News Flash

पिंपळपान : आघाडा

ही वनस्पती पावसाळय़ात सर्वत्र उगवते. हिचे पालकवर्गाशी खूप साम्य आहे.

‘‘अपामार्गस्तु तिक्तोष्ण: कटुक: कफनाशन:।

अर्श: कण्डू दरामघ्नो रक्त हृद्ग्राहिवान्ति कृत्॥’ ध. नि.

‘श्रावणमासी हर्ष मानसी’ असे आपल्या समाजात सर्वत्र आनंददायी वातावरण श्रावण महिन्यात असते. माझ्या लहानपणापासून पुणे शहरातील लहान-मोठय़ा गल्लीबोळात सकाळी, सकाळी, ‘आघाडा, दूर्वा, फुले’ असा खूप मोठा आग्रही आवाज ऐकू येत असतो. आपल्या समाजातील बहुसंख्य महिला या खूप खूप धार्मिक असतात व त्यामुळे या महिन्यात कोवळय़ा दूर्वा, तेरडय़ाची विविधरंगी फुले याबरोबर आघाडय़ाच्या छोटय़ा फांद्याना खूप खूप मागणी असते.

ही वनस्पती पावसाळय़ात सर्वत्र उगवते. हिचे पालकवर्गाशी खूप साम्य आहे. आघाडय़ाच्या दोन जाती आहेत. एक पांढरा व दुसरा लाल रंगाचा. पाने समोरासमोर  हृदयाकृती असतात. त्याला लांब तुरे येतात. त्यावरील बी कपडय़ांना चिकटते. औषधात याचे पंचांग वापरतात. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आघाडय़ाची जून झाडे उपटून, स्वच्छ धुऊन व सुकवून संग्रहित करावी. खूप थंडी पडल्यावर, स्वच्छ जागेवर सकाळच्या प्रहरी झाडे जाळून त्याची राख जमवावी. अशी राख सहापट पाण्यात मिसळावी. चांगली ढवळावी. अध्र्या तासाने ते पाणी वस्त्रगाळ करून, गाळलेले पाणी उन्हात सुकवावे; म्हणजे मिठासारखा क्षार जमतो. हा क्षार चांगल्या बुचाच्या बाटलीत  ठेवावा. या क्षारात भिन्न भिन्न रासायनिक द्रव्य असतात. विशेषकरून जवखार, चुना व सूर्यक्षार यांचे प्रमाण जास्त असते. पानांमध्ये राख जास्त प्रमाणात असते. त्याच्या खालोखाल मुळांमध्ये सापडते. फांद्यांमध्येही मोठय़ा प्रमाणावर जवखार असतो. आघाडय़ाची राख वैद्यकीय द्रव्यात अग्रगण्य आहे.

आघाडा कडू, तिखट चवीचा, तीक्ष्ण गुणाचा आहे. त्यामुळे चांगली भूक लागणे, आम्लता नाहीशी करणे, रक्ताचे प्रमाण वाढविणे व रक्तशुद्धी करणे अशी कामे होतातच. पण त्याहीपेक्षा आघाडय़ाचे मोलाचे कार्य, त्याच्या संस्कृत नांवात – अपामार्ग या संज्ञेत सांगितलेले आहे. आपल्या शरीरात विविध अवयवांत पाण्याचे खूप मार्ग आहेत. या मार्गात काही कारणाने अडथळे निर्माण होतात. विशेषत: मूत्रवाहिनी, मूत्रपिंड यामध्ये बारीक काटे असणारे मूतखडे- युरिनरी स्टोन निर्माण होतात, त्यामुळे संबंधित रुग्णास पाठीत व कंबरेच्या भागात विलक्षण वेदना होतात. अशा वेळेस आपल्या जवळपास आघाडा असल्यास त्याचा स्वरस किंवा चूर्ण किंवा काढा त्वरित घ्यावा. एक-दोन दिवसांत मूतखडय़ाचे बारीक कण विनासायास बाहेर पडतात आणि रुग्णाला बरे वाटते. दोन्ही प्रकारच्या आघाडय़ाला फुलांनंतर तांदुळासारख्या बारीक सूक्ष्म बियांचे कळे येतात. त्याला ‘अपामार्ग तंडुल’ अन्वर्थक संस्कृत नाव आहे.

अमाशयाच्या विकारात आघाडाचूर्ण कडू द्रव्याबरोबर, रक्तविकारात लोहाबरोबर, फुफ्फुसाच्या विकारात सुगंधी व स्निग्ध द्रव्याबरोबर, मूत्रपिंडविकारात स्निग्ध द्रव्याबरोबर आणि सर्व पित्तविकारात यकृताबरोबर काम करणाऱ्या कोरफडीबरोबर द्यावे. आघाडय़ांमध्ये मृदू स्वभावी मूत्रजनन गुणधर्म आहे. त्यामुळे हृदरोग, विविध सांध्यांचे विकार, गरमी, परमा अशा विकारांत पंचांगाचा काढा किंवा आघाडाक्षाराचा लगेच फायदा होतो. मूत्रेंद्रियाच्या विकारात आघाडा, गोखरू, ज्येष्ठमध व पहाडमूळ असा काढा, नि:काढा द्यावा. हरी परशुराम औषधालयाच्या फलत्रिकादि काढय़ाचा वापर अमांशविकाराकरिता प्रामुख्याने केला जातो. त्यात आघाडाचूर्ण हे प्रमुख द्रव्य आहे. तसेच हट्टी दंतशूलविकाराकरिता मयूर दंतमंजनाचा वापर होतो. त्यात आघाडाचूर्ण हे प्रमुख घटक द्रव्य आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 12:35 am

Web Title: aaghada
Next Stories
1 टॅटू काढताय?.. काळजी घ्या!
2 पिंपळपान : अशोक
3 राहा फिट : चरबी – आवश्यक आणि अनावश्यक
Just Now!
X