वजनवाढ होताना स्त्रियांमध्ये दंड, मांडय़ा, पोट, पाश्र्वभाग अशा ठिकाणी विशेषत: मेदसंचय होतो. उंची, वय, लिंग आणि वजन यांचा समतोल राखणे आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे असते. अनेकदा वजन कमी करून घेण्यासाठी शस्त्रक्रियेसारखे टोकाचे पर्याय स्वीकारले जातात. त्यापेक्षा जीवनशैलीतील काही बदल वजन आटोक्यात ठेवण्यासाठी मदत करतात.

वजनवाढ म्हणजे नक्की काय?

घेतलेले उष्मांक आणि शारीरिक हालचालींद्वारे खर्च होणारे उष्मांक यांचे गणित चुकले आणि उष्मांक शरीरात मेदाच्या स्वरूपात साठू लागले की वजन वाढू लागते. शरीरातील मांसपेशी, स्निग्ध पदार्थाचा साठा, द्रव पदार्थाची साठवणूक यांमुळे शरीराचा एकूणच भार आणि आकार वाढतो. अन्नपदार्थाद्वारे अधिक प्रमाणात घेण्यात येणारी कबरेदके शरीरात शॉर्ट चेन फॅटी अ‍ॅसिडमध्ये रूपांतरित होतात. म्हणूनच आहार व विहार (व्यायाम) याचा समतोल राखणे आवश्यक ठरते.

विविध कारणे व उपचार

अयोग्य जीवनशैली

चौरस आहाराच्या अभावाने पुरेशी प्रथिने आणि उपकारक स्निग्ध आम्ल तसेच तंतुमय पदार्थ पोटात जात नाहीत. जंकफूड, इन्स्टंट फूड, पॅक फूड यांमुळे पोट व मन भरते, परंतु पोषणाचा बोजवारा उडतो. गोड आणि तळकट पदार्थ आवडीने खाल्ले जातात. हे सर्व शरीरात मेदाचा संचय करण्यात अग्रेसर ठरतात. अधिकचे उष्मांक खर्च होण्याएवढा व्यायाम केला जात नाही. चढणे, चालणे या गोष्टी टाळल्या जातात. या सर्वाचा परिपाक म्हणजे वजनवाढ!

* आहारात भाज्या व फळे मुबलक प्रमाणात असावीत.

* चणे, शेंगदाणे, डाळी, उसळी, अंडे, दूध, ताक, चिकन, मासे इ. प्रथिनांचा स्रोत पुरेसा असावा. यामुळे पोट लवकर रिकामे होत नाही आणि सतत भूक लागत नाही.

* तळलेल्या व गोड पदार्थाचे प्रमाण कमी करावे.

* हॉटेलमधील तसेच रस्त्यावरील पदार्थ टाळावे.

* नाश्ता व दुपारचे जेवण पोटभर करावे, मात्र संध्याकाळी पचनास हलके पदार्थ घ्यावेत आणि रात्री कमी जेवावे.

* आहारात कोशिंबिरी आणि ताकाचा मुबलक वापर करावा.

* वयाप्रमाणे झेपेल असा व्यायाम डॉक्टरांकडून समजून घ्यावा आणि नित्यनेमाने करावा. जमेल तिथे शक्यतो चालत जावे आणि जिन्याचा वापर करावा. सूर्यनमस्कार घरच्या घरी करता येतात. मुले व तरुणांनी वेगवान व्यायाम करणे गरजेचे आहे. मैदानी खेळही खेळता येतात.

निद्रानाश व ताणतणाव

ताणतणावांमुळे अनेकदा पुरेशी झोप मिळत नाही आणि त्यामुळेही वजन वाढते. भूक वाढवणारी दोन संप्रेरके असतात. लेप्टीन व घ्रेलिन. सततच्या निद्रानाशामुळे लेप्टीन कमी होते आणि घ्रेलिन वाढते. घ्रेलिन हे भूक वाढवते आणि ऊर्जेचा खर्च मात्र होऊ  देत नाही. त्यामुळे खाण्याची इच्छा होते. उष्मांक पोटात जातात पण खर्च होत नाहीत. भुकेची संवेदनाही तळकट व गोड पदार्थाकडे नेणारी असते, जी शरीराचे नुकसान करते.

