13 December 2018

News Flash

अस्मिताकेंद्री राजकारणाची पुनर्जुळणी

या दशकात मनुष्याची व्याख्या सार्वजनिक पातळीवर व्यापक झाली.

अलीकडल्या २५ वर्षांत महिलांच्या सत्तासहभागापासून ते पक्षांतर्गत संघर्षांतून नवनेतृत्वाच्या उदयापर्यंत, ‘प्रतिअभिजनांच्या अस्मिताकेंद्री राजकारणाची रूपे दिसली. यात हल्लीच दिसू लागलेले रूप हे कॉपरेरेट वळणाचे आहे..

भारतात समकालीन दशकामध्ये नवीन नेतृत्व उदयास आले आहे. त्यास राजकीय अभिजनांच्या अभिसरणाची प्रक्रिया असे म्हटले जाते. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष यांमधील प्रस्थापित अभिजन बंदिस्त राजकारण करत होते. त्यांच्या तुलनेत प्रतिअभिजन हे खुलेपणे प्रस्थापित विरोधाचे राजकारण करीत आहेत. या प्रक्रियेत अस्मितांचा उपयोग केला जात आहे. या प्रक्रियेला संदिग्ध रूप आले आहे. उजवेदेखील डाव्यांचा दावा करत आहेत. अस्मितांमधील चढाओढ कार्पोरेट व्यवस्थेमध्ये घडत आहे. जुन्या परंपरांचे पुनज्र्जीवन व आधुनिक राजकीय कृतिप्रवणतेसाठी नव्याने अस्मिता रचल्या जातात, ही घडामोड राजकारणाचा नवा अर्थ स्पष्ट करते. राजकारणाची पुनव्र्याख्या करते. त्यांचा आढावा येथे घेतला आहे.

स्त्रियांच्या अस्मितेची पुनर्रचना

स्त्री हा समकालीन राजकारणातील सामाजिक गट आहे. त्यांना येत असलेले सामाजिक आत्मभान प्रतिअभिजन या स्वरूपातील आहे. त्यांचे राजकारण अबंदिस्त, अभिजनविरोधी आहे. राजकारणात स्त्रियांच्या अस्मितेची व मिथकाची पुनर्रचना झाली. ही घडामोड राजकीय शक्तींचा केंद्रिबदू झाली आहे. नव्वदीच्या दशकाच्या तुलनेत समकालीन दशकात हे बदल सुस्पष्टपणे दिसतात. उदा. नितीशकुमारांनी पुरुषवर्चस्व कमी करून दारूबंदी चळवळीचा पर्यायी अजेंडा विकसित केला. या प्रक्रियेत स्त्रियांचा बिहारच्या सामूहिक जीवनातील सहभाग वाढला. अशीच प्रक्रिया महाराष्ट्रातदेखील घडली. नव्वदीच्या व एकविसाव्या शतकाच्या आरंभीच्या दशकात या मुद्दय़ावर, शरद पवारांना सरंजामी समाजातून विरोध झाला. परंतु समकालीन दशकात पुढील बदल दिसतो : (१) नव्वदीच्या दशकाआधी राज्यकर्ती व्यक्ती कोण या प्रश्नाचे उत्तर पुरुष असे होते. या ऐवजी सामूहिक राजकारणातील एक कृतिशील व्यक्ती अशी स्त्रियांची नवी ओळख पुढे आली. (२) सामूहिक निर्णय पुरुष घेतात, ही जुनी प्रतिमा पालटून ‘निर्णयकर्त्यां स्त्रिया’ ही नवीन ओळख घडली. त्यामुळे प्रशासन, स्थानिक शासनातील पुरुष, सर्वसामान्य लोक यांच्या दृष्टिकोनात ‘स्त्री ही सामाजिक व विवेकी’ अशी ओळख घडली आहे. याअर्थी या दशकात मनुष्याची व्याख्या सार्वजनिक पातळीवर व्यापक झाली. या दशकात मनुष्याची व्याख्या सार्वजनिक पातळीवर व्यापक झाली.

(३) स्त्रियांची सार्वजनिक जीवनात भागीदारी ५० टक्केपर्यंत गेली. संख्याबळाचा परिणाम म्हणून स्त्रियांमध्ये भगिनीभाव उदयास येतो. अशा ठिकाणी स्त्रियांनी पुरुषांचे निर्णय डावलून केलेल्या सार्वजनिक निर्णयावर स्त्रियांचा प्रभाव आहे. ही त्यांची नवीन ओळख आहे. (४) जुन्या राजकीय अजेंडय़ावर पुरुषांनी अग्रक्रम दिलेले विषय होते. स्त्री सत्ताधारी झाली तेथे स्त्रियांनी अग्रक्रम ठरवताना, सामायिक गरजा समजून घेतल्या. सत्तेच्या संदर्भात स्त्री ही प्रतिअभिजन म्हणून उदयास आली. (५) राजकारण म्हणजे पुरुषांचे राखीव क्षेत्र; या अर्थाने त्याचे स्वरूप खासगी असेच होते. सार्वजनिक स्वरूप त्याला प्राप्त झाले नव्हते. स्थानिक शासन संस्थातील महिलांच्या सहभागामुळे राजकारणाला सार्वजनिक असे स्वरूप येऊ लागले. राजकारणाची स्त्री-पुरुषांचे संयुक्त क्षेत्र अशी नवी ओळख निर्माण झाली. (६) विविध सामाजिक आघाडय़ांची जडणघडण स्त्रिया करत आहेत. उदा. गडिहग्लज नगर परिषदेत मराठा-िलगायत अशी सामाजिक युती आंतरजातीय विवाहामुळे घडली. अशा विविध छोटय़ा छोटय़ा गोष्टी राजकारणात घडत आहेत. राजकारणाचा पोत स्त्रियांच्या भागीदारीने बदलला गेला.

