लैंगिक संबंधांतून ज्या रोगांचा संसर्ग होतो त्या रोगांना गुप्तरोग म्हटले जाते. यांना गुप्तरोग म्हणण्यापाठी दोन कारणे- एक म्हणजे असे आजार व्यक्ती स्वत:च गुप्त ठेवते आणि दुसरे म्हणजे अनेकदा हे आजार गुप्त अवस्थेत राहतात आणि रुग्णालाही आजाराचा संसर्ग झाल्याचे कळत नाही. काही काळ गुप्त राहून त्यानंतर मोठय़ा प्रमाणात हे आजार उचल खाऊ  शकतात आणि काही वेळा प्राणघातकही ठरू शकतात. अशा आजारांना गुप्तरोग अशी संज्ञा असली तरी या रोगांबाबत गुप्तता न ठेवणेच योग्य. केवळ गुप्तता ठेवण्याने असे रोग बळावून जीवघेणे ठरू शकतात. एड्स किंवा अलीकडच्या काळात निदर्शनास आलेले काही आजार वगळता इतर सर्व गुप्तरोगांवर आज उत्तम औषधे निघाली आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला गुप्तरोग होऊ  शकेल, असे लैंगिक संबंध जर आपण कुणाशी ठेवले असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या तपासण्या करून घेणेच योग्य.

नपुंसकता, लैंगिक दुर्बलता, शीघ्रपतन अशा लैंगिक तक्रारींबाबतही बहुतांश वेळा लोक गुप्तता पाळतात. पण यांना गुप्तरोग म्हटले जात नाही. हस्तमैथुनालाही काहीजण गुप्तरोग मानतात. हस्तमैथुन हा गुप्तरोग तर नाहीच, पण साधा आजारही नाही. हस्तमैथुन हा एक सामान्य प्रकार आहे. तो अपायकारकही नाही आणि त्यासाठी कुठल्या औषध उपचारांची गरजही नाही. लैंगिक संबंधातून विशिष्ट जंतू, विषाणू किंवा बुरशीची (फंगस) लागण झालेल्या रोगांना गुप्तरोग म्हटले जाते.

medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
siblings jealousy
भावंडांबद्दल वाटणारा मत्सर कसा कमी कराल? ‘या’ छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसेल सकारात्मक बदल

सिफीलीस :

यालाच उपदंश व गर्मी अशीही नावे आहेत. ट्रीपोनिमा पॅलिडम या जंतूमुळे हा आजार होतो. आजार झालेल्या व्यक्तीशी संभोग केल्याने या जंतूंचा संसर्ग होतो, तसेच आजार झालेल्या इंद्रियाला ओठाने किंवा जिभेने स्पर्श झाल्यासही याची लागण होऊ  शकते.

जंतूंची लागण झाल्यानंतर सुमारे १५ ते ३० दिवस कुठलीही लक्षणे शरीरावर उमटत नाहीत. त्यानंतर मात्र ज्या ठिकाणाहून जंतूंचा प्रवेश शरीरात झाला असेल त्या ठिकाणी एक मोठा फोड येतो. हा फोड अजिबात दुखत नाही. हा फोड स्वत:हून फुटतो आणि त्यातून पारदर्शक द्रवपदार्थ बाहेर येतो. त्यानंतर फोड आलेल्या ठिकाणी एक कठीण असा व्रण तयार होतो. हा व्रणही अजिबात दुखत नाही आणि चार ते सहा आठवडय़ात कुठल्याही औषध उपचाराशिवाय बरा होतो. व्रण बरा होताच आपण बरे झालो असा समज व्यक्ती करून घेते. सिफीलीसच्या या लक्षणांना प्राथमिक अवस्था म्हटले जाते.

यानंतर एक आठवडा ते सहा महिन्यांमध्ये कधीही, सिफीलीसच्या दुसऱ्या अवस्थेची लक्षणे दिसू लागतात. सुरुवातीला ताप येऊन जांघेत गाठी येतात. या गाठी दुखत नाहीत. याच काळात सबंध अंगावर गुलाबी पुरळ येतात. पुरळ आले तरी त्याला खाज मात्र येत नाही. जननेंद्रिय आणि गुदद्वाराजवळ ओलसर व्रण निर्माण होतात. याखेरीज वृषणांना सूज येऊन ते दुखू शकतात. भूक मंदावणे, वजन कमी होणे, सांधेदुखी, डोकेदुखी, केस गळणे, आवाज घोगरा होणे ही लक्षणेही दिसू शकतात. ही सर्व लक्षणे तीन ते सहा महिने राहतात. त्यानंतर मात्र कुठल्याही औषधाशिवाय ही लक्षणे बरी होतात. पुन्हा एकदा व्यक्तीला आपण पूर्ण बरे झाल्याचा भास निर्माण होतो. या लक्षणांचा संबंध आपण काही महिन्यांपूर्वी ठेवलेल्या लैंगिक संबंधाशी आहे  हेसुद्धा अनेकांच्या ध्यानात येत नाही. अनेक डॉक्टरही केवळ या लक्षणांवरून सिफीलीस या रोगाचे निदान करण्यात कमी पडतात.

या अवस्थेनंतर हा रोग काही काळ सुप्त अवस्थेत राहतो. या काळात रोगाचे जंतू हळूहळू मेंदू, डोळे, मज्जारज्जू, हृदय, रक्तवाहिन्या आणि हाडांमध्ये शिरतात. त्यानंतर सिफीलीसच्या अखेरच्या अवस्थेची लक्षणे उमटू लागतात. ही लक्षणे गंभीर स्वरूपाचे हृदयरोग, अर्धागवायू, अंधत्व, वेड लागणे यापैकी काहीही असू शकतात. अखेरीस रुग्णाला अत्यंत वेदनादायी मृत्यूला सामोरे जावे लागते.

सिफीलीस झालेल्या स्त्रीकडून हा आजार तिच्या गर्भाला होऊ  शकतो. सिफीलीस हा रोग पंधराव्या शतकाच्या अखेरीस युरोप खंडात सर्वात प्रथम दिसून आला. १९०५ साली या रोगाचे जंतू शोधून काढण्यात शास्त्रज्ञांना यश आले. सुरुवातीस हा रोग असाध्य मानला गेला, पण पेनीसिलीन या औषधाचा शोध लागल्यानंतर त्याच्या वापराने सिफीलीसवर खात्रीलायक उपाय होऊ  लागला. आजही पेनीसिलीन हेच औषध सिफीलीससाठी सर्वोत्तम मानले जाते. पेनीसिलीन न मानवणाऱ्या लोकांमध्ये टेट्रासाइक्लीन किंवा एरिथ्रोमाइसीन या औषधांच्या उपयोगाने सिफिलीसवर उपाय केला जातो.

गनोरिया आणि हर्पीस या आजारांविषयी पुढच्यावेळी माहिती घेऊया.

-डॉ. राजन भोसले, लैंगिक विज्ञानतज्ज्ञ.