अमेरिकेमधे २०व्या शतकाच्या मध्यात समलिंगी व्यक्तींवरचा पहिला खरा शास्त्रशुद्ध अभ्यास अल्फ्रेड किन्सी या शास्त्रज्ञानं केला. संशोधनाअखेर किन्सीनं रॉकफेलर फाऊंडेशनच्या हाती जणू एक टाइम बॉम्बच ठेवला होता. या संशोधनासाठी तब्बल ५,००० पुरुषांची लैंगिक वर्तनाबाबत सखोल चिकित्सा करण्यात आली होती. पुढे या अभ्यासाबाबत अनेक वाद-वादंग निर्माण असले, तरी तो पूर्णत: कधीच रद्दबातल ठरवला गेला नाही, की कधीच दुर्लक्षितही होऊ शकला नाही.

आमच्या समूहाच्या अंधारातल्या, मर्यादित असलेल्या जगातून आम्ही एकदम प्रकाशझोतात कसे आलो, याबद्दल मी जरा सांगतो. १९व्या शतकाच्या उत्तरार्धाच्या दरम्यान बर्लिन, पॅरिस, लंडन आणि अ‍ॅमस्टरडॅम या शहरांमध्ये समलैंगिकांचे असे अनेक गट दिसू लागल्यावर युरोपमधल्या लोकांनाही असाच धक्का बसलेला होता. ऑस्कर वाइल्डमुळं असे गट लंडनमध्ये ‘मॉली कल्चर’ या नावानं प्रसिद्ध झालेले होते. या साऱ्या एकत्र येणाऱ्या पुरुषांचा मुख्य उद्देश सुरक्षितता मिळवणं हा तर होताच, पण त्यासोबतच ‘पुरुषांचे अन्य पुरुषांशी शारीरिक संबंध असणाऱ्या जगाबद्दलची माहिती’ भोवतालच्या समाजाला देणं, हा दुसरा उद्देशही होताच.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
IAS officer awanish sharan share mpsc examination preparation tip
“इतकंही कठीण नाही” UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द प्रसिद्ध IAS नं दिल्या टिप्स
Human evolution explained
विश्लेषण: केसांमधील उवांचा आणि माणसाच्या अंग झाकण्याचा काय संबंध? उत्क्रांतीचा इतिहास व नवे संशोधन काय सांगते?

हे पुरुष अगदी उत्तम प्रकारे शास्त्रीय आणि साहित्य या विषयांवर चर्चा करू शकत होते, असं सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना आढळलं. मात्र अशा लोकांना इतरांपेक्षा ‘वेगळं’ समजलं जात होतं, ते केवळ त्यांना इतर पुरुषांबद्दल असणाऱ्या लैंगिक आकर्षणामुळं. त्याकाळी चर्चकडून अशा पुरुषांची ‘सोडोमाइट्स’ आणि ‘कॅटामाइट्स’ अशी अवहेलना केली जात असे. हे दोन्हीही शब्द बायबलमधल्या उल्लेखांवर आधारित होते. सोडोम आणि गोमोरा या दोन शहरांमधले पुरुष परस्परांशी संबंध ठेवण्याचं पाप करत असल्यामुळंच ईश्वरानं त्या शहरांचा विनाश केला, असा बायबलमध्ये उल्लेख आहे. अर्थात, असे धार्मिक कायदे मोडीत काढण्यात फ्रेंच मंडळींनी पुढाकार घेतला. फ्रेंचांनी ‘कोड नेपोलियन’ ही नवी न्यायिक पद्धती अस्तित्वात आणून समलिंगी लोकांवरचा गुन्हेगारी कृत्यं करण्याबद्दलचा शिक्का पुसून टाकला आणि त्यांना मुक्तपणे जगण्याची संधी दिली. ब्रिटिश समाजात मात्र परंपरावादी ‘व्हिक्टोरिअन’ मूल्यं सांभाळण्याचा कालखंड येऊन गेला. अगदी ऑस्कर वाइल्डच्याच शब्दांत सांगायचं झालं, तर असे पुरुष ‘नाव न उच्चारण्याजोगं कृत्य’ करत असत. त्याबद्दल त्यांना शिक्षा दिल्या जात असत आणि तुरुंगातही डांबलं जात असे. पण लवकरच बदलाचे वारे वाहू लागलेले होते.