पक्षांतर्गत अभिसरण

काँग्रेसप्रमाणे भाजप हा पक्ष प्रस्थापित झाला आहे. जुन्या-नव्या नेत्यांमध्ये सत्तास्पर्धा सतत दिसते. जुन्यांच्या तुलनेत नरेंद्र मोदी, शिवराजसिंह चौहान, अमित शहा, राजनाथ सिंह यांचे नेतृत्व नवीन आहे. या कारणामुळे भाजपांतर्गत अभिजनांचे अभिसरण राष्ट्रीय व राज्य पातळीवर घडते. जुने अभिजन हे आपले समाजातील स्थान कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तरीही भाजपांतर्गत अभिजन गटात नवीन नेतृत्वाचा अपरिहार्यपणे शिरकाव झाला आहे. मोदी, शहा, राजनाथ यांचे अभिजनांमध्ये पदार्पण व अडवाणी गटातील काहींची अभिजन गटातून उचलबांगडी ही प्रक्रिया भाजपांतर्गत अभिसरणाची म्हणता येईल. अशीच प्रक्रिया सोनिया गांधी व मनमोहन सिंगांच्या जागी राहुल गांधी यांच्या पदार्पणामुळे होते. बिहारमध्ये लालूप्रसाद यादवांच्या जागी नितीशकुमार व लालूप्रसाद यादवांच्या पक्षात त्यांचे नवीन वारसदार हे अभिजन म्हणून प्रवेश करत आहेत. अर्थात हे अभिसरण नियमित वा टप्प्याटप्प्याने झाले नाही. निवृत्ती, बढती, नवीन गुणवानांचा सातत्याने समावेश असे सातत्य या अभिसरणात नव्हते. त्यामुळे नव्या व्यक्तींचा अभिजन गटात प्रवेश होण्याच्या प्रक्रियेत तणाव निर्माण झालेले दिसतात. ही प्रक्रिया कार्पोरेट व्यवस्थेमध्ये घडत आहे. त्यामुळे त्या व्यवस्थेची वैशिष्टय़े कायम राहिली. परंतु प्रविष्ट होणाऱ्या अभिजनांची वेगळी वैशिष्टय़े पुढे येतात. सातत्याने नव्या नेतृत्वाचा अभिजन गटात समावेश न झाल्यामुळे पक्षावर ठसलेल्या बंदिस्त अभिजन गटाला आव्हान देणारी प्रक्रिया (प्रस्थापित नेतृत्वाला नामोहरम करून प्रस्थापित अभिजनांची उचलबांगडी) घडली. संपूर्ण नव्या अभिजनांचा संच निर्माण या तीन पक्षांत झाला (भाजप, काँग्रेस परिवार व ज. द. परिवार). राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला प्रस्थापित ही अस्मिता दूर करण्याची गरज भासू लागली. म्हणजेच नियमितपणे अभिजनांचे अभिसरण न घडून आल्यास प्रतिअभिजनांची निर्मिती होते, असे दिसते. हीच प्रक्रिया समकालीन दशकात भारतीय राजकारणाचा अर्थ बदलून घेणारी आहे. प्रतिअभिजनांना विरोधक या अर्थाने संबोधिले जाते. परंतु विरोधक व सत्ताधारी दोघेही अभिजन असतात. प्रस्थापित व प्रतिअभिजन यांची मूल्ये भिन्न असतात. त्यांची विचारसरणी वेगळी असते. ‘संपूर्ण प्रस्थापित अभिजन वर्गाला पदभ्रष्ट करून अभिजन बनण्याची आकांक्षा’ ही घडामोड मोदी, नितीश, केजरीवाल व राहुल गांधी यांच्या रूपाने गेले दशकभर पुढे आली. प्रतिअभिजन समाजविषयक नवीन आदर्श घडवितात. त्या आदर्शाची नवी विचारसरणी उदयास आली. उदा. मोदीवाद, मोदी अर्थकारण, नितीशकुमार अर्थकारण अशी नवी विचारप्रणाली घडली. त्यांनी जुन्या अजेंडय़ात फेरबदल केला. मोदींनी राष्ट्रीय पातळीवर ओबीसी आणि कार्पोरेट असा वैचारिक अजेंडा प्रस्थापित केला. हा राजकारणातील बदल अस्मितांच्या माध्यमातून अभिव्यक्त होत आहे.

