16 October 2019

News Flash

सेलिब्रेशन करा, पण..

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी होणाऱ्या मृत्यूंपैकी सहा टक्के मृत्यूचे कारण मद्यपान आहे.

|| डॉ बिपीनचंद्र भामरे, हृदयरोगतज्ज्ञ

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी होणाऱ्या मृत्यूंपैकी सहा टक्के मृत्यूचे कारण मद्यपान आहे. मद्याच्या सतत सेवनामुळे यकृतावर वाईट परिणाम होतो. हळूहळू यकृत आकुंचन पावते. पेशी काम करेनाशा होतात. या स्थितीला लिव्हर सिरोसिस म्हणतात. स्टडीज ऑन अल्कोहोल अ‍ॅपण्ड ड्रग्जच्या सर्वेक्षणानुसार कमी वयात दारूचे व्यसन लागल्यास ती सोडल्यावर त्याचे परिणाम दीर्घ वयापर्यंत दिसून येतात. त्यामुळे वय वाढल्यावर अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. वेस्टर्न अफेअर्स हेल्थ केअर सिस्टिमच्या संशोधकांच्या मते दारू सेवनाने मेंदूच्या काही भागावर दुष्परिणाम होतो. दारू सोडली तरी अशा व्यक्तींना समस्या निर्माण होऊ  शकतात.

दारूच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम

  • अति मद्यपानामुळे हेपेटायटिस, यकृत आणि अन्य इंद्रियांमध्ये ऱ्हासकारक बदल होऊ शकतात.
  • पोटाचा अल्सर, जठराला सूज येणे तसेच अनेक पाचक समस्या निर्माण होतात.
  • उच्च रक्तदाब आणि हृदयरोग जडण्याची अधिक शक्यता असते.
  • महिलांना पाळीविषयक समस्या जाणवू शकतात.
  • तोंड, यकृत, घसा आणि स्तनाचा कर्करोग होण्याचा संभव असतो.
  • गर्भधारणेच्या दरम्यान मद्यपान केल्याने गर्भपात होण्याची शक्यता असते, तसेच फेटल अल्कोहोल सिंड्रोम होऊ शकतो. म्हणजे गर्भातील अर्भकामध्ये दोष निर्माण होऊ  शकतात.

हॉलिडे हार्ट सिंड्रोम (एचएचएस)

सुट्टय़ांच्या आनंदाच्या भरात हृदयाला होणारा त्रास फारसा परिचित नाही. त्याला हॉलिडे हार्ट सिंड्रोम (एचएचएस) असं म्हणतात. मद्यपानाचे परिणाम किती गंभीर असतील, हे प्रामुख्याने मद्यपानाचे प्रमाण आणि त्या व्यक्तीच्या वैद्यकीय भूतकाळावर अवलंबून आहे. अधिक प्रमाणात मद्यपान केल्यास उलटय़ा होणे, शुद्ध हरपणे, स्वादूपिंडाचा दाह होणे असा त्रास होतो आणि काही वेळा मृत्यूही ओढवण्याची शक्यता असते. वारंवार बेधुंदपणे मद्यपान करण्याने आरोग्याच्या इतर गंभीर तक्रारी उद्भवू शकतात. अनियंत्रित उच्च रक्तदाब, इस्कॅमिक हृदयरोग किंवा हृदय बंद पडण्याचा त्रास असणाऱ्यांसाठी मद्यपानापासून दूर राहणेच उत्तम.

मद्यपानामुळे गंभीर आजारांना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते, हा धोका वेळीच लक्षात घ्या. सेलिब्रेशन म्हणजे जंकफूड, धूम्रपान, मद्यपान नसून आरोग्याची नासाडी करणारा मार्ग आहे. तेव्हा सेलिब्रेशनच्या पद्धती बदला आणि नवीन वर्षांत आरोग्याची समृद्धी मिळवा.

First Published on December 25, 2018 12:53 am

Web Title: alcoholic drink not good for health 2