News Flash

अंधाऱ्या जगातून प्रकाशात

वाचकहो, आज मी तुम्हाला एखाद्या समुदायासाठी असणारा गट चालवताना येणाऱ्या अडचणींबाबत सांगणार आहे.

अशोक रावकवी

भारतात समिलगी पुरुषांबाबतची माहिती गोळा करणाऱ्या पहिल्याच प्रकल्पामध्ये मुंबई आघाडीवर होती. आम्ही कोण आहोत, आम्ही काय करतो आणि मुंबईसारख्या महानगरात आम्ही कसं जगतो याबद्दलची माहिती प्रकाशात आल्यावर जणू आम्हीसुद्धा आमच्या वेगळ्या अंधाऱ्या जगातून एका विशाल महानगराचे नागरिक म्हणून पहिल्यांदाच प्रकाशात आलो.

वाचकहो, आज मी तुम्हाला एखाद्या समुदायासाठी असणारा गट चालवताना येणाऱ्या अडचणींबाबत सांगणार आहे. एखादी महापालिका, खाजगी कंपनी किंवा शैक्षणिक संस्था यासारख्या ठिकाणी काम करण्यापेक्षा अशा स्व-मदत गटांसोबत काम करणं अगदी वेगळंच असतं. प्रत्येकच संस्था कुठल्यातरी मार्गदर्शक तत्त्वांनुसार चालत असते आणि कालांतरानं त्या तत्त्वांचं रूपांतर कायदे आणि नियम यात होतं. अर्थात संस्थेचं काम कार्यक्षमपणे चालावं यासाठीच हे केलेलं असतं. यालाच शासकीय भाषेत ‘योजना आणि प्रशासन’ असंही म्हटलं जातं.

याउलट ज्या संस्था विशिष्ट समाजगटांच्या असतात किंवा स्वयंसेवी स्वरूपाच्या असतात, त्या एखाद्या विशिष्ट समुदायाचं भलं व्हावं म्हणून त्या त्या समुदायातल्या लोकांकडूनच चालवल्या जात असतात. त्या अधिक कार्यक्षमपणे चालण्यासाठी त्यांचं कामकाज सर्वसामान्य कार्यालयांपेक्षा वेगळ्या पद्धतीनं चालवलं जातं. उदाहरणार्थ, मी ‘हमसफर ट्रस्ट’मध्ये काम करणाऱ्या कुठल्याही माणसाला ‘‘तू तुझे वैयक्तिक प्रश्न इथं कामाच्या जागी अजिबात आणू नकोस’’ असं म्हणू शकत नाही. पण असं का? कारण आमच्याकडे काम करणाऱ्या लोकांना मुख्य धारेतल्या समाजाबाबत प्रश्न आहेत म्हणूनच तर ते आमच्यासोबत काम करताहेत. समाजात त्यांना भेडसावणारे प्रश्न दुर्लक्षिले, तर ‘हमसफर ट्रस्ट’मध्ये एक टीम म्हणून काम करण्यासाठी अडथळा बनतात. त्यामुळे ते त्यांच्या दैनंदिन कामापासून वेगळे काढता येत नाहीत.

आमच्या बाबतीत हे अगदी दररोजच घडत असतं. कुणाला तरी घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी मारहाण झालेली असते आणि ती व्यक्ती ही जखम सोबत घेऊन कार्यालयात आलेली असते. मग आमचं पहिलं काम असतं ते म्हणजे त्याच्या या प्रश्नाबाबत विचारपूस करणं, त्याला झालेली इजा बरी करण्यासाठी उपचार करणं आणि मगच त्याला योग्य ते काम देणं. हे नुसतं बोलणं सोपं आहे, पण प्रत्यक्ष करायला मात्र फार अवघड. अनेकदा आमच्या बहुसंख्य कर्मचाऱ्यांना काम करण्याची क्षमता रहावी म्हणून मानसिक आरोग्यासंबंधीच्या समुपदेशकांची मदत घेणं जरुरीचं ठरतं. आमच्या संस्थेनं या आघाडीवर खूपच प्रगती केलेली आहे, हे मी अभिमानानं सांगू इच्छितो.

मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आमच्या संस्थेमधल्या सर्वोत्तम व्यवस्थापकांपैकी एक आहे संदीप माने. या महाराष्ट्रीय मुलाला शाळेत नेहमी ‘बायल्या’ म्हणून चिडवलं जात असे. अनेकदा त्याला टग्या मुलांकडून मारहाणदेखील केली जात असे. पुढं ‘हमसफर ट्रस्ट’च्या संपर्कात आल्यानंतर त्यानं अगदी तळागाळातून कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली. तो स्वकष्टानं शिकला, बीकॉमची पदवी घेतली आणि आज तो संयुक्त राष्ट्रसंघानं दिलेल्या आणि जागतिक पातळीवरच्या अन्य कोटय़वधी रुपयांच्या निधींचं नियोजन करतो आहे. आता त्याच्या हाताखाली ५० लोक काम करत आहेत. मानसिकदृष्टय़ा पूर्णत: खच्ची झालेल्या ज्या तरुणाला आम्ही आत्महत्या करण्यापासून थांबवलं, त्याने केवढी ही गरुडझेप घेतली! किती महत्त्वाची गोष्ट आहे ना ही!

‘हमसफर ट्रस्ट’मधली आणखी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे ‘एक्झिक्युटिव्ह ऑफिसर’ या पदी असणारे विवेक आनंद. ते एमबीए आहेत. विवेक यांना कुठल्याही मोठय़ा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठमोठय़ा पदावरची नोकरी मिळाली असती. पण या उच्चशिक्षित तरुणानं ‘हमसफर ट्रस्ट’च्या कामात व्यावसायिकता, कामात सफाई आणली. ‘आपण एक स्वत:बद्दल अभिमान वाटणारी समिलगी व्यक्ती आहोत,’ हे त्यांनी स्वत:शी मान्य केलं. जेव्हा मनात स्वत:बद्दल कुठलाही संदेह नसतो, तेव्हा तुम्ही नक्की जगातल्या प्रतिकूल गोष्टींना सामोरे जाऊ शकता. त्यांनी खुलेपणानं एक भारतीय समिलगी व्यक्ती म्हणून साऱ्या जगभर प्रवास केलेला आहे. अगदी अभिमानानं परदेशातील सरकारं आणि विद्यापीठं इथं काम केलेलं आहे. ‘हमसफर ट्रस्ट’मधल्या आम्हा कुणालाच काही लपवायचं नाही आणि आम्ही या देशाचे नागरिक आहोत याचा आम्हाला अभिमान वाटतो.

अशी जोमानं काम करणारी टीम साथीला असल्यामुळं ‘हमसफर ट्रस्ट’नं १९९९च्या उत्तरार्धात आणखी एक परिषद भरवण्याचं ठरवलं. पुढच्या सहस्रकात नेमकं काय घडणार आहे, हे प्रमुख समिलगी स्त्री-पुरुषांना ठाऊक असायला हवं, हा या परिषदेमागचा उद्देश होता. बहुसंख्य लोक या नव्या प्रश्नांबद्दल अनभिज्ञच होते. परिषदेत आलेल्या १२७ जणांची (त्यात सहा स्त्रियाही होत्या) आम्ही १२ गटांत विभागणी केली. (त्यात असणाऱ्या गिरजा नावाच्या तृतीयपंथी व्यक्तीनं मात्र कुठल्याही गटात सामील व्हायला नकार देऊन तृतीयपंथीयांसाठी एकटय़ानंच योजना बनवायला सुरुवात केली.)

