30 May 2020

News Flash

ऊन-पावसाचा खेळ

१९९४ मध्ये आमच्या नव्या ‘हमसफर ट्रस्ट’ची सुरुवात झाल्यानंतर आम्ही एक धाडसी पाऊल उचलायचं ठरवलं.

(संग्रहित छायाचित्र)

अशोक रावकवी

एकीकडं ‘बॉम्बे दोस्त’ आणि ‘हमसफर ट्रस्ट’चं काम प्रगतिपथावर होतं, तर दुसरीकडं माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या अडचणी संपता संपत नव्हत्या. आमच्या समुदायाला एकत्र आणण्यासाठी, खूप प्रयत्नांती मुंबई पालिकेकडून एक हक्काची जागा मिळाली, तर दुसरीकडे माझं आजारपण सांभाळण्यासाठी आईला तिच्या जरीच्या साडय़ा विकाव्या लागल्या..

माझ्या काही सहकाऱ्यांसोबत ‘हमसफर ट्रस्ट’चं काम एकीकडं चालू केलं, तरी वैयक्तिक आयुष्यात आर्थिक ओढाताण सुरूच होती. त्याच वेळी मला ‘अशोका फाऊंडेशन’कडून एक छोटी अभ्यासवृत्ती मिळाली (यात विरोधाभास असा, की सम्राट अशोकाच्या नावानं असणारी ही फाऊंडेशन प्रत्यक्षात अमेरिकेची होती.). या पैशावर मी आणि आई कसेबसे तग धरून राहिलो. मी कॅनडाला गेलो असताना माझ्या आत्याचा, प्रेमाक्काचा १९९३ मध्ये मृत्यू झाला होता. ती जाण्याआधी आम्ही मनमोकळेपणानं एकमेकांशी बोललोही होतो. एखाद्या स्त्रीशी लग्न न करण्याचा माझ्या निर्णयाचा तिला राग आला होता. ‘‘तू एकटा पडशील आणि पुढे तुझी काळजी कोण बरं घेईल अशोक? एक तर वेळेआधी जन्माला आलेलं नाजूक बाळ होतास आणि आता तर तू आणखीनच चटकन कशालाही बळी पडू शकतोस’’, ती अंथरुणाला खिळलेली असताना मला म्हणाली होती.

मरण्याआधी प्रेमाक्कानं स्वत:वर एक छोटासा मृत्यूलेखवजा मजकूरही लिहिला होता (त्यात तिची काळजी न घेणाऱ्या माझ्या सगळ्या भावांची नाव वगळलेली होती.). ‘आपण जायला तयार आहोत’ हे तिला ठाऊक असल्यानं, ज्या दिवशी ती गेली त्या दिवशी तिनं डॉक्टरांना आपल्याला स्पंजिंग करायला आणि केस विंचरायला सांगितलं होतं. ते केल्यानंतर पहाटे ५ वाजता तिचं निधन झालं. माझा आणि आईचा अपवाद वगळता बाकी सगळ्यांना तिच्या इच्छामरणाची गोष्ट ऐकून धक्काच बसला होता. आम्हाला मात्र याचं आश्चर्य वाटलं नाही, कारण प्रेमाक्का अगदी तीव्र इच्छाशक्ती असणारी स्त्री होती, हे आम्हाला नीटच ठाऊक होतं. पितृसत्ताक पद्धत असलेल्या या दुष्ट जगात वैधव्यानंतर अनेक चटके सोसूनही ती अभिमानानं जगत होती.

