News Flash

मधुमेहींचा आहार

खाण्याच्या बाबतीत माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. तो रोज सकाळी उठून अन्न शोधायची वणवण करत नाही.

(संग्रहित छायाचित्र)

केवळ काय खायचं हा प्रश्न मधुमेहाच्या बाबतीत पोकळ ठरतो. रुग्णाने किती खाल्लं, कोणत्या वेळी खाल्लं, कुठल्या पद्धतीत ते शिजवलं आणि शिजवत असताना त्यात काय आणि किती गोष्टी घातल्या हेही तितकंच महत्त्वाचं ठरेल. शिवाय प्रत्येक मधुमेही माणसाची अन्न पचवायची क्षमताही वेगवेगळी असते. प्रत्येक माणसाला एकाच वयात एकाच वेळी मधुमेह झालेला नसतो. मधुमेहाचा पचनसंस्थेवरही परिणाम झालेला असू शकतो.

खाण्याच्या बाबतीत माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. तो रोज सकाळी उठून अन्न शोधायची वणवण करत नाही. त्याचं सगळं आयतं असतं. दुसरं म्हणजे तो अन्न शिजवून खातो. जगातल्या इतर यच्चयावत प्राण्यांना निसर्गात जसं उपलब्ध आहे, तसं कच्चंच खावं लागतं. तिसरा महत्त्वाचा फरक म्हणजे जिभेचे चोचले पुरवायला फक्त माणूसच तेल, मसाले, मीठ, साखर वापरतो. मेथी ही पाल्याची भाजी मधुमेहाला नक्कीच चांगली. पण एखाद्याने मलई मेथी मटार बनवून ती खाल्ली तर? त्यामुळे आहारतज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

मधुमेह जेवढा जुना तेवढा त्यानं शरीरातल्या इंद्रियांवर उत्पात केला असण्याची शक्यता अधिक. म्हणून कालपरवा मधुमेही बनलेली व्यक्ती आणि २० ते २५ वर्षांपासून त्याच्याशी झुंजणारा माणूस हे समान पातळीवर कसे असू शकतील? पुन्हा माणसागणिक रक्तातली ग्लुकोज वाढण्याची वेळ कमी-जास्त होते. इतकी अवधानं  पाळावी लागत असल्याने मधुमेहात काय खायचं आणि कसं खायचं याचं उत्तर सरसकट देता येणार नाही. त्यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला अतिशय मोलाचा ठरतो.

मधुमेहावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही आहाराचा सल्ला द्यावाच लागतो. फक्त तो देत असताना रुग्णाची आणि औषधांची सांगड घालावी लागते. रुग्ण काय खातो, कधी खातो, पेशंट किती शिकलाय, आम्ही सांगतो ते समजून घेण्याची त्यांची कितपत तयारी आहे, स्वत:च्या उपचाराविषयी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सामील व्हायला ते तयार आहेत का अशा अनेक गोष्टींची चाचपणी आम्ही करतो. त्यानुसार काय खायचं याबद्दल रुग्णाला माहिती देतो. मग ही माहिती कोण देणार हे ठरतं. आहारतज्ज्ञ सर्वात विस्तृत माहिती देतात. ते प्रथम तुमच्या खाण्याच्या सवयींची पूर्ण माहिती घेतात. याला हिस्टरी टेकिंग म्हणतात. मग तुमचं वय, वजन, दिवसभरात तुम्ही किती शारीरिक श्रम करता, तुम्हाला कुठला इतर आजार आहे का हे पाहिलं जातं. या सगळ्या गोष्टी एकत्रित लक्षात घेऊन मग तुमच्या खायच्या पद्धतींशी त्याची सांगड घातली जाते. एका कागदावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय खायचं ते सांगून प्रत्येक पदार्थाला पर्याय सुचवला जातो. वजन कमी करण्याचा सल्ला देताना तुम्हाला सगळी जीवनसत्त्वं, सगळे क्षारदेखील व्यवस्थित मिळतील याची दक्षता घेण्याचा द्राविडीप्राणायाम आहारतज्ज्ञ करतात. अनेक संदर्भ, अनेक व्यवधानं पाळून आहारतज्ज्ञ सल्ला देत असल्यानं तो बराच परिपूर्ण असतो.

दुसरा मार्ग असतो डायबेटिक नर्स एज्युकेटरचा. ती तुम्हाला औषध कसं घ्यायचं. पायाची काय काळजी घ्यायची, स्वत: स्वत:ची ग्लुकोज कशी तपासायची याबद्दल सांगताना खाण्याबद्दल माहिती देते. तिला पेशंटला बरंच काही समजवायचं असतं. त्यामुळे इतर माहितीसोबत खाण्याचं थोडंबहुत ज्ञान ती देते. अनेक क्लिनिकमध्ये ही सेवा मोफत असते. काही क्लिनिक मात्र त्यासाठी थोडासा आकार घेतात. ज्यांना हेदेखील परवडत नाही त्यांना समजावून सांगायचं काम स्वत: डॉक्टर करतात.