या परिषदेत पाडलेल्या प्रत्येक गटानं या प्रश्नांकडं कायदेशीर, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टिकोनातून बघून त्यांबाबत उपाययोजना बनवल्या. सुमारे वीस वर्षांपूर्वी म्हणजे १९९९ मध्ये ही परिषद झालेली असली, तरी त्या काळातसुद्धा आनंद ग्रोव्हर या विख्यात वकिलांनी तिच्यात सहभागी होऊन दंडसंहितेमधल्या कलम ३७७ विरुद्ध कसं लढावं, याबाबत आम्हाला जागृत केलं. या परिषदेच्या कामातूनच ‘पुढच्या सहस्रकाकडे वाटचाल’ हा महत्त्वाचा अहवाल तयार झाला. अहवाल तयार करणाऱ्या गटातल्या प्रत्येकानं इतकं झपाटून आणि नेटानं काम केलं, की आज १८ वर्षांनंतरही त्याची फळं एलजीबीटी संप्रदायाच्या कलम ३७७ विरुद्धच्या लढय़ाच्या रूपामध्ये दिसून येत आहेत. (ज्यांना या अहवालाची प्रत हवी असेल त्यांना आम्ही ती ई-मेलद्वारे पाठवू शकतो.)

अगदी डॉ. अलका गोगटे यांनीसुद्धा आम्हाला मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागासोबत काम करण्याचा सल्ला दिलेला होता. डॉ. गोगटे त्यावेळी महापालिकेच्या रुग्णालयात आणि नंतर मुंबई एड्स प्रतिबंधक सोसायटीमध्ये काम करत होत्या. नुकतंच आम्हाला संयुक्त राष्ट्र संघातर्फे न्यूयॉर्क इथं आमंत्रित करण्यात आलं होतं. आम्ही महापालिकेसोबत आरोग्यविषयक काम करतो असं तिथं आम्ही अभिमानानं सांगितलं होतं. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांसोबतदेखील आम्ही काम करतो हे ऐकून तर अनेकांना धक्काच बसला. हे पक्ष आमच्या विरोधात आहेत असा गैरसमज तिथं दिसतो. आम्ही केवळ या आरोपाला नाकारूनच थांबलो नाही, तर ‘भारतीय जनता पक्ष’ आणि ‘शिवसेना’ या पक्षांच्या नेत्यांनी ‘हमसफर ट्रस्ट’ला भेट देऊन आम्हाला अत्यंत सन्मानाची वागणूक दिली हेदेखील आम्ही त्यांना सांगितलं. प्रिया दत्त यांच्यासारख्या काँग्रेसच्या नेत्यानंदेखील दोन वर्षांपूर्वी आमच्या ‘एलजीबीटी’ परिषदेचं उद्घाटन केलेलं होतं. संयुक्त राष्ट्र संघाच्या परिभाषेत याला ‘मुख्य प्रवाहात येणं’ असं म्हटलं जातं. याचा अर्थ असा, की एखादा आधी खूप बदनाम झालेला समाजगट स्वत:च्या हक्कांसाठी उभा राहातो आणि मग अखेर त्याला महानगरपालिका आणि राज्य सरकार या दोहोंसोबत काम करण्याची संधी मिळते. याचाच अर्थ तुम्ही जर स्वाभिमानासाठी झगडलात, तर तुम्हाला नक्की त्यांच्यासोबत हक्कानं बसण्याची संधी मिळते आणि तुम्ही समान पातळीवरून त्यांच्याशी बोलू शकता. हा आपल्या लोकशाहीचा आणि सर्व नागरिकांसाठी असणाऱ्या समान हक्कांचा विजय आहे.

