माझ्या गेल्या स्तंभामध्ये मी आपल्यावर होणाऱ्या संस्कारांबद्दल बोललो होतो. एलजीबीटी समूहानं आपल्या वेगळ्या संस्कृतीची कोणती बीजं पेरली आणि शहरात स्वत:चा निभाव लागावा यासाठी कोणत्या प्रकारच्या ‘सपोर्ट सिस्टीम’ तयार केल्या, हासुद्धा महत्त्वाचा विषय, त्यामुळे आज त्याविषयी.

खरं तर सर्वच देशांतल्या सर्वच समाजांमध्ये एलजीबीटी समूह अस्तित्वात असतातच, पण त्यांचं प्रमाण मुख्यत: शहरांमध्ये अधिक असल्याचं आढळून येतं. मायकेल फॉक्लट या फ्रेंच तत्त्वज्ञानं आपल्या ‘हिस्टरी ऑफ सेक्शुआलिटी’ या तीन खंडांमध्ये विभागलेल्या बृहद् ग्रंथामध्ये याबाबत अगदी विस्तृतपणे लिहिलेलं आहे. ग्रामीण भागांच्या तुलनेत शहरांची वाढ होण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे तिथं उपलब्ध असणारा कुशल कामगारवर्ग. शहरामध्ये अत्याधुनिक सेवा-सुविधा देता याव्यात म्हणून कुशल कामगारवर्ग मिळवण्यासाठी स्पर्धा अत्यंत तीव्र असते.

उदा. मुंबईसारख्या शहरात महागडय़ा सलूनमध्ये एखाद्या चांगल्या कारागिराकडून केस कापून घेण्यासाठी ५०० ते १००० रुपये  मोजावे लागतात. अर्थातच हे कारागीर केवळ छोटय़ा खेडय़ांमध्ये असतात, तसे केवळ केस कापणारे नसतात. फेसपॅक लावणं, भुवयांना आकार देणं, दाढी-मिशांसारख्या गोष्टींना आकार देणं, संपूर्ण शरीराचं वॅक्सिंग करणं, आदी अनेक गोष्टी ते करत असतात. आज आधुनिक, शहरी भारतामध्ये काही व्यवसायांवर प्रामुख्यानं समिलगी पुरुषांचा मोठा पगडा आहे. अर्थातच यामागचं कारण कोणालाच ठाऊक नाही.

प्रा. ख्रिश्चन ए. ट्रिप या समाजशास्त्रज्ञानं लिहिलेल्या ‘द होमोसेक्शुअल मॅट्रिक्स’ या पुस्तकामध्ये संगीतातली काही विशिष्ट वाद्यं (पियानो, हार्मोनियम, आदी) ही अधिकतर समिलगी पुरुषांद्वारे वाजवली जातात, असं निरीक्षण नोंदवलेलं आहे. ‘सुंदर पण निरुपयोगी गोष्टींच्या निर्मितीमध्ये’, जसं की संगीत, कला आणि आधुनिक स्वरूपाच्या मानवनिर्मित कलाकृतींच्या निर्मितीमध्ये समिलगी व्यक्तींचा मोठा वाटा आहे, असं फॉक्लटदेखील म्हणतो. पण हा केवळ खोलवर गेलेल्या कला-साहित्य संस्कृतीचा अगदी वरवरचाच पदर आहे, असं म्हणावं लागेल.

