मागच्या लेखात पांडेय बेचन शर्मा म्हणजेच ‘उग्र’ यांच्या तत्कालीन समलैंगिकतेबद्दल व्यक्त होण्याबद्दल आपण वाचलं. गेल्या शतकात उत्तर भारतामध्ये कशा प्रकारे लेखनातून समलैंगिकता व्यक्त होत होती व त्यावर तत्कालीन साहित्य विश्वाची प्रतिक्रिया काय होती, याचाही अगदी थोडक्यात आढावा आपण घेतला.

मात्र त्याच दरम्यान महाराष्ट्रात काय घडत होतं, हे पाहणंही रंजक ठरावं. महाराष्ट्रात त्यावेळी संगीत नाटय़परंपरा ऐन सुवर्णकाळात होती. वेगवेगळ्या अभिनेत्यांनी रंगभूमीचा हा काळ अगदी उजळून गेलेला होता. अर्थातच त्यावेळी या संगीत नाटकांतल्या स्त्री भूमिका वेगवेगळे नामवंत पुरुष अभिनेतेच करत असत. स्त्री वेषातलं त्यांचं दिसणं, वावरणं इतकं सहजपणाचं आणि नैसर्गिक वाटावं असं होतं, की मी अचंबितच झालो होतो. ‘‘हे नट स्त्रियांचे कपडे किती सहजपणे घालतात, त्यांच्यातल्या स्त्रीचं हे दर्शन किती छान आहे ना!’’ असं बाबांना म्हटल्याचं मला चांगलंच आठवतं. त्यावर बाबांनी मला चांगलंच झाडल्याचंही मला आठवतं. हे लोक केवळ ‘उत्तम नट’ होते आणि त्यांच्या मनोवस्थेचा स्त्रियांचे पेहराव करण्याशी काहीही संबंध नव्हता. उलट मला असं वाटणं हेच ‘विकृतपणाचं लक्षण’ आहे, असं म्हणून त्यांनी माझी चांगलीच खरडपट्टी काढली होती. मात्र पुढं जेव्हा या ‘उत्तम नटांनी’ पुरुषांच्या भूमिका केल्या, तेव्हा ते सपशेल अयशस्वी का ठरले असावेत? असे स्त्रियांचे पेहराव करणारे आणि नाजूक शरीरयष्टी असणारे पुरुष खरं तर मराठी रंगभूमीचा खूप महत्त्वाचा भाग राहिलेले आहेत. ज्यांनी ‘नटरंग’ हा चित्रपट पाहिला असेल, त्यांना त्यातली ‘मावशी’ची व्यक्तीरेखा अगदी चांगल्या प्रकारे लक्षात राहिलेली असेल. एखादी व्यक्ती जन्मानं स्त्री आहे, की पुरुष? तिच्या मनात या दोन्ही लिंगभावांची कशी सरमिसळ झालेली असते? हा गुंता सोडवणं किती कठीण आहे, याचं एक सुंदर उदाहरण या चित्रपटातून मांडण्याचा दिग्दर्शकानं प्रयत्न केला होता.

Dr Amol Kolhe on Ajit Pawar karyasamrat
‘माझे काका अभिनय क्षेत्रात नव्हते’, नटसम्राट या टीकेवर अमोल कोल्हेंची अजित पवारांवर खोचक टीका
Construction of Ram temple is due to Narendra Modi Raj Thackeray role
मोदींमुळेच राम मंदिराची उभारणी, राज ठाकरे यांची भूमिका ; मनसे महायुतीच्या प्रचारात
maharashtra lokrang article, maharashtra lokrang
प्रगल्भ महाराष्ट्राच्या आठवणी
वीस वर्षे ‘ज्या’ व्यक्तीविरोधात संघर्ष केला तिलाच राष्ट्रवादीने आयात केलं, साहजिकच विलास लांडे नाराज होतील – अमोल कोल्हे

इतरांचं जाऊ  द्या. अगदी माझ्या बाबतीत सांगतो ना. मला लिंगभाव आणि लिंगविशिष्टता यांच्या राजकारणाची डोळसपणे ओळख झाली ती आधुनिक भारतात स्त्रीवादी चळवळ आणि पितृसत्ताक पद्धती उलटून टाकण्याच्या त्याच्या इच्छेपोटीच्या चळवळीमुळं. आपल्यापैकी अनेकांना, खास करून मला स्त्रीवादी चळवळीतून आणि त्यांच्या लढय़ातून खूप काही शिकता आलं. तीन प्रखर व्यक्तिमत्त्वं असणाऱ्या स्त्रियांच्या सहवासात मी लहानाचा मोठा झालो. कल्याणी कामत ही माझी आजी. म्हणजे ती माझ्या आईची आई. विधवा झाल्यामुळं दु:खाचे चटके सोसत तिने आपल्या दोन मुली आणि एका मुलाला एकटीनं वाढवलं होतं. शिवाय माझ्या बाबांची थोरली बहीण प्रेमाअक्का ही बालविधवा होती. तिसरी स्त्री म्हणजे माझी आई शोभा. माझी आई त्यावेळी गिरगावात लॅमिंग्टन रोडजवळच्या काँग्रेस भवनालगतच्या राजाराम मोहन रॉय शाळेच्या पहिल्या तुकडय़ांपैकी असणाऱ्या विद्यार्थिनींपैकी एक होती.