ही गोष्ट अगदी १९९९ पर्यंतसुद्धा मागे जाऊन पाहता येते. त्यावेळी ‘हमसफर ट्रस्ट’ला MDACS कडून पहिला प्रकल्प मिळालेला होता. त्यावेळी आम्ही संस्थेला कॉम्प्युटर्स मिळावेत अशी मागणी केली होती. सुमारे वीस वर्षांपूर्वीच आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या गरीब समुदायांना ते वापरायला आम्ही शिकवलं होतं. शिवाय आम्ही इतर संस्थांना किंवा स्वयंसेवक गटांनादेखील कामाला सुरुवात करायला आणि पुढं ते वाढवत न्यायला मदत करण्याचं वचन दिलेलं होतं. वर उल्लेख केलेल्या परिषदेमधली एक मागणी ‘हमसफर’च्या विचारधारेशी अगदी जुळणारी होती. आम्ही मुंबईमध्ये, म्हणजे आमच्या मुंबा-आईच्या शहरामध्ये एक सक्षम संस्था उभारू. खुद्द मुंबादेवीलासुद्धा आपल्या साम्राज्याचा विस्तार अन्य कुठं करायचा नव्हता, तर केवळ एका शहरापुरतंच तिला आपलं अस्तित्व ठेवायचं होतं. मुंबादेवीनं आम्हाला तर आशीर्वाद दिला आहे आणि तिच्या इतर मुलांची सेवाही आम्ही करतोच आहोत. ही मुंबाआई अन्य गावातल्या लोकांना ज्याप्रमाणे आपला कृपाप्रसाद देत असते, तसंच आम्हीही तिच्या सगळीकडं विखुरलेल्या मुलांना मदत करू. मग आम्ही इतर शहरातल्या आणि उर्वरित भारतातल्यासुद्धा गटांची स्थापना करण्यात आणि त्यांना सक्षम बनवण्यात साहाय्य केलं. अशा प्रकारे या गटांचं जाळं तयार करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. आणि त्यातूनच ‘नेटवर्क ऑफ सेक्शुअल मायनॉरिटीज’ (INFOACM) ची मुंबईमध्ये सुरुवात झाली. आज त्यामध्ये साऱ्या भारतभरातून १०० एलजीबीटी गट समाविष्ट आहेत. शिवाय आमच्यासोबत काम करण्याची इच्छा असणारे आणखी ३० ‘आमंत्रित पाहुणे’ असणारे प्राध्यापक, समाजशास्त्रज्ञ देखील यात आहेतच.

त्यापैकी आमच्यासोबत सतत असणारी साथीदार आणि हितचिंतक म्हणजे अल्पना डांगे नावाची अत्यंत बुद्धिमान संशोधक स्त्री. अल्पना डांगे यांनी मुंबईतील समिलगी पुरुषांवर केलेलं संशोधन हा भारतामधला या प्रकारचा पहिला अभ्यास आहे. यामध्ये मुंबई शहरातल्या वेगवेगळ्या भागातल्या समिलगी पुरुषांची मुलाखत घेऊन, त्यांच्या वर्तनाला संख्याशास्त्रीय दृष्टीनं त्यांचा अभ्यास करून, समजावून घेतलं होतं. त्यांनी तयार केलेल्या अहवालाचं ‘अत्यंत अद्भुत’ याच शब्दांत वर्णन करावं लागेल. त्या अगदी शांतपणे बोलून अशा पुरुषांना त्यांच्या अडचणींबद्दल किंवा त्यांना कुठली वैद्यकीय मदत हवी आहे का, ते कधी डॉक्टरांकडं गेले होते का – यांबद्दल प्रश्न विचारत असत. यामधलं भीषण सत्य असं होतं, की मुंबईतल्या कुठल्याही डॉक्टरांना समिलगी व्यक्तींच्या आरोग्यविषयीचे प्रश्न ठाऊक नव्हते. त्याहूनही अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे मुंबईमधले अनेक समिलगी पुरुष दर महिन्याला वेगवेगळ्या ११ जोडीदारांना भेटत होते. अशा प्रकारचा सखोल अभ्यास प्रथमच समोर आल्यामुळं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला (आणि लोक तर नाराजही झाले). कारण त्यातून एचआयव्ही किंवा अन्य संसर्गजन्य आजारांबाबत या समुदायात किती कमी जागरूकता आहे, हेच दिसून येत होतं.

