अशोक रावकवी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारं कलम ३७७ रद्द झालं आणि एलजीबीटी समुदायात आनंदाचं वातावरण पसरलं खरं, परंतु आता खरी जबाबदारी सुरू झाली आहे. गेली २५ वर्ष ‘हमसफर ट्रस्ट’ काम करते आहे. मुंबईतल्या एलजीबीटी समुदायाचं रक्षण करण्यासाठी ‘हमसफर’कडे पुरेशी सेना आहे. आता जे लोक कायद्याचा गैरवापर करतील त्यांच्याविरुद्ध या साऱ्या मुलांना प्रशिक्षण देऊन शिस्तबद्ध पद्धतीनं काम करण्याची गरज आहे.

६ सप्टेंबर २०१८ची मध्यरात्र..

होय.. आता चारही न्यायाधीशांनी ‘कलम ३७७’वर आपला निवाडा दिलेला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीनी आम्हाला जो निकाल दिला आहे, तो नुसता निकालच नाही, तर आमच्यासाठी तर जणू ते एखादं काव्यच आहे. प्रत्येकजण आपला आनंद साजरा करतो आहे.

आपल्या देशात एकीकडे याबद्दल ‘जयजयकार’ होतो आहे किंवा दुसऱ्या बाजूला मिळालेल्या या ‘घटनात्मक नैतिकता’ नावाच्या नव्या स्वातंत्र्याचं नेमकं काय करायचं तरी काय, याबाबत विस्मयाचा धक्काही बसलेला आहे.  लगबग करणारे वकील आणि गंभीरपणे बसलेले न्यायाधीश या विरोधाभासानं मी अधिकच चक्रावून गेलेलो होतो. आता मात्र मी दिवसभराची गजबज संपून आता शांत झालेल्या न्यायालयातल्या एका बाकावर बसून इकडंतिकडं पाहत होतो. सगळे दिवे विझलेले होते, पंखेसुद्धा आवाज न करता शांत, स्थिर झालेले होते आणि अखेरीस फक्त मी.. एकटा मीच तिथं बसलेलो होतो..

माझे डोळे अश्रूंनी भरलेले होते. मी डोळे मिटून घेतले खरे, पण आता अश्रू रोखणं मला शक्य झालं नाही. मुंबादेवीच्या या ७० वर्षांच्या बाळाच्या सुरकुतलेल्या गालांवरून अश्रू ओघळत होते. आणि काय आश्चर्य.. तिथं मी एकटाच नव्हतो असं माझ्या अचानक लक्षात आलं. न्यायालयाच्या त्या दालनात कुठला तरी वेगळाच दिव्य प्रकाश पडला होता. मी डोळे उघडल्यावर समोर मला एक अत्यंत आश्चर्यकारक दृश्य दिसलं.

न्यायाधीशांच्या खुर्चीत खुद्द मुंबादेवी बसलेली होती. हे विचित्र दृश्य पाहून मी थोडासा अस्वस्थ व्हायला लागलो होतो, पण मुंबादेवी मात्र हसत होती. अचानक एखादी जादू व्हावी तसे कोर्टाचे दरवाजे उघडले. एकापाठोपाठ काही लोक त्या दरवाजांतून आत प्रवेश करू लागले. हे सारे याआधी माझ्या आयुष्याला कुठे ना कुठे स्पर्शून गेले होते. सर्वात आधी आत आले ते शिखंडी आणि बृहन्नडा. त्यापाठोपाठ आले वेगवेगळे षंढ, पांडक आणि तृतीयपंथी. मग आत आली वासंती. ती आमच्या संस्थेतली पहिली कर्मचारी. वासंती एक सुशिक्षित तृतीयपंथी होती. तिनं दालनात मागच्या दरवाजातून प्रवेश केला. वासंती मुंबईच्या बदनाम वस्तीतून आमच्याकडे काम करण्यासाठी आलेली होती. याआधी या तृतीयपंथी व्यक्तीला केवळ पन्नास-पन्नास रुपयांसाठी दररोज देहविक्रय करणं भाग पडत होतं. अखेर एकेदिवशी तिनं हिंमत करून

‘हमसफर ट्रस्ट’ला फोन केला. मी हिशेबनीसाचं काम करू शकते, असं तिनं सांगितलं. आजवर आम्हाला मिळालेल्या सर्वोत्तम हिशेबनीसांपैकी ती होती – तिला एड्स होईपर्यंत ती आमच्या संस्थेत राहिली. ती मरण पावली तेव्हा तिच्या मृतदेहाला हात लावायलाही अन्य कुणी तयार नव्हतं. अखेर आम्ही आमच्या खांद्यांवरून तिचा मृतदेह सायनच्या स्मशानभूमीत नेला. मी जे आठवतील ते श्लोक-मंत्र पुटपुटण्याचं नाटक करत तिला अखेरचा निरोप दिला.

