पाणी म्हणजे जीवन हे शाळेत असल्यापासून आपल्याला माहीत आहे, तसेच पाणी केव्हा आणि किती प्रमाणात प्यावे याबाबतही अनेकदा वाचत असतो. पाणी आणि इतर द्रव पदार्थाचे आहारातील महत्त्व यांबाबत या लेखातून माहिती घेणार आहोत.

मानवी शरीरात ६० ते ७० टक्के पाणी असते. शरीरातील तापमान नियंत्रित ठेवणे आणि शरीराच्या प्रत्येक इंद्रियाला पोषक द्रव्ये पोहोचवण्यामध्ये पाण्याचा मोलाचा सहभाग असतो. याव्यतिरिक्त पेशींना ऑक्सिजन पोहोचविणे आणि शरीरातले टाकाऊ  पदार्थ बाहेर टाकण्याचे कामदेखील पाणीच करत असते.

पाणी हा शरीरातील महत्त्वाचा घटक असल्याने योग्य प्रमाणात त्याचे सेवन करणे आवश्यक आहे. दिवसातून किमान एक ते तीन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरात पाण्याची गरज भासली की तहान लागते आणि मग आपण पाणी पितो. शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासल्यास थकवा येणे, गळाल्यासारखे वाटणे, हाता-पायांना गोळे येणे आदी लक्षणे जाणवायला लागतात. अशा वेळी तात्काळ पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे.

शरीराला पाण्याची किती गरज आहे हे वय, शारीरिक श्रम, भौगोलिक परिस्थिती आणि तापमान यांवर अवलंबून असते. शारीरिक श्रम कमी किंवा वातानुकूलित वातावरणामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना इतर व्यक्तींच्या तुलनेत तहान कमी लागते, असे असले तरी शरीराला आवश्यक तेवढे पाणी प्यायला गेले आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. ही खात्री करून घेण्याचा सोपा उपाय म्हणजे लघवीचा रंग. शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी प्राप्त होत असल्यास लघवीचा रंग स्वच्छ पांढरा असतो. पिवळ्याजर्द रंगाची लघवी झाल्यास शरीराला पुरेशा प्रमाणामध्ये पाणी मिळाले नाही असे समजावे.

अनेकदा कामानिमित्त दिवसभर बाहेर राहणाऱ्या महिलांना स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध नसते. या कारणास्तव मग त्या पाणी पिण्याचे टाळतात. काही व्यक्तींना वारंवार मलमूत्र विसर्जन करण्यासाठी जाण्याचा कंटाळा येत असल्यानेही ते कमी प्रमाणात पाणी पितात. त्यामुळे मूत्रपिंडाचे आजार उद्भवू शकतात. वारंवार मूतखडय़ाचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी जास्तीत जास्त प्रमाणात पाण्याचे सेवन करावे. व्यायाम करणाऱ्या लोकांनाही व्यायामाचा वेळ, खर्च होणारी शारीरिक ऊर्जा यांनुसार पाण्याचे सेवन करावे. व्यायामादरम्यान पाण्याचे सेवन करू नये, हा गैरसमज आहे. उलट व्यायाम करताना थोडे थोडे पाणी पिणे आवश्यक आहे; परंतु एकाच वेळेस मात्र खूप पाण्याचे सेवन करू नये.

घाम, त्वचा आणि उत्सर्जनाच्या माध्यमातून शरीरातील पाणी बाहेर टाकले जाते. भारतासारख्या उष्ण प्रदेशात शरीरावाटे पाणी बाहेर पडण्याचे प्रमाण तुलनेने जास्त असते.

शरीराला पाणी हे केवळ पिण्याच्या पाण्यातून येते असे नाही. आहारातून किंवा खाण्यातून एकूण पाण्यापैकी २० टक्के पाणी शरीराला प्राप्त होते. उर्वरित पाणी पिण्याच्या पाण्यातून किंवा फळांचा रस, ताक आदी द्रव्य पदार्थामधून मिळते. टोमॅटो, कलिंगड, काकडी यातूनही शरीराला भरपूर पाणी मिळते. शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहण्यासाठी काही विशिष्ट गोष्टींची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.

पावसाळा सुरू असताना अनेक प्रकारचे विषाणू पाण्यात मिसळतात. त्यामुळे पाणी पिताना विशेष काळजी घ्यायची गरज असते. घराबाहेर पडताना शक्यतो पाणी बरोबर ठेवणे हा पर्याय योग्य आहे. ते शक्य नसल्यास आपण पीत असलेले पाणी स्वच्छ आहे की नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. कारण सुरक्षित पाण्यामुळेच आपण उत्तम आणि निरोगी आयुष्य जगू शकतो.

चहा कॉफी – बऱ्याच जणांची सकाळची सुरुवात चहा-कॉफीने होते. ही उत्तेजक पेये असून त्यांच्या अतिरिक्त सेवनाने आम्लपित्ताचा त्रास होतो, तसेच शरीरामधील साखरेचे प्रमाणही वाढते.

दूध- दुधामध्ये उत्तम दर्जाची प्रथिने आणि कॅल्शियम असते. इतर कोणत्याही पदार्थातून न मिळणारे ‘बी १२’ जीवनसत्त्व दुधातून मिळते.

ताक- दुधातील लेक्टोज नावाची नैसर्गिक साखर बऱ्याच जणांना पचत नाही. दुधाचे दही लावल्यानंतर ताक करण्याच्या प्रक्रियेमध्ये या लेक्टोजचे रूपांतर लॅक्टिक अ‍ॅसिडमध्ये होते आणि ते पचण्यास हलके असते. याला प्रोबायोटिक फूड असे म्हणतात. याचा उपयोग पोटात आरोग्यदायी जिवाणूंची पैदास करण्यासाठी होतो. त्यामुळे पचन आणि जीवनसत्त्वाचे शोषण केले जाते.

फळांचा रस- फळे चावून खाणे हे फळांचा रस पिण्यापेक्षा खरे तर जास्त चांगले असते. फळांमध्ये तंतुमय पदार्थ अधिक प्रमाणात असतात. कृत्रिम सरबत, कोलायुक्त पेयांपेक्षा फळांचा नैसर्गिक रस पिणे शरीराला फायदेशीर असते. बाहेर उघडय़ावरील सरबत पिणे टाळावे, तसेच साखरेचा वापर करून तयार केलेले फळांचे रसही शक्यतो पिऊ  नयेत.

शहाळ्याचे पाणी- याला ‘नॅचरल सलाइन’ असे म्हटले जाते. यात अनेक क्षार असून कॅलरीजचे प्रमाण तुलनेने कमी असते. हे पाणी प्यायल्याने लघवीचे संसर्ग शक्यतो होत नाहीत.

नीरा- ही ताडीपासून मिळवली जाते. यात नैसर्गिक गोडवा असतो आणि अनेक क्षार असतात. त्यामुळे ही ऊर्जादायी असते.

भाज्यांचे सूप- विविध भाज्या उकडून त्याचे सूप प्यावे. शक्यतो सूप गाळू नये. त्यात अजिनोमोटो, क्रम, बटर, मक्याचं पीठ असे पदार्थ वापरू नयेत. फक्त मिरपूड, जिरे, आले आणि मिठाचा वापर करावा. एकदा सूप तयार केले, की गरम असतानाच ते प्यावे. परत परत उकळून सूप पिऊ  नये.

कोलायुक्त पेये- यात साखर आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे हाडांतील आणि दातांतील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन त्यांना नुकसान होऊ  शकते. त्यामुळे पाण्याला पर्याय म्हणून अशी पेये पिऊ  नयेत.

अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