मुंबईमध्ये कला आणि संगीत यांच्या जगावर प्रामुख्याने ‘नाटक मंडळींचा’ प्रभाव होता. या नाटक मंडळीतील स्वच्छंदी, कलंदर लोक भिन्निलगी व्यक्तींचे कपडे बिनदिक्कत घालत असत. याआधी बेचन पांडे यांच्या लेखनात पाहिल्याप्रमाणे रामलीला संचातील तरुण मुलं स्त्रियांच्या भूमिका करण्यासाठी तसे कपडे घालत. अशा मुलांचं लैंगिक शोषणही होत असे. कोलकाता इथला माझा (आता दिवंगत) मित्र अग्नी लाहिरी यानं ‘लौंडा नाच’ या विषयावर बरंच संशोधन केलेलं आहे. मध्यमवर्गीय किंवा शेतकरी कुटुंबातील मुलांना हे नृत्य करण्यासाठी एखाद्या सांस्कृतिक गटामध्ये घेतलं जात असे. त्यातूनच पुढं त्यांचा समिलगी व्यक्तींच्या एका समांतर उपसंस्कृतीमध्ये प्रवेश होत असे. ही समलैंगिकांची उपसंस्कृती पश्चिमेतील गोरखपूरपासून ते पूर्वेतील मुíशदाबादपर्यंत पसरलेली होती.

भारताला हिजडा वा तृतीयपंथीय संस्कृतीची ओळख पहिल्यांदा ‘कोठी’ या प्रकारच्या नृत्यातून झाली. (‘कोट्टी’ या कन्नड / तेलुगू शब्दाचा अर्थ आहे ‘नाचणारं माकड’). या नृत्यामध्ये नाजूक दिसणारे तरुण फक्त पुरुष प्रेक्षकांसमोर नृत्य करत असत आणि श्रीमंत प्रेक्षकांकडून पसे मिळवत असत. असे हे बायकी दिसणारे पुरुष आणि तृतीयपंथीय यांनी आपली वेगळी ‘घराणी’ स्थापन केली. या घराण्यातला मुख्य गुरू खास करून लहान वयातील समिलगी पुरुषांची, मुलांची काळजी घेणाऱ्या एखाद्या आईसारखी भूमिका बजावत असतो. ऑस्कर वाईल्डनं लंडनमध्ये एकोणिसाव्या शतकात असणाऱ्या ‘मॉली कल्चर’चं वर्णन केलं आहे ना, हे अगदी तसंच होतं.

भारतातील समिलगी पुरुषांसाठी असणारी ‘सपोर्ट सिस्टीम’ पुष्कळशी या तृतीयपंथीय संस्कृतीवरच आधारित असल्यासारखे आहे. एखादा प्रौढवयीन समिलगी पुरुष कित्येक तरुण पुरुषांकरिता मार्गदर्शकाची भूमिका करतो. याचाच अर्थ हे सारे लोक त्याच्या ‘मुलींसारखे’ असल्यानं तो त्यांच्यासोबत लैंगिक संबंध ठेवत नाही. मुंबईमध्ये अशा किती तरी गुप्त पण मोठय़ा संख्येनं सदस्य असणारी ‘कुटुंबं’ उदयाला आली. खुद्द माझी समिलगी ‘आई’ होता अ‍ॅलन गिल. अ‍ॅलन हा एक अत्यंत देखणा अँग्लो-इंडियन नर्तक होता. १९५०-६०च्या दशकामध्ये आणि ७० च्या दशकाच्या सुरुवातीला तो मुंबईतल्या अनेक नाइट क्लब्ज्मध्ये नृत्य करत असे. त्या काळात मुंबईत असणाऱ्या जोमदार नाइट लाइफचा गळा पुढं तत्कालीन राज्यकर्त्यांनी हळूहळू घोटून टाकला.

