नववर्षांत विविध संकल्प करण्याचा चंग प्रत्येकाने बांधला असेल. एकमेकांना नववर्षांच्या आरोग्यदायी शुभेच्छाही दिल्या असेल.. वर्षभर आरोग्य चांगले राहावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असणार. त्या दृष्टीने काही चांगल्या गोष्टी आतापासूनच सुरू करता येतील. विविध वयोगटाच्या व्यक्तींना नववर्षांत आरोग्याचा कुठला संकल्प करता येईल याबद्दलच्या या काही ‘टिप्स’.

लहान मुले :

शाळेत जाऊ लागलेल्या लहान मुलांबद्दलची पालकांची पहिली तक्रार म्हणजे मूल खाण्यास टाळाटाळ करते. पुढे मूल आरोग्यवान होण्यासाठीच्या लहान लहान सवयी या वयापासून तयार होत असल्यामुळे त्या सवयी मुलांना लावण्याचे वय हेच.

मुलांना रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठण्याची सवय पहिली. रोजच्या जगण्यात चांगल्या आरोग्यासाठी काही वेळापत्रक आवश्यक असते ही सवय इथपासून लागते. सकाळी उठल्यावर मुलाचे पोट साफ होणे आवश्यक असून त्याने शाळेत जाण्यापूर्वी न्याहरीदेखील करायला हवी. पोट साफ न होणे किंवा न्याहरीशिवायच शाळेत जाणे यात वर्गात लक्ष न लागण्याची समस्या मोठय़ा प्रमाणावर दिसते.

लहान मुलांचे जेवण साधे पण चौरस हवे. हिरव्या पालेभाज्या व पिवळ्या व केशरी रंगाची पक्व फळे बालकांना जरुर द्यावीत. कंदमुळे, अंकुरित कडधान्ये व आंबवलेले पदार्थ, डाळी, उकडलेल्या अंडय़ांचे पांढरे हे पदार्थ आहारात गरजेचे. पुरेसे पाणी पिणेही आवश्यक.

मूल शाळेत जाऊ लागल्यानंतर हळूहळू त्याला व्यायामाचीही सवय लावावी. दररोज किमान अर्धा तास मैदानावर खेळणे गरजेचे आहे. या वयात सूर्यप्रकाश अंगावर पडणे आवश्यक असून सकाळी ११ ते दुपारी १ या वेळातले ऊन ‘ड’ जीवनसत्त्वासाठी महत्त्वाचे असते. मुलांचा टीव्ही बघण्याचा वेळही सुरुवातीपासूनच मर्यादित असेल याकडे लक्ष द्यावे. मोबाइल आणि त्यातली विविध अ‍ॅप्स पालकांनीच मुलांसमोर वापरणे कमी करावे, त्याऐवजी वेळ मिळेल तेव्हा मुलांबरोबर मोकळ्या हवेत फिरायला जाणे केव्हाही चांगले.

शिंकताना वा खोकताना नाकातोंडावर रुमाल धरणे, उघडय़ावर न थुंकणे, जेवण्यापूर्वी हात धुणे, वैयक्तिक स्वच्छता ठेवणे या चांगल्या सवयी त्यांना याच वयात लागणार आहेत हे पालकांच्या लक्षात हवे.

डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ

महिला :

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने पौगंडावस्थेतच आहार आणि व्यायामाला सुरुवात गरजेची असते. या वयात या गोष्टींकडे दुर्लक्ष होत गेल्यास स्थूलता, पॉलिसिस्टिक ओव्हरीज (पीसीओडी) या गोष्टींना सुरुवात होऊ शकते.

स्त्रियांच्या शरीरात मुळातच लोह कमी असते व पाळी आल्यावर त्यावर आणखीनच परिणाम होतो. त्यामुळे पाळी आल्यानंतर १२ ते १४ ग्रॅम हिमोग्लोबिन हवे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

आशिया खंडातील स्त्रियांची प्रजननक्षमता वयानुसार तुलनेने लवकर कमी होत जात असल्याने ज्या स्त्रियांना मुलाला जन्म देण्याची इच्छा आहे त्यांनी त्यासाठी योग्य वेळी प्रयत्न करायला हवेत.