* योगसाधना करावी. प्राणायाम करावा. ताण-तणावाचे ओझे मित्रांबरोबर वाटून घ्यावे. छंद जोपासावे.

* झोपेसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने तात्पुरती औषधे घेता येतील.

* रात्री झोपताना दूध+मध+जायफळ पूड घ्यावी. यामुळे झोप येण्याकरता आवश्यक रसायने तयार होण्यास मदत होते.

वेदनामय आजार

अनेकदा मांसपेशींची सततची वेदना, सांधेदुखी, पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी अशा कारणांनी किंवा काही शस्त्रक्रियांनंतर शरीराची हालचाल पुरेशा प्रमाणात होऊ  शकत नाही पण खाणे मात्र आहे त्या मात्रेत सुरू राहते. यामुळेही वजन वाढते.

* फिजिओथेरपी घेऊन, योग्य व्यायाम शिकून हालचाली सुरू होतील असे पाहावे.

* नियमित औषधयोजनेने बरे वाटू शकते आणि त्यानंतर व्यायाम करता येतो.

* आहारात योग्य तो बदल करावा. उष्मांक कमी करावेत. तंतुमय पदार्थ वाढवावेत.

पेशींमध्ये पाणी साठणे

स्त्रियांमध्ये पाळी जातानाच्या वयात तसेच मुलींमध्ये पाळीपूर्व लक्षणांमध्ये संप्रेरकांचे असंतुलन आढळते. तसेच काही औषधांच्या परिणामानेही पेशींमध्ये अधिक प्रमाणात पाणी साठते. सोडियम हे पेशींमध्ये पाणी धरून ठेवते. आपल्या आहारात सोडियमयुक्त (मीठ) पदार्थाचा अतिरेक असेल (पॅक्ड फूड, हॉटेलमधील पदार्थ, लोणची, पापड, वेफर्स, फरसाण इत्यादी) तरीही असे पाणी शरीरात साठते.

* सोडियमचा वापर कमी करावा तसेच वर उल्लेखलेले पदार्थ टाळावेत.

* काकडी, कलिंगड, धने, बडिशेप अशा मूत्रल पदार्थाचा आहारात समावेश करावा. त्यांच्यामुळे शरीरातील साठलेल्या पाण्याचा निचरा होतो.

* काही वेळा अशा मूत्रल गोळ्या डॉक्टरांकडून दिल्या जातात. मात्र स्वत:च्या मनाने अशा गोळ्या घेऊ  नयेत.

* पाळीसंबंधित तक्रारींसाठी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

हायपोथायरॉइडिझम

आपल्या गलभागी/ मानेच्या समोरील भागात असणाऱ्या गलग्रंथी पुरेशा प्रमाणात संप्रेरके तयार होत नाहीत. ही संप्रेरके अन्नाची चयापचय क्रिया नियंत्रणात ठेवण्यासाठी गरजेची असतात. अशा वेळी शरीरात चरबीची निर्मिती अधिक होऊ  लागते आणि वजनात हळूहळू वाढ होऊ  लागते, यालाच आपण बोलीभाषेत थायरॉइडचा त्रास असे म्हणतो.

* सर्व तपासण्या वेळेवर कराव्या आणि योग्य ती औषध योजना सुरू ठेवावी.

* व्यायामाला पर्याय नाही, अन्यथा वजनाचा काटा पुढे जात राहील.

* आहारतज्ज्ञांकडून दैनंदिन आहाराचे कोष्टक तयार करून घ्यावे आणि ते पाळावे.

