|| अशोक रावकवी

६ सप्टेंबर २०१८ च्या निकालानंतर मिळालेल्या स्वातंत्र्याच्या आनंदोत्सवाचा ज्वर आता काहीसा ओसरू लागलेला आहे. एलजीबीटी समुदायाच्या सध्याच्या प्रतिक्रियांमुळं आमच्या या समुदायाला भविष्यात कोणत्या प्रकारच्या आरोग्याच्या धोक्याला सामोरं जावं लागेल, याची मला मोठीच चिंता लागून राहिलेली आहे.

गेली शेकडो वर्ष या समुदायातल्या लोकांवर गुन्हेगार असल्याचा शिक्का जन्मत:च बसलेला असल्यानं त्याची मोठीच किंमत त्यांना चुकवावी लागलेली आहे. सामान्यत: एलजीबीटी समुदायातल्या जवळजवळ सगळ्याच जणांना कुठल्या ना कुठल्या मानसिक आजाराला सामोरं जावं लागतं. समिलगी स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये औदासीन्याचा म्हणजे डिप्रेशनचा विकार मोठय़ा प्रमाणावर दिसून येतो, तर तृतीयपंथी व्यक्तींमध्ये मद्यपानाचं प्रमाण मोठय़ा प्रमाणावर दिसून येतं. यासाठी आपल्याला अमेरिकेतली आकडेवारी तपासावी लागेल. याचं कारण भारतात अजून अशी आकडेवारी अधिकृतरीत्या उपलब्ध झालेली नाही. अन्य तरुणांपेक्षा अमेरिकेमध्ये एलजीबीटी समुदायातील तरुणांनी आत्महत्या करण्याची शक्यता तब्बल २०पट जास्त असते. भारतात हा आकडा निश्चितच याहून कमी नसणार, कारण पाश्चिमात्य देशांपेक्षा ‘लग्न करून सेटल होण्याचं’ दडपण आपल्या देशात मोठय़ा प्रमाणावर असतं. समिलगी स्त्रियांवरही पुरुषांशी लग्न करण्याची सक्ती केली जाते आणि समिलगी पुरुष कोणतीही पूर्वकल्पना न देता स्त्रियांशी लग्न करतात. यामुळे त्यांना होणारा औदासीन्याचा आजार हा एक सार्वकालिक प्रश्न होऊन बसतो.

असा मानसिक आजार औषधोपचारांनी जरी बरा होऊ शकत असला, तरी त्याचं रूपांतर दुर्वर्तनात होऊ शकतं. असं वर्तन निश्चितच धोकादायक आणि सर्वनाशाकडं घेऊन जाणारं असतं. एलजीबीटी समुदायातल्या व्यक्तींमध्ये दारू आणि ड्रग्ज यांचं व्यसन सर्रास आढळतं. अशा स्व-विनाशी वर्तनामुळे समिलगी पुरुषांना एचआयव्ही/एडस् किंवा अन्य संसर्गजन्य लैंगिक आजार होण्याचा धोका इतरांपेक्षा सुमारे १२पट जास्त असतो. तृतीयपंथी व्यक्तींना असंवेदनशील सामाजिक परिस्थितीमुळं दारिद्रय़ाचा सामना करायला लागतो. अनेकदा त्यांच्यासमोर देहविक्रय करण्याखेरीज कोणताही पर्याय उरत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्येही अशा आजारांचं प्रमाण मोठं असतं. आता तर देशातल्या महामार्गावरील  वेश्याव्यवसाय तृतीयपंथी व्यक्तींच्या हातातच गेलेला आढळतो. केवळ अशा व्यक्तीच महामार्गावर असणाऱ्या गुंडांना, पोलिसांना तोंड देऊ शकतात, ते मोठय़ा प्रमाणावर करत असलेल्या लैंगिक हिंसाचाराला सामोरं जाऊ शकतात.