४० ते ५५ वर्षांपर्यंतच्या वयात- म्हणजे रजोनिवृत्तीच्या काळात स्थूल न होण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात, कारण स्थूलतेत पोट आणि नितंबांवर साठलेली चरबी उच्च रक्तदाब व मधुमेहाला आमंत्रण देते.

चाळिशीनंतर वर्षांतून एकदा स्तनांची ‘मॅमोग्राफी’ तपासणी, ‘एचपीव्ही’ किंवा ‘पॅप स्मिअर’ ही गर्भाशयाच्या पिशवीच्या कर्करोगाची तपासणी आणि गर्भाशयाच्या आतील स्तर व अंडकोष यांची सोनोग्राफी या तपासण्या करून घ्यायला हव्यात.

रजोनिवृत्तीनंतर म्हणजे ५५ वर्षांनंतरही स्थूलता टाळण्यासाठी प्रयत्न हवेत. व्यायाम तर हवाच, पण हाडे ठिसूळ होण्यास सुरुवात होत असल्याने रोजचे जीवन शांततेचे हवे.

डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ

तरुण :

तरुणांचा आहार आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचा. तरुणांमध्येही महाविद्यालयात जाण्यापूर्वी न्याहरी करत नसल्याचेच अधिक दिसते, पण लक्ष लागण्यासाठी सकाळची न्याहरी गरजेचीच. त्याशिवाय दोन वेळचे सकस जेवण व मधल्या वेळचे खाणे असे ४ ते ५ वेळा तरुणांनी थोडे-थोडे खावे.

पंचविशीच्या आतल्या मुलामुलींनी रोज दूध प्यायलाच हवे. शिवाय जेवणानंतर एक फळ खावे. यात अगदी सहज मिळणारे, स्वस्त व पोषक असे केळे तरी खावेच.  जेवणानंतर आपण जे पाणी पितो त्याव्यतिरिक्त एक ते दीड लिटर पाणी प्यायलाच हवे.

पिझ्झा, बर्गर, वडापाव, समोसा असे जंक फूड, कोला, बेकरी उत्पादने कधीतरी चालेल, पण रोज ते टाळावे.

सहज गंमत म्हणून किंवा मित्रांच्या संगतीत व्यसन एकदा तरी करून पाहण्याकडे अनेकांचा कल असतो. पण पुढे ते हळूहळू वाढत जाऊ शकत असल्याने धूम्रपान, मद्यपान वा गुटखा-तंबाखू ही व्यसने पूर्णत: टाळावीत. सतत बाहेर कॉफी पिणे किंवा एनर्जी ड्रिंक पिणे हेही व्यसनच आहे व त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.

प्रत्येक तरुणाने आठवडय़ात किमान ४ दिवस चालणे, धावणे, पळणे, जॉगिंग, सायकलिंग यांपैकी एखादा व्यायाम तसेच हाडे व स्नायू बळकट होण्यासाठी जिममध्येही व्यायाम करावा. त्याला प्राणायाम व ध्यान यांचीही जोड हवी. वजन व उंचीचे गुणोत्तर योग्य सांभाळणे गरजेचे.

रात्रीची जागरणे व दुपारची झोप टाळा. रात्री साडेसहा ते साडेसात तास झोप हवीच.

डॉ. अविनाश भोंडवे, फिजिशियन

वृद्ध :

नियमित प्रतिबंधक आरोग्य तपासण्या गरजेच्या. या ‘रुटीन’ तपासण्यांमधून अनेक आजार वेळीच लक्षात येऊ शकतात. हाडे ठिसूळ होण्याच्या व इतरही आजारांमध्ये प्रतिबंधक म्हणून वृद्धांना कॅल्शियम, ‘डी’ व ‘बी-१२’ जीवनसत्त्व, लोह असे घटक बाहेरून घेण्यास सुचवले जाते. ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावेत.