आम्हाला ‘बॉम्बे दोस्त’ हे देशामधील समलिंगी व्यक्तींसाठीचं पहिलं नियतकालिक सुरू करायला प्रेमाक्कानंच तिच्या साठवलेल्या पैशांतून काही रक्कम दिली होती. तिच्या आशीर्वादामुळंच आम्ही या समुदायापर्यंत पोचू शकलो. तिनंच आम्हाला एखाद्या स्वस्तातल्या ‘बिझनेस सेंटर’मध्ये जागा बघून तिथं पत्रं मिळण्याची सोय करायला सुचवलेलं होतं. पुन्हा एकदा स्त्री-शक्तीनं आम्हाला अडचणीतून बाहेर काढलं होतं. नंतरच्या आयुष्यातही मला पुन:पुन्हा या शक्तीचा प्रत्यय येत गेला. १९९४ मध्ये आमच्या नव्या ‘हमसफर ट्रस्ट’ची सुरुवात झाल्यानंतर आम्ही एक धाडसी पाऊल उचलायचं ठरवलं. आता पुढे कशाप्रकारे वाटचाल करावी, हे ठरवण्यासाठी आम्ही देशभरातल्या समलिंगी नेत्यांची मुंबईत परिषद घेण्याचं ठरवलं. आमची सगळी योजना अगदी बारकाईनं आखलेली होती. ‘बॉम्बे दोस्त’च्या वर्गणीदारांची संख्या तशी छोटी होती. त्यातल्या काही लोकांची नावं निवडून कोण इतरांशी उत्तमप्रकारे संवाद साधू शकेल आणि कोण भविष्यात नेतृत्व करू शकेल, अशा देशभरातल्या काही लोकांची नावं आम्ही निवडली. अशी आम्ही एकूण ७५ लोकांची निवड केली. त्यांना आम्ही मुंबईला परिषदेसाठी बोलावलं. विद्यापीठातल्या एका शांत ठिकाणी ही परिषद घेऊन अन्य कुणाला तिचा कसलाच त्रास होणार नाही, याची आम्ही नीट खबरदारी घेतलेली होती.

प्रत्यक्षात या परिषदेला ७५ ऐवजी ८४ प्रतिनिधी आले. वेगवेगळ्या राज्यांमधल्या अनेक पुरुषांना तिला यायचं होतं. श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांतून एकेक प्रतिनिधी आलेला होता. या परिषदेचं उद्घाटन करायला आम्ही

डॉ. सुभाष साळुंके यांना बोलावलेलं होतं. ते केवळ उद्घाटनापुरतेच आलेच नाहीत, तर त्यांनी आम्हाला एक अगदी मोलाचा सल्लाही दिला. ‘‘तुमच्या समुदायाला जागरूक करा, त्यांना एकत्र आणा आणि त्यांना एचआयव्ही/एड्स या आजाराबद्दल जागरूक करा. तो आजार प्राणघातक आहे आणि त्यावर कोणतंही औषध उपलब्ध नाही. जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर हे काम करा.’’ त्यांचा आम्हाला दिलेला हा सल्ला छोटा असला तरी अत्यंत कळकळीचा होता.

भारतातील समलिंगी व्यक्तींची ही पहिलीच परिषद होती. एसएनडीटी विद्यापीठाच्या जुहू इथल्या परिसरात ती डिसेंबर १९९४ मध्ये झाली. आशियातसुद्धा या प्रकारची ही पहिलीच परिषद असल्यानं ती ऐतिहासिक होती, असं नक्कीच म्हणता येईल. डॉ. साळुंकेंच्या उपस्थितीमुळं तिच्यावर अधिकृततेची एक मोहर उठली. त्यामुळं त्या काळात सामोऱ्या जाव्या लागत असणाऱ्या संकटांना तोंड देण्याचं धैर्य आमच्यामध्ये आलं. या परिषदेचा अहवाल अगदी आजही तितकाच उपयुक्त आहे. ‘या आजाराला अटकाव घालणारं औषध उपलब्ध होण्यापूर्वी आमच्यापैकी हजारो लोक त्यामुळं मृत्युमुखी पडतील’ असं त्यात म्हटलं होतं. आता आता म्हणजेच २१व्या शतकाच्या सुरुवातीला अँटी-रेट्रो व्हायरल (एआरटी) औषधांचा शोध लागला आहे. आज ही औषधं एचआयव्हीच्या विषाणूंशी लढू शकत असली, तरी आजवर या आजारानं कायमचं ओढून नेलेल्या माझ्या हजारो मित्रांसाठी मात्र खूप उशीर झालेला आहे.