आपल्या देशातल्या सर्व मोठय़ा शहरांमध्ये समिलगी पुरुषांना एचआयव्हीची मोठय़ा प्रमाणावर लागण झालेली आहे, मात्र या गोष्टीबाबत प्रचंड गोपनीयता बाळगली जाते. मुंबादेवीच्या या महानगरीत समिलगी पुरुषांमध्ये एचआयव्हीचं प्रमाण १० टक्क्यांहून अधिक आहे. याचाच अर्थ प्रत्येक दहा समिलगी पुरुषांमधल्या एकाला एचआयव्हीची बाधा झाली आहे. ही गोष्ट एक तर त्याला ठाऊक नाही किंवा त्याची तो फिकीर करत नाही. जर अशा बाधित समिलगी पुरुषांनी स्त्रियांशी लग्न केलेलं असेल, तर ते आपली पत्नी आणि अन्य स्त्री जोडीदारांमध्येही एड्सचा प्रसार करू शकतात.

एक दशकापूर्वी राष्ट्रीय एडस् नियंत्रण संस्थेच्या म्हणजे नॅकोच्या पहिल्या काही संचालकांपकी एक असणाऱ्या प्रसाद राव यांनी आशियामधल्या एचआयव्ही प्रसारावर एक पुस्तक लिहिलेलं होतं. त्या वेळी त्यांनी भारतामध्ये या आजाराचा प्रसार होण्याचं प्रमुख कारण समिलगी आणि बायसेक्शुअल पुरुष असतील असं म्हटलेलं होतं. आपल्या एकंदर लोकसंख्येचा विचार केला तर लैंगिकदृष्टय़ा सक्षम असणाऱ्या पुरुषांच्या वयोगटात ही संख्या तब्बल ३.२ ते ३.८ कोटी पुरुष एवढी होते. देशाच्या लोकसंख्येमधला हा आकडा खूप मोठा आहे. जर एखाद्या समाजात पाच टक्क्यांहून अधिक लोकांना कुठल्याही रोगाची लागण झाली, तर आरोग्यशास्त्राच्या व्याख्येनुसार तिचं वर्णन ‘नियंत्रणाबाहेर गेलेली रोगाची साथ,’ असं केलं जातं. इथं अशा संसर्गाचं प्रमाण दुप्पट असूनही शासनाला त्याची काही तमा नाही, असंच दिसतं आहे.

माझ्या अनुभवानुसार खरं तर दिल्लीत या संदर्भात झालेल्या केंद्रीय पातळीवरच्या प्रत्येक बठकीत ते, ‘आम्ही अशा पुरुषांची लोकसंख्या नियंत्रणाखाली आणलेली आहे,’ ही निर्थक गोष्ट पुन:पुन्हा सांगत असतात. खरं तर वास्तवाच्या हे अगदी उलट आहे. प्रत्यक्षात समिलगी व्यक्तींबाबत असणाऱ्या तिरस्कारामुळे अशा प्रकारे त्यांच्याकडे दुर्लक्षच केलं जात असतं. आज सरकार असो की सामान्यजन, आपल्या लोकसंख्येतले ३० लाखांहून अधिक पुरुष आजारी आहेत व योग्य उपचार व औषधं यांच्या अभावामुळं ते काम करू शकत नाहीत, आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकत नाहीत, याची कुणाला म्हणजे कुणालाही काळजी नाही.

समिलगी स्त्रियांसाठी तर आवडीनुसार जगणं हा जणू जीवनमृत्यूचाच प्रश्न होतो. जसजसं पुरुषांशी लग्न करण्याबद्दल त्यांच्यावर दडपण वाढत जातं, त्या जिवावर उदार होऊन घरातून पळून जातात. भविष्यातल्या उपजीविकेसाठी आपली शैक्षणिक प्रमाणपत्रं सोबत घेण्याचंही भानही त्यांना राहिलेलं नसतं. भारतामध्ये समिलगी स्त्रियांच्या जोडप्यानं आत्महत्या करण्याचं प्रमाण फार मोठं आहे. आपल्या जोडीदाराशी लग्न करण्याबाबत त्या पुरुषांहून अधिक धाडसी असतात आणि आत्महत्येसारखं टोकाचं पाऊलही त्या उचलू शकतात. आपल्यासारखाच त्यांनाही जगण्याचा हक्क असल्यामुळं हे सारं थांबवलं गेलं पाहिजे.