अन्य एखाद्या प्राण्याच्या वर्तनाचा अभ्यास करावा, अगदी अशाच प्रकारे युरोपातील सामाजिक शास्त्रज्ञांनी मानव प्राण्याच्या लैंगिक वर्तनाचा अगदी शास्त्रशुद्धपणे अभ्यास करायला सुरुवात केली. प्रत्येक समाजामध्ये ‘अशा’ स्त्री-पुरुषांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे, असं त्यांना आढळून आलं. यामधे हॅरलॉक एलिस या समाजशास्त्रज्ञाचं विस्तृत अभ्यास करण्याबद्दलचं योगदान पहिलं मानावं लागेल. मानव प्राण्यामधील लैंगिक वर्तनाचा अभ्यास करून त्यानं ‘लैंगिकतेचे मानसशास्त्र’ या विषयावर एक अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले. अर्थात खुद्द हॅवलॉक एलिसचं वैयक्तिक आयुष्यही वादळीच होतं. एलिसनं आपल्या पुस्तकात ‘अशा’ व्यक्तींना विशिष्ट संज्ञा देण्याचा प्रयत्न केला होता खरा, पण तो अयशस्वी ठरला. या ग्रंथाच्या दोन खंडातल्या १,०००हून अधिक पानात तुम्हाला अगदी एकदादेखील ‘समलिंगी’ (होमोसेक्शुअल) असा शब्द आढळणार नाही. याचं कारण म्हणजे या संज्ञेची उत्पत्तीच मुळात १८८९ पर्यंत झालेली नव्हती. १८८९मधे एका ऑस्ट्रियन वैद्यकीय मानसशास्त्रज्ञानं ‘होमोसेक्शुअल’ हा शब्द तयार केला. ज्या स्त्री किंवा पुरुषांना आपल्याच लिंगाच्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटतं, त्यामुळं उत्तेजना प्राप्त होते आणि त्यांच्याशी शारीरिक संबंधही असतात, अशा व्यक्तींसाठी ही संज्ञा वापरण्यात आलेली होती. होमो  या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे ‘एकसारखे’. त्याला ‘सेक्शुअल’ हा शब्द जोडून या शास्त्रज्ञानं त्यांच्या लैंगिक वर्तनाची व्याख्या केलेली आहे. म्हणजेच हे दोन वेगवेगळे शब्द मिळून हा शब्द बनलेला आहे.

दरम्यान जर्मनमध्ये, मॅगनीस हर्शफिल्ड या दुसऱ्या समाजशास्त्रज्ञानं विसाव्या शतकाच्या सुरुवातीला चर्चमधल्या नोंदींचा धांडोळा घेतला. नियमितपणे चर्चला उपस्थित राहणाऱ्यांमध्ये ‘अशा’ किती लोकांचा समावेश आहे, याबद्दल त्यानं तिथल्या पाद्रींकडे पृच्छा केली. या संशोधनात आकडेवारी सगळीकडेच साधारण सारखी होती. बहुसंख्य चर्चमध्ये येणाऱ्या लोकांत ‘अशा’ लोकांचं दोन ते तीन टक्के इतकं प्रमाण होतं. हर्शफिल्डनं अनेक सर्वेक्षणं केली. त्यामधे अशा समाजघटकांचा आकडा छोटा असला, तरी तो लक्षणीय होता असं आढळून आलं. पुढं हिटलर आणि नाझींनी हर्श फिल्डची लायब्ररी जाळून टाकली.

