|| अशोक रावकवी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकीकडे सरकारने कलम ३७७ सारख्या कालबाह्य़ कायद्याचा धाक आम्हाला घातला असला, तरी समलिंगी व्यक्तींच्या आरोग्यविषयक प्रश्नांबाबत जाण असणारी जिज्ञासू माणसंही मुंबई महापालिकेत होती. फक्त समलिंगी (आणि तृतीयपंथी) व्यक्तींसाठी असणारं भारतातलं पहिलं क्लिनिक महापालिकेतील डॉक्टरांच्या मदतीनेच सुरू झालं. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेचे (नॅकोचे) महासंचालक प्रसाद राव यांच्या हस्ते झालं. पहिल्याच दिवशी आठ  रुग्ण आल्याचं मी सांगताच त्यांना धक्काच बसला होता. ‘‘इतके सारे समलिंगी पुरुष?’’ त्यांनी आश्चर्यानं विचारलं होतं. खरं तर समलिंगी पुरुषांनी खुलेपणानं आणि स्वत:हून आरोग्यविषयक साहाय्य मागायला येण्याची संपूर्ण भारतातली ही पहिलीच वेळ होती!

एक इंग्रजी म्हण आहे, ‘कामाला सुरुवात केली की निम्मं झाल्यातच जमा असतं,’ पण ही म्हण खरी आहे का? कारण आमच्या ‘हमसफर ट्रस्ट’च्या कामाचा श्रीगणेशा करतानाच मोठय़ा अडचणी येत गेल्या. आमच्या ‘बॉम्बे दोस्त’ या नियतकालिकाच्या पहिल्याच अंकात आम्ही अ‍ॅड. श्रीकांत भट यांचा लेख प्रसिद्ध केलेला होता. अ‍ॅड. भट मुंबईमध्ये फौजदारी कायदा या विषयातले अत्यंत प्रतिष्ठित वकील होते. (ते शासकीय विधि महाविद्यालयात ‘गुन्हेगारी कायदा’ हा विषयदेखील शिकवत असत.) ‘बॉम्बे दोस्त’मध्ये त्यांनी भारतीय दंडसंहितेतल्या कलम ३७७ वर लेख लिहिलेला होता.

या दंडसंहितेनुसार ‘ज्या लैंगिक संबंधांमधून मुलं जन्माला येत नाहीत’ ते संबंध गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत, असं ठरवण्यात आलं होतं. याचाच अर्थ स्त्री-पुरुष संबंधांखेरीजचे अन्य सारे शरीरसंबंध ब्रिटिशांनी गुन्हेगारी स्वरूपाचे ठरवले होते. मात्र अशा स्वरूपाचा कुठलाही कायदा आपल्या भारतीय पुराणांमध्ये किंवा मनुस्मृतीमध्येसुद्धा सापडत नाही किंवा त्याआधीच्या काही शतकांच्या इतिहासात अशी कुठंही नोंद असलेली दिसत नाही. खरी गोष्ट अशी आहे की, हा कायदा थॉमस बॅबिंग्टन मॅकॉले या ब्रिटिश अधिकाऱ्यानं आणला. याला आधार होता तो बायबलमधल्या ‘लेव्हिटिकस १:१’चा. मुळातला हा धार्मिक कायदा नंतर ब्रिटिश गुन्हेगारी कायद्यामध्ये समाविष्ट केला गेलेला होता. पुढं ब्रिटिश संसदेनं ‘वुल्फेन्डेम’ यांच्या अहवालानंतर तो रद्दही केला. वुल्फेन्डेम या अहवालामध्ये ब्रिटिश संसदेला जुन्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची गरज नमूद करण्यात आलेली होती. या जुनाट कायद्यांचा वापर करून ब्रिटिश समाजातल्या अत्यंत प्रतिष्ठित लोकांची (उदा. ऑस्कर वाइल्ड) छळणूक आणि ब्लॅकमेलिंग केलं जात असे. ब्रिटिश संसदेनं १९६४ मध्ये गुन्हेगारी कायद्यातला हा भाग काढून टाकला आणि त्यामध्ये, ‘खासगीपणानं दोन प्रौढ व्यक्तींनी परस्पर संमतीनं ठेवलेले लैंगिक संबंध’ याबाबत सरकारची कोणतीही जबाबदारी नाही. पोलीस यावर कोणतंही नियंत्रण ठेवू शकणार नाहीत, असंही यात म्हटलं होतं. खासगीपणाचा भंग होत असल्यानं असा कायदा त्यामुळं रद्द केला पाहिजे, अशी ब्रिटनमध्ये मागणी होत होती. अशा प्रकारे ब्रिटनमधल्या ‘एलजीबीटी’ समुदायानं या प्राचीन कायद्याला हटवून अखेर ब्रिटनला खरोखरच्या निधर्मी समाजाच्या दिशेनं नेलं. मात्र इथं भारतात आपण अजूनही ब्रिटिशांनी आणलेला ‘कलम ३७७’ लागू करत आहोत. खुद्द ब्रिटिशांनीच हा जुना कायदा कधीच मोडीत काढलेला आहे.