पण मी या साऱ्यांसाठी काही करू शकत होतो का? माझ्या मुंबा-आईनं माझ्यासमोर अन्य कोणताही पर्याय शिल्लकच ठेवलेला नव्हता. मात्र तिनं मला मुंबई महापालिकेत दोन पाठीराखे मिळवून दिलेले होतेच – डॉ. अलका कारंडे आणि डॉ. जयराज ठाणेकर. त्यांनी माझ्यावरच्या लोभापोटी मला जणू आदेशच दिलेला होता – ‘‘शहरातल्या महापालिकेच्या अखत्यारीतल्या सगळ्या इमारतींचा शोध घे आणि मोकळी, वापरात नसलेली जागा किंवा नीट निगा न राखलेली जागा दिसली की आम्हाला सांग. तिथं आपण लगेच तुझं हे कार्यालय उघडू.’’

मी माझ्यासोबत राकेश मोदी नावाच्या एका तरुण समलिंगी पुरुषाला घेऊन हिंडत होतो (आता हा राकेश मोदी अमेरिकेमध्ये हॉटेल क्षेत्रातला मोठा उद्योजक म्हणून ओळखला जातो.). त्याकाळी राकेश एक धडपडणारा विद्यार्थी होता. तो सूरज मोदी या टोपणनावाने वावरत असे. राकेश आणि मी बोरिवलीपासून सुरुवात करून सगळीकडं जागा धुंडाळू लागलो. महापालिकेच्या अखत्यारीतल्या जुन्या इमारती शोधत आम्ही सगळीकडं भटकत होतो. आम्ही जिथं गेलो, तिथं आमचं धड स्वागतही होत नसे. कसं होणार? आम्ही अगदीच गचाळ आणि गबाळे दिसत असणार ना! त्या वेळी राकेश एखाद्या शेअर बाजारात सर्वस्व गमावलेल्या माणसासारखा दिसायचा आणि मी कॉलेजच्या नोकरीवरून काढून टाकलेल्या एखाद्या दीनवाण्या प्राध्यापकासारखा. आम्हाला सगळीकडून हुसकावून दिलं गेल्यावर अखेरीस आम्ही वाकोला इथल्या एका जुन्या मच्छीबाजारापाशी आलो. हा मच्छीबाजार एका महापालिकेच्या मालकीच्या जुन्या इमारतीला जोडून होता. तिथं तळमजल्यावर एक पोस्टऑफिस होतं आणि वरचे दोन मजले कुलूप लावून बंद केलेले होते. त्यापैकी पहिल्या मजल्यावर मुंबई उपनगरातल्या जन्म-मृत्यूंच्या नोंदी सांभाळून ठेवलेल्या खोल्या बंद  होत्या (त्या गेल्या १० वर्षांत कुणीही उघडलेल्या देखील नव्हत्या). दुसऱ्या मजल्यावर एका मोठय़ा हॉलला जोडलेल्या चार खोल्या होत्या. त्या जवळच्याच सांताक्रूझ (पू.) इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना राहण्यासाठी बांधलेल्या होत्या. अर्थात तिथलं छप्पर गळत असल्यानं आणि त्या सगळ्या खोल्यांमध्ये भंगार माल पडलेला असल्यामुळं कुठलाच डॉक्टर तिथं राहणं शक्यच नव्हतं. तिथल्या लादीवर कबुतरांनी केलेली घाण आणि उंदरांच्या लेंडय़ा यांचा मिळून तीनेक इंच जाडीचा थर साठलेला होता. याही खोल्या गेल्या आठ वर्षांत कुणीच उघडलेल्या नव्हत्या.

तिथं आम्हाला जागा मिळण्याची शक्यता दिसताच मी उत्साहात आलो. राकेशला मात्र ही जागा धोकादायक आणि घाण वास येणारी वाटत होती. तिथलं छपराचं प्लॅस्टर निघाल्यामुळं आतल्या लोखंडी सळ्या मुंबईच्या खाऱ्या हवेनं गंजून ते छप्पर कधीही कोसळलं असतं. शिवाय राकेश एक गुजराती, कट्टर शाकाहारी माणूस असल्यानं, त्याला माशाचा वास अगदीच नकोसा होत होता. त्याउलट मला मात्र तो काहीसा हवाहवासाच वाटत होता.