अशा प्रकारे समलिंगी व्यक्ती आपल्या गुप्त, खासगी जगातून बाहेर येऊन आता एकदम समाजाच्या दृष्टीत आल्या. याबद्दल त्या वेळी फ्रेंच तत्त्वज्ञ मिशेल फॉकल्टनं धोक्याची सूचना दिलेली होती. आपल्या समाजाला विशिष्ट व्यक्तींसाठी वैद्यकीय उपचार आणि अनैसर्गिकता याबद्दल ‘उपाययोजना करावी लागेल’, असं त्यानं म्हटलं होतं. त्यामुळं समलिंगी व्यक्तींसाठी एका नव्या प्रकारच्या छळवादाचा प्रारंभ झाला. तो म्हणजे – त्यांच्यामधे सुयोग्य बदल करणं आणि त्यांना देशाचे आदर्श, गुणी नागरिक बनवणं.

या छळामध्ये इटालियन लोक आघाडीवर होते. मेंदूमध्ये असणाऱ्या ‘होर्मोन्स’ किंवा स्रावांमधे बिघाड झाल्यामुळं लोक समलिंगी होतात, अशी तिथल्या मानसशास्त्रज्ञांनी कारणमीमांसा केली. जर तुम्ही एखाद्या ‘नॉर्मल’ माणसासारखे दिसत असाल आणि तरीसुद्धा तुम्हाला दुसऱ्या पुरुषांबद्दल प्रेम वाटत असेल, तर नक्कीच तुमच्या ‘हार्मोन्स’मध्ये बिघाड असणार. तो ‘दुरुस्त करण्यासाठी’ अशा व्यक्तींना पुरुषांच्या शरीरात असणारी हार्मोन्स देण्याची गरज आहे, असा. पण याचा बरोबर उलटाच परिणाम झाला. यामुळं त्या रुग्णाच्या अन्य पुरुषांबाबतच्या लैंगिक भावना कमी होण्याऐवजी त्यांचं समलिंगी वर्तन अधिकच वाढलं. त्यांची अन्य पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा अधिक तीव्रतेनं वाढली. त्यामुळं त्यांच्या मूळ ‘आवडीमध्ये’ काहीच फरक पडला नाही. आपण तुलनेसाठी एक उदाहरण बघू या. समजा एखादं मूल डावखुरं असेल आणि त्यानं उजव्या हातानं लिहावं अशी तुमची इच्छा असेल, तर त्या मुलाच्या मेंदूत कमी असणारं रसायन टोचलं, की त्याचा डावखुरेपणा बंद होईल अशा धर्तीची ही कल्पना होती. पण असं रसायन टोचल्यावर ते मूल डाव्या हातानंच अधिकाधिक चांगलं लिहू लागलं तर? ते उजव्या हाताचा वापर अजिबातच करेनासं झालं तर? समलिंगी व्यक्तींना पुरुषांची होर्मोन्स टोचल्यावर नेमकं हेच झालं.

अशा अनेक फसलेल्या प्रयोगांनंतर समाजशास्त्रज्ञांनी ठरवलं, की हा प्रश्न मनाशी निगडित असणार. मग याची चिकित्सा सायकियाट्री म्हणजे मनोविकारशास्त्राद्वारे करण्यात आली. मेंदूच्या मुख्य कार्याचा, म्हणजेच त्यात खोलवर असणाऱ्या ‘मन’ या गोष्टीचं काम कसं चालतं, याचा अभ्यास आणि पृथक्करण करणारी शाखा म्हणजे सायकियाट्री ऊर्फ मनोविकार शास्त्र. तरुण मुलांच्या आयुष्यात जर आग्रही व्यक्तिमत्त्व असणाऱ्या स्त्रिया (मदर फिगर्स) जर असतील, तर त्यांचं आपल्या वडिलांबद्दलचं आकर्षण वाढतं आणि ते आपल्या आयांपासून दूर होतात, असं या विषयातल्या शास्त्रज्ञांचं मत पडलं. अशा अनेक खुळचट संशोधनांमुळं आणि प्रयोगांमुळं अखेर हा ‘प्रश्न’ सुटलाच नाही. कारण मुळात तो प्रश्न नव्हताच, हे पुढच्या अभ्यासातून लक्षात आलं.