या तीनही स्त्रियांकडून मी ‘दृढ निश्चय’ ही काय चीज असते ते अनुभवलं. जगात पुरुषी लैंगिकता आणि पितृसत्ताक पद्धतीमुळं किती संघर्ष आणि हिंसाचार पसरलेला आहे, हे त्यांच्यामुळंच माझ्या लक्षात आलं. असमानतेनं भरलेल्या या जगामध्ये एकूणच स्त्रिया आपला मार्ग कसा काढतात, आयुष्य जगण्यासाठी असमानतेनं भरलेल्या जगापेक्षा समानता ही किती चांगली गोष्ट आहे, याचा वस्तुपाठच मला त्यांच्या वागण्या बोलण्यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मिळत गेला. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या चारचौघांपेक्षा वेगळ्या लिंगभावाबद्दल अण्णांनी, म्हणजे माझ्या बाबांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आणि मोकळेपणानं वागण्याची मुभा दिली हेही काही थोडकं नव्हतंच.

त्यावेळी घडलेली एक गोष्ट मला चांगलीच आठवते. मी सहावीत असताना माझ्या वर्गातली मुलं मुलींकडे बघून शीळ वाजवायची. ते का बरं? त्यात इतकं आकर्षण वाटण्याजोगं काय होतं, तेच मला कळत नव्हतं. त्याबद्दल मी अण्णांना विचारलं. ते काही क्षण गप्प झाले. मग ते म्हणाले, ‘‘तू एखादी छान, सुंदर गोष्ट पाहिल्यावर आपोआप शीळ घालत नाहीस का?’’ मीही उत्तर दिलं, ‘‘हो! जेव्हा देखणी मुलं दिसतात, तेव्हा मीही ती वाजवतोच की.’’ माझं उत्तर ऐकून अण्णा शांत बसले. ते आता यावर काय बोलावं, असा विचार करत असावेत. थोडय़ा वेळानं शांततेचा भंग करत ते म्हणाले, ‘‘हो, बरोबर आहे. मला वाटतं छान दिसणारी मुलं आणि मुली अशा दोघांनाही पाहून आपोआप अशी शीळ घातली जाणं नैसर्गिकच आहे.’’

त्या पुढच्या महिन्यात मी त्यांना ‘मुलं कशी होतात’ याबद्दल प्रश्न विचारला. माझ्या वर्गातल्या मुलांनी याबद्दल काहीतरी गोंधळवून टाकणारी माहिती माझ्या डोक्यात भरवली होती. मला तर ती अगदीच किळसवाणी वाटत होती. आपल्या मुलाला ‘याबाबतीत शिकवण्याची’ हीच ती वेळ आहे, हे माझ्या अण्णांनी जाणलं. ते इंजिनीअर होते. (म्हणजे निदान त्यांचा तसा दावा तरी होता) त्यांनी विजेचा प्लग आणि सॉकेट कसं एकमेकांना पूरक असतं, यांसारख्या कुठल्यातरी संकल्पना सांगून त्या उदाहरणांद्वारे ‘नेमकं काय घडतं’ हे मला शिकवण्याचा एक निष्फळ प्रयत्न केला. अर्थात यातून माझ्या डोक्यात फारसा प्रकाश पडला नाही. पण यातली महत्त्वाची आणि अन्य घरांपेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे, वडिलांसमवेत अशा संवेदनशील विषयांवर बोलण्याचा मोकळेपणा आमच्या घरात असल्यामुळं मी पुढच्या साऱ्या आयुष्यात माझ्या समलैंगिकतेबद्दल मनात कुठलाही अपराधगंड न बाळगता, विवेकानं वागू शकलो.

माझं घर वेगळं आणि चांगलं होतं. तुमचे आपल्या आईबाबांसोबतचे अनुभव काय आहेत? मला नक्की लिहून कळवा. वाट पाहतो.

– अशोक रावकवी

rowkavi@gmail.com

भाषांतर : सुश्रुत कुलकर्णी