इतर कारणे

पीसीओएस, कशिंग्स सिंड्रोम, मलावरोध, गर्भारपण, नैराश्य, पाण्याचे प्रमाण कमी आणि अन्नसेवन अधिक असणे इत्यादी अनेक कारणे वजनवाढीस जबाबदार ठरतात. तेव्हा उंची, वय व वजनाचा आढावा सतत घेत राहणे. आहार-व्यायाम व औषधे हे त्रिसूत्री या बाबतीत यशस्वी ठरते.

मधुमेह

मधुमेही व्यक्तींमध्ये चयापचयाची क्रिया बिघडलेली असते. शरीरातील रक्तशर्करा व इन्शुलिन यातील परस्परसंबंध बिघडलेले असतात. परिणामस्वरूपी सतत भुकेची जाणीव होत राहते आणि खूप खाल्ल्याने स्वाभाविकपणे वजनावर परिणाम होतो, खर्च न झालेले उष्मांक मेदात परिवर्तित होतात आणि शरीराचा भार वाढू लागतो.

* योग्य ती औषध योजना करावी

* आहारात तंतुमय पदार्थाचे प्रमाण वाढवावे (भाज्या, फळे, उसळी, डाळी).

* भूक भागवण्यासाठी द्रव पदार्थाचा समावेश करावा (सूप, ताक, पेज).

* कमी उष्मांकयुक्त आहाराचे सेवन करावे.

* रोज पुरेसा व्यायाम करावा.

* आहारात दालचिनी पूड, मोड आलेली मेथी, लसूण, जवस, कारले यांचा विशेष वापर करावा.

वय

साधारणपणे वयाच्या तिशी-पस्तिशीनंतर आपल्या चयापचयाचा वेग मंदावतो आणि मांसपेशींची झीज सुरू होते. या वेळी मांसपेशींना पूरक अशी प्रथिने घेणे गरजेचे असते, पण त्याचबरोबर व्यायाम आणि आहार हे गणित जुळवणेही आवश्यक असते. वयोपरत्वे आहार थोडा कमी करावा. नव्या नव्या व्याधीही या वयात मागे लागतात आणि मग हे दुष्टचक्र  थांबवणे कठीण होऊन जाते.

* चौरस आहार, उष्मांक, जंकफूड, खाण्याच्या वेळा यांचे समीकरण वयोपरत्वे बदलणे गरजेचे असते.

* भाज्या व फळे तसेच पुरेशी प्रथिने (दूध, ताक, उसळी, अंडी ) घ्यावीत.

* अपचन होत असेल तर वेळेवर चिकित्सा करावी आणि व्यायामाकडे लक्ष पुरवावे.

औषधांचे दुष्परिणाम

बीटा ब्लॉकर औषधे, काही वेदनाशामक औषधे, स्टिरॉइड्स, संप्रेरकांच्या गोळ्या, नैराश्यविरोधी औषधे यांसारख्या अनेक औषधांच्या नित्य सेवनाने वजनात वाढ होत असलेली दिसून येते. असे जाणवल्यास डॉक्टरांशी बोलून योग्य तो निर्णय घ्यावा.

काही गैरसमजुती

आरोग्यास  हितकारक म्हणून काही विशिष्ट अन्नपदार्थाचे अतिसेवन करीत राहिल्यानेही वजन वाढते. उदा. डार्क चॉकलेट, क्विनोआ, कवच फळे, बदाम, अक्रोड, हेजल नट, काजू इत्यादी भरपूर व्यायाम सुरू आहे म्हणून खाण्यावरील र्निबध पाळले नाही तरीही वजन वाढतेच.

रोज तळलेले पदार्थ आणि गोड पदार्थ थोडय़ा प्रमाणात खाल्लेले चालतात असाही एक गैरसमज असतो. हे पदार्थ बहुतेक वेळा मैद्याचे असतात. शेवटी यातून येणारे उष्मांक अधिकच्या मेदात परावर्तित होतात आणि वजनवाढीस कारणीभूत होतात.

dr.sanjeevani@gmail.com