देखणा अ‍ॅलन गिल उत्तम पोशाख केल्यावर अत्यंत सुंदर स्त्रीसारखाच दिसत असे. तो चर्चगेट इथल्या एका नाइटक्लबमध्ये मद्यपान करणाऱ्या पुरुषांसमोर ‘कॅबरे’ करत असे. नृत्याच्या सर्वोच्च बिंदूला तो अचानक आपले सर्व कपडे काढून टाकत असे. तेव्हा तो पुरुष असल्याचं पाहून साऱ्या प्रेक्षकांना जोरदार धक्का बसत असे. पण तो धक्का इतका आनंदाश्चर्याचा असायचा, की अनेक स्त्री-पुरुष आपल्या जागेवरून उठून दाद द्यायला त्याला मिठीच मारायचे. अर्थात अ‍ॅलन गे होता आणि त्याला वेगवेगळ्या काळी बॉयफ्रेंडही होते. त्या वेळी लैंगिक संबंधांकरिता त्याच्याकडं येणाऱ्या त्या वेळच्या बॉलीवूडमधल्या नवोदित नायकांचा इथं उल्लेख करणं उचित होणार नाही. एकुणात ते दिवस अगदी वेगळेच होते. मुंबईमध्ये अत्यंत सक्रिय समिलगी समांतर उपसंस्कृती जोमानं वाढत होती. त्या संस्कृतीमधूनच साऱ्या भाषा, वर्ग आणि जाती यांना भेदणारी एक नवी लैंगिक क्रांतीच सुरू झाली.

त्या वेळी मी कॉलेजमध्ये होतो आणि पदवीचा अभ्यास करत असताना मी ‘सोशल ड्रिंकिंग’ करू लागलो. संगीत, साहित्य आणि रंगमंचावरून सादर केलं जाणारं कवितांचं सादरीकरण या साऱ्यांच्या तेव्हा रात्री छान मफली होत असत. अशा नाइट क्लबमध्ये कोणी ‘पिऊन तर्र’ झाल्याचं मला आठवत नाही. उलट अशा प्रकारे वागणं कमीपणाचंच समजलं जात असे. माझा तळ कायम अ‍ॅलनच्या मेकअपरूममध्येच ठोकलेला असायचा. तिथे येणारे देखणे पुरुष मला आजही आठवतात. त्यांतल्या अनेकांशी माझी मत्रीही झाली. कधी कधी सहजगत्या लैंगिक संबंधही प्रस्थापित होत. मात्र त्यामध्ये कधीच कुठलाही हिंसाचार किंवा खालच्या पातळीवरचं वागणं नव्हतं. कधी जर कोणी अशा संबंधांना नकार दिला, तर ते खिलाडूवृत्तीनं घेतलं जायचं.

१९६०च्या पुढची तीन दशकं माझ्यासाठी आणि माझ्या पिढीतल्या समिलगी पुरुषांसाठी महत्त्वाची होती. शिवाय काही प्रमाणात तो काळ बेधडकपणे जगण्याचाही होता. कारण फार फार तर त्यामुळं काही शारीरिक आजार होत. त्यावर पेनिसिलीन हा सहजसोपा आणि अक्सीर उपायसुद्धा अगदी सहज उपलब्ध होता. त्यामुळं ओव्हल आणि आझाद मदान, तसंच गेटवे ऑफ इंडिया अशा ठिकाणी असंख्य समिलगी प्रेमं फुलत असत. मुंबई या समिलगी संस्कृतीची जणू राजधानीच होती आणि आम्हाला तिचा रास्त अभिमानही होता. अ‍ॅलन गिलसारखे पुरुष आमच्यासारख्यांच्या ‘आईची’ भूमिका बजावत असत. आमचं अशा ७५ पुरुषांचं एक कुटुंब होतं. आज बॉलीवूडमधल्या काही महत्त्वाच्या नावांचाही त्या कुटुंबामध्ये समावेश होता. (अर्थातच त्यांच्या नावांचा मी इथं उल्लेख करू शकत नाही, हे ओघानं आलंच.) एकीकडे आम्ही आमच्या व्यावसायिक क्षेत्रात प्रगती करत होतो, तसंच त्यासोबतच आमचे गे मित्र अविवाहित आणि एकटेच पडलेले असल्यामुळं येणाऱ्या अडचणींवर मात करण्यावरही मदत करत होतो. असे बहुसंख्य समिलगी पुरुष आपली आई किंवा वृद्ध आई-वडिलांची काळजी घेत असत. उदा. आपल्या आईनं ७५व्या वर्षी अखेरचा श्वास घेईपर्यंत अ‍ॅलननं तिची काळजी घेतली.