तृतीयपंथी व्यक्तींच्या आयुष्याचा मार्ग मात्र तसा ठरलेला असतो. ते घरातून पळून जातात आणि तृतीयपंथींच्या घराण्यांमध्ये सामील होतात. आपल्या समुदायाच्या स्थितीबद्दल इंटरनेटवर व्यक्त होण्याचं व स्वयंसेवी संस्थांमध्ये सामील होण्याचं तृतीयपंथी व्यक्तींचं प्रमाण मोठं आहे, हे आणखी विशेष. मुंबईसारख्या शहरांमध्ये ‘हमसफर’, ‘चारचौघी’, ‘अस्तित्व’ यांसारख्या संस्था त्यांना प्राथमिक बाबतीत तरी साहाय्य करतात. तरीसुद्धा स्वत:चं घर शोधण्यापूर्वी आणि काम मिळवण्यापूर्वी राहण्यासाठी कोणतीच वसतिगृहाची किंवा तात्पुरत्या घराची सोय त्यांच्यासाठी उपलब्ध नसते.

आज बॉलीवूडमध्ये अनेक तृतीयपंथी व्यक्ती चांगलं काम करत आहेत. या उदाहरणापकी एक उत्तम उदाहरण म्हणजे गजल धालीवाल, अतिशय सुंदर कथा लिहिते. सत्या नायपॉल हे तंत्रज्ञ उत्तम छायाचित्रकार म्हणून ओळखले जातात. अनेक जण रंगभूमी आणि अन्य प्रसारमाध्यमांमध्येही काम करत असतात. आपल्या अवतीभोवती अशा व्यक्ती दिसणं तसं कठीण नाही, पण त्यांना परिस्थितीशी किती तीव्र झगडा करावा लागतो, याची त्यांच्या जीवनकहाणी मात्र आपल्यापर्यंत कधीच पोचत नाही. त्यासाठी तुम्ही ‘रेवती’ ही कथा वाचली पाहिजे. रेवतीला स्वत:च्या घरी जाणं हासुद्धा छळ वाटत असे, कारण वडिलांनी तिला स्त्रीवेषात घरी यायला मनाई केलेली होती. जेव्हा तिचे आई-बाबा अगदी गंभीर आजारी होते, तेव्हाही त्यांना भेटण्याआधी तिला स्वत:चे केस बारीक कापावे लागले, नंतर एका हॉटेलात जाऊन कपडे बदलून पुरुषांसारखा पँट-शर्ट परिधान करून मगच आई-वडिलांची भेट तिला घेता आली.

आमच्या संस्थेत काम करणाऱ्या अनेक तृतीयपंथी व्यक्तींना स्वत:च्या घरी जाण्याची इच्छा नसते, हे मला चांगलंच ठाऊक आहे. माझ्या मानसकन्येला, गौरी सावंतला तिच्या वडिलांनी आजही स्वीकारलेलं नाही. एकदा तर ती बसस्टॉपवर उभी होती आणि तिचे वडील त्यांच्या कारमधून चालले होते. मात्र रस्त्यात त्यांनी तिला न पाहिल्यासारखं केलं आणि नजर दुसरीकडं वळवली. जर तुमचे स्वत:चे आई-वडील जवळून जाताना तुमची नुसती दखलही घेत नसतील, तर ते आयुष्य कसं असेल? पण अखेर आयुष्य असंच असतं खरं!

जे पुरुष ‘बायसेक्शुअल’ असतात, त्यांच्या पत्नीला आपला पती आणि मुलांना आपले वडील नेमके कसे आहेत, हेच कळत नसतं. आपल्या पुरुष प्रियकरांची स्वत:च्या कुटुंबाशी ओळख करून देणारे काही बायसेक्शुअल पुरुषही मला ठाऊक आहेत. पण अर्थातच ही परिस्थिती क्वचितच आनंदी असते. पत्नीला नेहमीच आपल्या पतीच्या आयुष्यात कोण महत्त्वाचं आहे, याचं त्याच्याकडून पक्कं स्पष्टीकरण हवं असतं : पत्नी-मुलं की पुरुष प्रियकर. क्वचित जर पत्नीला पतीचा हा नवा पुरुष मित्र आपल्या मुलांसाठी आणखी एक पालक होऊ शकतो, असं वाटलं तर मग त्यांचे संबंध दृढ होतात. अशा प्रकारे अनेक समिलगी पुरुषांनी स्वत:च्या कुटुंबाखेरीज अन्य कुटुंबांतही चांगल्या प्रकारे प्रवेश केलेला आहे.