या वयात काही लशी घेण्याचा फायदा होतो. साठीनंतर किंवा ६५ वर्षे वयानंतर दरवर्षी ‘फ्लू’ची लस, ६५ व्या वर्षी ‘न्यूमोकोक्कल’ लस घेण्यास सांगितले जाते. नागीण (हर्पिस) या आजारावरील लस आता देशातही उपलब्ध झाली आहे. या आजाराचे प्रमाण मोठे असून त्यात खूप वेदना होतात. नागिणीवरील ही लस साठीनंतर एकदाच घ्यावी तसेच धनुर्वाताचीही (टिटॅनस) लस या वयात घेण्यास सुचवले जाते.

वृद्ध मंडळी पाय घसरून किंवा लहानसा अपघात होऊन पडल्यास खुब्याच्या हाडास फ्रॅक्चर होणे, डोक्यास मार लागणे किंवा स्नायू दुखावण्याचा प्रकार होऊ शकतो. हे टाळण्यासाठी छोटी का होईना, पण खबरदारी घ्यायला हवी. बाथरूम निसरडे नसावे, तसेच वृद्धांना जाण्यास सोपे जावे यासाठी बाथरूममधील दिवा रात्रीही सुरू ठेवावा.

चालू असणारी औषधे वेळच्या वेळी व नियमित घेणे फार गरजेचे आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह व हृदयविकारावरील औषधांचा डोस आवश्यकतेनुसार कमी-जास्त केला जावा यासाठी नियमितपणे डॉक्टरांची गाठ घ्यायला हवी.

या वयात चांगल्या मानसिक आरोग्यासाठी स्वत:ला कोणत्या तरी कामात गुंतवून घ्या. इतर ज्येष्ठ नागरिकांशी, नातेवाईकांशी आणि कुटुंबातल्या लोकांशी आवर्जून संवाद साधा. एकटेपणा, नैराश्य आणि चिंता कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.

या वयात अगदी व्हॉट्सअ‍ॅप वा फेसबुक वापरता आले नाही तरी परगावी असलेल्या मुलानातवंडांशी बोलण्यासाठी आणि ज्ञान व करमणूक यासाठीही संगणक व इंटरनेटचा वापर शिकून घ्यायलाच हवा.

मुख्य म्हणजे जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन हवा. तो ठेवला की अनेक तक्रारी सुटणे सोपे होते.

डॉ. संदीप तामणे, जराचिकित्सा तज्ज्ञ

मोजमाप आरोग्याचे रक्तज्ञान

मानवी शरीरातील एकूण रक्त : ५ ते ६ लिटर

सामान्य रक्तदाब : १२०/८० मिमी/ पाऱ्याची उंची

लाल रक्तपेशींची संख्या : पुरुष – ५ ते ५.५  दशलक्ष /क्युबिक सेंटीमीटर स्त्री – ४.५ ते ५ दशलक्ष /क्युबिक सेंटीमीटर

लाल रक्तपेशींचा जीवनकाळ : १२० दिवस

पांढऱ्या रक्तपेशींचा जीवनकाळ : २ ते ५ दिवस

पांढऱ्या रक्तपेशींची संख्या : ५००० ते १०,००० /क्युबिक सेंटीमीटर

रक्तातील प्लेटलेट्स : दोन लाख ते चार लाख क्युबिक सेंटीमीटर

हिमोग्लोबिनचे प्रमाण : पुरुष – १४ ते १६ ग्रॅम/ १०० घनसेंटीमीटर स्त्री – १२ ते १४ ग्रॅम/ १०० घनसेंटीमीटर

मुख्य रक्तगट : ‘ए’, ‘बी’, ‘एबी’, ‘ओ’

सर्वयोग्य दाता रक्तगट :  ‘ओ’

सर्वयोग्य ग्राही रक्तगट : ‘एबी’