भारतात समलैंगिकता अगदी ऐतिहासिक काळापासून, म्हणजे वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या काळापासूनच अस्तित्वात असली, तरी लैंगिकतेबाबतच्या हक्कांसाठीच्या चळवळीला प्रारंभ मात्र अगदी १९व्या शतकाच्या उत्तरार्धात व २०व्या शतकाच्या सुरुवातीला झाला. या बदलाची सुरुवात झाली, ती उत्तर भारतात. विशेष म्हणजे, एका उच्चपदी असलेल्या आयकर अधिकाऱ्यांकडून मला याबद्दल माहिती मिळाली. आयकर विभागात कमिशनर असणाऱ्या या गृहस्थांसोबत माझी १९९६ मध्ये भेट झाली होती. त्यांनी मला पांडेय बेचन शर्मा (१९२०-१९६७) म्हणजेच ‘उग्र’ या टोपणनावानं लेखन करणाऱ्या लेखकाबद्दल सांगितलं होतं. हिंदीतल्या ‘उच्चभ्रू लेखकसमुदायानं’ उग्र यांचा उल्लेख न करण्याचा जणू विडाच उचललेला होता. अखेर दिल्ली विद्यापाठामधल्या प्रा. रुथ वनिता यांच्याकडून मला उग्र यांच्याबद्दलची मोलाची माहिती मिळाली.

आजच्या या स्तंभामध्ये दिलेली बहुसंख्य माहिती प्रा. रुथ वनिता यांच्या लेखनावर आधारित आहे. त्यांनी मला आपले संशोधन उपलब्ध करून दिले व त्यातील मजकूर उद्धृत करण्याची परवानगी दिली याबद्दल त्यांचे मनापासून आभार! त्यावेळचे हिंदी-उर्दू साहित्यविश्व फारच वादळी आणि नवनिर्मितीने ओसंडून वाहात होते. महात्मा गांधीच्या राजकीय उदयासोबतच एका नव्या हिंदी-उर्दू मिश्र संकृतीचा उदय होत होता. आता हिंदी आणि उर्दू या दोन्हींचे वेगवेगळे अस्तित्व दिसू लागले होते. उर्दू भाषा अरेबिक लिपीत लिहिली जाऊ लागली, तर हिंदी देवनागरीत. मात्र सगळ्या देशवासीयांनी ‘हिंदुस्तानी’ म्हणजे या दोन्हींचे मिश्रण असलेली भाषा आणि दोन्हीही लिप्या शिकाव्यात, असे गांधीजींना वाटे. उदाहरणार्थ मुन्शी प्रेमचंद सुरुवातीला उर्दूमध्ये लिहीत असत, पण त्यांनी हिंदीमध्ये मोठा वाचकवर्ग असल्यामुळे लवकरच त्या भाषेत लिहायला सुरुवात केली.

तत्कालीन हिंदी लेखक स्त्रियांचे हक्क, विधवाविवाह, बालविवाह, कुटुंबातील हिंसाचार, मद्यासक्तता यांसारख्या सामाजिक प्रश्नांसंबंधीच्या चळवळींमध्ये हिरिरीने भाग घेत होते. त्याच वेळी साहित्यातल्या दोन प्रभावी विचारधारांचा उगमही झालेला होता. पहिली होती ‘छायावाद’ म्हणजेच स्वच्छंदतावाद वा रोमँटिसिझम मानणारी. सूर्यकांत त्रिपाठी ‘निराला’, सुमित्रानंदन पंत आणि महादेवी वर्मा हे या विचारधारेचे पुरस्कत्रे होते. दुसरी विचारधारा आधुनिकतेला मानणारी होती. माखनलाल चतुर्वेदी यांचा गट हिचा पुरस्कर्ता होता. बहुसंख्य हिंदी लेखक अर्धवेळ पत्रकार म्हणूनही काम करत असत. ही परंपरा अगदी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत चालू राहिली.

१९२० मध्ये ‘उग्र’ (टोकाचा या अर्थी) यांनी लिहिलेली ‘अपनी खबर’ नावाची कादंबरी प्रकाशित झाली. खरं तर हे हिंदीमधलं पहिलं आत्मचरित्रच म्हणावं लागेल. आधुनिक हिंदी साहित्याचा पहिला नमुना म्हणून हे पुस्तक आजही दिल्ली विद्यापीठात अभ्यासलं जातं. उग्र यांच्या लेखनात राष्ट्रवाद आणि समाजवाद हे दोन्हीही दिसत होतेच. पण समकालीन लेखकांच्या आणि त्यांच्या लेखनात असणारा मुख्य फरक म्हणजे, त्यात केलेले विखरत जाणाऱ्या हिंदू कुटुंबव्यवस्थेचे चित्रण. एरवी बाहेर कुठेच बोलला न जाणारा नसणारा कुटुंबव्यवस्थेत सुरू असणारा हिंसाचार, बालकांचे शोषण यांचे अगदी थेट व भेदक चित्रण उग्र यांच्या साहित्यात दिसून येतं. प्रेमचंद यांच्यासारख्या लेखकांनीही सामाजिक प्रश्नांबाबत लिहिलेलं आहे, पण ते सारं लेखन तृतीय पुरुषी पद्धतीचं आहे. उग्र यांनी मात्र आपल्या कुटुंबाचं चित्रण करणारं सारं लेखन प्रथमपुरुषी पद्धतीनं केलेलं आहे. त्यांचा थोरला भाऊ आपल्या जुगाराच्या व मद्याच्या व्यसनाच्या आहारी जाऊन कसा आपल्या पत्नीला, आईला व मुलांना मारहाण करत असे, याबद्दल त्यांनी अगदी थेटपणे लिहिलेलं आहे. उग्र आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतीक असलेल्या आपल्या थोरल्या भावाबद्दल आणि तो अगदी ‘निकम्मा’ असल्यानं आपल्या कुटुंबाची कशी वाताहत झाली, याबद्दल कुठलाही आडपडदा न ठेवता लिहितात. उग्र यांनी स्वत:च्या आयुष्याबद्दलही त्यात लिहिलेलं आहे. रामलीला उत्सवात ते एक बालकलाकार म्हणून काम करत असत. अर्थात लहान असताना त्यांना मुलीची भूमिका करावी लागे. ते स्वत:बद्दल म्हणतात, ‘‘ज्याला आयुष्यभर पत्नी म्हणजे काय हे ठाऊक झाले नाही, अशा मला आयुष्याच्या सुरुवातीला मात्र रामाची पत्नी म्हणून भूमिका वठवावी लागली.’’ रामलीलेत काम करणाऱ्या कलाकारांच्या मनात असणाऱ्या लिंगभावाबद्दल संमिश्र भावनांविषयीही त्यांनी बरंच लिहिलेलं आहे.