पण आता ती इथं माझ्या शेजारीच स्मित करत बसलेली होती.

त्यानंतर न्यायालयात अवतरला तो शशी. एका शासकीय कार्यालयात काम करणारा हा तरणाबांड मुलगा. त्याला एड्स झाला आहे, असं लक्षात आल्यावर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं. मरतेवेळी मात्र मुळात पहिलवानासारख्या असणाऱ्या त्याच्या शरीराचा केवळ सापळा उरलेला होता. त्याच्या चितेला किती थोडंसं लाकूड लागलं होतं! माझी कितीतरी मुलं अशा प्रकारे देवाघरी गेलेली होती. पोलिसांनी मारहाण केल्यामुळे किंवा एड्समुळं मरण पावलेली होती. ही सारी मरण पावली तेव्हा फक्त मी आणि आमचं ‘हमसफर कुटुंब’ यांनीच त्यांच्यासाठी शोक केला होता. बाकी कुणीच त्यांच्या पाठीशी नव्हतं. आता एकेक करून त्यापैकी सगळे हळूहळू न्यायालयात प्रवेश करत होते. सगळ्यांनी मुंबाआईला नमस्कार करत सर्वोच्च न्यायालयातल्या बाकांवर गर्दी करून बसायला सुरुवात केली.

आता मुख्य न्यायमूर्तीच्या खुर्चीत बसलेल्या मुंबाआईला मी अखेर म्हणालो, ‘‘अगं मुंबाआई, आता आम्ही इथे सारे जमलो आहोत, तर सगळ्यांच्या वतीने मी तुला नमस्कार करतो आणि आभार मानतो (आता मला माझे हुंदके आवरेनात). खंडपीठातल्या इंदू मल्होत्रा या न्यायाधीशांनी तर सगळ्या देशानं आमची माफी मागितली पाहिजे, असं म्हटलं होतं. मी उठून उभा राहिलो आणि मुंबाआईच्या दिशेनं चालू लागलो. मात्र एका वेगळ्याच प्रकाशामुळं तिच्या चेहऱ्यावर दिसणारी चमक पाहून मी जागीच थबकलो.

खरंतर तोवर सारी निकालपत्रं वाचून मी थकलो होतो (अजूनही माझी ती वाचून पुरी झालेली नाहीत.) त्यामुळं मी तिला इतकंच म्हणालो, ‘‘अखेर या दयाळू न्यायाधीशांनी कलम ३७७ काढून टाकलं आहे.’’ त्यावर ती लगेच उत्तरली, ‘‘नाही, नाही. तो कायदा अजून अस्तित्वात आहे. कारण या देशातले काही मूर्ख भारतीय प्राण्यांवरदेखील लैंगिक अत्याचार करण्याचं सोडत नाहीत. त्यामुळं तो अजूनही जरुरीचा आहे. मात्र आता तो कायदा तुम्हा समलिंगींना लागू होणार नाही, कारण मी न्यायालयाला सांगितलेलं आहे – सरकारला कुणाच्याच खासगी आयुष्यात दखल देण्याचा हक्क नाही.’’ त्यावर प्रश्न विचारायला मी अगदी अधीर झालेलो होतो : ‘‘खरंच? पण लोक तर आम्हाला म्हणजे समलिंगी व्यक्तींना आणि तृतीयपंथी व्यक्तींना बागांमध्ये, रेल्वे प्लॅटफॉर्मवर किंवा अन्य कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी मारहाण करत असत. आता ती कोण थांबवणार?’’

‘‘तूच.’’ ती खणखणीत आवाजात म्हणाली. ‘‘ब्रिटिशांनी केलेल्या या जुलमी कायद्यातला विखारीपणा मी त्यांना काढून टाकायला सांगितलेला आहे खरा, पण जे लोक या कायद्याचा दुरुपयोग करत आहेत त्यांच्याशी लढण्याचं काम मात्र तुम्हालाच करावं लागेल.’’ न्यायालयात जमलेल्या लोकांच्या गर्दीवरून आपली नजर फिरवत ती म्हणाली. आता मात्र मी तिच्यावर जरा रागावलेलो होतो. ‘‘मग मुंबाआई, तुझ्या आशीर्वादाचा आम्हाला उपयोग तरी काय?’’