समिलगी पुरुष आणि स्त्रियांनी सुरू केलेल्या अनुक्रमे पुरुषांसाठीच्या आणि स्त्रियांसाठीच्या मासिकांची नावं मला इथं औचित्यामुळं घेता येणार नाहीत. पण थोडक्यात सांगायचं तर फॅशन आणि फिल्मपत्रकारितेवर एलजीबीटी समूहाची मक्तेदारी होती, असं म्हटलं, तर अजिबातच अतिशयोक्ती होणार नाही. त्या काळात मुंबईतील चित्रपट उद्योगातही एलजीबीटी समूहाचा तसा वट होता. त्याबद्दल अनेकदा विनोदानं किंवा चिमटे काढण्याच्या रूपातही लिहिलं जायचं. त्या वेळी एका विख्यात समिलगी अभिनेत्यानं श्यामा या विख्यात अभिनेत्रीशी विवाह करण्याचा प्रस्ताव तिच्या आईकडं दिला होता, त्याबद्दल ‘स्क्रीन’ या प्रसिद्ध चित्रपटविषयक नियतकालिकात लिहून आलं होतं. श्यामाच्या आईनं त्या नायकाला अगदी खटय़ाळपणे बोलवून कटवलं होतं. ती त्याला म्हणाली होती, ‘‘अरे मियां, अर्थातच तुम्ही श्यामाशी लग्न करू शकता. पण आधी तुमच्या ड्रायव्हरला घटस्फोट तर द्याल की नाही? तुम्हाला पुन्हा लग्न करायचं असेल, तर पहिल्या नवऱ्याची परवानगी घ्यावी लागेल ना?’’ अशा प्रकारच्या द्वय़र्थी लिखाणामुळं आमच्या पत्रकारितेच्या जगात खळबळ माजल्यावाचून राहायची नाही.

त्या वेळी ‘लेडी किलर’ म्हणून ओळखला जाणारा एक विख्यात मराठी अभिनेता होता. मात्र ‘स्क्रीन’नं या अभिनेत्याचं त्या त्या वेळी शूटिंग सुरू असलेल्या स्टुडियोमधल्या ‘वॉचमन’ लोकांवर ‘विशेष लक्ष’ असतं, अशी बातमी छापून मराठी सिनेसृष्टीत मोठाच गहजब उडवून दिलेला होता. अजूनही काही फिल्मी मासिकांमध्ये अशा द्वय़र्थी टिप्पण्या येतच असतात. पण त्या काळी त्यात अधिक गंमत होती खरं. त्यात कोणताही विखार नसायचा.

त्या काळी प्रख्यात असणारी सिनेपत्रकार देवयानी चौबळ हिनं एका नियतकालिकातल्या चुरचुरीत गॉसिप असणाऱ्या आपल्या स्तंभामध्ये तत्कालीन ‘सुपरस्टार’बद्दल लिहिलेलं होतं. ती जेव्हा त्याला भेटायला गेली होती, तेव्हा हा सुपरस्टार आपल्या बंगल्यात, आरशासमोर संपूर्णत: स्त्रीवेशामध्ये बसलेला होता. तिनं याबद्दल इतक्या नर्मविनोदी पद्धतीनं आणि कमरेखाली वार न करता लिहिलं, की त्या सुपरस्टारनं तिला भेट म्हणून एक उत्तम व्हिस्कीची बाटली पाठवली अन् तो विषय तिथंच संपला.

थोडक्यात, ते दिवस आजच्यापेक्षा जास्त मनमोकळेपणाचे, मुक्तपणे वागण्याचे होते हे खरं. पण मी स्वत: एक समिलगी व्यक्ती आहे हे आजूबाजूच्या लोकांना कळल्यावर काय झालं? माझी ओळख कशी घडत गेली? त्याविषयी पुढच्या लेखात!

– अशोक रावकवी

rowkavi@gmail.com

अनुवाद : सुश्रुत कुलकर्णी