नव्या अस्मिता

अस्मितामध्ये जुन्याचे पुनरुज्जीवन असते. तसेच आधुनिकतेचा दावा असतो. त्यामुळे ओबीसी व कार्पोरेट हा वैचारिक अजेंडा मध्यम शेतकरी जातींना सरंजामी ठरवत पुढे जात आहे. तसेच निश्चलनीकरण ही प्रक्रिया ‘राष्ट्रवादी’ ठरते. या प्रकारच्या घडामोडींचा महाराष्ट्राच्या समाज मनावर दूरगामी परिणाम झाला आहे. त्यांची उदाहरणे म्हणजे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विविध अंगाने विभूतिभवन सुरू आहे. िहदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी, गोब्राह्मण प्रतिपालक शिवाजी, कुळवाडी भूषण शिवाजी, अशा नानाविध अस्मितांमध्ये पक्षीय पातळीवर (शिवसंग्राम, शिवसेना, शिवराज्य पार्टी, संभाजी ब्रिगेड पक्ष) व समाजात चढाओढ सुरू आहे. या पक्षांमध्ये अस्मितांच्या आधारे धरसोड दिसते. परंतु भाजपच्या कार्पोरेट अस्मितेशी सांगड घालण्याचा एक कल दिसतो. दुसरा कल हा शेतकरी कामगार पक्षांशी जुळणी करण्याचा आहे. त्यांनी रूढप्रतिमेला छेद देणारी ‘पोिशदा कुणब्यांचा’ ही प्रतिमा निर्माण केली. ही सांगड ओबीसी व दलित यांच्याशी घालण्याचा दावा दिसतो. तिसरा कल स्वतंत्र अस्मितांशी जुळवून घेण्याचा आहे. तो प्रयत्न संदिग्ध स्वरूपाचा आहे. म्हणजेच व्यापक अर्थाने अस्मितांची पुनर्रचना केली जाते. यात सर्वच नेते व पक्ष आघाडीवर आहेत. भाजप व संघाची जुनी अस्मिता िहदुत्व; तर ओबीसी/ कार्पोरेट अजेंडा हा मोदीप्रणीत भाजपचा नवा अग्रक्रम आहे. या दोन अजेंडय़ांत द्वैत असल्यामुळे िहदुत्व विचारसरणी अस्वस्थ झाली आहे. याखेरीज राज्याराज्यांतील मध्यम शेतकरी जातीदेखील अस्वस्थ आहेत. अशा या मध्यम शेतकरी जातींतून अस्मिता आक्रमक स्वरूपात पुढे आल्या आहेत. त्या अस्मितांच्या आधारे त्यांचा असंतोष बाहेर पडत आहे. त्या असंतोषाची हवा कमी करण्यासाठी पुन्हा अस्मितेचाच आधार घेतला गेला. अरबी समुद्रात शिवस्मारकाचे भूमिपूजन/ जलपूजन हे त्याचे उदाहरण आहे. शिवस्मारकाच्या आधारे अस्मितेचे राजकारण दोन्ही काँग्रेस पक्षांनी केले होते. सध्या भाजपने या कामात पुढाकार घेतला. कोल्हापूरसह प्रत्येक जिल्ह्य़ातून माती व जलकुंभ मुंबईला पाठविण्यात आले. तसेच राजघराण्यांना सन्मान देण्यात आला. ही सर्व प्रक्रिया भावनिक आहे. तसेच आध्यात्मिक पातळीवरील प्रतिष्ठावाचक स्वरूपाची आहे. परंतु भाजपेतर पक्षांना त्या अस्मितेमुळे सामाजिक आधार घसरण्याची भीती वाटावी, अशी स्थिती उद्भवली. किंबहुना भाजप आघाडीतील घटकपक्ष त्याबद्दल मतभिन्नता व्यक्त करताहेत. शिवाजी महाराजांच्या प्रतीकांचे कार्पोरेट व्यवस्थेमध्ये रूपांतर घडून येत असल्याचे हे परिणाम आहेत.

थोडक्यात म्हणजे राज्यकर्ता वर्ग बदलला. जुना राज्यकर्ता वर्ग मध्यम शेतकरी जातींमधून पुढे येत होता, तर समकालीन दशकातील राज्यकर्ता वर्ग ओबीसी व स्त्री या वर्गातून पुढे येत आहे. या दोन्ही वर्गाची भाषाशैली समूहाची आहे. हे राजकारण ‘प्रस्थापित अभिजन विरोधी प्रतिअभिजन’ या स्वरूपातील सत्तासंघर्षांचे आहे.                 (समाप्त)

लेखक शिवाजी विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

मेल  prpawar90@gmail.com

First Published on December 28, 2016 3:42 am

Web Title: identity politics in maharashtra