मुंबाआई गडगडाटी आवाजात उत्तरली, ‘‘हे बघ, माझ्या प्रत्येक मुलानं मुंबई शहराबाबत आपापलं कर्तव्य निभावलं पाहिजे. माझ्या शहराला कशा प्रकारे वागवलं जात आहे, हे मला दिसत नाही असं तुम्हा लोकांना वाटतं का? पण याचा अर्थ असा नव्हे, की तुम्ही केवळ शांतपणे बसून राहायचं आणि जे कायद्याचा दुरुपयोग करत आहेत त्या गोष्टी निमूटपणे बघत राहायच्या.’’ मग हळुवारपणे ती म्हणाली, ‘‘मी तुम्हाला गेली २५ वर्ष ‘हमसफर ट्रस्ट’ रुजवण्यासाठी दिलेली होती. आता मुंबईतल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी ‘हमसफर’कडे पुरेशी सेना आहे. आता जे लोक कायद्याचा गैरवापर करत आहेत त्यांच्याविरुद्ध या साऱ्या मुलांना प्रशिक्षण देऊन शिस्तबद्ध पद्धतीनं काम करण्याची गरज आहे,’’ तिनं आपल्या मधुर आवाजात जणू गुरुमंत्रच दिला.

‘‘पण मी हे करू तरी कसं?’’ काही न सुचून मी मुंबाआईला विनवलं. ती उत्तरली, ‘‘या सगळ्या खंडपीठांच्या निकालांचा अभ्यास कर. माझ्या दुसऱ्या एका पुत्रानं भारताला दिलेल्या अनमोल भेटीचा म्हणजे भारतीय घटनेचा आदर करण्यासाठीच ही निकालपत्रं दिली गेलेली आहेत. हा माझा कर्तबगार पुत्र म्हणजे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर. कितीही अन्याय झाला, तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं घर दादरमधल्या हिंदू कॉलनीमध्येच बांधलं होतं. या देशातल्या दुर्बळातल्या दुर्बळ नागरिकाला समतेनं आणि आदरानं वागणूक मिळेल, अशा प्रकारे त्यांनी देशाची घटना लिहिली आहे. तू त्यांचाच आदर्श समोर ठेव. ते ज्या जातीत जन्मले त्याचा त्यांनी मनात कधी कडवटपणा बाळगला नाही. आपल्या लोकांना शिकवण्यासाठी त्यांनी नेहमीच लढा दिला. नेहमी समता, न्याय यांच्यासाठी आणि माणसांमधल्या बंधुभावाचाच त्यांनी आग्रह धरला होता. होणाऱ्या त्रासाला भिऊन जाऊन त्यांनी कधीच परकीय धर्म स्वीकारला नाही. निजामानं त्यांना धर्मातर करण्यासाठी सहा कोटी रुपये देऊ केले होते. त्या वेळी नुकतंच नाशिक इथल्या काळूराम मंदिरात त्यांची शूद्र म्हणून हेटाळणी करून त्यांना अपमानित करण्यात आलं होतं, तरीदेखील

डॉ. आंबेडकरांनी असा विचार केला नाही. असं ठाम राहायला धाडस लागतं. त्यांनी गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर मंद होऊ पाहणारा ज्ञानाचा दीप हाती घेतला आणि बौद्ध धर्माचा मार्ग स्वीकारला.’’

मुंबाआई अगदी कठोरपणे बोलत होती. ‘‘माझ्या या मुलाला मी सातासमुद्रापार पाठवलं आणि हाच खऱ्या अर्थानं माझा सर्वात सु-शिक्षित मुलगा ठरला. ज्या ज्या विद्यापीठात तो शिकायला गेला, तेथे तेथे तो अव्वल श्रेणीत आला. माझा हा पुत्र कुठल्या सुखवस्तू पाश्र्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेला नव्हता, तर अगदी गरिबातल्या गरीब घरातूनच आलेला होता. पण दुर्दैवानं काही प्रस्थापित लोकांनी त्याला या भारतावर राज्य करू दिलं नाही. त्यामुळंच मी तुला या पुत्राचा आदर्श समोर ठेवून तुझ्या लोकांचं नेतृत्व कर, असं सांगते आहे.’’

