सुरुवात झाली.

त्यानंतर माझ्या मदतीला आणखी एक ‘आई’ धावली. सावित्रीबाई फुले यांचे विचार वाचणं मला स्वातंत्र्याची जाणीव करून देणार होतं. त्यांनी स्त्रियांना पहिला बीजमंत्र दिला होता – तो म्हणजे शिक्षण. आणि आम्हाला समलिंगी समुदायाबाबत अगदी हेच करायचं होतं. आम्हाला आमच्या समुदायाला एचआयव्ही, अन्य पसरणारे आजार यांबाबत शिक्षण द्यायचं होतं. दलित आणि अन्य मागासवर्गीय जातींप्रमाणे आम्हालादेखील आमचं शोषण करणाऱ्यांविरोधात कुठलीही वाईट भावना मनात न ठेवता हिंसाचार आणि भेदभाव टाळायचे होते. सावित्रीबाई फुल्यांनी जशा मुलींसाठी शाळा सुरू केल्या त्याचप्रमाणे आम्हालादेखील आमच्या समुदायाला स्वत:चं संरक्षण कसं करावं आणि जागतिक महासत्ता बनू पाहणाऱ्या, वेगानं औद्योगिकीकरण होणाऱ्या समाजात कसा टिकाव धरावा, हे शिकवायचं होतं. आधुनिक जगाला सामोरं जायचं असेल, तर आधुनिक वैज्ञानिक शिक्षणाचीदेखील गरज आहे. डॉक्टर गोगटेंनी आम्हाला नेमकं हेच करायला प्रवृत्त केलं.

नॅकोनं आम्हाला दिलेल्या पहिल्या प्रकल्पात मुंबईतल्या अशा एक हजार पुरुषांपर्यंत पोचण्याचं उद्देश्य दिलेलं होतं. मुंबई महानगर इतकं मोठं आहे आणि तरीसुद्धा डॉ. गोगटेंना आम्ही जेमतेम एक हजार पुरुषांपर्यंत पोचू किंवा नाही याचीदेखील शंका वाटत होती. पण आमच्याकडं असणाऱ्या मर्यादित निधीमध्येसुद्धा आम्ही पहिल्या वर्षांतच ३ हजार समलिंगी पुरुषांपर्यंत पोचलो. त्यांना सुरक्षित लैंगिक संबंध आणि एचआयव्हीचा धोका यांबद्दल ‘हमसफर’नं त्यांचं प्रबोधन केलं.

मुंबईसारख्या आधुनिक शहरात बहुसंख्य पुरुषांना कंडोमचा वापर कसा करावा हेदेखील ठाऊक नव्हतं ही किती शरमेची गोष्ट! त्यांना प्रशिक्षण द्यावं लागलं. ‘हमसफर ट्रस्ट’च्या छोटय़ाशा हॉलमध्ये आम्ही दररोज बैठका घेत असू. तिथे तरुण समलिंगी पुरुष येऊन एचआयव्हीपासून स्वत:चं संरक्षण कसं करावं याचे धडे घेत असत. मात्र ज्या लोकांना स्वत:बद्दलच आदर वाटत नाही, त्यांना शिकवणं सोपं नसतं, हा सावित्रीबाई फुलेंसारखाच धडा आम्हालाही मिळाला.

आम्ही ‘हमसफर ट्रस्ट’च्या कामाची सुरुवात मुंबईत अगदी तळापासून केली. यासाठी आम्ही संपर्क साधणाऱ्या कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आणि जी ठिकाणं आम्ही ‘मॅप’ केलेली होती तिथं जाऊन आमच्या समुदायाशी संपर्क साधायला त्यांना सांगितला.

आमचं काम आणि सरकारी आरोग्य व्यवस्था यात असणारा महत्त्वाचा फरक म्हणजे, सरकारी रुग्णालय रुग्णांनी आपल्याकडं यावं याची वाट पाहात असतात. आमच्या कामामध्ये मात्र आम्हीच समुदायाकडे जात होतो आणि ते ‘आजारी पडण्याअगोदर’ आमच्या कामाला सुरुवात करत होतो. यालाच प्रतिबंधक सामाजिक आरोग्य असं म्हणतात. पूर्वीच्या काळातसुद्धा आपल्या देशातले वैद्य आणि समाजसेवक वेगवेगळ्या मंदिरात आणि धर्मशाळांमध्ये जाऊन, त्यांच्याशी स्वत:हून बोलून आणि तपासणी करून लोकांच्या आरोग्याची काळजी घेत असत. आपल्या समाजात पूर्वीच्या काळी कशाप्रकारे हे काम चालत असे, याची वर्णनं मीनाक्षी मंदिराच्या भिंतींवर आणि धर्मपाल यांच्या ग्रंथांमध्ये दिसतात.

या साऱ्या लोकांसोबत काम करणं अत्यंत कठीण होतं, कारण ते आपल्या रोजच्या कामाच्या रगाडय़ातच इतके व्यग्र असत, की आजारी पडेपर्यंत आपल्या आरोग्याची त्यांना जाणीवच नसे. ते आजारी पडू नयेत यासाठीचं शिक्षण देणं हे आमच्या ‘हमसफर ट्रस्ट’चं मुख्य काम होतं. त्या वेळी प्रतिबंधनात्मक उपाय आणि सामाजिक आरोग्य ही भारतात एक नवीन संकल्पनाच होती. आपल्या प्राचीन संस्कृतीत ही गोष्ट फार आधीपासून चालत आलेली असली तरी आधुनिक काळात मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जात असे. उदाहरणार्थ ‘कामसूत्र’सारख्या प्राचीन ग्रंथातदेखील जबाबदारीने करण्याचे लैंगिक वर्तन, पुरुषांना याबाबतीत असणारे आरोग्याचे प्रश्न याबाबत विस्तृत वर्णन केलेले आहे.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपण आपल्यावर राज्य करणाऱ्यांकडून वाईट गोष्टी शिकलो तर होतोच, पण त्या पाळण्याबाबत त्यांच्याहीपेक्षा कठोर दृष्टिकोन आपण स्वीकारलेला होता. ज्याप्रमाणे ब्रिटिशांनी नीट प्रयत्नपूर्वक आपला सारा प्राचीन इतिहास पुसून टाकला आणि त्याजागी स्वत:ची सांस्कृतिक मूल्यं प्रस्थापित केली, त्यामुळे आता आपल्याला इतिहास पुन्हा एकदा आधुनिक परिप्रेक्ष्यातून शोधावा लागेल. एखाद्या आरशावरची धूळ झटकून आपलं रूप नीटपणे पाहण्यासारखंच हे आहे.

rowkavi@gmail.com

chaturang@expressindia.com

अनुवाद : सुश्रूत कुलकर्णी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 1:01 am

Web Title: ashok row kavi article on feature of the gay community
Next Stories
1 महापालिकेमधले देवदूत
2 ‘कलम ३७७’ नावाची दहशत
3 ऊन-पावसाचा खेळ
Just Now!
X