डॉ. दीपा दिनेश जोशी

drdeepadjoshi@gmail.com

जागतिक सर्वेक्षणातून पुढे आलेली मुला-मुलींमधील मानसिक अस्वास्थ्याबद्दलची आकडेवारी अस्वस्थ करणारी आहे. मुलामुलींमधील रागीटपणा, हिंसकवृत्ती, एकाकीपणा, नैराश्य वाढताना दिसत आहे. मध्यंतरी एका जागतिक सर्वेक्षणात ५० टक्क्य़ांहून अधिक मुले तणावग्रस्त आहेत, असे निष्पन्न झाले. त्याहूनही जास्त पालक तणावाखाली आहेत. हे सर्व होत असताना एक अनोखी संकल्पना उदयास आली आहे ती म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. वर उल्लेख केलेल्या मानसिक अस्वास्थ्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मुलांमधील सर्वसाधारण बुद्धय़ांक म्हणजे ‘आय ओ’ वाढलेला पण भावनिक बुद्धिमत्तेचा निर्देशांक म्हणजे भावनांक कमी झालेला दिसतो. अशा वेळेस आपल्या पालकत्वाला नवीन आयाम देणे गरजेचे आहे. फक्त प्रेम, सामान्य ज्ञान येथे उपयोगी नाही तर त्या पलीकडे जाऊन काही भावनिक बुद्धिमत्ता कौशल्य स्वत पालक म्हणून अंगीकारणे क्रमप्राप्त आहे.

भावनिक बुद्धिमत्ता कशी मोजायची?

भावनिक बुद्धिमत्ता मापन केल्यावर आलेल्या संख्येला आपण भावनांक म्हणतो. त्यासाठी जगभर काही शास्त्रशुद्ध अधिकृत मापन पद्धती अस्तित्वात आहेत. ढोबळ मानाने भावनांक मोजण्यासाठी प्रश्नावली दिली आहे. मुलांसाठी आणि पालकांसाठी वेगळी प्रश्नावली दिलेली असते. या प्रश्नावलीत खालील मुद्दय़ांच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात..

मूल भावना कसे व्यक्त करते / शब्दांचा वापर करते का?

  • दुसऱ्यांबद्दल आदर व आस्था
  • अपयशात-अवघड प्रसंगातील आशावाद
  • हवी असलेली गोष्ट मिळेपर्यंत संयम
  • वयाला अनुसरून ध्येयपूर्तीची कल्पना
  • एखादी गोष्ट ऐकण्यासाठी एकरूपता
  • इतर मुलांबरोबर मिसळू शकता का?
  • कुठलाही प्रश्न स्वतंत्रपणे सोडवण्याचा प्रयत्न मूल करतंय का?

पालकांसाठीही मुलांची बाजू आपण किती समजून घेत आहोत यासाठी प्रश्नावली असते. वरील प्रश्नांना तीन स्तरात गुण दिले जातात. या गुणांची बेरीज करून भावनांकाचा स्तर कमी प्रतीचा (१०-१५ गुण), साधारण (१६-२४ गुण) आणि उच्च दर्जाचा (२५ पेक्षा अधिक) असा निष्कर्ष काढला जातो.

भावनिक बुद्धिमत्ता विकसित झाल्याने त्याचे मुलांवर कोणते चांगले परिणाम दिसतात?

  • गेल्या दोन दशकांतील संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, मुलांचा भावनांक अगदी लहान वयापासून वाढवता येतो.
  • उच्च दर्जाचा भावनांक असलेली मुले मनमिळाऊ, खेळकर व संयमी असतात.
  • विविध तीव्र भावनांना ते सक्षमपणे सामोरे जातात.
  • लक्ष केंद्रित करत स्वतच्या ध्येयाच्या दिशेने प्रेरित होत काम करतात.
  • आशावाद, कौशल्यामुळे ते नैराश्याला बळी पडत नाहीत.
  • जीवनातील चढउतारांना, समस्यांना, आव्हानांना धीटपणे सामोरे जाऊ शकतात.

या सर्व गोष्टी अभ्यासातील यशासाठी आवश्यक असल्याने अशी मुले अभ्यासातही पुढे असतात. ती आनंदी व खेळकर असतात.

मुला-मुलींमध्ये भावनिक स्वास्थ्य राखण्यासाठी पालकांनी नेमके काय करावे?

बालरोगतज्ज्ञ म्हणून सर्व पालकांना अगदी कळकळीने सांगावेसे वाटते की शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य हे तितकेच महत्त्वाचे आहे. मुलांचे भावनिक स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी हे जरूर करा..

मुलांशी नियमित संवाद

संवाद या शब्दातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जाणीवपूर्वक ऐकणे किंवा बोलण्याला संवेदनशील कान देणे. मुलांशी बोलताना त्यांच्या बोलण्यामध्ये व्यत्यय आणू नका. त्यांना प्रश्न विचारू नका. त्यांच्या बोलण्यावर त्वरित प्रतिक्रिया देऊ नका. त्यावर टीका करू नका किंवा त्यांना सल्ला देऊ नका. त्यांना चांगले वाटावे म्हणून एखाद्या अडचणीवर त्वरित पर्याय देऊ नका. या सर्व गोष्टी चांगल्या संवादामधील अडथळे आहेत, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

माझे आई-बाबा खऱ्या अर्थाने समरस होऊन ऐकून घेत आहेत ही भावना त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. उदा. एखाद्या उदास, खिन्न बालकाशी बोलताना ‘मला दिसतंय की तुला या गोष्टीमुळे वाईट वाटत आहे’ हे वाक्य आपल्या बोलण्यातून जाणवले पाहिजे. काही मुले भावना व्यक्त करू शकत नाही. अशा वेळी भावना व्यक्त करण्याच्या इतर पद्धती जसे चित्र काढणे, गोष्टी लिहिणे, एखादी पाककृती करणे या गोष्टींना वाव देणे आवश्यक आहे. संवाद कधी कधी शब्दांच्या पलीकडे किंवा शब्दाविना खांद्यावर हात ठेवून किंवा पाठीवर शाबासकी देऊन मुलांना जवळ घेऊनही करता येतो. मुलांवर मागण्यांचे दडपण ठेवू नका. त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवा. कारण, जेव्हा पालक मुलांकडून अपेक्षा ठेवतात, तेव्हा ते स्वयंप्रेरित होतात. परंतु अपेक्षांचे रूपांतर मागण्यांत होऊ देऊ नका. नाहीतर मुलांवर दडपण येऊ शकते. मुलांना नेहमी आपल्या पंखाखाली घेऊ नका तर त्यांच्या पंखात बळ तयार करा.

मुलांना नियमित मैदानी खेळ व मित्र

मैत्रीणींसोबत मनसोक्त खेळण्यास वाव द्या. त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व बहरते. विविध भावनांना सामोरे जाण्याचे त्याचे कौशल्य वाढते. मुलांच्या ताण-तणावाकडे डोळसपणे पहा. मुलांच्या वागणुकीतील बदलांकडे बारकाईने लक्ष द्या. गरज पडल्यास बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. मुलांच्या समतोल आहाराकडे जरूर लक्ष द्या. मुलांचे हिमोग्लोबीन चांगले असेल तर त्यांचे मानसिक स्वास्थ्यही चांगले राहते. आपले मूल भावनिक निरोगी व्हावे यासाठी पालकांनी स्वतमध्ये बदल घडवणे व मुलांना सक्षम करण्यासाठी स्वत सक्षम होणे ही आता काळाची गरज आहे.