ही सारी निकालपत्रं देताना त्यांत

डॉ. आंबेडकरांच्या समतेच्या दृष्टिकोनाबाबतचा आदर्श समोर असलेला पाहून मी चकितच झालो. प्राचीन पुराणं, बायबल किंवा कुराण यांसारख्या पवित्र ग्रंथांमधल्या नैतिकतेबद्दल कोर्टाचे हे निकाल बोलत नाहीत, तर कायद्यासमोर भारतातल्या प्रत्येक नागरिकाला समानतेनं वागवलं जावं, हे सांगणाऱ्या आधुनिक ग्रंथाचा म्हणजे भारतीय राज्यघटनेचा या निकालपत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. प्रत्येकाला आपलं व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, (इतरांना त्रास न होईल अशा प्रकारे) प्रत्येकाला आपल्याला हवं तसं जीवन जगण्याची मुभा आहे, हे इथं अधोरेखित केलेलं आहे. न्यायमूर्तीनी इथं ‘घटनात्मक नैतिकतेचा’ उल्लेख केलेला आहे. विशेष म्हणजे तो गौतम बुद्धानं मांडलेल्या धर्माच्या संकल्पनेशी अगदी मिळताजुळता आहे. अगदी गरिबातल्या गरीब आणि दुर्दैवी माणसालादेखील धर्माचं चक्र फिरवून ज्ञान आणि संघटन यांद्वारे मुक्ती मिळवण्याचा हक्कआहे.

त्यामध्ये म्हटलं आहे – धर्ममं शरणं गच्छामि. संघम् शरणं गच्छामि. (धर्माचा आश्रय घ्या, कारण धर्म तुम्हाला मुक्त करेल. संघटित व्हा. एकत्र येणंच तुमचं संरक्षण करेल.)

‘‘अशोक, ही सारी निकालपत्रं काळजीपूर्वक वाच. आणि तू त्यांचा वापर भविष्यातल्या कामांसाठी योग्य प्रकारे करशील, हे मला ठाऊक आहे. खरं कठीण काम तर आता सुरू होत आहे,’’ मुंबादेवीनं फर्मावलं. मी माझ्या आजूबाजूला पाहिलं. भोवताली असणाऱ्या तृतीयपंथी लोकांच्या आणि आपली नखं रंगवलेल्या आणि लांब केस बांधलेल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा निर्धार मला स्पष्टपणे दिसला. केवळ समलिंगी किंवा तृतीयपंथी आहेत म्हणून मारहाण सोसावी लागणाऱ्या सज्जन पुरुषांचे चेहरेदेखील मी तेव्हा पाहिले. या प्रत्येकाच्या चेहऱ्याच्या जागी मला माझाच चेहरा दिसत होता. हे सारे चेहरे वेदना, त्रास आणि शोषण यांच्या खुणा दाखवत होते. आमच्या प्राणप्रिय मुंबई शहरातल्या या अन्यायग्रस्त शरीरांना घामाचा आणि चिखलाचा वास येत होता. मी माझं रडणं थोपवू शकलो नाही. जसजसे परलोकातून आलेले हे हजारो, लाखो लोक अंतर्धान पावू लागले, तसतसा मुंबादेवीवरचा तेजस्वीपणे झळकणारा प्रकाश हळू हळू मंद होऊ लागला होता. त्यांना

आयुष्यभर लज्जा आणि त्रास यांचा सामना करावा लागलेला होता.

मी इकडंतिकडं पाहिलं, तर मुंबाआईनं एक काठी ठेवलेली दिसली! ती चालताना वापरण्यासाठीची एक छानशी काठी होती. मला वाटतं तिनं आपल्या हाती धारण केलेला तो धर्मदंडच असावा. ती तो इथेच विसरली होती. मी तिला परत द्यायला बाहेरच्या दिशेने धावलो. पण मला ती कुठंच दिसली नाही. आता दिसत होती ती केवळ चिखलात उमटलेली तिची पदचिन्हं. पावसाची पर्वा न करता ती धावत धावत मला भेटायला आलेली होती.

हे मुंबाआई, कितीही वादळ आणि विजांचा कडकडाट असो, तू मला दिलेलं वचन अखेर पाळलं होतंस!

अनुवाद – सुश्रुत कुलकर्णी

rowkavi@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व लिंगभेद भ्रम अमंगळ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hamsafar trust responsibility to protect lgbt community
First published on: 22-09-2018 at 01:01 IST