हा कायदा ‘एलजीबीटी’ समुदायासोबत काम करताना मोठा अडसर ठरू शकेल, अशी धोक्याची सूचना अ‍ॅड. श्रीकांत भटांनी आम्हाला दिलेली होती. त्यामुळं ‘बॉम्बे दोस्त’ला पुढाकार घेऊन या कायद्याबद्दल जागरूकता निर्माण करावी लागली. आमच्या मार्गात कुठले अडथळे येणार आहेत, तेही त्यातून स्पष्ट झालं. खरं तर डॉ. जयराज ठाणेकर या मोठय़ा मनाच्या मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यानं आम्हाला म्हटलं होतं, ‘‘अरे, तुम्ही महापालिकेच्या जागेत काम करत राहा. तुम्ही चांगलं काम करत आहात. तुम्हाला कोण हात लावतं आहे मी बघतो.’’

डॉ. अलका कारंडे यांनी कामाठीपुऱ्यामध्ये कार्यरत असणाऱ्या ‘आशा प्रकल्पा’च्या प्रमोद निगुडकर यांनादेखील आम्हाला मदत करायला सांगितलेलं होतं. प्रमोद निगुडकरांनी मला वेगवेगळे शासकीय अहवाल कशा प्रकारे लिहावेत, हे शिकवलं. आम्हाला पोलिसांनी टाकलेल्या धाडींचा आणि छळाचा त्रास होऊ नये, अशी डॉ. अलका कारंडे यांची इच्छा होती. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाला पाठवण्याचे हे अहवाल तयार करायला अत्यंत कठीण आणि किचकट असले, तरीही अखेर आम्ही हे अहवाल लिहिण्याचं कौशल्य प्राप्त करून घेतलंच. मध्येच कधीकधी डॉ. ठाणेकर गमतीशीरपणे वागत असत. ते अगदी भोळेभाबडे प्रश्नसुद्धा विचारत- ‘‘मला अगदी खरंखरं सांगा. तुम्हाला खरंच सुंदर स्त्रियांमध्ये रस वाटत नाही का? आम्ही म्युनिसिपल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन तुझी तपासणी करू का? आम्ही तुझं सगळं ठीकठाक करून देऊ.’’ मी त्यांच्या या आपुलकीमुळं भारावून जात असे. त्यांनी आपल्या पत्नीकडेही या गोष्टीचा उल्लेख केला होता. त्यांच्या पत्नी श्रीमती ठाणेकर नाटय़ क्षेत्रातल्या होत्या आणि त्यांना ‘अशा प्रकारचे’ पुरुष असतात हे ठाऊक होतं. अशा अनेक गोष्टींमुळे डॉ. ठाणेकर लैंगिकता आणि लिंगभाव या गोष्टींबाबत संवेदनशील बनलेले असावेत. महापालिकेतला एक डॉक्टर लोकसंख्येत फारशा कुणाला ठाऊक नसणाऱ्या समुदायाबाबत नव्यानं शिकत होता आणि हे करताना तो या समुदायाच्या वैयक्तिक सन्मानाला कुठंही धक्का न लावण्याचा मनाचा मोठेपणाही दाखवत होता. डॉक्टरांना मी भेटायला गेल्यावर कधीकधी त्यांच्या पत्नी गमतीनं म्हणायच्यादेखील, ‘‘काय दुर्दैव आहे बायकांचं! इतके देखणे पुरुष आणि तुमच्यापैकी कुणाचाच एकाही स्त्रीला उपयोग नाही.’’ त्यावर मीही त्यांना गमतीनं म्हणायचो, ‘‘तुमच्यापैकी एक जणसुद्धा आम्हा सगळ्यांना त्रास द्यायला पुरेशी आहे की.’’ त्या काळात उघडपणे आपण समलिंगी आहोत, हे मान्य करणारा एक पुरुष आणि मुंबई महानगरपालिकेमधील उच्च पदावर असणारा एक वैद्यकीय अधिकारी यांच्यात अशी मनमोकळी, खेळकर संवादांची देवाणघेवाण होती, हेसुद्धा अगदी अनोखंच होतं.