अमेरिकेमध्ये २०व्या शतकाच्या मध्यात (१९५०च्या दशकात) समलिंगी व्यक्तींवरचा पहिला खरा शास्त्रशुद्ध अभ्यास झाला. हा अभ्यास अल्फ्रेड किन्सी या शास्त्रज्ञानं केला होता. किन्सी खरं तर एक कीटकशास्त्रज्ञ होता. अमेरिकेतल्या विख्यात रॉकफेलर फाऊंडेशननं त्याला या संशोधन प्रकल्पासाठी आर्थिक मदत केली होती. संशोधनाअखेर किन्सीनं रॉकफेलर फाऊंडेशनच्या हाती जणू एक टाइम बॉम्बच ठेवला होता. किन्सीच्या या अभ्यासाचं शीर्षक होतं, ‘अमेरिकन पुरुषांचे लैंगिक वर्तन’. या अभ्यासात जरी काही त्रुटी असल्या, तरी हा पुरुषांबाबतचा पहिला शास्त्रशुद्ध अभ्यास होता. या संशोधनासाठी तब्बल ५,००० पुरुषांची लैंगिक वर्तनाबाबत सखोल चिकित्सा करण्यात आली होती. पुढं या अभ्यासाबाबत अनेक वाद-वादंग निर्माण झाले असले, तरी तो पूर्णत: कधीच रद्दबातल ठरवला गेला नाही, की कधीच दुर्लक्षितही होऊ शकला नाही.

किन्सीच्या अभ्यासात असं म्हटलं होतं, की लोकसंख्येमधील लैंगिकदृष्टय़ा सक्षम वयोगटातील पाच टक्के लोक समलिंगी संबंध ठेवणारे असतात, असं खात्रीशीरपणे म्हणता येतं. शिवाय सर्व पुरुषांमधील सुमारे वीस टक्के पुरुष त्यांच्या प्रौढ जीवनामध्ये निदान १५ वर्षे तरी कुठल्या ना कुठल्या प्रकारचं समलिंगी वर्तन दर्शवतात. हे निष्कर्ष इतके धक्कादायक होते, की ते स्वीकारण्याऐवजी पुराणमतवादी लोकांनी किन्सीची भरपूर बदनामी केली आणि वर खिल्लीही उडवली. खास करून चर्च आणि त्या संबंधित मुखपत्रं याबाबतीत आघाडीवर होती. रॉकफेलर फाऊंडेशननं किन्सीच्या पुढच्या संशोधनासाठीची आपली आर्थिक मदत रद्द केली. आयुष्याची अखेर होईपर्यंत किन्सीच्या मनात या गोष्टीचा विखार राहिला. काही झालं तरी शेवटपर्यंत त्यानं आपलं संशोधन मागं घेतलं नाही. पुढं त्याच्या विद्यार्थ्यांनी हे मोलाचं काम पुढं नेलं. अजूनही अमेरिकेमधील ब्लूमिंगडेल इथल्या आयोवा विद्यापीठातमधल्या इन्स्टिटय़ूट ऑफ सेक्शुअ‍ॅलिटीमध्ये हे सारं संशोधन उपलब्ध आहे.

अल्फ्रेड किन्सीचं हे संशोधन केवळ मानसशास्त्र किंवा वैद्यकशास्त्र या शाखांतच नव्हे, तर जाहिरात व्यवसाय, सामाजिक अभ्यास इतकंच काय निवडणुकींच्या तंत्रात बदल घडवून आणणारं ठरलं. कसं ते पाहू या पुढील लेखात!

अशोक रावकवी

भाषांतर – सुश्रुत कुलकर्णी

chaturang@expressindia.com

chaturang@expressindia.com