18 January 2019

News Flash

बालआरोग्य : लहानग्यांचा ताप

औषधामुळे ताप उतरत असेल आणि ताप उतरल्यावर बाळ नेहमीसारखे खेळत असेल तर तुम्ही ४८-७२ तास वाट बघू शकता.

प्रतिनिधिक छायाचित्र

डॉ. गौरव नेरकर, बालरोगतज्ज्ञ.

बऱ्याचदा ॠतू कुठलाही असो, दवाखान्यात चिमुकल्यांच्या असणाऱ्या गर्दीचे मुख्य कारण हे त्यांना येणारा ताप असतो. वातावरणात थोडा बदल झाला की, चिमुकल्यांच्या तब्येतीवर परिणाम होतो आणि ती तापाने फणफणतात. ताप म्हटले की पालक घाबरतात. मात्र ताप येण्याची कारणे समजून घेतल्यास ताप शत्रू नव्हे, मित्र आहे असे लक्षात येईल.

आपण सभोवतालच्या वातावरणात अक्षरश: लाखो प्रकारचे जिवाणू, विषाणू असतात. हेच जिवाणू / विषाणू विविध मार्गाद्वारे शरीरात प्रवेश करतात आणि मग आपली रोगप्रतिकारशक्ती त्यांच्या विरोधात काही विशिष्ट प्रकारच्या रक्तपेशी आणि प्रतिजैव तयार करते. या दरम्यान शरीराचे तापमान वाढते. साध्या भाषेत सांगायचे तर हे वाढलेले तापमान आपल्याला जिवाणू आणि विषाणूशी लढण्यात मदत करते. लहान मुलांना येणाऱ्या तापाच्या अनेक कारणांपैकी जिवाणू / विषाणूचा शरीरात प्रवेश आणि मलेरियासारखे आजार ही प्रमुख कारणे आहेत.

विषाणू-जिवाणू-मलेरियामध्ये फरक कसा ओळखावा?

विषाणूचा ताप

सामान्यत: विषाणूच्या तापाची तीव्रता सुरुवातीच्या काळामध्ये जास्त असते आणि त्यासोबतच सर्दी, खोकला, अंगदुखी यासारखी लक्षणे दिसतात. हा ताप हळूहळू उतरून ४८ ते ७२ तासांमध्ये बरा होतो. या तापामध्ये प्रतिजैविकांचा वापर करणे चुकीचे असते. तापामुळे आलेले आजारपण कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्लय़ानुसार औषध देणे. त्याचप्रमाणे या काळात पुरेसे पाणी आणि इतर द्रव पदार्थ मुलांना पाजावेत. साध्या पाण्याने आंघोळ, मोकळी हवा आणि साध्या पाण्यात बुडवलेल्या कपडय़ाने अंग पुसून काढणे या उपायांमुळे ताप पटकन उतरण्यास मदत होते.

जिवाणूंचा ताप

हा ताप साधारणपणे हळूहळू चढतो व मुख्यत: ४८-७२ तासांमध्ये खूप प्रमाणात दिसायला लागतो. टॉन्सिल ग्रंथीचा जंतुसंसर्ग, मूत्र मार्गाचा जंतुसंसर्ग, फुप्फुसाला होणारा जंतुसंसर्ग असे आजार जिवाणूंमुळे होतात. या आजारांमध्ये प्रतिजैविकांचा वापर केला जातो. मात्र ती कशी, कोणती व किती घ्यावी यासाठी वैद्यकीय सल्ला गरजेचा आहे. औषधांचा डोस पूर्ण घेणेही आवश्यक आहे. काही वेळा या आजारांमध्ये रक्ताच्या तपासण्या कराव्या लागतात.

मलेरिया व तत्सम आजार

विशिष्ट जातीचे आणि संसर्ग असलेले डास चावल्याने मलेरिया व डेंग्यूसारखे आजार होतात. विशेषकरून पावसाळ्यात या आजाराचे प्रमाण खूप वाढते. मलेरियाच्या तापाला विशिष्ट आकृतीबंध नसतो. म्हणून या तापाला ‘एरिटीक फिव्हर’ म्हणतात. अंगात ताप असताना रक्ताचे नमुने घेतल्यास आजाराचे निदान अधिक स्पष्ट होऊ  शकते. क्लोरोक्वीन औषध मलेरियावर गुणकारी आहे.

डॉक्टरांकडे कधी जावे?

तापाच्या दोन लागोपाठ येणाऱ्या प्रसंगांमध्ये बाळाच्या हालचाली बघाव्यात.

तापाच्या पहिल्या दिवशी ताप कोणत्या कारणामुळे आला आहे हे सांगणे कठीण असते. औषधामुळे ताप उतरत असेल आणि ताप उतरल्यावर बाळ नेहमीसारखे खेळत असेल तर तुम्ही ४८-७२ तास वाट बघू शकता.

मात्र औषध दिल्यावरही ताप उतरला नाही आणि बाळ सुस्त पडून असेल तर त्वरित डॉक्टरकडे न्यावे.

तापाच्या तीव्रतेपेक्षा मुलावर तापाचा किती परिणाम आहे याला महत्त्व देणे आवश्यक आहे.

प्रत्येक सुजाण पालकांनी तापाबद्दल खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

’ प्रत्येक घरात एक चांगली तापमापी असणे गरजेचे आहे. आजकाल बाजारात मिळणाऱ्या डिजिटल तापमापीमुळे ताप मोजणे सोयीस्कर झाले आहे.

’ ताप आल्या आल्या लगेच मोजावा आणि त्याची नोंद करून ठेवावी. त्यामुळे नंतर तो वाढला की कमी झाला ते कळते.

’ तापाचे औषध पॅरासिटमॉल दिल्यावर ताप उतरतो की नाही ते पाहावे.

’ दोन तापांमध्ये रुग्णाचे वर्तन कसे असते ते बघावे. उदा: मूल नीट खेळते की सुस्त पडून राहते?

’ तापासोबत आणखी काही त्रास आहे का हे बघावे तसेच लघवीचे प्रमाण बघावे.

First Published on May 15, 2018 3:33 am

Web Title: article about fever in children