डॉ. ठाणेकर आणि डॉ. कारंडेच हेच आमच्या कामावर देखरेख ठेवत होते असं नव्हे, तर महानगरपालिकेचे अन्य डॉक्टर्सही ‘हमसफर ट्रस्ट’च्या कार्यालयात येऊन आमचं काम कसं चाललं आहे, हे पाहात असत. त्यापैकी काही उल्लेखनीय अधिकाऱ्यांची नावं मी इथं देऊ इच्छितो. डॉ. अरुण बामणे हे अत्यंत हुशार आणि स्वभावानं शांत होते. त्यांचा क्षयरोग, पोलिओ आणि मलेरिया या आजारांवर कित्येक वर्षांचा अभ्यास होता. समलिंगी पुरुषांचा व्यवहार नेमका कशा प्रकारे असतो, याचा त्यांना अभ्यास करायचा होता. याशिवाय काही स्त्री डॉक्टरही होत्या. आजही त्या मुंबई महापालिकेत काम करतात. त्यापैकी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात काम करणाऱ्या डॉ. पद्मजा केसकर आज इथल्या कार्यकारी आरोग्य अधिकारी आहेत. जेमतेम चारेक फूट उंचीची छोटय़ा चणीची ही स्त्री प्रत्यक्षात मात्र खमकी होती. अमेरिकन राजदूतावासातून आलेल्या एका उंचापुऱ्या, गोऱ्या अमेरिकन माणसाला झापताना मी त्यांना नीटच पाहिलं होतं. ‘‘पुढच्या वेळी जेव्हा मला भेटायला याल, तेव्हा नीट तयारी करून या. सार्वजनिक आरोग्याविषयीच्या मी अगदी प्राथमिक गोष्टी तुम्हाला शिकवू शकत नाही. खरं तर तुम्हाला द्यायला माझ्याकडं पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळही नाही. त्यामुळं तुम्हाला जे सांगायचं आहे, ते अगदी थोडक्यात सांगा.’’ हे ऐकून त्या आगाऊ अमेरिकन गोऱ्या माणसाचा चेहरा लालेलाल झाला. आम्हा भारतीयांना गोऱ्या लोकांचा बाऊ वाटून न घेता आत्मविश्वासानं उभं राहता येतं, हे पाहून मला खूपच आनंद झाला होता. आरोग्य विभागातल्याच डॉ. केसकर यांच्यासारख्या कार्यक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यानंच मुंबईच्या सतत वाढत असणाऱ्या झोपडपट्टय़ांमध्ये जाऊन महत्प्रयासानं तिथल्या १०० टक्के मुलांना पोलिओ आणि अन्य जीवघेण्या आजारांवर मात करण्याच्या लसी दिलेल्या होत्या. असे चांगले अधिकारी नसते, तर बजबजपुरी झालेल्या या भयंकर नागरी वस्तीत परमेश्वरसुद्धा आपल्याला वाचवू शकला असता का, याबद्दल शंकाच आहे.

मला प्रभावित करणाऱ्या आणखी काही डॉक्टर स्त्रियाही महापालिकेत होत्या. त्यापैकी एक होत्या डॉ. लतिका शिवकर. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीच्या (टऊअउर)च्या वडाळा इथल्या कार्यालयात त्या असत. मुंबईतल्या सर्वोत्तम मेडिकल कॉलेजेसमधल्या तज्ज्ञ डॉक्टरांना संसर्गजन्य लैंगिक आजारांबद्दल जे ठाऊक नसेल, ते सारं ज्ञान डॉ. शिवकर यांच्याकडं होतं. सार्वजनिक आरोग्य विभागात त्या कनिष्ठ पदावर काम करत असल्या, तरी या विषयात त्या एक अधिकारी व्यक्ती होत्या. त्यासोबतच ‘क्षयरोग’ या विषयावर अधिकारी असणाऱ्या दुसऱ्या डॉक्टर होत्या डॉ. बिन्नी खेत्रपाल. या दोन्ही डॉक्टर स्त्रियांनी समलिंगी व्यक्तींच्या आरोग्याबाबत अगदी अचूक प्रश्न विचारल्यानं मी खूपच प्रभावित झालो होतो. भारताच्या सार्वजनिक नोकरशाहीमध्ये, खास करून सार्वजनिक आरोग्य विभागात इतक्या कार्यक्षम स्त्रिया काम करतात याची फारच थोडय़ा लोकांना जाणीव असेल. मला सतत जाणवणारी गोष्ट म्हणजे आपला देश बहुधा स्त्रियांमुळंच चालत असावा; कारण पुरुष नेहमी प्रत्येक बाबतीत राजकारण आणून त्यावर झगडत बसण्यात वेळ घालवत असतात.

