18 January 2019

News Flash

समाजमाध्यमांचं व्यसन!

समाजमाध्यमांचे आपल्या मेंदूवर होणारे परिणाम हे मुळात मेंदूमधल्या डोपामिन यंत्रणेवर होत असतात.

प्रतिनिधिक छायाचित्र

डॉ. मनोज भाटवडेकर

समाजमाध्यमांचे आपल्या मेंदूवर होणारे परिणाम हे मुळात मेंदूमधल्या डोपामिन यंत्रणेवर होत असतात. आपल्या आयुष्यातले सर्व सुखद अनुभव आपण या यंत्रणेतून घेतो. समाजमाध्यमांच्या सततच्या वापरामधून आपण या यंत्रणेला फक्त त्याच एका पद्धतीने सुखद जाणिवा निर्माण करण्याचं शिक्षण देतो.

समाजमाध्यमं आपल्या आयुष्यात खाणंपिणं, झोपणं, बसणं-उठणं यांच्याइतकीच (की त्याहूनही जास्त?) महत्त्वाची झाली आहेत. कितीही व्यग्र दिनक्रम असलेली व्यक्ती दिवसाचा बराचसा वेळ समाजमाध्यमांवर घालवताना दिसते. अफाट संपर्कक्षमता आणि सहज (खरं तर फुकट) उपलब्धता या दोन गुणांमुळे सामाजिक माध्यमांचा वापर लोकप्रिय झाला आहे. दूर असलेल्या निकटवर्तीयांच्या संपर्कात राहण्यासाठी किंवा चटकन एखादा संदेश कोणाला तरी पाठवण्यासाठी समाजमाध्यमं मोलाचं काम करतात याबद्दल शंकाच नाही. पण त्यांच्या आहारी गेल्यामुळे होणारे दुष्परिणाम हा चिंतेचा आणि शास्त्रीय संशोधनाचा विषय झाला आहे.

समाजमाध्यमांचे आपल्या मेंदूवर होणारे परिणाम हे मुळात मेंदूमधल्या डोपामिन यंत्रणेवर होत असतात. आपल्या आयुष्यातले सर्व सुखद अनुभव आपण या यंत्रणेतून घेतो. समाजमाध्यमांच्या सततच्या वापरामधून आपण या यंत्रणेला फक्त त्याच एका पद्धतीने सुखद जाणिवा निर्माण करण्याचं शिक्षण देतो. साहजिकच मोकळा वेळ असेल किंवा थोडासा ताण जाणवत असेल तेव्हा म्हणजेच सुखद जाणीव निर्माण करायची गरज भासल्यावर आपण चटकन उपलब्ध असलेल्या समाजमाध्यमांकडे वळतो. यातून या माध्यमांचा गैरवापर सुरू होतो आणि शेवटी त्याचं व्यसन लागू शकतं. दिवसाचा काही काळ इंटरनेट उपलब्ध नसेल किंवा मोबाइल फोन, संगणक बिघडला तर चिडचिड करून घर डोक्यावर घेणारी मंडळी हल्ली वाढली आहेत! एखाद्या अमली पदार्थाचं व्यसन लागलं  आणि ते मिळालं नाही की जशी लक्षणे दिसू लागतात तशीच लक्षणे समाजमाध्यमांपासून वंचित राहावी लागल्यास होतात. सध्या दिवसातून सहा तासांपेक्षा जास्त वेळ या माध्यमांपायी खर्च करणारी अनेक तरुण मुलं-मुली आहेत. त्यांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा विपरीत परिणाम झाला नाही तरच नवल. त्यांचा रात्रीचा बराचसा वेळ चॅटिंगमध्ये जात असल्याने रात्रीची झोप नीट होत नाही. दिवसा पेंगुळलेलं राहणं, सुस्त किंवा मरगळलेलं राहणं यामुळे अभ्यासावर विपरीत परिणाम होतो. दिवसभर शारीरिक व्यायाम नसेल तर भूक आणि चयापचय बिघडतात. मधुमेह किंवा रक्तदाब यासारख्या जीवनशैलीच्या आजारांना यामधून सुरुवात होऊ  शकते. चिडचिड आणि मानसिक असंतुलन व्हायला सुरुवात होते. शरीर आणि मन या मुळात दोन वेगळ्या गोष्टी नाहीत, आपल्या सोयीसाठी आपण केलेली ती विभागणी आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं.

समाजमाध्यमांमधून सतत आपल्याला कसली ना कसली तरी धमकी स्थूल किंवा सूक्ष्म स्तरावर मिळत असते. उदा. आता अमुक कायदा लागू होणार, त्यामुळे जीवनावर परिणाम होणार किंवा आता पाऊस कमी किंवा जास्त पडणार, किंवा शेअर मार्केट कोसळणार इ. इ. या बातम्यांवर उलटसुलट चर्चाही होत असते. एखाद्या विषयावरून वाद सुरू असतात. या धमक्यांमुळे आपल्या नकळत एका प्रकारची मानसिक असुरक्षितता आणि त्यातून ताण निर्माण होतात. वैचारिक पातळीवर आपल्याला हे पटत असतं की ही धमकी जेवढी वाटते, तेवढी प्रत्यक्षात धोकादायक नाही. पण ती सतत आदळल्यामुळे त्यातून मानसिक संतुलन बिघडतं. महत्त्वाची गोष्ट ही की याच असुरक्षिततेपोटी आपण पुन्हा पुन्हा समाजमाध्यमांकडे जातो. यातून एक प्रकारचं दुष्टचक्र तयार होतं.