अर्थात आहारशास्त्र हा मोठा विषय असला तरी तो सोप्या पद्धतीने अवलंबता येतो. अगदीच थोडक्यात बोलायचं झालं तर थोडं खा, वेळेवर खा, ताजं खा आणि भरपूर भाज्या व फळं खा अशी चार सूत्रं तुमच्यासमोर ठेवता येतील. आपण पिष्टमय पदार्थ खूप खातो. त्यावर थोडं नियंत्रण असलेलं बरं. ढेकर दिला म्हणजे पोट नीट भरलं ही संकल्पना कालबाह्य करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. वजन नियंत्रणात राहील, असा आहार घेतलात की झालं. एकप्रकारे तुम्हाला अर्धपोटी जेवणावरून उठावं लागेल, असा काहीसा विचार हळूहळू जोर धरतो आहे. हा सल्ला सोपा वाटत असला तरी तो पाळणं अनेकांना अवघड जातं. पार्टीमध्ये गेल्यावर समोर आलेले पदार्थ संपवताना दिवसांच्या उष्मांकाचे (कॅलरी) समीकरण पार कोलमडते. १४०० कॅलरी, १६०० कॅलरी असं सांगितल्यावर भल्याभल्यांना अर्थबोध होणं कठीण आहे. सल्ला जेवढा काटेकोर तेवढा तो समजून घेणं आणि त्यावर अंमल करणं अवघड असतं. म्हणून मी बऱ्याचदा एकदम सोपा सल्ला देतो. हेदेखील स्पष्ट करतो की माझा सल्ला परिपूर्ण नाही. पण तो समजायला अतिशय सोपा आणि सहज पाळता येण्यासारखा आहे. शिवाय मधुमेह काबूत राहायलाही तो बऱ्यापैकी मदत करतो.

मी त्याला ‘१ मिनिट टेस्ट’ असं म्हणतो. पदार्थ तुम्ही तोंडात घातल्या घातल्या गोड लागला तर तो खाऊ  नका. अशा पदार्थामध्ये साखर, गूळ, मध वगैरे वज्र्य गोष्टी असण्याची शक्यता जास्त असते. एक मिनिट चघळल्यावर जर जरासा गोडसर लागायला लागला तर तो मर्यादेत खा. भाकरी, चपाती, पाव, बटाटे, भात असे पिष्टमय पदार्थ तोंडातल्या लाळेने थोडेसे पचतात. त्यांच्यातली ग्लुकोज मोकळी होते आणि तुम्हाला त्यांची थोडीशी गोड चव मिळते.

ल्ल जे पदार्थ एक मिनिट चघळल्यावरही जराही गोडसर होत नाहीत ते खुशाल हवे तेवढे खा. पालक, मेथी यांसारख्या पालेभाज्या, सलाड बरंच चघळूनही गोड लागत नाही. त्यांचं पचन तोंडात होतच नाही. त्यामुळे त्यांच्यात दडलेली ग्लुकोज बाहेर येत नाही.

ल्ल फक्त फळं या नियमाला अपवाद आहेत. कारण सगळीच पिकलेली फळं गोड लागणार. त्यांच्यासाठी वेगळा नियम वापरता येईल. ज्या फळांचा रस होत नाही ती टाळली की झालं. मग आंबा, केळं, सीताफळ, चिकू, फणस वगैरे बाद होतील.

ल्ल हा सल्ला माझाही वेळ वाचवतो आणि बऱ्यापैकी उत्तम काम करतो. मुख्य म्हणजे कोणालाही तो सहज समजतो, सहजपणे पाळता येतो. मग तुम्ही हॉटेलमध्ये जेवा की घरी, फारसा फरक पडत नाही.

अर्थात मधुमेहासोबत तुम्हाला इतर काही प्रश्न असतील तर त्याचाही विचार आहारात उमटावा लागतो. रक्तदाब असेल तर मीठ कमी ठेवावं लागतं. असे असताना जेवणातून कमीतकमी कसं जाईल ते पाहावं लागतं. मूत्रपिंडे निकामी झाली तर प्रथिने कमी ठेवण्याबरोबर पाणीपण ठरावीक प्रमाणात घ्यावं लागतं. तेव्हा मी असा ढोबळ सल्ला द्यायचं टाळतो.

– डॉ. सतीश नाईक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2018 4:09 am

Web Title: article about diabetic diet
Next Stories
1 हा खेळ भावनांचा..
2 मन:शांती : ताना बुनना
3 लोहाच्या गोळ्यांचा उपयोग
Just Now!
X