मी डॉ. ठाणेकर आणि डॉ. कारंडे यांना त्या जागेला भेट देऊन मग ती आम्हाला वापरायला देऊ करण्याची विनंती केली. भेट दिल्यावर मुंबईतल्या साऱ्या समलिंगी लोकांसोबत काम करण्यासाठी तिथली एक खोली पुरेशी आहे असं डॉ. ठाणेकरांना वाटत होतं. ‘‘सध्या तुम्ही मुंबईत एक लाख असे लोक आहेत असं म्हणताय खरं, पण आत्तातरी मला फक्त तुम्ही दोघंच इथं असलेले दिसताय,’’ त्या वेळी ठाणेकर उपरोधानं म्हणाले होते. मग ते म्हणाले, ‘‘आधी मी डॉ. कारंडेना तुम्हाला एक खोली तर द्यायला सांगतो, नंतर समाजसेवेसाठी तुम्हाला किती जास्त जागा लागते, ते आपण पाहू या.’’

अशाप्रकारे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या एका इमारतीत ‘हमसफर ट्रस्ट’ला अखेर जागा मिळाली. पण माझ्या वैयक्तिक आयुष्यात तो काळ अगदी वाईट होता. दिवसभर काम करून मी अगदी दमून जात असे. घरी परतताना पोटात प्रचंड भूक पेटलेली असायची आणि अंगात अजिबात त्राण शिल्लक नसायचं. मला मिळालेल्या ‘अशोका फाऊंडेशन’च्या त्या छोटय़ा अभ्यासवृत्तीमुळं जेमतेम दोन वेळेला चूल पेटण्याची सोय तरी व्हायची. पण आई आणि आत्या शिजवलेल्या तुटपुंज्या अन्नापैकी अगदी कमी खाऊन जास्तीत जास्त अन्न  माझ्यासाठीच शिल्लक ठेवायच्या. त्या तसं ठेवत होत्या, हे मला कुणी न सांगताही कळत होतंच. त्यामुळं मीसुद्धा अनेकदा बाहेर नुसता वडापाव खाऊन घरी परतायचो आणि त्यांना ‘‘मी मित्राच्या घरी खाल्लं आहे, मला थोडंच जेवायला असलं तरी पुरे’’, असं म्हणायचो.

त्या वेळी एकावेळी खूप साऱ्या गोष्टी घडत होत्या. एकीकडे मी समलिंगी लोकांसाठीचं आमचं ‘बॉम्बे दोस्त’ हे नियतकालिक प्रसिद्ध करण्याचा आणि त्याची माझ्या मित्रमंडळींमध्ये विक्री करण्याचा प्रयत्न करत होतो, तर दुसरीकडं वाकोला इथं ‘हमसफर ट्रस्ट’चं केंद्र सुरू करण्याचा प्रयत्नही सुरूच होता. पालिकेकडून आम्हाला वापरासाठी मिळालेल्या त्या जागेची स्थिती इतकी खराब होती की विचारता सोय नाही. तिथल्या लादीवर कबुतरं आणि उंदीर यांनी केलेली घाण तर होतीच, शिवाय मोठमोठे उंदीर आणि एक मरून पडलेलं मांजरदेखील होतं. सफाई करायला अ‍ॅसिडच्या ३५ बाटल्या वापरल्यावर कुठं खालची लादी दिसू लागली. आम्हाला मदत म्हणून काही लोकांनी जुनं फर्निचर देऊ केलं. मला पितृतुल्य असणाऱ्या विख्यात सेक्सॉलॉजिस्ट महेंद्र वत्सा (अजूनही ते एका लोकप्रिय इंग्रजी दैनिकात लैंगिक विषयावरचे तज्ज्ञ म्हणून लेखन करतात.) यांनी मला एक अँटिक सागवानी टेबल आणि खुर्ची दिली. लोकांना आम्हाला फोन करता यावा म्हणून आम्ही तिथं एक टेलिफोन लाइनदेखील मिळवली.