एकीकडं कलम ३७७ची धास्ती असताना दुसरीकडं ‘हमसफर ट्रस्ट’पुढची आव्हानं उग्र रूप धारण करू लागलेली होती. समलिंगी समुदाय विखुरलेला आणि अदृश्य होता म्हणून ही आव्हानं नव्हती, तर तो आजारांना अधिक प्रमाणात बळी पडू शकणारा होता. शिवाय तो आधीच व्याधींनी ग्रासलेला होता. आमच्या ट्रस्टनं केलेलं पहिलं काम म्हणजे मुंबई महापालिकेत या कामात मदत करू शकतील असे अधिकारी शोधणं. वायव्य मुंबईच्या सायन हॉस्पिटलमधल्या त्वचा आणि कुष्ठरोग विभागाच्या प्रमुख डॉ. हेमांगी जयरंगानी अशा अधिकाऱ्यांपैकी एक होत्या. यापूर्वी डॉ. गीता भावेंनी मला आधी विचारलं होतं तसंच त्यांनीही मला आश्चर्यानं डोळे विस्फारून विचारलं होतं, ‘‘मुंबईत खरोखरच समलिंगी पुरुष आहेत?’’ ‘मीदेखील त्यांपैकी एक आहे’ असं सांगितल्यावर त्या म्हणाल्या होत्या, ‘‘खरं तर तू मानसिकदृष्टय़ा ठीकठाक वाटतोस आणि आजारीही दिसत नाहीस. मग नेमकी अडचण तरी काय आहे?’’ त्यावर आम्ही दोघंही मोठय़ानं हसलो आणि मग कामाबाबत आमचं बोलणं सुरू झालं. त्यांना या विषयात खरोखरच रस होता, इतकंच नव्हे तर त्यासाठी मोठय़ा प्रमाणात काही तरी करावं असंही त्यांना वाटत होतं. ‘‘मी तुमच्या केंद्रावर दोन एमबीबीएसचे विद्यार्थी डॉक्टर्स पाठवते आणि तुम्ही त्यांना समलिंगी पुरुषांच्या आरोग्यविषयक प्रश्न कसे हाताळायचे ते शिकवा,’’ असं त्यांनी सुचवलं. मी त्यांची ही ऑफर अगदी आनंदानं स्वीकारली. फक्त समलिंगी (आणि तृतीयपंथी) व्यक्तींसाठी असणारं भारतातलं हे पहिलं क्लिनिकच होतं.

हे क्लिनिक मुंबईतल्या वाकोल्याच्या मच्छीबाजाराशेजारी असणाऱ्या महापालिकेच्या एका इमारतीत सुरू झालं. तिथल्या दुसऱ्या मजल्यावरच्या एका मोठय़ा बाथरूमचं रूपांतर आम्ही क्लिनिकमध्ये केलं होतं. २५ जुलै १९९९ रोजी त्याचं उद्घाटन त्या वेळी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेचे (नॅकोचे) महासंचालक आणि भारत सरकारचे आरोग्य उपसचिव प्रसाद राव यांच्या हस्ते झालं होतं. पहिल्याच दिवशी आठ रुग्ण आल्याचं मी सांगताच त्यांना धक्काच बसला होता. ‘‘इतके सारे समलिंगी पुरुष? याहूनही जास्त रुग्ण असतील असं तुम्हाला वाटतं का?’’ त्यांनी अगदी आश्चर्यानं विचारलं होतं. ते ऐकून मला खरं तर खूप वाईट वाटलं होतं. दिल्लीत आमचा स्वीकार व्हायला वेळ खूप लागला होता; पण मुंबईत नाही. समलिंगी पुरुषांनी खुलेपणानं आणि स्वत:हून आरोग्यविषयक साहाय्य मागायला येण्याची संपूर्ण भारतातली ही पहिलीच वेळ होती!

नंतर मात्र डॉ. कारंडेंनी मला सांगितलं की, खरं तर मुंबई महानगरपालिकेनं ही सेवा सुरू केल्यानं प्रसाद राव नावाचे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागातले हे उच्चपदस्थ आयएएस अधिकारी खूपच प्रभावित झाले होते. ‘आता कुणी काही बोलूच दे, मग बघतेच,’ असं म्हणताना डॉ. कारंडेंच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित पसरलं होतं. डॉ. ठाणेकरांचाही चेहरा आनंदानं उजळलेला होता. अखेर त्या दिवशी आम्ही एक मोठाच अडथळा पार केलेला होता!

rowkavi@gmail.com

chaturang@expressindia.com

अनुवाद: सुश्रुत कुलकर्णी

मराठीतील सर्व लिंगभेद भ्रम अमंगळ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gay men national aids control organisation
First published on: 11-08-2018 at 02:59 IST