जरी एचआयव्ही/एड्स भारतात सर्वप्रथम चेन्नईमधील एका स्त्री वेश्येला झालेला आढळून आला असला, तरीदेखील जेव्हा समिलगी पुरुषांनाही तो होऊ शकतो ही गोष्ट सिद्ध झाली, कारण त्यांना कंडोमसारखी प्रतिबंधक साधनं वापरण्याचं ज्ञान नव्हतं किंवा रोगाचा प्रसार कसा होतो याबद्दलही ठाऊक नव्हतं. शेवटी त्यावेळी ‘प्रतिबंधक साधनं कशी वापरावीत आणि ती वापरल्यावर त्यांची विल्हेवाट कशी लावावी’ यासाठी आम्ही पत्रकं छापली होती. आता हे आठवून मला हसू येतं. पहिल्या वर्षीच आम्ही MDACS प्रकल्पामध्ये काम केलं तेव्हा आम्ही मुंबईमधले समिलगी पुरुष आणि तृतीयपंथी यांना प्रतिबंधक साधनांची हजारो पाकिटं वाटलेली होती.

अशा प्रकारे भारतात समिलगी पुरुषांबाबतची माहिती गोळा करणाऱ्या पहिल्याच प्रकल्पामध्ये मुंबई आघाडीवर होती. आम्ही कोण आहोत, आम्ही काय करतो आणि मुंबईसारख्या महानगरात आम्ही कसं जगतो याबद्दलची माहिती प्रकाशात आल्यावर जणू आम्हीसुद्धा आमच्या वेगळ्या अंधाऱ्या जगातून एका विशाल महानगराचे नागरिक म्हणून पहिल्यांदाच प्रकाशात आलो. अल्पना जणू मुंबईतल्या समिलगी नागरिकांना जन्म देणाऱ्या सुईणीचंच काम करत होत्या. आमची स्वत:ची काळजी कशी घ्यावी याबद्दल त्यांनी आम्हाला दाखवलं. धडपड करत आणि चुकत-माकत हे काम पुढं चाललेलं होतं. आम्ही शिकत शिकत पुढं मार्ग काढत होतो. या साऱ्या दरम्यान आम्ही जे जे साहित्य छापलं, त्यातून आम्ही किती कसोशीनं प्रयत्न करत होतो हे दिसून येईल. कोणत्या गोष्टी असुरक्षित आहेत आणि एचआयव्ही आणि अन्य संसर्गजन्य आजारांपासून स्वत:चा बचाव कसा करावा, हे त्यामध्ये शिकवलेलं होतं. ते दिवस खूप उत्कंठेचे होते. कारण डॉ. अलका गोगटे यांनी आम्हाला समाजामध्ये मोकळेपणानं काम करण्याची मुभा दिलेली होती. खरंच सांगतो, ते दिवस खूप छान होते.

लवकरच आम्हाला या साऱ्या प्रस्थापित यंत्रणेमध्ये काम करणं किती कठीण आहे हे कळून चुकलं. सबल नसणाऱ्या समुदायांसाठी तो एक धडाच होता. कुठल्यातरी सभागृहाबाहेर थांबून आपल्या हक्कांसाठी घोषणा देणं एकवेळ सोपं आहे; पण एखाद्या यंत्रणेमध्ये सामील होऊन तिच्यासोबत काम करणं मात्र त्याहून खूपच कठीण आहे. ‘हमसफर’ आजही तो प्रयत्न करते आहे. आपल्या देशाच्या राज्यघटनेमधील मानवी हक्कांसाठी केलेल्या तरतुदी हाच आमच्यासाठी मार्ग दाखवणारा प्रकाश आहे. आणि या तरतुदी दाखवूनच आम्ही सरकारसोबत काम करू शकतो, हे इतरांना दाखवून देतो. आम्ही सदासर्वकाळ  भांडत राहू शकत नाही ना?

एखादी वेळ लढाई करण्याची असते, तर एखादी असते स्वत:वर काम करण्याची. ते धोरण आमच्या कामात आम्ही अवलंबलं आहे.

rowkavi@gmail.com

chaturang@expressindia.com

अनुवाद : सुश्रुत कुलकर्णी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 1:01 am

Web Title: ashok row kavi article on homosexulity freedom
Next Stories
1 आरशावरची धूळ झटकताना..
2 महापालिकेमधले देवदूत
3 ‘कलम ३७७’ नावाची दहशत
Just Now!
X