अमेरिकेला दिलेल्या मागच्या भेटीत, मी तिथं नव्याच प्रकारची कुटुंब व्यवस्था उदयाला येताना पाहिली. दोन स्त्रियांनी आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून अन्य दोन समिलगी पुरुषांच्या साहाय्यानं कृत्रिम गर्भधारणा करून घेतली. हा समिलगी पुरुष आणि त्याचा जोडीदार अशा प्रकारे बाप बनले. त्यांनी ही जबाबदारी अगदी गांभीर्यानं निभावली. या दोन्हीही स्त्रियांनी आपल्या मुलांची देखभाल करण्याकरिता त्यांना कायदेशीर हक्कही दिले होते. अशा प्रकारे या दोन मुलांना दोन आया आणि दोन वडील मिळाले, हे एक नव्याच प्रकारचं कुटुंब आहे. अनेकदा समिलगी पुरुष तरुण समिलगी विद्यार्थ्यांना आयुष्यात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावताना दिसतात. सातारा इथल्या मराठी शेतकरी कुटुंबातला मुलगा माझा मानसपुत्र आहे. त्याच्या कर्मठ वडिलांनी त्याला घराबाहेर हाकलून दिलं होतं. तो संस्कृत आणि मोडी या भाषांचा अभ्यास करणारा एक हुशार विद्यार्थी आहे. सध्या तो मराठय़ांच्या इतिहासावर संशोधन करतो आहे. त्याला जरी पुरेशी शिष्यवृत्ती मिळत असली, तरी माझी पूर्वपरवानगी घेऊन माझ्या घरी जेवायला यायला, माझे अनुभव ऐकायला त्याला आवडतं. तो माझ्या घराची देखभालही बघतो आणि कधी कधी बठक मारून माझ्या वैयक्तिक ग्रंथालयातल्या पुस्तकांचा अभ्यास करत बसतो. वयात अंतर असलं तरी आमचं नातं अगदी मित्रत्वाचं आहे. तो माझ्यासोबत बाजारात खरेदीसाठी मदत करायला येतो, माझी बिलं भरायला मदत करतो, इतकंच नव्हे, तर एखादा सख्खा मुलगा आपल्या वडिलांना मदत करेल, अशा प्रकारे घर स्वच्छ करायलासुद्धा मदत करतो. अधूनमधून आई-वडील त्याला मोबाइलवर फोन करत असतात, पण साताऱ्याला घरी परत जाण्याचा त्याचा कोणताही इरादा नाही. आणि मला तरी याहून चांगला मुलगा कुठून मिळाला असता? गमतीनं सांगायचं तर, अन्य लोकांच्या मुलांसारखा तो माझ्याकडे पसे किंवा भेटवस्तू असं काही कधीच मागत नाही. उलट अनेकदा तोच माझ्यासाठी काही ना काही घेऊन येत असतो. अधूनमधून आम्ही दोघं दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये नाटकं बघायलादेखील जात असतो.

हे इतकं विस्तारानं सांगायचं कारण म्हणजे हाच मुलगा १८ महिन्यांपूर्वी आत्महत्या करणार होता, याची मी आता कल्पनादेखील करू शकत नाही. ‘त्याच्या आयुष्यात पुढं काही तरी चांगलं घडेल’ ही आशा मी निर्माण करू शकलो याचा मला खूप आनंद होतो. हा स्तंभ वाचणाऱ्या प्रत्येकानंच असं एक आयुष्य वाचवलं, तर आपला समाज खूप समृद्ध होईल. बहुसंख्य समिलगी व्यक्तींना एकटं राहून आपापल्या पद्धतीनं जीवन जगायचं असतं. वाचकहो, तुम्ही निदान आम्हाला आमच्या पद्धतीनं जगू द्याल का? आजार आणि मृत्यू यांच्या भीतीपासून मुक्त जीवन आम्हाला जगता येईल का?

वाचकहो, यावर तुमचं काय म्हणणं आहे?

rowkavi@gmail.com

chaturang@expressindia.com

अनुवाद : सुश्रुत कुलकर्णी