..आणि अखेर १९९५च्या दिवाळीच्या दिवशी ‘हमसफर ट्रस्ट’च्या कामाला तिथं सुरुवात झाली. हा ट्रस्ट आम्ही त्याअगोदर साधारण एक वर्षभरापूर्वी, म्हणजे एप्रिल १९९४ मध्ये मुंबईच्या धर्मादाय आयुक्तांकडे नोंदवलेला होता. शेवटी त्याला वाकोला इथल्या मच्छीबाजारात का होईना, एक वापरासाठी जागा तर मिळाली होती. संपूर्ण आशियामध्ये समलिंगी व्यक्तींसाठी सरकारनं देऊ  केलेली जागा असणारी केवळ आमचीच संस्था होती. अगदी जपान, थायलंड किंवा फिलिपाईन्समध्येदेखील समलिंगी व्यक्तींच्या संस्थेला आजवर सरकारी जागा मिळालेली नाही. या ट्रस्टच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या छोटय़ा ट्रस्टींच्या मंडळानं एक गोष्ट अगदी पक्की ठरवली. ती म्हणजे, ‘‘आपण नेहमी मुंबई महापालिकेच्या सोबतच काम करायचं. मुंबई महापालिका वैद्यकीयक्षेत्रात जे काम अगोदरच करते आहे, त्या स्वरूपाचं कुठलंही काम आपण त्या क्षेत्रात करायचं नाही. मुंबई महापालिका आमची माई-बाप होती आणि आम्हीही पालिकेला आमच्या आरोग्यासाठी आणि मुंबईत जगण्यासाठी नेमानं कर भरतच होतो. त्यामुळं मुंबा-आई आणि मुंबई पालिका या दोघीही आमची काळजी घेण्याचं आपलं कर्तव्य बजावत होत्या. माझ्या मनात असणारी अपार श्रद्धा आणि डॉ. कारंडे व त्यांचे सहकारी

डॉ. जयराज ठाणेकर यांच्या पूर्ण पाठिंब्यामुळं अखेर मुंबईतल्या समलिंगी व्यक्तींना एचआयव्ही, लैंगिक संबंधातून होणारे आजार, आरोग्याबाबतची माहिती आणि एकूणच लागणारं समुपदेशन यांसाठी एक हक्काची जागा अखेर मिळाली.

या साऱ्या घडामोडींच्या ताणानंही असेल कदाचित, मी एकाच वेळी मधुमेह आणि क्षयरोग होऊन खूप आजारी पडलो. या दोन्हीही आजारांमुळं माझं वजन जवळजवळ १५ किलो कमी झालं. आता स्वत:च्या तब्येतीची काळजी घेणं मला भागच होतं खरं; पण कामाचा वेग कमी करणं मला शक्य होतं का? अखेर मुंबा-आईनं मला विश्रांती घ्यायला भाग पाडलंच. माझ्या रोगनिदानाचीही सोय झाली, पण माझी विपन्नावस्थेतली आई क्षयरोग आणि मधुमेह यांसाठी लागणारी महागडी औषधं आणायला कसं काय जमवत होती कोणास ठाऊक? तिनं आपल्या सगळ्या जुन्या खरं सोनं असलेल्या जरीच्या साडय़ा विकून त्यासाठी पैसे उभे केले होते, हे मला नंतर कळलं. मुंबा-आईनं आणि माझ्या सख्ख्या आईनं, शोभाअम्मानं मला

पुन्हा दुसरं जीवन दिलं, हे मी कधीही विसरू शकणार नाही. आयुष्यदेखील ज्यांच्यासाठी गहाण ठेवलं तरी कमी पडेल, अशा माझ्या जीवनातल्या या दोन स्त्रियांना वंदन करून हा आजचा स्तंभ संपवतो.

rowkavi@gmail.com

chaturang@expressindia.com

अनुवाद : सुश्रुत कुलकर्णी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2018 3:45 am

Web Title: mother role in life of ashok rao kavi during illness
Next Stories
1 विस्तीर्ण आकाशाकडे झेप
2 नव्या लढाईला सुरुवात
3 आझादी आणि बरंच काही..
Just Now!
X