समाजमाध्यमांमधून बोकाळलेला आणखी एक प्रकार म्हणजे स्वत:च्या आयुष्याचं अवाजवी आणि अवास्तव (अर्थातच अनावश्यक) सकारात्मक प्रदर्शन. फेसबुक, स्नॅपचॅट किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर  ‘आपण किती छान छान दिसतो, आपण किती आनंदात आहोत’ याचं सचित्र प्रदर्शन करण्याकडे अनेकांचा कल आहे. किंबहुना तो त्या माध्यमांचा एक मुख्य हेतू आहे. अतिआत्मकेंद्री किंवा अतिन्यूनगंडाने पछाडलेली (तो न्यूनगंड झाकण्यासाठी) मंडळी हे प्रदर्शन करत असतात. त्यातून लाइक्स, टाळ्या मिळवण्याची चटक लागते. प्रदर्शनही एकांगी आणि खोटं आणि लाइक्सही खोटे- कधी कधी न वाचताही दिलेले! सगळंच व्हर्चुअल. यातून चढाओढ, स्पर्धा, मत्सर, इर्षां वाढीला लागतात. लाइक्स न मिळाल्यास दु:ख होतं. आधीच असलेला न्यूनगंड वाढीला लागतो. त्यावर उपाय म्हणून व्यक्ती पुन्हा समाजमाध्यमांकडेच खेचली जाते आणि आणखी एक प्रकारचं दुष्टचक्र तयार होतं.

या दुष्टचक्राची आपोआप तयारी होणारी दुसरी बाजू म्हणजे समाजमाध्यमांच्या आहारी गेलेली मंडळी प्रत्यक्ष माणसांच्या भेटीगाठींपासून मात्र दूर राहतात. त्यामुळे वास्तव जगाशी त्यांचा संपर्क कमी येतो. पौगंडावस्थेतील मुलांना किंवा तरुणांना या संपर्काची आत्यंतिक गरज असते. प्रत्यक्ष संवादातील देहबोलीतून होणारा संवाद हा अत्यंत महत्त्वाचा भाग शिकण्याची या वयात नितांत आवश्यकता असते. तो कुठल्याही प्रकारे समाजमाध्यमांतून शिकता येत नाही. प्रत्यक्ष आयुष्यातले संघर्ष, त्यावरचे उपाय, नातेसंबंधांचं व्यवस्थापन यांचं शिक्षण मुलांना प्रत्यक्ष आयुष्यातूनच मिळतं. समाजमाध्यमं याही बाबतीत निरुपयोगी ठरतात. समाजमाध्यमांच्या आहारी गेलेली मुलं एकलकोंडी असण्याची शक्यता जास्त असते. त्यांची सामाजिक कौशल्य कमी विकसित असतात. त्यांची ताण सहन करण्याची क्षमता कमी असते. माझे फेसबुकवर इतके हजार मित्र आहेत म्हणजे आपण खूप फ्रेण्डली आहोत या भ्रमाखाली ती असतात. त्यांना इतरांशी नातं जोडताना खूप अडचणी येऊ  शकतात. स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामवर दिवसातून दोन तासांपेक्षा जास्त काळ घालवणाऱ्या मुलांच्या बाबतीत कुठल्या तरी मानसिक आजाराचं निदान होऊ  शकतं, असंही संशोधन प्रकाशात आलं आहे.

प्रामाणिक आढावा घ्या!

* एखाद्या अमली पदार्थाचं व्यसन लागलं आणि ते मिळालं नाही की जशी लक्षणे दिसू लागतात, तशीच लक्षणे सामाजिक माध्यमांपासून वंचित राहावी लागल्यास होतात.

* सामाजिक माध्यमांमधून सतत आपल्याला कसली ना कसली तरी धमकी स्थूल किंवा सूक्ष्म स्तरावर मिळत असते.

* या धमक्यांमुळे आपल्या नकळत एक प्रकारची मानसिक असुरक्षितता आणि त्यातून ताण निर्माण होतात.

* पौगंडावस्थेतील मुलांना किंवा तरुणांना प्रत्यक्ष भेटीतील संपर्काची आत्यंतिक गरज असते.

* या माध्यमांच्या नावाखाली आपले दिवसाचे किती तास खर्च होतात त्याचा एक प्रामाणिक आढावा घेतला तर अनेक गोष्टी सोप्या होतील.

उपाय काय?

समाजमाध्यमं वापरणारे आपण आहोत हे भान जर मुळातच असेल तर हे लक्षात येईल की त्यांचा वापर कसा करायचा हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. या माध्यमांच्या नावाखाली आपले दिवसाचे किती तास खर्च होतात त्याचा एक प्रामाणिक आढावा घेतला तर अनेक गोष्टी सोप्या होतील. मधून मधून या माध्यमांपासून लांब राहावं हे उत्तम. फक्त याच माध्यमातून लोकांशी संपर्क साधण्यापेक्षा जेव्हा आणि जिथे शक्य असेल तेव्हा आणि तिथे प्रत्यक्ष भेटणं जास्त श्रेयस्कर. दिवसाचा काही वेळ व्यायाम, छंद, योग किंवा ध्यान यांना दिला तर त्यामुळे जीवनशैलीत सकारात्मक बदल होतात. सध्या तथाकथित ‘बिझी’ मंडळी आपला आधीच कमी असलेला वेळ समाजमाध्यमांना खाऊ  देताहेत. त्यांनी सावध व्हावं आणि समाजमाध्यमांचा वापर तारतम्याने करावा.

– डॉ. मनोज भाटवडेकर, मानसोपचारतज्ज्ञ

drmanoj2610@gmail.com

First Published on May 8, 2018 4:18 am

Web Title: article about social media addiction