19 April 2019

News Flash

मन:शांती

त्यांच्या मुलीला दोन महिन्यांपासून झोप येत नव्हती, सतत घरातच गप्प बसून असायची

(संग्रहित छायाचित्र)

कुटुंब समुपदेशन

डॉ. अव्देत पाध्ये

‘डॉक्टर माझ्या, मुलीला नक्की बरं वाटेल ना?’

‘का हो असं का विचारताय?,

‘तसं काही नाही डॉक्टर, पण हा मनोविकार आहे, मी असं ऐकलंय की ते बरेच होत नाहीत, कायमच उपचार घ्यावे लागतात. अहो, आमच्या इमारतीमधल्या एका मुलीला गेली २५ वर्षे औषधोपचार चालू आहेत, कधी बरी असते, मध्येच बिघडते, माझ्या मुलीचं पण तसंच होणार नाही ना?’ मुलीची आई अतिशय काळजीने विचारत होती.

त्यांच्या मुलीला दोन महिन्यांपासून झोप येत नव्हती, सतत घरातच गप्प बसून असायची. धड जेवायची नाही. कशाकशातच लक्ष लागायचं नाही. टीव्ही बघणे, गाणी ऐकणे आधी तिला आवडायचे, मैत्रिणी खूप होत्या, पण आता तिला या कशातच आनंद वाटत नव्हता. आईवडील तिला ‘बाहेर’ दाखवूनही आले होते, पण काहीच उपयोग झाला नाही. म्हणून मग फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने ते मनोविकारतज्ज्ञांकडे आले होते. पण मनापासून स्वीकार नव्हता. अनेक ऐकीव गोष्टी, गैरसमजुतींमुळे एकूणच उपचार, उपचारांचा कालावधी, मुलगी बरी होणे या सर्वाविषयी तिच्या कुटुंबीयांचे मन अतिशय चिंताग्रस्त, कातर झाले होते. या सर्वाविषयी त्यांच्या शंकांचे फक्त निरसनच नव्हे तर त्यांना विकाराच्या सर्व पैलूंविषयी माहिती देणे खूप गरजेचे होते. तसेच तिच्याशी त्यांनी कसे वागावे, किंबहुना आतापर्यंतच्या वागण्यात काही बदल करणे आवश्यक आहे का, कोणते बदल करायचे हे सर्व त्यांना वेळोवेळी समजावणे गरजेचे होते. त्यात जे काही अडथळे येत असतील त्यावर काय उपाय करायचे हे त्यांना सातत्याने सांगावे लागणार होते. त्यामुळेच मुलीच्या औषधोपचाराबरोबरच तिचे वैयक्तिक समुपदेशन जसे आवश्यक होते तसेच कुटुंबीयांचे समुपदेशन तितकेच महत्त्वाचे होते.

मध्यंतरी एका आठ वर्षांच्या मुलाची आई त्याला घेऊन आली होती. तो शाळेत जायला तयार नव्हता. अभ्यासात त्याची अधोगती होत असे. त्यामुळे शाळेची वेळ झाली की त्याचे डोके दुखायचे, पोट दुखायचे अशा तक्रारी सुरू होत्या. त्यासाठी आवश्यक तपासण्या केल्या होत्या. त्या सर्व नॉर्मल होत्या. पण मुलाला खूप काहीतरी त्रास होतोय हे समजून त्याचे लाड मात्र पुरवले जात होते. त्यामुळे तो हट्टी मात्र बनत चालला होता. आता याचे निदान करून त्याप्रमाणे उपचार होणार होतेच, पण शेवटी मुलांच्या समस्या हाताळताना पालकांचे हाताळणे पण महत्त्वाचे ठरतेच. त्याप्रमाणे त्याच्या घरच्यांना आईवडील, आजी-आजोबा सर्वाना या मुलाशी कसे वागायचे, त्याचे चुकीचे वर्तन सुधारायला कसा हातभार लावायचा, त्याला आधार कितपत द्यायचा, त्याच्यात आत्मविश्वास येण्यासाठी वातावरण कसे ठेवण्याचा प्रयत्न करायचा, हे समुपदेशनातून वेळोवेळी सांगणे आवश्यक होते.

लहान मुलांच्या बाबतीत कैकवेळा शिक्षकांचे समुपदेशन किंवा मदत फार आवश्यक ठरते. विशेषत: अध्ययन अक्षमता (लर्निमग डिसअ‍ॅबिलिटी), गतिमंदत्व (स्लो लर्नर) वगैरे किंवा चंचलपणा वगैरे समस्यांच्या बाबतीत. कारण मूल शाळेत पाच ते आठ तास शिक्षकांबरोबरच असते. शाळेत त्याला समजून घेणे, योग्य पद्धतीने हाताळणे, मदत करणे तेवढेच आवश्यक आहे.

मुलांच्या बाबतीत समुपदेशन करताना बऱ्याचदा पालक खूप सकारात्मक असतात. ते बऱ्याचदा स्वत:च्या वागण्यात समुदपदेशक सांगतील तसे बदल घडवतात. पण काही पालक मात्र खूप आडमुठे असतात किंवा त्यांची अशीही भूमिका असते की आम्ही तुमच्याकडे मुलाला घेऊन आलो आहोत, त्याला सुधारा! तर काही जण सुधारल्यासारखे दाखवतात, तर काही वेळा एक पालक सुधारणा दाखवतो, दुसरा मात्र सुधारत नाही किंवा येणेच बंद करतो किंवा मुलासकट सर्वाचेच समुपदेशन बंद होते. असे होणे समुपदेशकालाही अपेक्षित नसते!

मध्यंतरी एका वृद्ध बाईंना घेऊन नातेवाईक आले होते. काही महिन्यांपासून त्यांना भास व्हायला लागले होते, झोप येत नव्हती, स्मरणशक्तीवर परिणाम झाला होता. मुली त्यांना आपल्याकडे ठेवायला तयार होत्या, पण बाई पूर्वापार विचारसरणीप्रमाणे जावयांकडे राहायला तयार नव्हत्या. मुलगा मात्र का-कू करत होता, कारण त्याची बायको तयार नव्हती. अशा वेळी त्या सर्वाचे समुपदेशन आवश्यक होते. प्रेम दिले तर या आजारात लहान मूल झालेले हे वृद्ध बरे राहतात, पण प्रेम आपण मनापासून द्यायला पाहिजे. स्मृतीभ्रंश/ ज्ञानभ्रंश (डिमेन्शिया) यांविषयी सर्व माहिती देऊन हाताळणी योग्य कशी हवी हे समजावणे त्यांची ‘मुले’ असणाऱ्या ‘पालकांसाठी’ अत्यावश्यक असते.

शेवटी मनोव्यवहारात परस्परसंवाद, संबध फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे तणावग्रस्त/ विकारग्रस्त मनाला सावरण्यासाठी, सशक्त करण्यासाठी असे सुदृढ परस्परसंबध, संवाद असणे अत्यावश्यक ठरते, त्यासाठी कुटुंबाचे समुपदेशन महत्त्वपूर्ण ठरते! चुकांतून शिकून, सुधारून मनोविकारात त्रस्त झालेली कुटुंबीयांची नाती जपण्याचे आणि त्यांच्या आयुष्यात आनंद फुलवण्याचे काम हे समुपदेशन करत असते, मंगेश पाडगावकरांनी म्हटल्यासारखे,

चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं!

First Published on August 7, 2018 3:56 am

Web Title: article about family counseling