‘अपनी खबर’ उत्तर भारतातील बुद्धिजीवी पुरुषांच्या स्वत:च्या, अगदी व्यक्तिगत मानसिक पातळीवरच्या उत्क्रांतीवर प्रकाशझोत टाकते. एकीकडे भारतीय पितृप्रधान संस्कृती, उत्स्फूर्तता आणि दुसरीकडे पाश्चिमात्य प्रभावाचे औपचारिक शिक्षण यांच्या सरमिसळीतून अनेक हिंदू आणि मुस्लीम परंपरांचे अनेक पदर हळूहळू कसे विरत गेले, याचे उत्कृष्ट चित्रण या आत्मकथनपर लेखनातून आपल्याला दिसून येते. त्यानंतर लवकरच उग्र यांचा ‘चॉकलेट’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. या कथासंग्रहात आठ कथा होत्या. त्यात असणारी ‘मतवाला’ ही त्यांची पहिली कथा १९२४ मध्ये प्रसिद्ध झालेली होती. १९२७च्या ऑक्टोबरमध्ये ‘चॉकलेट’ हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला.

हा कथासंग्रह प्रसिद्ध होताच मोठीच खळबळ उडाली. याचं कारण म्हणजे या संग्रहातल्या कथांमध्ये उग्र यांनी २०च्या शतकाच्या सुरुवातीला असणाऱ्या शहरी भागातील पुरुष-पुरुष प्रेमाचे अगदी बारकाव्यांसकट वर्णन केलेले होते. कथांची शीर्षकेही ‘दिल्लीचे दलाल’ आणि ‘आयुष्य छोटं आहे, मजा करू या’ अशी वाचकाला काहीशी चाळवणारीच होती. एकीकडे भारतात स्वातंत्र्यसंग्राम सुरू असतानाच, दुसरीकडे शहरी आयुष्यातल्या हळव्या बाजूंचे या कथांमध्ये चित्रण केलेले होते. उग्र आणि त्यांचा ‘मतवाला’ हा कथासंग्रह, या दोहोंही विरुद्ध लेखक-प्रकाशक बनारसीदास चतुर्वेदी यांनी मोठीच आघाडी उघडली. बनारसीदास चतुर्वेदी वाराणसीतून प्रसिद्ध होणाऱ्या ‘विशाल भारत’ नावाच्या वृत्तपत्राचे संपादक होते. काही पुस्तके कशी ‘तुपात तेलाची भेसळ केली जावी त्याप्रमाणे भारतीय संस्कृतीला अगदी कमीपणा आणत आहेत’ अशा आशयाचा एक निबंध चतुर्वेदींनी प्रसिद्ध केला. अशा प्रकारच्या साहित्याची त्यांनी ‘भडकवणारे साहित्य’ वा ‘घासलेट साहित्य’ किंवा ‘अश्लील साहित्य’ म्हणून कुचेष्टा केली. या चळवळीला ते ‘घासलेट चळवळ’ असंच हिणवत असत.

पण उग्र यांची चतुराई अशी होती, की एकीकडे ते समलैंगिकतेसारख्या अनतिक कृत्यांच्या विरोधी ‘लढा देत’ होते, तर दुसरीकडे आपल्या लेखनात ते हीच गोष्ट इतकी बहारदार आणि वाचकाला चाळवून टाकणाऱ्या पद्धतीनं लिहायचे, की ते समलैंगिकतेच्या नक्की विरोधातच आहेत ना, असा प्रश्न पडावा. उग्र स्वत:चीच खिल्ली उडवणारं आणि काहीसं आत्मटीकापर लेखन करत असले, तरी त्यांच्या लेखनाची समीक्षा करताना संकोच वाटून भल्याभल्यांची बोलती बंद होत असे.

२०व्या शतकाच्या उत्तर भारतात काय घडत होतं, त्याची नुसती एक झलकच आज आपण पाहिली. पण माझ्या स्वत:च्या घरातही काय घडत होतं? पाहू या, पुढच्या लेखात.

– अशोक रावकवी

rowkavi@gmail.com

भाषांतर – सुश्रुत कुलकर्णी

chaturang@expressindia.com