20 February 2019

News Flash

रोबोटिक शस्त्रक्रिया

रोबोटिक शस्त्रक्रियेचे तंत्रज्ञान एक प्रकारचा व्हिडीओ गेम आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

मागील काही वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात आलेल्या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानापैकी एक म्हणजे रोबोटिक शस्त्रक्रिया. संगणकाच्या मदतीने केल्या जाणाऱ्या रोबोटिक शस्त्रक्रियेत त्रुटींना वाव नसतो, जखमा कमी होतात आणि त्यामुळेच रुग्ण लवकर पूर्ववत होण्यास मदत होते. मात्र या शस्त्रक्रिया अजूनही काही मोजक्याच रुग्णालयांत उपलब्ध असून अत्यंत महागडय़ा आहेत. पुढील काही वर्षांत या शस्त्रक्रियेचे तंत्रज्ञान कमी किमतीत उपलब्ध झाले तर त्या सामान्यांच्या आवाक्यात येऊ शकतील. या शस्त्रक्रियेविषयीची ही माहिती.

विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीनुसार सर्वच क्षेत्रात बदल होत असतात. वैद्यकीय क्षेत्रही त्याला अपवाद नाही. गेल्या दोन दशकांत औषधोपचार आणि शस्त्रक्रियांच्या प्रकारात तसेच त्यासाठी वापरात असलेल्या तंत्रज्ञानातही बदल झाले. असाच एक प्रकार म्हणजे रोबोटिक शस्त्रक्रिया. रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे रोबोट किंवा संगणकीकरणातून केली जाणारी शस्त्रक्रिया. १९८० साली अमेरिकेत पहिल्यांदा रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर १९९८ साली पहिली रोबोटिक बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. २०१० नंतर भारतात रोबोटिक शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले.

रोबोटिक शस्त्रक्रियेचे तंत्रज्ञान एक प्रकारचा व्हिडीओ गेम आहे. स्क्रीनवर दिसणाऱ्या शरीराच्या अवयवांच्या चित्रफितीचे आकारमान कमी जास्त करत, यांत्रिक हातांना योग्य ते निर्देश देत ही शस्त्रक्रिया केली जाते. यासाठी शस्त्रक्रियागृहात दोन उपकरणे असतात. यातील एक उपकरण (टेलीमनीप्युलेटर) तज्ज्ञांकडून हाताळले जाते तर दुसऱ्या उपकरणाच्या (यांत्रिक हात) माध्यमातून प्रत्यक्ष शस्त्रक्रिया केली जाते. टेलीमनीप्युलेटरमध्ये तज्ज्ञाच्या पायाखाली आणि हाताजवळ हॅण्डल स्वरूपातील स्वतंत्र यंत्र बसविले जाते. हॅण्डलच्या साहाय्याने तज्ज्ञ शस्त्रक्रिया करतो. तर पायावरील यंत्राच्या माध्यमातून स्क्रीनवरील दृश्यफितीच्या आकारमानात बदल करता येतो. स्क्रीनवर (थ्रीडी)अधिक स्पष्टता असल्याने शस्त्रक्रिया करणे सोयीचे जाते.

रोबोटिक शस्त्रक्रिया करताना त्वचा जास्त प्रमाणात कापावी लागत नाही. तर ज्या भागाची शस्त्रक्रिया करायची त्यावर लहान चीर पाडली जाते. सात मिलिमीटरच्या छेदातून यांत्रिक हातांच्या सहाय्याने दुर्बिण रुग्णाच्या पोटात बसविण्यात येते. दुर्बिणीच्या साहाय्याने शरीराचा भाग डॉक्टरांना स्क्रीनवर दिसू लागतो. त्या चित्रफितीच्या आधारे तज्ज्ञ शस्त्रक्रिया करतो. याच लहान छिद्रातून यंत्र शरीराच्या आत सोडले जाते. शरीराअंतर्गत गेलेल्या यंत्राच्या माध्यमातून शल्यचिकित्सा केली जाते. हे करताना डॉक्टरांचे यांत्रिक हातांवर पूर्ण नियंत्रण असते. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार यांत्रिक हातांद्वारे अत्यंत सराईतपणे शस्त्रक्रिया केली जाते. कमी जखमा, छोटी उपकरणे हाताळणे यंत्राला शक्य होते. त्यामुळे शस्त्रक्रिया रोबोमार्फत करून घेणे सोपे जाते. या रोबोटला तीन ते चार हात असतात. शस्त्रक्रियेनंतर टाके घालण्याचे कामही या यंत्रामार्फत केले जाते.

या प्रकारात रक्त वाया जाण्याचे प्रमाण कमी असते. ओपन शस्त्रक्रियेसाठी तीन तासांचा अवधी लागतो. मोठय़ा प्रमाणात रक्त वाया जाते. तर रोबोटिकमध्ये त्याहून निम्मा वेळ लागतो. आणि यात रक्त वाया जात नाही. त्यामुळे रक्ताची गरज पडत नाही. शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुढल्या दोन ते तीन दिवसांत रुग्ण कामावर रुजू होऊ शकतो. संगणकाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या या शस्त्रक्रिया अतिशय सूक्ष्म पातळीवर केल्या जात असल्याने हा प्रकार कमी वेदनादायी असतो. त्याशिवाय या प्रकारात जास्त त्वचा कापावी लागत नसल्याने त्वचेवर व्रण राहण्याची शक्यता कमी होते. भारतात मूत्रपिंड, मूत्राशय, मेंदू, घसा, फुप्फुसे, स्त्रीरोग यासाठी रोबोटिक शस्त्रक्रिया करता येऊ शकते. मात्र मेंदू आणि हाडांच्या आजारांवर भारतात तरी शस्त्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी सुमारे ४ ते ५ लाखांपर्यंत खर्च येतो.

रोबोटिक पद्धतीने गुडघे प्रत्यारोपण –

रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येते. जेथे दुखापत झाली आहे त्याच ठिकाणी आणि तेवढय़ाच भागावर रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया केली जाते. यावेळी गुडघ्याच्या सांध्याजवळील इतर भागाला दुखापत होत नाही तसेच हाडांच्या मजबुतीवर परिणाम होत नाही. वयोवृद्धांमधील गुडघेदुखीच्या समस्या लक्षात घेऊन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांना उपाय म्हणून हे तंत्रज्ञान ज्येष्ठांसाठी उपयुक्त आहे. रोबोटिकच्या साहाय्याने गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अत्यंत वेदनारहित असून रुग्णांची प्रकृती लवकर सुधारते. या शस्त्रक्रियेदरम्यान कमीत कमी रक्तस्राव होतो.

वैद्यकीय क्रांती

दुर्बीण शस्त्रक्रियेपेक्षा रोबोटिक शस्त्रक्रिया अतिशय सुलभ पद्धतीने होते. मूत्राशय, हृदय, थोरासिकमध्ये मोठय़ा प्रमाणात शस्त्रक्रिया होते. जठर, मूत्रपिंड, गर्भाशय, घसा आणि कर्करोगासारख्या आजारांवर रोबोटिक पद्धतीने उपचार करणे अधिक सोपे असते. प्रोटेस्ट ग्रंथीच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्याची क्रांती रोबोटिक शस्त्रक्रियेने केली आहे. भारतात मुंबई, दिल्ली, बंगळुर आणि कलकत्ता येथे रोबोटिक शस्त्रक्रिया केली जाते.

– डॉ. युवराज टी. बी.
कर्करोगतज्ज्ञ आणि शल्यचिकित्सक

First Published on February 6, 2018 4:23 am

Web Title: article about robotic surgery