19 January 2019

News Flash

पिंपळपान : वासनवेल

वासनवेलीचे लोमयुक्त, बहुवर्षांयु वेल मोठमोठय़ा बंगल्यांच्या कुंपणावर हटकून सापडतात.

(संग्रहित छायाचित्र)

‘छिलहिप्टोमहामूल: पातालगुरुडाव्हय:। छिल्लहिण्ट: परंवृष्य: कफघ्न: पचनापह:।’

(भा. प्र.)

वासनवेलीचे लोमयुक्त, बहुवर्षांयु वेल मोठमोठय़ा बंगल्यांच्या कुंपणावर हटकून सापडतात. ही वेल पावसाळ्यात बहरते. काही ठिकाणी मात्र हिचे वास्तव्य बाराही महिने असते. ही वेल डोंगराळ भागात होत नाही. पहिल्या वर्षी या वेलीचे क्षुप सावकाश वाढते आणि त्यानंतर या वेलीचे ताणे जमिनीवर लांबपर्यंत पसरत जातात. ताणे मृदु, लोमयुक्त असतात. जुन्या वेलीचे ताणे लांब, चिवट असल्यामुळे त्यांचा उपयोग टोपल्या करण्यासाठी केला जातो. पाने-दोन ते तीन इंच लांब, फुले पिवळी, आकाराने छोटी असतात. फळे वाटाण्याच्या आकाराची गुळगुळीत काळ्या रंगाची असतात. त्यातील रसही काळ्या रंगाचा असतो. मूळ आडवे कापल्यास फिक्कट पिवळे आणि कंकणासरख्या काचरी असलेले असतात. मुळांना तिखट, ओळखण्यासारखा सुगंध येतो. मुळांची चव उग्र, किळसवाणी आणि कडू असते. वस्तादनी, पातालगरुडी (संस्कृत), छिरहटा (हिंदी), भुईपाडळ (कोंकणी), जलजन्मी या नावांनी वासनवेल ओळखली जाते.

वासनवेलीचे मूळ उष्णवीर्य पण मृदू स्वभावी, बल्य, मूत्रजनन आणि शमन क्रिया करणारे आहे. मुळांची क्रिया उपळसरीच्या मुळांसारखी किंवा सारसापरिलासारखी होते. शरीराचे किंवा लघवीला आग होत असल्यास वासनवेलीच्या मुळांचा काढा वापरावा. वासनवेलीची पाने ठेचून मुकामार, ठेच याकरिता लेप लावल्यास खात्रीने गुण मिळतो. वारंवार लघवी होत असल्यास वासनवेलीच्या मुळांचा काढा घ्यावा.

शिरीष

‘तिक्तोष्णा विषहा वण्र्य स्निग्ध दोषशमनो लघु:।

शिरीष: कुष्ठकण्डूघ्नस्त्वग्दोष श्वासकासहा।।’   ध. नि.

पुणे, मुंबई यांसारख्या मोठय़ा हमरस्त्यावर दुतर्फा शिरीषाचे खूप मोठय़ा आकाराचे वृक्ष आपले लक्ष वेधून घेतात. याची पाने हिवाळ्यात झडून जातात. मात्र फुले दीर्घकाळ हमरस्त्यावरून जाणाऱ्यांचे लक्ष त्याच्या मोहक रंग पिवळा-पांढरा गोल आणि सुगंधाने वेधून घेतात. शिरीषाच्या बिया बाहव्याच्या शेंगेसारख्याच, आकाराने लहान पण कठीण असतात. शेंगाची रुची वांतीकारक, तिखट असूनही पोपटांना या शेंगा फार प्रिय असतात. शिरीषाच्या सालीचा उपयोग मासेमाऱ्यांच्या जाळी रंगवण्याकरिता करतात. औषधात पंचाग वापरतात. शिरीष पंचांग पौष्टिक, वाजीकर, ग्राही व विषघ्न आहे. शुक्र पातळ झाल्यास बियांचे चूर्ण वा सालीचे चूर्ण दूध, साखर किंवा तुपाबरोबर घ्यावे. जुनाट गंडमाळा विकारात शिरीषाच्या बियांचा दाट लेप बाहेरून लावावा. तसेच सालीचे चूर्ण पोटात घ्यावे.

शिरीष (संस्कृत), शिरस (मराठी.), सिरस (हिंदी.) सरसडो, काळीयो (गुजराथी) गिरीशमु (तामिळ) अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या शिरीषाची साल वण्र्य गुणाची असल्यामुळे ह. प. औषधालयाच्या दशांगलेप या औषधात वापरली जाते. त्यामुळे हट्टी तारुण्यपीटिकांवर लवकरच मात होते.

– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

कचरा डेपोमुळे पाणी प्रदूषित

First Published on April 3, 2018 3:36 am

Web Title: article about ayurvedic plant