-डॉ. अद्वैत पाध्ये

Adwaitpadhye1972@gmail.com

विवाह हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा! अनेक जणांसाठी आनंदाची, पण काही वेळा काही जणांसाठी ताणतणावाची, कोंडमारीची बाब होते. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. मग त्या स्वर्गातल्या गाठी कधी जुळणार ते ज्योतिषाला विचारायचे, मग कुंडली, पत्रिका जुळवायच्या, थाटामाटात (हुंडा देऊन/ न देऊन/ कमी देऊन) विवाह होणार, ‘लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची’ वगैरे गाणी असलेल्या व्हिडीओ सीडी बनणार. काही दिवस असे नवलाईचे, आनंदाचे सणवाराचे संपले की कोणालाही वास्तवाचे काटे टोचतातच! कोणी त्या काटय़ांच्या टोचण्यावर मात करून गुलाबी सुगंध घेणार तर कोणी त्या काटय़ांची वेदना सहन करत राहणार, तर कोणी त्या विरुद्ध विद्रोह करणार!

गुलाबी सुगंध घेणारे तर खूप आहेतच, पण पूर्वी काटे टोचून विद्ध झाले तरी वेदना सहन करत, कोंडमाऱ्यात जगत राहणाऱ्यांची संख्या जास्त असायची. काटे हे टोचतातच, नवीन भूमिकात फिट बसायला, त्या नीट जमेपर्यंत! पण आताशा थोडे जरी काटे टोचले तरी लगेच विद्रोहाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. काहींचे काटे खरेच भयानक अणकुचीदार असतात. पण काहींना अणकुचीदार नसले तरी, थोडेसे टोचले तरी ते खूप टोचणारे वाटतात आणि मग धीर संपतो, विद्रोहाची वाट चोखाळली जाते आणि हे प्रमाण वाढत चालले आहे, जे चिंताजनक आहे!

विद्याचे लग्न ठरले. अगदी एकमेकांना बघून पसंती झाली. पत्रिका नीट जुळल्या होत्या. त्यानंतर दोघं भेटायचे, फिरायला जायचे. चित्रपट पाहायचे, दोघांची जोडी घरच्यांना अगदी ‘मेड फॉर इच अदर’ वाटायची. दोघेही उच्चविद्याविभूषित, चांगल्या लठ्ठ पगाराची नोकरी असलेले. विद्याच्या घरी फक्त आईवडील आणि ती! तर गौरवच्या घरी तो, त्याचे भाऊ, बहीण, आजी. शिवाय पै पाहुणे घरात असायचेच. गौरवची आई शिक्षिका होती, पण नंतर नोकरीची तशी गरज नसल्याने गृहिणी झाली होती. विद्याच्या घरी, आई-वडील दोघेही नोकरी करणारे, फारसे नातेवाईक नाहीत. वडील बहुराष्ट्रीय कंपनीत असल्यामुळे सामाजिक वावर फक्त पाटर्य़ामधूनच असायचा. त्यामुळे विद्याला ठरावीक वर्तुळाचीच सवय तर गौरव एकदम सर्वच प्रकारच्या वर्तुळांची सवय असलेला होता.

थाटामाटात, कार्पोरेट स्टाइलमध्ये विद्या-गौरवचा विवाह सोहळा आणि नंतर मधुचंद्र झाला. दोघांचेही दैनंदिन आयुष्य सुरू झाले. गौरवच्या भूमिकेत फक्त पतीच्याच भूमिकेची भर पडली, तर विद्याला मात्र अनेक भूमिका नव्याने वठवायला लागत होत्या. नव्याची नवलाईमुळे कौतुक होते पण जसे दिवस सरत होते तशा अपेक्षा वाढत होत्या. ऑफिसचे काम, घरचे काम, पाहुण्यांची सरबराई, सासू, आजेसासू या सर्वाची सवय नसलेली विद्या घायकुतीला यायची. त्यामुळे मधुचंद्राला दिसलेली विद्या, गौरवला मिळायचीच नाही. त्यात मित्रमंडळ, पाहुणे आले की त्यात गौरव रमत असल्याने विद्याला एकटा हवा असलेला गौरव मिळायचा नाही.

हा सर्व वृत्तान्त रोज आईला असायचाच. गौरव-विद्याची रात्री रोज धुसफुस थोडी थोडी असायचीच. शेवटी वर्ष व्हायच्या आत विद्याने गौरववर बॉम्ब टाकला, की आपण वेगळे राहू या. आपण आपला दोघांचा वेगळा संसार थाटू या. झालं, मोठय़ाच वादाला तोंड फुटले, गौरवने मोठेच भांडण केले. आतापर्यंत जाणवलेल्या चुकांचा (पण मनात ठेवलेल्या) पाढा वाचला, त्यानेच नाही तर घरातल्या सर्वानीच. मग विद्याचाही क्रोधाग्नी भडकला आणि विद्या आपले सामान घेऊन माहेरी राहायला आली. आता ते पुढे काय करणार? समुपदेशन करून पुन्हा एकत्र यायचा प्रयत्न करणार की घटस्फोटाच्या मार्गावर जाणार ते येणारा काळ ठरवणार होता.

त्यांनी समुपदेशनाचा मार्ग निवडला खरा, पण तिथं समुपदेशकासमोर पुन्हा तोच तमाशा व्हायला लागला. दोघेही आपल्या त्याच भूमिकांवर अडून राहत होते. मग हळूहळू हट्टाच्या, पूर्वग्रहाच्या भिंती ढासळायला सुरुवात झाली होती. अर्थात ही खूपच दीर्घकाळ चालणारी गोष्ट दिसत होती. नातेसंबंधांच्या धाग्यांना पडलेल्या गाडी सोडवणे, धागा न तुटता हे फार कौशल्याचे काम असते.

पण नक्की काय झाले होते? दोघांनी आपल्या विवाहाचा नीट अभ्यास केला नव्हता. विवाहाचा अभ्यास? हो. विवाहाचा अभ्यास! म्हणजे एकमेकांचे स्वभाव जुळतात का, नसतीलच जुळत तर काय करायचे, थोडीच समस्या असेल तर आपल्या अपेक्षा, वागणे विचार यात कसा बदल करायचा, विवाह म्हणजे नक्की काय त्यात अपेक्षित आहे, एकमेकांकडून काय अपेक्षा आहेत, आपण कोणत्या वातावरणात वाढलो आहोत, कोणत्या वातावरणाची अपेक्षा आहे.. या सर्वाची चर्चा एकमेकांसोबत झालीच नव्हती. वैयक्तिक, कौशल्य, स्वभाव त्यासाठी काय देवाणघेवाण अपेक्षित आहे, या सर्वाची चर्चा परस्परात किंवा समुपदेशकासमोर आधीच झाली असती तर ही वेळच आली नसती. विवाह समुपदेशनाची म्हणूनच नितांत गरज आहे, विवाहपूर्व, विवाहोत्तर समुपदेशनाची खूप गरज आहे. प्रख्यात  गीतकार व कवी गुलजार यांनी म्हटलंच आहे,

मुझको भी कोई तरकीब सिखा कोई यार जुलाहे

अक्सर तुझे देखा है की ताना बुनते

जब कोई तागा टूट गया था खत्म हुआ,

फिर से बांध के

और सिरा कोई जोड के

उसमें आगे बुनने लगते हो

तेरे इस ताने में लेकिन इक थी गांठ बुनतर की

देख नहीं सकता हैं कोई यार जुलाहे!

(क्रमश:)